राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने छत्रपती “शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७” लागू केली आहे. या योजनेंतर्गत कर्जमाफी व इतर प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी शेतकरी कुटुंब हा निकष विचारात घेण्यात आला आहे. या कर्जमाफीचे स्वरुप काय आहे, या योजनेचा लाभ कसा घ्यावा, या संदर्भातील शासन निर्णय काय आहे आणि या कर्ज माफीचे निकष काय आहेत. या संदर्भातील शासन निर्णय काय आहे आदी विषयांवरील सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमात सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू यांनी दिली आहे.
अर्ज भरण्याचा पहिला टप्पा झाल्यानंतर शासनाची पुढील प्रक्रिया काय असणार आहे?
उत्तर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत २२ सप्टेंबर होती. मुदतीअखेर एकूण ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले. या अर्जांमध्ये ७७.२६ लाख खातेदारांचा समावेश आहे. २ लाख ४१ हजार ६२८ शेतकऱ्यांनी आधार कार्डचा क्रमांक दिलेला नाही तसेच दि. २ ऑक्टोबरपर्यंत गावात चावडीवाचन पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय यंत्रणेकडून याबाबतची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. अर्ज भरण्याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. कर्ज घेतलेल्या खात्याची माहिती दिल्यानंतर या माहितीच्या आधारे बँकांनी प्राथमिक स्वरुपात माहितीची पडताळणी प्रक्रिया सुरु केली आहे. बँकांकडून संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाकडून तपासणी केली जाईल. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर ज्या जिल्ह्यांतील सर्व बँकांची संपूर्ण माहिती भरली आहे. त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येईल.
अर्जामध्ये आधार क्रमांक अनिवार्य आहे. याबद्दल सांगा?
उत्तर – कर्ज माफीचा अर्ज भरताना आपला अर्ज कोणी दुसरी व्यक्ती भरू नये. आणि पात्र आणि योग्य व्यक्तींनाच या योजनेचा लाभ मिळायला हवा यासाठी आधार क्रमांक देणे बंधनकारक आहे. यामुळे कोणीही वंचित राहणार नाही. हाच आधार क्रमांक घेण्याचा उद्देश होता. सर्व शेतकऱ्यांनी ज्या बँकेमध्ये कर्जखाते आहे. त्या बँकेत तत्काळ आपला आधार क्रमांक नोंद करावा आणि बँकेनेसुद्धा शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकांची नोंद घेऊन कर्जमाफीसाठी सर्व कर्जखात्यांची अचूक माहिती शासनाला वेळेत द्यावी.ज्या शेतकऱ्यांनी अर्जामध्ये आधार क्रमांक नमूद केला नाही त्यांना आधार/EID क्रमांक ऑनलाईन नमूद करण्यासाठी अर्ज दुरूस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आधार केंद्रावर आधार नोंदणी करून सदर आधार क्रमांकाची आपले सरकार पोर्टलवर नोंद करावी.
तालुका आणि जिल्हा पातळीवर कामकाज कसे चालणार आहे?
उत्तर – जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली समित्या स्थापन करून कामकाज पाहणार आहेत. तर तालुका पातळीवर तहसिलदार व त्यांच्या नियंत्रणाखालील अधिकारी कर्मचारी कामकाज पाहणार आहेत. तालुकास्तरीय समितीने नामंजूर केलेल्या लाभार्थ्यांना उपविभागीय अंमलबजावणी समितीकडे गाऱ्हाणे ऑनलाईन किंवा अर्जाद्वारे सादर करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. उपविभागीय अंमलबजावणी समितीकडे आलेल्या गाऱ्हाण्यांची छाननी करण्यात येऊन त्यावर घेतलेले निर्णय अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. योजनेसाठी लागणारी शेतकऱ्यांची कर्ज खात्यांची माहिती राष्ट्रीयकृत, खासगी, व्यापारी आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकाकडे संकलित करण्यासाठी देण्यात आली आहे. त्यानुसार या नमुन्यामध्ये माहिती भरण्याचे काम सुरू आहे. विकास संस्थांकडील कर्जासंबंधीची माहिती टेम्प्लेटद्वारे तयार करुन त्याची सहकार खात्याच्या लेखापरीक्षकांमार्फत पडताळणी करण्याचे काम सर्व जिल्ह्यांमध्ये प्रगतीपथावर आहे. बँकेकडील माहिती अपलोड झाल्यानंतर संगणकीय संस्करण सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असून, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थींच्या प्रारुप याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. याचबरोबर लाभार्थ्यांच्या गावनिहाय संचिका तयार करण्यात येणार असून, बँकाकडील असलेल्या माहितीचे सामाजिक अंकेक्षणाद्वारे मिळालेल्या अर्जदारांच्या माहितीची खातरजमा आणि चावडीवाचन दरम्यान आलेल्या सूचना / हरकती विचारात घेऊन तालुकास्तरीय समितीमार्फत अंतिम मान्यता देणार आहे.
बँकानी शासनाला सादर करावयाच्या माहितीबद्दल काय सांगाल ?
उत्तर - ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकरी अर्ज आले आहेत. नक्कीच यापेक्षा जास्त शेतकऱ्यांची खाते माहिती बँकांकडे आलेली असणार. फक्त आलेले अर्ज खाते मर्यादित न ठेवता ज्यांच्या कर्जांचे पुनर्गठन झालेले आहे. थकलेले कर्जदार, वेळेत कर्ज भरणारे खातेदार अशा सर्वच खात्यांची माहिती एकत्रित करून एक माहिती पत्रक बँकांना तयार करून दिले आहे. यापैकी बरीच माहिती बँकांकडे उपलब्ध आहे. या सर्व अर्जांची गावनिहाय माहिती ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित गावनिहाय याद्या तालुकास्तरीय समितीकडे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बँक स्तरावरील शेतकऱ्यांची कर्ज खात्यांची माहिती राष्ट्रीयकृत, खासगी, व्यापारी आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकाकडे संकलित करण्यासाठी देण्यात आलेल्या नमुन्यामध्ये माहिती भरण्याचे काम सुरू आहे. विकास संस्थांकडील कर्जासंबंधीची माहिती टेम्प्लेटद्वारे तयार करुन त्याची सहकार खात्याच्या लेखापरीक्षकांमार्फत पडताळणी करण्याचे काम सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु आहे.
शेतकऱ्यांनी पूर्ण अर्ज भरला आहे का हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांना कशी माहिती मिळेल ?
उत्तर – शेतकऱ्यांनी अर्ज भरल्यानंतर त्यांना पोचपावती म्हणून त्यांचा युजर आयडी उपलब्ध आहे. याबाबतचा ओटीपी देखील मोबाईलवर येत असतो. समजा शेतकऱ्यांना त्यांचा अर्ज पूर्ण भरला आहे हे तपासावयाचे असेल तर ते पोर्टलवर जाऊन पाहू शकतात.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 6/6/2020