অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कृषिसंस्कृती आणि मातीच्या लेकी

कृषिसंस्कृती आणि मातीच्या लेकी

“खरं तर मातीच्या लेकीची गोष्ट अन् कविताही संपणारी नाहीये. ती कवितेत मावते कुठं? अन् गोष्टीतही नाही. कादंबरीची पानंही तिला बांधून घालू शकत नाहीत. विश्वाच्या अनंत एकर मातीभर ती पसरून राहिलीय. झाडासारखी उगवून आलीय. डोंगरासारखी मातीला बिलगून आहे. दरीसारखी पार मातीच्या काळजापर्यंत पोहोचलीय. लोकगीताच्या शब्दाशब्दांत तिनं कृषिसंस्कृतीला गोंदवून ठेवलंय ...! सृष्टीच्या नाभीत तिनं कस्तूरी पेरलीय. मातीची लेक उंचचउंच नभाला भिडलीय...”

मातीच्या लेकी सूर्याशी भिडवतात डोळा

आभाळाला खुरप्याच्या अरीत अडकवून खाली ओढतात

विळ्याने कचाकचा कापतात नक्षत्रांचे वेडेविद्रे चाळे!

दुष्काळाच्या पाठीवर पाय देवून उभ्या राहतात

मातीतल्या लेकी उकरतात मातीचं काळीज;

देतात त्यात स्वप्न पेरून

मातीच्या लेकी जमिनीला झाडाचे लुगडे नेसवतात

मातीच्या लेकी आयुष्याच्या वस्त्राचा आडोसा करून

मातीचं बाळंतपण करतात

तिच्या हिरव्या लेकराला पाजतात सुदृढतेची बाळघुटी

त्याच्या डोळ्यांत विजेचं काजळ घालतात

वार्‍याचा खुळखुळा त्याला खेळायला देतात

मातीचे वाळे पायांत घालतात

मातीच्या लेकी रस्त्यात आडव्या आलेल्या

सापांनाही कापून फेकतात

त्या असतात वाघिणीचं दूध प्यायलेल्या अन् हरिणीचे पाय असलेल्या

म्हणून थांबत नाही त्यांचं पाऊल जमिनीवर

त्या वादळाशी झुंजी खेळतात

मातीच्या लेकी सूर्याशी रत होऊन पैदा करतात

मातीचे बलिष्ठ पोशिंदे; अब्रूस कडक पहारा देतात

आगीच्या पाठीवर देतात काठीचा निबर तडाखा

दुखाच्या झितर्‍या धरून उन्हाच्या खडकावर आपटवतात

व्यथेला दाखवतात धारदार विळा

झाडाचा पाला अन् कंदमुळं खाऊन त्या झाल्या आहेत पुष्ट

त्यांना नजरेत घेणार्‍यांची त्या भुकटी करतात

मातीच्या लेकी उन्हाचा घोडा करून वार्‍यावर स्वार होतात

जिंकून आणतात दर लढाईत मातीसाठी काय काय

मातीच्या लेकी अंगावर धावून येणार्‍या सांडालाही

चारी मुंड्या चित करतात

पिसाळलेल्या वासनेच्या ठेचतात नांग्या

मस्तवाल हत्तींना काबूत करतात

फुरफुरणार्‍या बेलगाम घोड्याच्या मुसक्या आवळतात

मातीच्या लेकी

चित्त्यासारख्या धावतात

धामिणीसारख्या गरगरतात

सळसळतात नागिनीसारख्या

वात्सल्यतात गायीसारख्या

मातीच्या लेकींचा शाप घेऊ नका ...!

