অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऑस्ट्रियातील शेतकऱ्यांचे एकात्मिक शेतीला प्राधान्य

ऑस्ट्रियामधील शेतकरी एखाद्या परिपूर्ण उद्योगासारखी एकात्मिक शेती करतात. अन्नधान्य, भाजीपाला, फळे, कंदपिके उत्पादन, दुग्ध व्यवसाय, वराहपालन, कुक्कुटपालन याचबरोबरीने शेतमाल प्रक्रिया आणि उत्पादनांच्या विक्रीवर त्यांचा भर आहे. याचबरोबरीने घराच्या छपराचा उपयोग करून सौर ऊर्जानिर्मितीचा पुरक व्यवसाय करण्याचा व्यवहारीपणा येथील शेतकऱ्यांनी दाखविला आहे. 

स्वित्झर्लंड, इटली, जर्मनी, हंगेरी आदी सात देशांच्या जवळिकीमुळे शेती उत्पादन व बाजारपेठेच्या दृष्टीनेही ऑस्ट्रियाचे युरोपमधील स्थान महत्त्वपूर्ण आहे. सुमारे 84 हजार चौरस किलोमीटरच्या या देशात 30 ते 35 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र शेतीखाली असून, लोकसंख्येच्या फक्त 10 टक्के लोक हा व्यवसाय करतात. त्यातही निम्मे शेतकरी 10 हेक्‍टरपेक्षा कमी जमीनधारणा असलेले, तर 40 टक्के शेतकरी पाच हेक्‍टरहून कमी जमीनधारणा असलेले आहेत. "कॉर्पोरेट फार्मिंग'चे प्रमाणही येथे जास्त आहे. अन्नधान्य, दूध, पशुपालन व मांस उत्पादन या चार बाबींवर त्यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे.

पीक नियोजनावर भर ः


फ्लॉरेन्सबर्गजवळच्या एका गावातील शेती आम्ही पाहिली. या शेतकऱ्याने गहू, बार्ली, ओट, बटाटा या पिकांची लागवड केलेली होती. पिकाची पेरणी, तणनाशकांची फवारणी व पिकाची काढणी या तीनच गोष्टी त्यांच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. खात्रीशीर हवामान आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असल्याने उत्पन्नही खात्रीशीर आहे. चार देशांच्या 10 दिवसांच्या प्रवासात कुठे एखादा किडा किंवा चिलटे दिसली नाहीत. वातावरण एवढे स्वच्छ व निर्मळ आहे, की पिकांवर फार काही प्रकारची रोगराई नाही. बटाट्याचे पीक फुलांवर आले होते, पण एकाही पानावर कीड, रोगाचा प्रादुर्भाव दिसला नाही. कीटकनाशके, बुरशीनाशकांचा वापर त्यांच्याकडे नगण्य आहे. मात्र तणनाशकांचा वापर जास्त प्रमाणात होतो.
आम्ही भेट दिलेल्या शेतकऱ्याचे दोन गोठे होते. गोठ्यांबरोबरच मुक्त पद्धतीचाही अवलंब केलेला होता. त्यासाठी शेतीच्या काही भागात गोठ्याजवळच कुरण राखून ठेवलेले होते. येथील लोकांच्या आहारात गहू, बार्लीपासून बनविलेले "रेडी टु ईट' प्रकारचे खाद्यपदार्थ जास्त असतात.

गाईंच्या नैसर्गिक गर्भधारणेवर भर

येथील बहुतेक शेतकऱ्यांकडे तांबड्या-पांढऱ्या रंगाच्या होल्स्टिन फ्रिजियन जातीच्या गाई आहेत. आपल्यासारख्या काळ्या-पांढऱ्या रंगाच्या गाई त्यांच्याकडे दिसल्या नाहीत. त्यांच्या पशुपालनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते गाईंची गर्भधारणा नैसर्गिक पद्धतीने घडवून आणतात. यासाठी गाईंच्या कळपात जातिवंत वळू आवर्जून ठेवले जातात. त्यापासून तयार झालेल्या कालवडी वाढवून अधिक दूध उत्पादन देणाऱ्या गाई गोठ्यात तयार करण्याकडे त्यांचा प्रयत्न असतो. दररोज 35 ते 40 लिटर दूध देणाऱ्या गाई त्यांच्या गोठ्यात आहेत. आपल्यासारखी तीन वेळा दूध काढण्याची पद्धत त्यांच्याकडे नाही. ते गाईंचे दूध सकाळी व संध्याकाळी याप्रमाणे दोन वेळा काढतात. त्यांच्याकडे म्हशी नाहीत. यामुळे दूध उत्पादन म्हणजे गाईचेच दूध, असे त्यांचे सर्वसाधारण समीकरण आहे.

करार शेती, पूरक व्यवसाय


आम्ही भेट दिलेल्या शेतकऱ्याची स्वतःची 10 हेक्‍टर शेती होती. याशिवाय त्याने आणखी 30 हेक्‍टर शेती करार पद्धतीने कसायला घेतली होती. येथील शेतकरी पीक उत्पादनाबरोबरच विविध प्रकारचे पूरक व्यवसायही कौशल्याने करतात. या शेतकऱ्याचा वराहपालन प्रकल्प होता. एका जोडीपासून 30 वराह तयार झाले होते. वराहांचे मांस हा शेतकरी स्वतःच ड्रेसिंग करून ग्राहकांना थेट विकत होता. त्यासाठी त्याने छोटे दुकानही सुरू केले होते. या दुकानात शेतकरी स्वतः तयार केलेले प्रक्रिया पदार्थ, धान्य, भाजीपाला याची विक्री करीत होता. सर्व उत्पादने पॅकिंगमध्ये व प्रत्येकावर किमतीचे लेबल होते.

फिरते कुक्कुटपालन


फ्रान्समधील एका विशिष्ट जातीच्या कोंबड्या ऑस्ट्रियामध्ये अधिक प्रमाणात पाळण्यात येत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आम्ही भेट दिलेल्या शेतकऱ्याकडेही या जातीच्या 500 कोंबड्या होत्या. त्यासाठी त्याने कंटेनरच्या आकाराची, ट्रॅक्‍टरला ट्रॉलीसारखी जोडता येईल, कोठेही नेता येईल अशी फिरती पोल्ट्री तयार केलेली आहे. अंडी व मांस, दोन्हींचे उत्पादन तो घेत होता. ग्राहकाच्या मागणीनुसार कोंबडी कापून, मांस ड्रेसिंग करून स्वतःच्या शेतावरील दुकानात पॅकिंगमध्ये विकण्याचे कामही तो स्वतःच करत होता.

सौर ऊर्जानिर्मितीचा पूरक व्यवसाय

1) ऑस्ट्रियातील- विशेषतः फ्लॉरेन्सबर्ग परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी तीव्र उताराच्या दुपाखी घराच्या संपूर्ण छपरावर सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत.
2) यासाठी तेथील शासनामार्फत त्यांना विविध प्रकारे प्रोत्साहन देण्यात येते. सौर प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना कर्जही उपलब्ध करून दिले होते.
3) प्रकल्प उभारणी, व्यवस्थापन आदीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही सहज उपलब्ध आहे. शेतकऱ्यांकडील अतिरिक्त वीज विकत घेण्याची यंत्रणा येथील शासनाने चांगली राबवली आहे.
4) शेतकरी स्वतःची गरज भागवून उरलेली वीज आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किंवा शासनाला विकतात.

फूल व्यापाराचे जागतिक केंद्र ः नेदरलॅंड्‌स

नेदरलॅंड्‌स या देशाच्या एकूण भूभागापैकी निम्म्याहून अधिक भाग हा समुद्रकिनारी मातीचा भराव घालून तयार करण्यात आला आहे. या जमिनीवर विविध प्रकारच्या अत्याधुनिक हरितगृहांची उभारणी करून भाजीपाला व फुलांचे उत्पादन घेतले जाते. फुलशेती हे नेदरलॅंड्‌सचे बलस्थान आहे. अल्समीर येथील जगातील सर्वांत मोठा अत्याधुनिक फुलबाजार आणि लिलाव केंद्राला आम्ही भेट दिली. सर्व प्रकारच्या सेवा या बाजारात अतिशय झटपट पुरवल्या जातात. संपूर्ण ऑनलाइन कामकाज असते. फुलाला हात न लावता सर्व व्यवहार स्क्रिनवर फुलाची गुणवत्ता, प्रत पाहून होतात. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बाजारचे कामकाज संपून फुले खरेदीदार सांगेल त्या ठिकाणी परस्पर रवाना होतात. बाजारापासून अवघ्या 10 ते 15 किलोमीटर अंतरावर खास विमानतळ आहे. अतिशय कमी लोकांच्या सहकार्याने हा बाजार चालवला जातो.

कालवे, रस्ते विकासाचा ऍमस्टरडॅम पॅटर्न


नेदरलॅंड्‌समधील ऍमस्टरडॅम या एकाच शहरात तब्बल 1200 किलोमीटर लांबीचे कालवे आहेत. आपल्या पुणे-मुंबईत जसे रस्त्यांचे जाळे आहे तसे या शहरात कालव्यांचे आहे. समुद्रात भराव घालून जमीन तयार करतानाच हे कालवे बांधण्यात आले आहेत. सर्व कालव्यांच्या कडा व नदीचे किनारे व्यवस्थित बांधून घेतलेले आहेत. शहरातील कालव्यांवरील पुलांची संख्या 600 हून अधिक आहे. कालव्यांतून बोटींची वाहतूक चालते. पुलाखालून बोट जाण्यासाठी या पुलाचे मध्यभागी दोन भाग होऊन वरच्या दिशेने उघडले जातात. बोट गेली की पूल पुन्हा पूर्ववत होतो. ऍमस्टरडॅम हे सायकलींचे शहर म्हणूनही जगभर ओळखले जाते. येथील रस्त्यांची गुणवत्ता व दुरुस्ती अभ्यासण्यासारखी आहे. चार, सहापदरी रस्त्यांवर खास दुरुस्ती व देखभालीसाठी मध्यभागी एक पट्टा ठेवण्यात आला आहे. वापरातील रस्त्यांची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. सर्व शेतमालाची वाहतूक या रस्त्यांनीच होते.

------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate