অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोंबड्यातील जिवाणूजन्य रोगांवर उपचार

कोंबड्यांचे आरोग्य व्यवस्थापन, आहार नियोजन, जैवसुरक्षा, लसीकरण याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. अलीकडच्या काळात कोंबड्यांमध्ये जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कुक्कुटपालकांनी तज्ज्ञांकडूनच रोगाचे निदान करून योग्य औषधोपचार करावेत. 

कोलिसेप्टिसेमिया

1) या रोगाचे जंतू पक्ष्यांच्या आतड्यांमध्ये आढळतात. विष्ठेद्वारे ते बाहेर येतात. 
2) अंड्याला विष्ठा लागल्यास हे जीवाणू अंड्यावरील कवचांमध्ये छिद्राद्वारे अंड्यामध्ये प्रवेश करतात. ही अंडी उबवल्यानंतर जन्मलेल्या पिल्लांमध्येही हे जिवाणू आढळतात. 
3) हा रोग दूषित पाणी, खाद्य, हवा इत्यादींद्वारे पसरतो. 
लक्षणे - 
1) हा रोग कमी वयाच्या पक्ष्यांमध्ये जास्त तीव्र स्वरूपात दिसतो. 
2) आजारी पक्षी अशक्त व मलूल दिसतात. त्यांची भूक मंदावते, वाढ अनियमित होते. 
3) पिसे विस्कटलेली दिसतात, त्यांना पांढरट हगवण लागते. 
4) सुरवातीला या रोगात श्‍वसनविषयक लक्षणे दिसतात. रात्रीच्या वेळी घशातून घरघर आवाज ऐकू येतो. 
5) वेळेवर योग्य औषधोपचार न झाल्यास मोठ्या प्रमाणात मरतूक दिसून येते. 
नियंत्रणाचे उपाय - 
1) रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उत्तम व्यवस्थापन, शेडची स्वच्छता, निर्जंतुकीकरण केलेले पाणी आणि जैवसुरक्षेचे काटेकोरपणे पालन या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. 
उपचार - 
1) उपचार करण्यापूर्वी योग्य व परिणामकारक प्रतिजैवक निवडण्यासाठी "ऍन्टीबायोटिक सेन्सिटीव्हिटी टेस्ट' करून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. 
2) तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार क्‍लोरॅमफिनीकॉल, क्‍लोरटेट्रासायक्‍लीन, निओमायसीन, जेंटामायसीन, इनरोफ्लॉक्‍सॅसीन, इत्यादी प्रतिजैविके योग्य मात्रेमध्ये औषधोपचारासाठी वापरावीत.

पुलोरम

1) या रोगास पांढरी हगवण असे म्हणतात. 
2) हा संसर्गजन्य रोग असून, तो मुख्यतः अंडी उबवणी केंद्रामध्येच बाधित अंड्यांद्वारे पिलांना होतो. 
3) रोगातून बरे झालेले पक्षीदेखील शरीरातून जिवाणू बाहेर सोडतात. सभोवतालचे वातावरण दूषित करतात. त्यांच्यापासून मिळणारी अंडीसुद्धा रोगाने बाधित असतात.
4) हा रोग सालमोनेल्ला पुलोरम या जिवाणूमुळे होतो. 
5) हा रोग सर्व वयोगटांतील पक्ष्यांना होतो. परंतु 2 ते 3 आठवडे वयाच्या पिल्लांमध्ये जास्त तीव्र स्वरूपात आढळतो. 
6) या रोगाचा प्रसार दूषित अंडी उबवल्यानंतर पिल्लांना होतो आणि मग विष्ठेतून दूषित पाणी, खाद्य यांद्वारे इतर पक्ष्यांना होतो.

लक्षणे

1) रोगाची लागण झालेली पिल्ले अंडी उबवण केंद्रामध्ये जन्मापूर्वी अंड्यामध्येच मरण पावतात किंवा जन्मानंतर लगेचच मरतूक सुरू होते. 
2) आजारी पक्षी अशक्त दिसतात. त्यांचे खाणेपिणे कमी होते. त्यांना पांढरट हगवण होते. 
3)पिल्ले उब मिळवण्यासाठी गर्दी करून बसतात.

नियंत्रणाचे उपाय

1) ब्रीडर पक्ष्यांची वेळोवेळी सालमोनेल्ला तपासणी करावी. जे ब्रीडर पक्षी रोगाने बाधित आहेत, त्यांना ताबडतोब नष्ट करावे. असे केल्याने अंड्यातून होणारा प्रसार टाळता येतो. 
2) कुक्कुटपालकांनी पिल्ले विकत घेताना ब्रीडर पक्ष्यांचे रेकॉर्ड; तसेच उबवण केंद्रातील व्यवस्थापनाविषयी माहिती घ्यावी. 
3) रोगप्रतिबंध करण्यासाठी वेळोवेळी शेडची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. 
4) योग्य व्यवस्थापन, जैवसुरक्षेचे काटेकोर पालन केल्याने हा रोग टाळता येतो. 
उपचार - 
1) रोगाच्या लक्षणांची तपासणी करून त्यानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत. ऍमॉक्‍सीसिलीन, ऍम्पीसिलीन, सिफालेक्‍सीन, क्‍लोरॅमफिनीकोल, डॉक्‍सीसायक्‍लीन ही प्रतिजैवके मरतुक कमी करतात; परंतु रोगाने बाधित पक्षी शक्‍यतो पूर्ण बरे होत नाहीत.