मातीच्या लेकीवर कविता लिहून मी सुरुवात करतोय तिच्याविषयी बोलायला. या लेकींना मी खूप जवळून ओळखतो. कारण यातल्याच एका मातीच्या लेकीचा मी मुलगा आहे. तिनं तिच्याशी असलेली माझी नाळ तटकन तोडून मातीशी जोडून दिली. यातच आणखी एक मावशी आहे; जिनं मातीच्या श्वासानं माझे कान फुंकलेत. एक बहीण आहे, जिनं लाखमोलाचं गुपित म्हणून माती माझ्या मुठीत ओतलीय. आत्या आहे, आजी आहे. आणखी याच मातीच्या प्रदेशातल्या काही लेकी आहेत, ज्यांनी त्यांचं आत्मकथन सतत माझ्या डोळ्यांसमोर धरलंय. विहीर खोदण्यासाठी लागलेला खडक फोडण्यासाठी सुरुंगाची दारू ठासून भरावी; तशी या सार्‍यांनीच एकमतानं कृषिसंस्कृती माझ्या धमन्यांमध्ये ठासून भरलीय; म्हणून मी त्यांच्याकडे बाया किंवा महिला म्हणून पाहू शकत नाही. त्या नुसत्याच बाया असतात कुठं? त्या तर कृषिसंस्कृतीच्या नाभीतून तरारून उगवून आलेल्या असतात. मग त्याच उगवून आणतात आवतालभोवतालात सारं काही. त्या डोक्यावरून पाणी वाहत नाहीत. त्या नदीच उचलून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेऊन ठेवतात. गावाचे पाणवठे ज्यांच्यामुळे जिवंत होतात, मुकं जातं ईश्वर होऊन बोलून उठतं, ज्यांनी निर्माण केल्यात रानोमाळ पायवाटा; त्यांनाच तर कळते विहिरीच्या तळाची भाषा. शेतीत नांगर माणसांनीच चालवले असं नाही; याच लेकींनी नांगरत नेलीय जमीन, मोटा हाकल्या; श्रेय मात्र सतत पुरुष घेत असतो. खरं तर अगदी आदिम काळापासून पुरुषांपेक्षाही ती स्वार झालीय कळीकाळाच्या घोड्यावर; उन्हाळ्याच्या दगडफोड उन्हातही ती वाळून गेली नाही, वादळाला डगमगली नाही. पावसापाण्यानं गाठलं म्हणून भेदरली नाही. एवढंच नाही; अवघ्या कृषिसंस्कृतीची पृथ्वीच या मातीच्या लेकींनी आपल्या पाठीवर घेतली आहे. कसं म्हणणार मग त्यांना नुस्त्या बाया? दर्‍या उकरल्या, डोंगर पोखरले, विहिरी खोदल्या यात त्या नव्हत्या असं नाही. त्या घेतच नाहीत कुठलंही श्रेय. त्यांना फक्त मुंगीसारखं सतत कामाला जुंपून घ्यायला आवडतं. भलेही वारूळ सापाच्या सातबार्‍यावर गेलं तरी त्या फिकीर करत नाहीत!

काय गंमत आहे बघा, बारा बलुतेदारांच्या एकत्रीकरणातून ‘गावगाडा’ निर्माण झाला. मात्र तिचा उल्लेख कुठेच नाही. त्या उल्लेखाची आवश्यकताच तिला भासत नाही आणि ते सांगायची गरजही नाही. कारण गावगाडा तिच्याशिवाय पांगळा आहे. तीच तर लोहाराच्या हातोड्याची क्षमता आहे, सुताराच्या वाकसाची धार आहे, कुंभाराच्या चाकाचं तीच तर कसब आहे, गवंड्याच्या वळंब्याची दोरी तीच आहे, शेतकर्‍याच्या नांगराचं बळही तीच आहे. एवढंच कशाला ‘गावगाड्या’च्या रथाचं चाकही तीच आहे. अन्यथा, गावगाडा कधीचाच मातीत रुतून बसला असता. तिनं चालवलाय हा गावगाडा! आब आणि बूज तिनं राखलीय गावगाड्याची; मग मी तिला महिला कसं म्हणू? ती खरी लेक मातीची; म्हणून तिला मातीची हाक कळते. या लेकीच्याच जिवावर रानात पीक उभं राहतं. खळ्यादळ्यात धान्य येऊन पडतं. बैलांच्या गव्हाणीत चार्‍याच्या चार पेंढ्या पडतात. गोठ्यातली गाय दूध देते. दारच्या कुत्र्याला भाकर मिळते. चिमणीकावळ्यासाठी चार दाणे उधळले जातात. अशी खमकी मातीची लेक खूप नेटानं उभी राहत आलीय आजपर्यंत. स्वतःसाठी काहीच मागत नाही ती. तिच्या कुंकवाच्या धन्याला आयुष्य मागत आलीय. मात्र अलीकडे तिचा कुंकवाचा धनी नापिकी कर्जबाजारीपणामुळं स्वतःचं आयुष्य संपवून टाकतोय. परिस्थितीपुढं हार मानत मातीच्या लेकीला अन् तिच्या पोरांबाळांना वार्‍यावर सोडून देतोय. हे नवंच संकट तिच्यापढं उभं ठाकलंय. आता मातीच्या लेकीनंही टाकायचा का जीव संपवून? मात्र ती तसं करत नाही. ती तगून राहते. दुःखाच्या पाठीवर बसून त्याला हाकलत नेते. मागच्या गारपिटीत कित्येक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या; पण अशीही एक भुईची लेक मला भेटली. तीच तर उतरून आलीय माझ्या कवितेत ... गं. भा. मथूबाई संपत मोरे. अर्थात तिला फाटलेल्या आभाळाची जित्ती गोष्ट मी समजतो. ती तुम्हांला सांगितली पाहिजे ...

