অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोंबड्यांना योग्य खाद्य द्या, चयापचयाचे आजार टाळा

वातावरणातील अतिशय बारीक सारीक बदल, व्यवस्थापनातील छोट्या त्रुटी, खाद्याच्या प्रमाणात आणि गुणवत्तेतील बदलामुळे कोंबड्यांच्या चयापचायाच्या प्रक्रियेत बदल होतात. यामुळे कोंबड्यांना वेगवेगळे आजार होतात. आजाराची लक्षणे ओळखून तज्ज्ञांकडून उपाययोजना कराव्यात.ध्याच्या परिस्थितीत उत्तम जाती, संतुलित आहार आणि काटेकोर संगोपनामुळे 38 ते 42 दिवसांत ब्रॉयलर कोंबड्या साधारणत: दोन किलो वजनाच्या होतात. याचबरोबरीने लेअर कोंबड्यांचे वार्षिक अंडी उत्पादन 300 ते 320 अंड्यांपर्यंत पोचले आहे.ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये मांसाची ज्या प्रमाणात वेगाने वाढ होते, त्या प्रमाणात हृदय आणि फुफ्फुस यांची वाढ होत नाही. कोंबड्यांचे फुफ्फुस जास्त प्रसरण पाऊ शकत नाही. यामुळे यामुळे कोंबड्यांचा चयापचयाचा वेग जास्त असतो आणि त्यांच्यावर ताण असतो.

चयापचयातील बिघाडामुळे होणारे आजार :

1) गाऊट 2) जलोदर 3) हार्ट अटॅक 4) फॅटी लिव्हर आणि किडनी सिंड्रोम5) मुडदूस

गाऊट

  1. कोंबड्यांच्या यकृतताध्ये प्रथिनांच्या चयापचय प्रक्रियेत युरिक ऍसिड हा टाकाऊ पदार्थ तयार होतो आजही तो मुत्राद्वारे बाहेर फेकला जातो.
  2. याउलट या आजारात रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढते. त्याचे वेगवेगळे क्षार फुफ्फुस, हृदय, यकृत, पोट, आतडे इ. वर असलेल्या पातळ पडद्यावर जमा होतात.

लक्षणे

  1. आजारामुळे अचानक मोठ्या प्रमाणात मरतुक होते. आजारी पक्ष्यांचे सांधे सुजलेले आढळतात निदान : मेलेल्या कोंबड्यांचे शवविच्छेदन केल्यास यकृत, हृदय, आतडे, फुफ्फुस इ. वरील पातळ पडद्यावर पांढरा चकाकणारा पदार्थ जमा झालेला पाहायला मिळतो.

कारणे

  1. ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये हा आजार मुख्यत: व्यवस्थापनातील त्रुटी आणि कोंबड्यांना पाण्याची कमतरता झाल्यामुळे होतो.
  2. इनफेक्‍शियस ब्रॉंकायटीस हा मुख्यत: श्‍वसन संस्थेचा व प्रजनन संस्थेचा आजार आहे. या विषाणूंचे काही प्रकार मूत्रपिंडास इजा पोचवितात. त्यामुळे मूत्रपिंडातून युरिक ऍसिडचे उत्सर्जन होत नाही, रक्तातील त्याचे प्रमाण वाढल्याने गाऊट होते.
  3. गंबोरो या आजार आणि 'अ' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही गाऊट होतो.
  4. लेअर कोंबड्यांच्या आहारामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण वाढल्यास गाऊट होतो.

उपाययोजना

  1. कोंबड्यांना स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात दिवसभर द्यावे.
  2. कोंबड्यांना संतुलित आहार द्यावा. योग्य व्यवस्थापन करावे.
  3. इनफेक्‍शियस ब्रॉंकायटीस आणि गंबोरो या आजारांचे लसीकरण करावे.

उपचार

  1. आजाराचे निदान होताच सर्वांत प्रथम कोंबड्यांना स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
  2. काही दिवसांकरिता आहारातील प्रथिनांचे प्रमाण कमी करून ऊर्जेचा स्रोत वाढवावा.
  3. लेअर कोंबड्यांच्या आहारामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त नसावे.
  4. तज्ज्ञांच्या सल्ल्याने मुत्राची आम्लता कमी करणारी औषधे द्यावीत.

जलोदर

ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये चयापचयच्या प्रक्रियेचा वेग जास्त असतो, त्यांचे वजन खूप वेगाने वाढते. यामुळे हृदय व फुफ्फुसांवर कायम अतिकामाचा ताण असतो आणि यामुळेच हा आजार होतो.

कारणे

  1. जास्त खाद्य देणे, गोळी खाद्य देणे.
  2. शेडचे तापमान कमी होणे, शेडमध्ये गर्दी जास्त होणे.
  3. शेडमध्ये हवा खेळती न राहणे, शेडमध्ये अमोनियाचे प्रमाण वाढणे.
  4. ब्रुडिंग व्यवस्थित न होणे.
  5. यकृतास इजा पोचवणाऱ्या जिवाणू / विषाणू/ बुरशींचा संसर्ग.

लक्षणे

  1. कोंबड्या काहीही विशिष्टप्रकरणी लक्षणे न दाखवता मरतात.
  2. आजारी पक्षी शांत बसतात, कमी खातात, वजनही कमी होते.
  3. कोंबड्यांचे पंख विस्कटलेले दिसतात. काही कोंबड्यांचे पोट फुगलेले दिसते.
  4. हा आजार 4 ते 6 आठवड्यांच्या कोंबड्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.

निदान

शवविच्छेदन करून पशुवैद्यकाकडूनच करून घ्यावे.

नियंत्रण

  1. ब्रॉयलर कोंबड्या वयाच्या 7 ते 21 व्या दिवसांपर्यंत साधारणत: दिवसामध्ये 6-8 तासांपर्यंत खाद्य बंद ठेवल्यास फायदा होतो.
  2. गोळी खाद्य न वापरता मॅश वापरल्यास कायदा होतो.
  3. शेडचे तापमान नियंत्रित ठेवावे, अमोनियाचे प्रमाण वाढू देऊ नये.
  4. शेडमध्ये वायुविजन चांगले राहील याची काळजी घ्यावी.

उपचार

या आजारावर औषधोपचाराचा विशेष फायदा होत नाही, परंतु आहारात एल- अर्जिनीन या अमायनो ऍसिडचे, तसेच 'क' जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढविल्यास फायदा होतो.

हार्ट अटॅक

हा आजार मुख्यत: ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये होतो. जास्त खाद्य खाल्ल्यामुळे आणि झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे पक्षांच्या हृदयावर अतिकामाचा ताण येऊन ते काम करणं बंद होतं आणि कोंबड्या अचानकच मरतात.

साधारणत:2-4 आठवड्यांच्या नरपक्ष्यांमध्ये हा आजार जास्त आढळून येतो.

लक्षणे

  • अतिशय वेगाने वाढणाऱ्या आणि चांगले वजन असणाऱ्या कोंबड्या अचानकच पंख फडफडायला सुरवात करतात, आचके देतात आणि काही मिनिटांत पाय वर करून उलट्या होऊन मरतात.

प्रतिबंध

  • प्रतिबंध हाच उपचार आहे. कारण उपचार करण्यास वेळच मिळत नाही. कोंबड्यांच्या आहारात बायोटीन, इ. जीवनसत्त्वे शिफारशीनुसार द्यावीत.

 

संपर्क : डॉ. व्ही. एस. धायगुडे : 9860534482

(लेखक मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत : अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate