निसर्गाचा चमत्कार ऑल स्पायसेस या मसाल्याच्या झाडात दिसून येतो. ऑल स्पायसेस या झाडातल्या फळात दालचिनी, जायफळ, काळी मिरी आणि लवंग या ४ मसाला पिकांचा एकत्रित वास – स्वाद येतो. शिवाय ऑल स्पायसेसच्या फळापासून या चारही मसाला पदार्थाची गरज भागते.
त्यामुळे या मसाल्याच्या झाडाला फोर इन वन असे नाव दिले आहे.
कर्नाटकात आणि केरळातल्या हवामानात १५ फुटांपासून ३० फुट उंचीपर्यंत ठिकठिकाणी ऑल स्पायसेसची झाडे पाहायला मिळतात. हिरव्या रंगाची जाड पाने उंडीच्या पानासारखी आसतात.
पानाच्या मागे तेलग्रंथी असून एक प्रकारची चकाकी पानावर दिसते. पानाचा देठाकडचा भाग अरुंद असतो. ७ – ८ वर्षानंतर हे झाड फुलावर येऊन फळे यायला सुरवात होते. साधारणतः पूर्ण वाढलेल्या झाडापासून उपयुक्त अशी वाळवलेली २ – २.५ किलो फळे मिळतात. हीच फळे मसाल्यासाठी वापरता येतात.
ऑल स्पायसेस या झाडाला जयाकनगिरी या नावाने ओळखले जाते. या नैसर्गिक झाडाला वेस्ट इंडीज मध्ये आर्थिक दृष्ट्या फार महत्त्व आहे. तिथूनच पहिल्यांदा त्याची केरळ आणि कर्नाटक मध्ये लागवड करण्यात आली.
आपल्याकडे कोकणाचे हवामान ऑल स्पायसेसच्या लागवडीसाठी अनुकूल आहे असे भाट्याच्या नारळ संशोधन केंद्राने सूचित केले आहे. किंबहुना या झाडाच्या लागवडीकडे भविष्यात लक्ष देण्याची गरज आहे अशी शिफारक केली आहे. याच्यापासून चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळेल म्हणून कोकणातल्या शेतकऱ्यांनी याची लागावड काजू, आंबा, नारळ, सुपारी प्रमाणे करावे. लाखी बागेत ऑल स्पायसेसची झाडे चांगली वाढतात असेही दिसून आले आहे. महाबळेश्वर, राधानगरी, भुदरगड, वाई परिसर, इगतपुरी, माथेरानचा पश्चिम डोंगरी भाग या ठिकाणी सुद्धा याच्या लागवडीस अनुकुलता आहे. त्यामुळे प्रयोग करून पाहावे. यशस्वी झाल्यानंतर जरून लागवड करावी.
डोंगर उताराच्या हलक्या जमिनीत हे झाड चांगले वाढते. मध्यम जमिनीतही येते. समुद्रकिनारी आणि जांब्या जमिनीतही हे येऊ शकते. साधारणतः १००० – ११०० मीटर उंचीं पर्यंत हे झाड वाढू शकते. म्हणजे या झाडाची लागवड करण्यासाठी आपल्याकडे ठिकठिकाणी खूप अनुकुलता आहे. फोर इन वन झाडाच्या फळांचा मसाला म्हणून उपयोग करता येतोच पण त्यापासून तेल काढणे, अर्क काढणे, फळाचे तुकडे करणे अगर तसेच संपूर्ण फळ वापरणे सहज शक्य आहे.
या झाडाच्या बियापासून रोपे तयार करून रोपांद्वारे लागवड करावी लागते. एका फळातून एकच बी मिळते. म्हणून मोठ्या प्रमाणात रोपे करण्यासाठी उती संवार्धानाद्वारे रोप करण्यास वाव आहे. बियांद्वारे महिन्या दीड – महिन्यांत रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. कोकण कृषी विद्यापीठाने गुटी कलमाद्वारे अभिवृद्धी करण्याचे तंत्र विकसित केले आहे. ऑल स्पायसेसची गुटी कलमे लावून योग्यतऱ्हेने भरून घेतलेल्या खड्ड्यात लावावीत. सावलीत वाढत असल्याने नारळ – सुपारीच्या बागेत २ ओळीतल्या मधल्या जागेत ऑल स्पायसेसची कलमे खड्डे घेऊन लावावीत.
लागवडीनंतर २ – ३ महिने पाऊस असल्यास रोपे, कलमे चांगली जातात. नर – मादी अशी झाडे असून ती ७ – ८ वर्षानंतर फळ लागल्यानंतरच ओळखू येतात. या झाडाच्या बुडाजवळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर मात्र या झाडाला सतत पाणी लागते. उत्तम वाढ होण्यासाठी खड्ड्यात शेणखत, सुपर फॉस्फेट टाकावे. त्यानंतर दरवर्षी जसे झाड वाढेल तशी खते वाढवावीत. ७ वर्षाच्या झाडाला ५० किलो शेणखत, अर्धा किलो युरिया आणि पावशेर सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो पोटॅश अशी एकूण खते विभागून द्यावीत.
ऑल स्पायसेस या फळामध्ये पाणी, प्रथिन, स्निग्धता कार्बोदके, चुना, फॉस्फरस, सोडियम, लोह, जीवनसत्त्व आणि दालचिनी, लवंग, जायफळ आणि मिरी यांचा स्वाद आणि चव पुरेपूर मिळते म्हणून या अशा वैशिष्ट्यपूर्ण मसाला झाडाची लागवड वाढली पाहिजे.
ऑल स्पायसेस हे झाड खऱ्या अर्थाने फोर इन वन म्हणून मसाल्याचे झाड आहे. याचे महत्त्व ओळखून लाखी बागेत आंतरपीक म्हणून लागण करायला हवी. त्याचप्रमाणे सावलीच्या ठिकाणीही पश्चिम घाटमाथा आणि त्या सदृश्य जिथं जिथं अनुकुलता आहे तिथं तिथं याची लागवड करणे गरजेचं आहे. याची कलमे, रोपे कोकण कृषी विद्यापीठाकडून, तसेच काही अधिकृत रोप वाटीकेतून मिळू शकतील. तेव्हा अशी रोपे मिळवून सलग अगर थोड्याफार प्रमाणात लागवड करावी. किंबहुना घरची गरज भागवण्यासाठी पारस बागेत १ – २ झाडे नक्कीच लावावीत.
स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव
अंतिम सुधारित : 8/2/2020
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...