या बसा!

चहा ठिवू का उलसा?

तसं चहासाखरीचं न्हायीचंय घरात

मुक्ते, गुळाचा खडा दे गं हातावं

नको का? र्‍हायलं ...!

मंग घ्या पटकशी लिव्हून ....

हातातोंडाचा घास नेला नं बाई मुडद्यानं!

सार्‍या कष्टाचं मातेरं झालं; पण गेल्यामागं कायी जात येत न्हायी!

देवानंच ह्या गव्हाणीत आणून बांधलं

त्याच्या मर्जीबिगर खुटा कसा सोडायचा?

आज त्यानं पाठ फिरवली म्हणून काय झालं?

लेकराबाळायच्या तोंडात तं घास भरावाच लागंल नं!

त्यायला का उपाशी ठिवावं?

जीवाहून दुःख कुडं मोठं आसतं काय वो ...

जीव लाखमोलाचा! पण कळंल त्याला?

दुःख कायी बसून र्‍हायला येत न्हायी; त्याला का यका जागी बूड टेकून भागंल का?

आज हे घर तं उद्या ते घर; हजेरी लावतच हिंडत असतं

ते त्याचं कामचंय!

मग आमचीबी हजेरी कशी चुकंल?

माझा दादला हालक्या दिलाचा, गेला निघून!

न्हायी देता आली त्याला हजेरी

त्याला कुनी सांगायचं की, जग त्याच्याच प्रश्नात गुंतलंय

ते का आपले प्रश्न सोडवायला येईल?

आपला आपणच भुईला रेटा द्यायचा

अन् उभं र्‍हायचं!

मोडलेल्या झाडाला डीर फुटतात का न्हायी!

तसंच माणसाचंबी हाये

माझ्या कुकवाला उमगलं न्हायी; संपवला जीव

यकपट अस्मानीनं मारलं

ह्ये दुख का कमी व्हतं? त्यात याची वाढ ....

मरणारं जातं दादा यका वाटेनं

मागं हजार वाटा उभ्या राहत्यात ... जिभल्या दावत; त्यांचं काय?

तुमीच सांगा मेलेल्याच्या नावानं रडायचं?

का हा मागं वाढून ठिवलेला पसारा निस्तरायचा?

काळजातलं वारूळ फुटून मुंग्या धावाय लागत्यात वो चौखूर

ते कुणाला उघडून दावायचं?

आतल्या आत हंबरडा फोडून रडून घ्यायचं झालं!

अहो, उलसाबी इचार केला न्हायी माघारी इचं कसं व्हईल?

चार लेकरांना कशी सांभाळील?

त्यानं घेतला गळफास

मीही घेऊन कसं चालंल ... ह्या लेकरांना उन्हात सोडायचं का?

अशानं असं व्हवून बसलं ...

किती सांगायची कैना?

लेकरायचे चिमनीएवढाले तोंडं झाले

भुका लागल्या वाटतं

मुक्ते, आण बाई चार गवर्‍या

चूल पेटून भाकरी थापते ...

जगायचं तं खावं लागंलच नं

आपलं दुख आपल्यापाशी ....

उजूक सवडीनं सांगेन कायी सांगायासारखं घडलंच तर!

पेपराबिपरात काय छापू नका

आन् कथाबिथाही लिव्हू नका!

गवरी थापावी तसं काळीज थोडंच थापता येतं?

अशी ही मातीची लेक दुःख करत भुई धरून बसत नाही. ती बसेल कशी? कृषिसंस्कृतीच जर तिनं पाठीवर घेतलीय. ती तिनं जर का उतरवून ठेवली, तर आहे ते नामशेष होऊन जाईल. मग आपण चित्रातली, कथाकादंबरीमधली कृषिसंस्कृती सांगत बसू. ती तसं करणार नाही. कारण तिच्या रक्तातून मातीचीच संवेदना फिरत असते. जागतिकीकरणाचा राक्षस तिची माती गिळू लागलाय. तिचा धनी त्या विळख्यात सापडतो. तिची मुलंही या भुलाव्यात गुरफटत जातात. मात्र माती वाचवली पाहिजे यासाठी तीच कंबर कसते. अशी आणखी एक लेक ‘आवडाई’ मला भेटली ....