फाउल टायफॉईड

1) हा रोग प्रामुख्याने मोठ्या कोंबड्यांमध्ये दिसून येतो. 
2) बाधित अंड्यांमार्फत जन्माला येणाऱ्या पिलांना हा रोग होतो. 
3) शेडमध्ये बाधित पक्ष्यांच्या विष्ठेद्वारे दूषित पाण्यातून; तसेच खाद्यातून हा रोग पसरतो. 
लक्षणे - 
1) पक्षी खाणेपिणे कमी करतात, पक्षी डोळे बंद करून एका जागेवर उभे राहतात. 
2) पक्ष्यांना श्‍वासोच्छवासास त्रास होतो. पक्षी पाण्यासारखी पातळ हगवण करतात. 
3) दिवसेंदिवस मरतुक वाढत जाते, औषधोपचार न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. 
उपचार - 
लक्षणाची तपासणी करून तज्ज्ञांच्या सल्याने उपचार करावे.

इन्फेक्‍शियस कोरायझा

1) हा सर्व वयोगटांतील पक्ष्यांना होतो. 
2) जास्त वयाच्या पक्ष्यांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळून येतात. 
लक्षणे - 
1) डोक्‍याच्या समोरील भाग व डोळे सुजलेले दिसतात. डोळे आतून लाल होतात, डोळ्यांवाटे पाणी वाहते. 
2) पक्ष्यांच्या नाकावाटे पातळ, पांढरट पिवळसर स्राव बाहेर पडतो. 
3) श्‍वासोच्छवासास त्रास होतो. 
नियंत्रणाचे उपाय - 
1) योग्य व्यवस्थापन आणि जैवसुरक्षेचे उपाय केल्यास या रोगाचा प्रसार टाळता येतो. 
उपचार - 
1) तज्ज्ञाच्या सल्ल्याने शिफारशीत प्रतिजैवकांचा वापर करून रोगाचे नियंत्रण करता येते.

क्रोनिक रेस्पायरेटरी

1) हा रोग बाधित अंडी उबवल्यानंतर जन्मास येणाऱ्या पिलांना होतो. 
2) रोगाचे जिवाणू मुख्यतः दूषित हवेतून पसरतात. वातावरणात झालेले अचानक बदल, पक्ष्यांची जास्त प्रमाणात हाताळणी, शेडमध्ये अमोनियाचे जास्त प्रमाण, कमी जागेत जास्त पक्षी ठेवणे, श्‍वासनलिकेचे आजार यामुळे पक्षी या रोगास बळी पडतात. 
3) हा रोग झाल्यानंतर त्याबरोबर कोलिसेप्टिसेमिया, कोरायझासारखे रोगही पक्षास होतात. 
लक्षणे - 
1) हा रोग मांसल कोंबड्यांमध्ये साधारणतः 4 ते 8 आठवड्यांच्या वयामध्ये होतो. 
2) श्‍वसनास त्रास होणे, खोकणे तसेच शिंका येणे ही प्रमुख लक्षणे आहेत. 
3) या रोगात पक्षी बऱ्याच वेळा मान उंचावून श्‍वास घेतात. त्यांच्या नाकातून चिकट स्राव बाहेर येतो. 
4) पक्ष्यांच्या घशातून घरघर आवाज येतो. पक्षी कमी खातात, त्यांचे वजन कमी होऊन वाढ खुंटते.

नियंत्रणाच्या उपाययोजना

1) शेडमध्ये पक्ष्यांची गर्दी कमी करावी. 
2) वातावरणातील अचानक बदलांपासून पक्ष्यांचे संरक्षण करावे. 
3) समतोल खाद्य तसेच उच्च प्रतीचे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे असते. 
4) शेडमध्ये धुळीचा त्रास नसावा. शेडमध्ये वाढणाऱ्या अमोनियापासून पक्ष्यांचे संरक्षण करावे.

पक्ष्यांवर उपचार करताना

1) पक्ष्यांमध्ये रोगाची लक्षणे दिसताच, मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करून वैद्यकाच्या सल्ल्यानेच औषधोपचार सुरू करावेत. 
2) पक्षी आजारी नसताना विनाकारण प्रतिजैविके व इतर औषधांचा वापर करू नये.


संपर्क - डॉ. धायगुडे - 9860534482, डॉ. मेश्राम - 9594581239 
( लेखक मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate