शेतीचं स्वरूप, त्यातील स्थित्यंतरे, शेतीप्रधान संस्कृतीतलं स्त्रीचं स्थान याच्याशी जोडलेलं एक सांस्कृतिक संचित म्हणजे भाषेतील विविध म्हणी. मराठीतील विविध रोचक म्हणींच्या आधारे शेतीचा प्रवास उलगडून
दाखवणारा हा लेख.
‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ट नोकरी, करी विचार|’
या म्हणीला आदर्श मानण्याच्या सीमारेषेवर माझा जन्म झाला. दुसरं महायुद्ध सुरू होण्याच्या वर्षात तिथून पुढं स्वातंत्र्यप्राप्ती, म. गांधींचा खून, भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना, भाषावार प्रांतरचनेचा लढा, नंतरचा गोवा स्वातंत्र्य संग्राम अशा राजकीय-सामाजिक चळवळींच्या, चढउताराच्या काळात माझी अजाणतेपणापासून तरुण वयात येण्यापर्यंतची वाटचाल झाली. कळत्या-नकळत्या वयातल्या त्या वातावरणाचे नकळत संस्कार होत गेले.
माझा जन्म अर्धग्रामीण, अर्थशेतीव्यवस्था असलेल्या घरात झाला. म्हणजे असं की वडिलांच्या गावी आणि आईच्या माहेरी- माझ्या आजोळी दोन्ही घरी बर्यापैकी शेती होती. दोन्ही कुटुंबे जिराईत शेतीवर पूर्णपणे उपजीविका करणारी होती. पुणे शहरापासून दोन्ही गावे वीस-पंचवीस किलोमीटर (त्यावेळी १०-१२ कोस) अंतरावर होती. माझ्या धाकट्या काकांच्या शिक्षणासाठी पुण्यात एक बिर्हाड केलं होतं. माझ्या वडिलांनी नोकरी करावी आणि आईने दीर-नणंदांना सांभाळून प्रपंच करावा या हेतूनं हे घर केलं. तरी गावच्या शेतीच्या लोकांचा, नातेवाईकांचा अखंड राबता घरी असे आणि गावाकडे आम्हा मुलांसह आईचा दोन-दोन, चार-चार महिने गरजेनुसार मुक्काम असे. सगळी शेतीची कामे बहुतेक घरातली माणसे - आजी, आजोबा, काका, मामा, मामी असे सगळे करीत आणि घरी किंवा आजोळी गेलं तरी आईसह आम्हां भावंडांना, विशेषत: मला - थोरली मुलगी म्हणून सगळ्यांसह दळण-कांडणासह सगळी कामं करावी लागत. आजच्या शहरी मध्यमवर्गीय (आणि आजच्या शिकत असलेल्या ग्रामीणही) मुला-मुलींइतकी सवलत, लाड, कौतुकं होत नसत. कारण परंपराशील विशेषत: तेव्हाच्या फारशी शेतीयंत्रे नसण्याच्या काळात काम करणारी घरची माणसं हेच शेतीचं मुख्य भांडवल असे. त्यामुळे ‘कामावे तो/ती सामावे’ हे अनिवार्य होतं.
ही थोडी वैयक्तिक पार्श्वभूमी अशासाठी सांगितली की हे लेखन स्वानुभवाचे आहे. केवळ ग्रांथिक अभ्यास-अध्ययनातून झालेले नाही. जाणतेपणी या व्यक्तिगत अनुभवांना ग्रांथिक अभ्यासाची जोड मिळाली आणि जगण्याचे अन्वयार्थ उलगडत गेले.
संपूर्ण एकोणीस-विसावे शतक भारतीय समाजजीवनातला खळबळजनक काळ आहे. या काळात मागील दीड-दोन हजार वर्षांच्यापेक्षा अधिक काळातील ग्रामीण जीवनातही नकळत बदल घडले. त्यात विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकात भारताने दोन महायुद्धे अनुभवली. त्यामुळे परंपरानिष्ठ आणि शेतीनिष्ठ (केवळ शेतीप्रधान - पुस्तकी भाषेत ‘कृषिप्रधान’) जीवनच उखीर-वाखीर होत जाण्याचा हा काळ - संक्रमणावस्था होती. शेतीवरचे स्वास्थ्य हरवल्याच्या पाऊलखुणा दिसत होत्या. आधुनिक इंग्रजोत्तर शिक्षण घेतले आणि ‘रोख’ पैसा हाती येणारी ‘नोकरी’ शहरात मिळाली तर शेतीवर जगणार्यांचा भार कमी होतो, ती अनिवार्य गरज आहे, म्हणून ज्यांना आज आपण उच्चवर्णीय म्हणतो त्या शेतीपासून जमिनीपासून तुटून शहरी ‘पांढरपेशा-मध्यमवर्गीय’ झालेल्या कुटुंबांच्या या वर्गात येण्याचा तो प्रारंभकाळ, संक्रमणकाळ होता. अशा सीमारेषेवरच्या ‘अर्धग्रामीण’, ‘अर्धशेती’ अवस्थेतल्या अनुभवातून मला जे शेतीजीवन, कुटुंबव्यवस्था आणि विशेषत: स्त्री उमगली, ती मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
इंग्रजोत्तर यंत्रयुगाची शहरांतून चाहूल लागली होती तरी ग्रामीण जीवनात दिवसातून एकदा काही गावी ‘सर्विस बस’ पोचण्यापलीकडे यंत्रे पोचली नव्हती. म्हणून बहुतेक शेती आणि त्या कुटुंबाची दैनंदिन कामे यांना शारीरिक कष्टाशिवाय पर्याय नव्हता. शेतीकामात बैल, रेडा हे प्राणी कष्ट उपसायला जोडीदार होते. बाईला ‘शुक्राची चांदणी’ उगवल्यापासून (पहाटे सुमारे ३/३॥ वा.) उठून जात्यावर दळण दळण्याशिवाय पर्याय नव्हता. मग पाण्याचे नळ दूरची गोष्ट! नदीचे गाव असेल तर नदीवरून, अन्यथा विहिरीतून रहाटाने उपसून पाणी भरावे लागे. काही तालेवारांच्या परसात त्यांचे स्वतंत्र आड (लहान व्यासाची विहीर) किंवा विहिरी असत. म्हणजे दळणाच्या जोडीला पाणी उपसून भरण्याची कामे, घरात एकत्र दहा-बारा माणसांचे कुटुंब ... आबालवृद्धांचे, शेतावरचे एक-दोन कामकरी गडी, शेतात-दारात एखाद-दुसरी राखणदार धनगरी कुत्री, शिवाय येणारी-जाणारी या सर्वांचा न्याहारीपासून स्वयंपाक! घाटावर भाकरी, कोकणात भात/पेज! आमच्या घरात न्याहारीच्या भाकरीचा पहिला तवा उजाडताना चुलीवर जायचा. एक बाई ताबा घ्यायची. ही चूल बहुधा मुख्य स्वयंपाकघराबाहेर पाणी तापवण्याच्या आडोशाला असायची. शिवाय एखादी बाळंतीण बहुधा अखंड घरात-सासुरवाशीण किंवा माहेरवाशीण! ‘बाळंतिणीची खोली’ बहुधा स्वतंत्रपणे बर्याच घरांतून-वाड्यातून असे. तशीच मामाच्या शेतावरच्या घरात विटाळशिणीसाठी स्वतंत्र ‘कोपी’ असे. अगदी पुण्याला आम्ही रहात होतो त्या सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या शनिवार पेठेतल्या वाड्यातही ‘विटाळशिणींसाठी’ एक स्वतंत्र बाथरूम (तेव्हा ‘मोरी’) होती. ही प्रचंडच सुधारणा!
अशा पार्श्वभूमीवर स्त्री-पुरुष सर्वांनाच कष्टाशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे लग्नाळू मुलगी ‘कामाला वाघीण असणे’, ‘दहा माणसांच्या घरात समाधानाने नांदणारी असणे’, ‘उभ्यानं सासरी जाऊन आडव्यानं (मरणोत्तर तिरडीवरून) बाहेर येण्याची मानसिकता असणे ही कोणत्याही (काही अतिश्रीमंत अपवाद) स्तरातल्या मुलीची पात्रता ‘क्वालिफिकेशन’ असे. कष्ट भूषणाचे मानले जात.
कामाचा कंटाळा तुला भिकार्याचे मुली |
कामाचा सराव आम्हां तालेवाराच्या घरी॥
मोठं नांदतं घर हे सुनेचं भूषण -
-झाल्या तिन्हीसांजा दिवा लावू मी कोठे कोठे?
माझ्या सासर्यांचे चिरेबंदी गोठे॥
दळण दळण्याचा अभिमान खूप मोठा|
-जात्या तू इसवरा नको मला जड जाऊ|
बयाच्या (आईच्यंा) दुधाचा सया पाहतात अनुभाऊ॥ किंवा
-कुरूंदाचं जातं माझं सयानो पळतं |
माय माऊलीचं दूध मनगटी खेळतं ॥
आईनं लावलेली कष्टाची सवय वळण, भूषणाचे असो. अशा आशयाच्या अक्षरश: शेकडो ओव्या तेव्हा पाठ होऊन गेलेल्या.
म्हणून मग शेतकर्यांच्या घरात मुलगी द्यायची तर ती सुखात रहावी यासाठी ‘घर’ पारखून घेणं आलं.
आड पाण्याचा आणि कोठा दाण्याचा! (धान्याचा) असला आणि जावई ‘मनगटाला मनगय शोभणारा’ मुलीसारखाच कष्टाळू असावा. गणगोत ‘मोंया मनाचं’ असावं. आईबापासारखे सासू-सासरे आणि बहीण-भावासारखे दीर-नणंदा असाव्या ही अभिलाषाही अनेक ओव्यांतून दिसते.
‘सरलं दळण मी गं सरलं म्हणू कशी |
सासरी-माहेरी माझ्या भरल्या दोन्ही राशी॥
हा अभिमान! घरात कधी नकारात्मक (‘अमुक नाही, संपलं’) असं कर्त्या स्त्री-पुरुषांनी बोलू नये असा संकेत होता. त्यातून भाषा-वाक्प्रचार यांची वळणं ठरत. ‘बांगडी फुटली नाही, मंगळसूत्र तुटलं’ नव्हे -‘वाढवलं’ म्हणायचं. ‘दिसर विझला’ नाही ‘थोर झाला, वाढवला’ म्हणायचं. घरात रात्री एखादी चतकोर तरी भाकरी ‘लक्ष्मीसाठी राहिली पाहिजे. सगळं अन्न संपता उपयोगी नाही. एक की दोन! त्या भाषेचं चलनही आता परिस्थितीने भूतकाळात घालवलं आहे.
अशा शेतीनिष्ठ (यंत्रयुगपूर्व) कुटुंबात- समाजात स्त्रिया-पुरुष सर्वांनाच कष्टाशिवाय पर्याय नसतो. त्यात महाराष्ट्र अजूनही खूपसा जिराईत (केवळ पावसावरच्या) शेतीचा! तोही लहरी मोसमी पावसाचा. म्हणून पावसाच्या येण्या-जाण्यावर कामाचं नियोजन अपरिहार्य. मग पेरणीचे दिवस असले की ‘मढं पडलं तरी ते झाकून ठेऊन आधी शेतात जाणं’ अपरिहार्य असे.
अशा शेतीनिष्ठ समाजात शारीरिक कष्टाची क्षमता हेच सर्वांचे भूषण असते. त्यातूनच बाईला घरातलं दळण-कांडण, सडा-सारवण, धुणं-पाणी, मळणं-रांधणं अशी कामं करता करता त्यांचा अनुभव बोलीतून व्यक्त होतो. म्हणून ‘जात्यावर बसलं की ओवी सुचते.’ ही म्हणही खर्या अर्थाने ‘जाते संस्कृती’बरोबरच कालबाह्य होणे स्वाभाविक असते. जेव्हा पर्यायच नव्हता तेव्हा जाते ओढणे भूषणाचे होते. पण जेव्हा तुरळक का होईना गिरण्या आल्या तेव्हा ‘आली गिरण अनसूया, माझ्या जिवाची ग सखी, म्हणून तिचे उत्स्फूर्त स्वागतही झाले.
अल्पाक्षरी, यमक प्रासाच्या नादातून आपोआप बायकांच्या तोंडी म्हणी येत असत. माझी आजी तर सतत म्हणीतच बोलायची. बहुधा दर वाक्यात एखादी म्हण असायची. ‘म्हणता म्हणता म्हण झाली’, अशी म्हणीवरही म्हण झाली.