आवडाई, इथल्या चिमण्याकावळ्यांनाही ठाऊकंय की,

तू या गावात आली ती अंगावरच्या एका लुगड्यानिशी

एका सांजेची भाकर खात दिवसाला दिवस जोडले

पैला पै जमवत उभा केला जमीनजुमला!

पण तुझ्या लेकांना काय त्याचं?

आवडाई तुझंच चुकलं

तू लागू दिली नाही त्यांच्या तळपायास माती

हातात पाटीपुस्तक ठेवलं

जास्तच साक्षर झाले

तुझे चारही लेक गाव सोडून गेले!

आता तरी हट्ट सोड; माती सोड!

ज्या मातीवर बसलीस उपोषणाला

त्या मातीचा सातबारा तुझ्या अंगठ्यानिशी

कंपनीच्या नावे झाला ...

नाहीतरी मातीत काय ठेवलंय गं आवडाई?

ते दिवस गेले; जेव्हा मातीतून सोनं पिकायचं

एका ‘बी’चे हजार दाणे व्हायचे

घरादारासकट चिमण्यापाखरांना, किडामुंगीला पुरून उरायचे ....

आता माती खोक खोक खोकू लागलीय

कंपनीच्या धुराड्यातून प्रदूषण ...

आवडाई, एवढी कशी निरक्षर राहिलीस?

भावनेचं अर्थशास्त्र कवटाळून बसलीस?

आवडाई, भावना काही भाकरीबरोबर चुरून खाता येत नाही!

आज जमीन कसायाऐवजी विकायलाच

मोप पैसे मिळतात ...

नाहक कोण हाडाचा चुना करत बसंल!

आवडाई, तुला असं का वाटतं की;

तुझी शेती पिकली नाही, तर देश उपाशी मरंल?

आवडाई, देश आता भाकर खात नाही!

आवडाई, आता तुझ्या देशाला मातीचीच गरज उरली नाही ....

हेका का सोडत नाहीये आवडाई तू?

अगं! ज्या चिमणीकावळ्याला फेकायचीस मूठ-मूठ दाणे,

तेही बघ दाण्याला चोच लावत नाहीयेत

भाकरीवरची वासना उडावी, तशी मरून गेलीय मातीवरची इच्छा!

त्यांना कळलं हे शेत तुझं राहिलं नाही म्हणून,

तू मात्र आडून राहिलीस!

ऊठ ऊठ आवडाई,

ऊठ!

जेसीबी येतंय दात वासवत ...

आवडाई, तुझ्या लेकांना कळलं असंल का,

जेसीबीच्या दातर्‍यांनी तुला मातीआड केलं?

आवडाई, मी बिलकूल लिहिणार नाही तुझ्यावर कविता

तुझं मरण लोकांना कळलं, तर

कुणीच कवटाळणार नाही माती!

आवडाई, खरंच गं खरंच माती वाचवायला हवीय ...!

आवडाई, ग्लोबल म्हैस फतकल मारून बसलीय

तुझ्या वावरात

तिला काठीनं ढुसण्या देवू पाहतोय तो हात कुणाचाय?

हे काय! शब्दांचं बियाणं खपली भेदून वर आलंय

डीर फुटलेत डीर ...!

खरंच मी लिहीत नाहीये कविता ...

आवडाई, तुझाच हात गिरवत चाललाय

कवितेची मुळाक्षरं ...!

खरं तर मातीच्या लेकीची गोष्ट अन् कविताही संपणारी नाहीये. ती कवितेत मावते कुठं? अन् गोष्टीतही नाही. कादंबरीची पानंही तिला बांधून घालू शकत नाहीत. विश्वाच्या अनंत एकर मातीभर ती पसरून राहिलीय. झाडासारखी उगवून आलीय. डोंगरासारखी मातीला बिलगून आहे. दरीसारखी पार मातीच्या काळजापर्यंत पोहोचलीय. लोकगीताच्या शब्दाशब्दांत तिनं कृषिसंस्कृतीला गोंदवून ठेवलंय ...! सृष्टीच्या नाभीत तिनं कस्तूरी पेरलीय. मातीची लेक उंचचउंच नभाला भिडलीय..

लेखक: ऐश्वर्य पाटेकर, युवा साहित्य अकादमी विजेता लेखक, नाशिक, संपर्क : 9822295672

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate