शेतकरी शेतात राबतो, चटणी, भाकरी खाऊन दोन वेळची भूक भागवितो, मात्र या आहारातून त्याच्या शरीराला आवश्यक ते पोषक घटक खरंच मिळतात? पुरेसे नाही. मग त्यासाठी आहारात काय हवे, ते माहिती करून घ्यायलाच पाहिजे. कारण पोषक आहार घेतला तरच स्वास्थ्य उत्तम राहील.
देशाच्या संरक्षणाची धुरा जशी आपल्या जवानांवर असते, त्याचप्रमाणे संपूर्ण देशाच्या आरोग्याची व पोषणाची धुरा शेतकऱ्यांवर आहे, म्हणूनच शेतकऱ्याला सर्वांचा अन्नदाता असे म्हटले जाते. शेतकरी निसर्गावर आणि दैवावर हवाला ठेवून शेतात राबतो आणि आपल्या घामाचे मोती पिकवतो, तेव्हा कुठे तमाम जनतेला अन्नधान्य मिळते. सर्वांसाठी राबणारा हा महत्त्वाचा घटक आपल्या स्वतःच्या आहाराबाबत तितकी काळजी घेतो का? उत्तर कदाचित नाही असे असेल. तर मग याविषयी जाणून घ्यायला हवे.
सकाळी उजाडल्यापासून ते सूर्यास्तापर्यंत शेतकरी शेतात राबत असतो. दुपारचे जेवण शेतावरच घेतो. विविध भाग म्हणजे मावळ, विदर्भ, नगर, कोकण इथे काही ठिकाणी भात उत्पादन जास्त होते, तर काही ठिकाणी ज्वारी किंवा बाजरी! त्याच प्रकारची धान्ये शेतकऱ्यांच्या आहारात असतात. कोकणातील शेतकरी सकाळी न्याहारीला तांदळाची भाकरी घेतो आणि त्याचबरोबर झुणका! दुपारी जेवणालादेखील तांदळाची भाकरी, भात, डाळ आणि कडधान्याची उसळ, क्वचित एखादी फळभाजी असते. जिथे ज्वारी, बाजरी होते ते भाकरीसाठी तांदळाऐवजी ज्वारी, बाजरीचा वापर करतात. रात्रीचे जेवणदेखील दुपारसारखेच घेतले जाते. शेतकऱ्यांचा हा आहार तसा सात्त्विक आणि साधा असतो. या आहाराची तुलना जर शहरवासीयांच्या आहाराशी केली तर आपल्याला काही गोष्टींतील फरक लगेचच जाणवेल. पहिली गोष्ट म्हणजे शहरवासीयांप्रमाणे शेतकऱ्यांना अनेकविध पदार्थ सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि एका मर्यादेतच त्यांचा आहार राहतो. बऱ्याचदा जे काही उपलब्ध आहे त्यावरच त्यांचा आहार अवलंबून असतो.
एक चांगली गोष्ट म्हणजे शारीरिक श्रम आणि साधा आहार यामुळे शहरी जीवनशैलीशी संबंधित विकार (जसे - मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार) यांना "पूरकता' इथे असत नाही. याउलट हा आहार काही प्रमाणात एकांगी आणि कुपोषण निर्माण करणारा किंवा अपूर्ण असा असू शकतो.
सर्वेक्षणात असे आढळले आहे, की शहरामध्ये अति बारीक स्त्रियांचे प्रमाण २७ टक्के, तर गावात ते ४६ टक्के आहे. याउलट शहरवासी स्त्रियांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण गावाकडच्यापेक्षा जवळजवळ तिप्पट आहे. पुरेसा आहार न मिळाल्याने कुपोषण तयार होते, त्यातून अनेक गोष्टी घडू शकतात. लोह कमी झाल्याने थकवा जाणवतो. अंगातील कॅल्शिअम कमी झाले तर हाडे ठिसूळ होऊ शकतात. पूर्ण आहार मिळाला नाही तर एकंदरच रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन संसर्गजन्य आजार पटकन होतात. एवढेच नव्हे तर शरीरास व्यवस्थित पोषण मिळाले नाही तर आजारी पडल्यास "बरे होण्याचा काळ' लांबणीवर पडू शकतो.
(लेखिका मानवी आहारविषयक तज्ज्ञ आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
बेल्ट्सव्हिले येथील मानवी अन्नद्रव्य संशोधन संस्थ...
नवजात आणि लहान मुले फार चळवळी असतात आणि जास्त प्रम...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
या विभागात विविध प्रकारचे जाडेभरडे धान्य जसे ज्वार...