कुणी भाकरी करायला बसली की ‘भाकरी पहावी काठाला आणि बायको पहावी ओठाला’ म्हणत एका म्हणीत दोन पक्षी मारायचं कसब होतं. कष्टकरी माणसाचा आहारही दणकट. शिवाय जाता-येता चटक-मटक खाणं कुणालाच नसे. न्याहारी आणि दोन जेवणं. श्रमकरी कुटुंबात भाकरी प्रधान असे. गव्हाच्या पोळी, भात महाराष्ट्रत तरी सणवार सोडून नसे. इंग्रजोत्तर ‘रेशनच्या’ काळात आयात निकृष्ट गहू आणि एकूणच धान्य हा शहरी आहाराचा भाग झाला. म्हणून नाजूक-साजूक भाकरी थापून चालत नसे. ‘जिची भाकर जाड, तिचा नवरा धड|’ हे ओघानेच आले. अशा वेळी रोज अक्षरश: पायलीभर (सुमारे ४ किलो) पीठ रोज दळणं आलं. बायकांच्या अडचणीच्या वेळी किंवा एखाद्या तालेवार घरात मोलानं दळण दळून घेतलं जाई. अशा वेळी ‘तळे राखील, तो पाणी चाखील’, या न्यायानं ‘दळणारीचा पसा, शिंप्याचा कसा अन् सोनाराचा मासा’’ असणारच.
पसाभर धान्य का होईना दळणारीण चोरून ओच्यात (नऊवारीमुळे) घालणारच! भ्रष्टाचाराचं हे लघुरूपच! कधीकधी घरात एखादी चतुर कामचुकवी जाऊ, नणंद, भावजय असायचीच. स्वत: जात्यावर न बसतां दुसरं कुणी दळलेलं जात्याच्या पाळीभोवतालचं पीठ आपणच दळण दळल्याचं नाटक करीत भरायला लागली की तिच्यावर पाळत ठेऊन असलेली एखादी ज्येष्ठ बाई टोमणा मारी -‘दळणारीण गोजरी अन् भरणारीण निलाजरी.’ द्विभार्याप्रतिबंधक कायदा होण्यापूर्वी अनेक कष्टकरी कुटुंबात हक्काचं, घरात राबणारं माणूस म्हणून कधी मुलगा व्हावा म्हणून घरात सवत आणली की द्वंद्व, धुसफूस अटळ असे. वस्तुत: ती सवतही स्वेच्छेने दुसरेपणावर क्वचितच येई. पण ‘सवतीचं भांडण (कधी सासु-सुनांचं भांडण) आणि राळ्याचं कांडण (रात सरली) तरी सरत नाही-’ म्हणून सवतींनाच दोषी ठरवलं जायचं. पण काही ओव्यांमधून मात्र या प्रथेमागच्या पुरुषकेंद्री व्यवस्थेचं भान या अनक्षर (अडाणी नव्हे) पण शहाण्या प्रतिभावंत ओवीकर्त्यांना होतं याचा प्रत्यय येतो.
-सवतीवर लेक दिली, जशी साखरेची गोणी|
बाप विकून झाले वाणी॥
-सवतीवर लेक दिली पाहिली आपली सोयी|(सोय)
कसाबा हाती दिली गाई
-लेकीच्या पैक्यानं बाप झाला सग्रदूत |(समर्थ)
कसाबाच्या मागं गाई गेल्या हंबरत॥
-झाडाला लागला आंबा, आंबा नव्हं कृती कैरी|
सवतीवर बँक दिली बाप विकून झाले वैरी ॥
आजच्या भाषेत पितृप्रधान, पुरुषहितकेंद्री व्यवस्थेचं भान या स्त्रीच्या अंत:स्तरात नेमकं होतं, हे लक्षात येतं तरी ‘बाईचं जिंदगीचं खत’ घालून व्यवस्था जतन होत होती. मग ‘नवर्यानं मारलं न् पावसानं झोडलं, सांगायचं कुणाला?’ ही बहुसंख्यांची मानसिकता मारून मुटकून जतन केली जाई. तरी अभावग्रस्त कुटुंबाची परिस्थिती कधी कधी ‘घरात नाही दाणा (धान्य) अन् मालदार म्हणा|’ तर कधी ‘शेत धोंडाळ, बायको तोंडाळ अन् गवत गोंडाळ’ असलेल्या पुरुषाची कुचंबणाही व्यक्त होई. बहुपत्नीत्त्वामुळे कधी विजोड दांपत्ये दिसत. तरुण बाईची लैंगिक कुचंबणा होई. अशा वेळी ‘बाईल आली रुपात आन् नवरा चालला कुपात’, किंवा ‘राळ्याचा भात पंक्तीला अन् म्हातारा नवरा गंमतीला.’ असेही दिसे. मग एखादी धीट बाई थोड्या वाकड्या मार्गानेही जाई. ‘शेताआड चोरी आणि नवर्याआड शिंदळकी’ चाले. मग कधी ‘कुंपणानेच शेत खाल्लं’ म्हणण्याजोगी ती बाई राखणदार गड्या (सालदार)शीच संधान बांधून मोकळी होई. ‘घरच्यांचं वावडं अन् सालदार आवडं’ किंवा ‘वाड्यावर हुळा भाजू दे अन् पावन्याजवळ निजू दे.’ मग त्यातही गुप्तता- ‘अंबाडीच्या भाजीला जोंधळ्याची कणी अन् घरच्या धन्याला सांगू नका कुणी.’ याचाही बंदोबस्त व्हायचा यात शेतकरी कुटुंबातली अंबाडीच्या भाजीला जोंधळ्याची कणी (आजच्या क्वचित होणार्या नागर जीवनासारखी भाताची कणी नव्हे) अशी एक ‘रेसिपी’ ही लक्षात येते. यातून मग ‘मन जाणे पापा आणि आईच जाणे लेकराच्या बापा.’ हे जैविक सत्यही बाईला उमगल्याची खात्री पटते.
पण एकूण आपल्या ‘बाईच्या मर्यादेत’ राहणार्याच बहुसंख्य. म्हणून ‘पुरुषाच्या कष्टाचं खावं, पण दृष्टीचं खाऊ नये,’ हे भान. ‘साप म्हणू नये बापडा अन् नवरा म्हणू नये आपला’ हे उमगून राह्यलं की शीण कमी होतो, असं समजून ‘पदरी पडलं अन् पवित्र झालं,’ म्हणून सहन करायचं. मग घरात टिकून आपलं स्थान पक्कं करायचं तर ‘पुत्रवती’ होणं हा प्रतिष्ठेचा भाग होई. ‘शेताचा आरा, गाईचा गोर्हा अन् पाळण्यातला हिरा (तान्हा)’ असले की बाईचं जगणं कृतार्थ होई.
शेतात धान्य पिकणं ही जगण्याची शाश्वती. म्हणून चातुर्मासातले सगळे सणवार, व्रते-उत्सव मुळात शेतीनिष्ठ समाजाची निर्मिती ‘शेताचं फूल, जागवी चूल,’ हेच सत्य पण कष्टाने पिकवलेल्या शेताच्या उत्पन्नालाही हजार जळवा लागलेल्या. अजूनही ‘शेत करता हरकली अन् सारा (कर) देता टरकली’ किंवा ‘वावरभर कापूस पिकला अन् वार्यावर पिंजला गेला.’ (विकला गेला नाही) तर पुन्हा हाल. एखादे वर्षी मनासारखं पीक नाही आलं तर ‘शेत पिकत नाही, पेठ पिकते’ (बाजारात व्यापार्यांचा फायदा होतो) म्हणून जिवापाड शेताला जपायचे. ‘शेती (शेतावर) राहणे, त्याला नसे उणे,’ सगळं कुटुंब शेतावर राहून खपत राहतं, तरी घरात बाई शेतकरी हा हा कुटुंबाचा मोठा आधार... निरनिराळ्या नात्यांनी याीही जाण या व्यवस्थेला होती. ‘शेता जाय पावसु अन् पुता जाय आवसु (आई)’ अशी कोंकणात म्हण असते. तर ‘घोड्यावरला बाप मरो, पण चुह्हा जोडनी माय ना मरो.’ अशी खानदेशी म्हण असे. तर कधी ‘शेताचं झाकण पाड (डोंगर) अन् घराचं झाकण बाई’ किंवा ‘शेताला आताडी आणि घराला म्हातारी’ हे आधार असतात. ‘शेती शेती जिवाची माती’ हे कायमचं सत्य होतं.
कळत नकळत श्रमकर्याच्या मनात ‘मातीत हात न घालणार्या जातीविषयी अढी असली तर नवल नाही.’ ‘शेतकर्याच्या खांद्यावर घोंगडी, शिळी भाकरी पोट भरती अन् बामणाला तूपपोळी मरमर चोळती’ किंवा ‘सगळी बायको साळ्याची (विणकराची) अर्धी बायको माळ्याची अन् रीणकरीण बायको ब्राह्मणाची.’ हे सत्य श्रमणार्यांच्या अनुभवातलं होतं. मग शेतकर्याच्या बायकोला कधीच विश्रांती नाही. अगदी बाळंतीण होईपर्यंत आणि नंतरही चार-सहा दिवसातच कामाला लागणं भाग होतं. अनेकदा बाळंतपणच जीवघेणं ठरे.‘कुणब्याचं मरण शेती अन् बायकोचं मरण वेती.’ (बाळंतपणात) शेतकर्याचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी नुकसान अटळ. ‘शेती होई धननाश, ना धनी राहे पास’ किंवा अतिपावसानं पिकं नासली तरी नुकसानच! ‘शेतातली सुपारी नासली न् पैशाला पासरी विकली’ हा अनुभव आजही शेतकर्याला येतोच आहे. कधी कांदा, कधी टोमॅटो नासले म्हणून फेकून द्यावे लागतात. ‘ज्याचे मळ्यात ऊस, त्याले पैशाचा पाऊस’ हाही अनुभव अनावृष्टी शेतकर्याला - खरे तर सर्वांनाच जाचक असते. एक वेळ ओला दुष्काळ परवडला. (दुसरं पीक तरी हाती लागेल हा भरवसा वाटतो.) म्हणून ‘सडून जावो पण संपून न जावो.’ पीक आलं तरी हाच अनुभव येतो. पण कोरड्या दुष्काळात ‘घरात नाही दाणा न् कुणबी उताणा!’ हेही वेगळं सांगायची गरज नाही. कधी कधी घरचेच भेदी वैरी होतात. अशावेळी ‘वावरात नको नाला अन् घरात नको साला’ असं वाटतं.
शेतकर्याच्या पिढ्यान्पिढ्यांच्या अनुभवातून पाऊस, पिके पशुपक्षी, निसर्ग यांच्याबद्दल काही आडाखे-अंदाज बांधले आहेत. लोकभाषेत ‘सहदेव-भाडली’ ही बहीण भावंडांची जोडी शेतीविषयी भाकितं सांगणारी म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे त्यांच्या देशी भाषेतील म्हणीसदृश कवितेची संस्कृतमध्येही भाषांतरं झाली. पण परंपराशील शेतकरी समाजात त्या म्हणी म्हणून आजही प्रचलित आणि प्रतिष्ठित आहेत. मी माझ्या आजीकडून ऐकलेल्यांपैकी काही स्मरणात आहेत. त्याचा थोडा नमुना
प्रामुख्याने नक्षत्र, पाऊस आणि पिके यांसंबंधीचे हे आडाखे.‘चित्रा’ नक्षत्रातल्या पावसासंबंधी उलटसुलट म्हणी आहेत. उदा. ‘न पडती चित्रा तर भात मिळेना पित्रा, पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा’ उलट ‘धाड पडावी पण चित्रा न पडावी.’ हा अनुभव प्रदेश-परत्वे भिन्न असावा. -‘मघा’ नक्षत्रासंबंधी - ‘न पडती मघा तर वरतीच बघा|’ हा पाऊस पडला तर पावसाळा समाधानाचा जाईल किंवा ‘न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा’ इत्यादी. या ‘सहदेव (भाऊ) भाडळी (बहीण)’ ह्या जोडीत एक स्त्री निसर्ग पीक-पाणी, पाऊस यांचे आडाखे बांधणारी म्हणून लोकपरंपरेत प्रतिष्ठित आहे, हे महत्त्वाचे. बाईची दैनंदिन भाषा बाई आणि प्रकृती यातील अद्वैत सांगणारी. ‘पोटी फळ असणं, ‘जमीन वांझ असणं’, जमीन तापली की पाऊस हवा’ (लैंगिक सूचन) ‘बेंबीचं देठ’, ‘पोट पिकणं’, उलट ‘केळ व्यायली’ (वनस्पतीसाठी जैविक भाषा). म्हातार्यांसाठी ‘पिकलं पान’ (गळायचंच) एक की दोन! ‘प्रकृती’ (निसर्ग नव्हे, पर्यावरण तर नाहीच) आणि बाई यातील अद्वैत भाषेतून अनंत परीने व्यक्त होते. मुलामुलींच्या विशेषनामात फुले, वृक्ष पंचमहाभूते यांच्या नावांची एकदा सहज यादी करून बघावी. मोठा खजिना सापडेल. शेती एकूण बेभरवशाची. तरी ‘काळी आई’ म्हणून शेतकरी कुटुंबाचा जीव जमिनीत अडकलेला असतो.
पारंपरिक शेतीत स्त्री आणि पुरुष दोघांचीही शारीरिक आणि मानसिक गुंतवणूक सारखीच असते. हा एकच व्यवसाय असा ‘होता’ की ज्यात दोघांच्या गुंतवणुकीत, अनुभवात फारसं तर-तम करता येत नाही. कारण शारीरिक कष्ट हे दोघांचंही भांडवल म्हणून मनही सारखंच अडकलेलं. हे प्रत्यक्ष कसून शेती करणारांबद्दल सांगते आहे. कुळांकडून कसून घेणार्या दूरस्थ तालेवारांबद्दल नाही. परंपराशील शेतकरी कुटुंबातल्या मुलाबाळांपासून म्हातार्यांपर्यंत सगळे त्यात अडकलेले. मोसमी बेभरवशाच्या पावसावरच्या शेतीमुळे बरेचसे सोशीक, उदार आणि दैववादी झालेले. एखादे वेळी हवा तसा पाऊस पडला नाही तर ‘दैव नाही घटी अन् पाऊस पडला शेताच्या काठी’ म्हणून स्वत:च्याच दैवाला बोल लावीत बसलेले.
महाराष्ट्रातल्या शेतकर्याच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेला. तरी आज जशी शेतकर्यांच्या आत्महत्या होतात तशा ‘त्या’ काळात औषधालाही झालेल्या दिसत नाहीत. असे का? मला एक उत्तर सापडते ते असे... गेल्या काही वर्षात शेतीचा खर्च रोख भांडवली पद्धतीने वाढला. जुना शेतकरी बैलाने नांगरणी करी. मोटा ओढून पाणी देई, बैलगाडीतून माल बाजारात नेई. रोख पैसे कशालाच द्यावे लागत नसत. बियाणेही बायका घरात निगुतीने राखून ठेवीत. आता बैलाऐवजी ट्रॅक्टर (इंधनासह) विजेवरचे पंप (पाणी उपसायला) कंपन्यांची बियाणे, प्रवासी वाहने, रासायनिक खते सगळ्यांना रोख पैसा मोजावा लागल्याने कर्जबाजारीपणा गणिती श्रेणीने वाढत गेला. बायकांचे शेतीतले कष्ट कमी झाल्याने गुंतवणूक कमी झाली. दारची जनावरे उणावल्याने जैविक खतेही संपली. बायकांची पूर्वी एखादी गाय-म्हैस असे. तिचे दुभते, बांधावरची माळवं (भाजीपाला) तिचा स्वत:चा असे. आता ‘डेअरी’त दूध घालण्यासाठी जनावरे आली. बाईची त्यावरची सत्ता संपली. तो अर्थप्रधान व्यवसाय पुरुषांचा झाला. बाईचा शेतीतला हक्काचा सहभाग संपुष्यात आला. दुसर्यांच्या शेतावर मजुरी करण्यापुरता तो राहिला. त्यामुळे आता ‘उत्तम शेती’ न राहता जणू ‘कनिष्ठ शेती’ झाली आणि ‘माळ्याची अर्धी’(वाटेकरी) बाई संपून ‘रिणरिण बायको कुणब्याची’ झाली आहे. तरी पुरुषाने वैतागून आत्महत्या केली तरी बायको, (आई-बहीण सगळ्या बायका) नवर्यामागे जीव देत नाहीत. मुले-बाळे, म्हातारी कोतारी यांसह जगण्याला कंबर बांधून सामोर्या जातात. अखेर बाईची जात चिवट. ‘आशा सुटेना अन् देव भेटेना’ असं वाटलं तरी ‘ही बाईची जात हरळीसारखी चिवट!’ उन्हाळ्यात तापलेल्या भुईत वाळून गेली तरी थोडा पाण्याचा शिडकावा मिळाला तरी पुन्हा हिरवाईने तरारून वर येणारी!
----
डॉ. तारा भवाळकर
३, स्नेहदीप
आंबेडकर रोड
सांगली - ४१६४१६
फोन - ०२३३ - २३७३३२६
स्त्रोत:
अंतिम सुधारित : 6/18/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...