आमच्या कृषी अभ्यास दौऱ्याची सुरवात जर्मनीमधील फ्रँकफर्ट येथून झाली. या दौऱ्यामध्ये राज्यातील ४५ शेतकरी आणि तीन कृषी अधिकारी सामील झाले होते. जून महिन्यात येथील वातावरण अत्यंत आल्हाददायक होते. वसंत ऋतूमुळे शेतीची विविधता, येथील शेतकऱ्यांचे जनजीवन पाहता आले. आमच्या प्रवासामध्ये टूर गाईड परिसराची, गावांची, तसेच त्या देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी याची सर्व माहिती देत होता.
फ्रँकफर्टहून ॲमस्टरडॅमकडे बसने जाताना आम्ही पशुपालकाचा गोठा, डेअरीला भेट दिली. त्या शेतकऱ्याकडे जर्सी गाई होत्या. शेतकऱ्याच्या गोठ्यात सर्व गाईंचे दूध यंत्राने काढण्यात येत होते. त्याच्याकडील एकूण लागवड क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्र चारा लागवडीखाली होते. चारा लागवडीमध्ये ठराविक दिवसांचे अंतर ठेवले असल्याने गरजेनुसार सकस चारा गाईंसाठी उपलब्ध होत होता. मजुरांची कमतरता असल्याने या चाऱ्याची कापणी यांत्रिक पद्धतीने करून त्याचे गोल बंडल तयार करण्यात येतात. हे चाऱ्याची बंडले लॅस्टिक वेष्टनात पॅकिंग करून ठेवली जातात. थंडीच्या काळात चाऱ्याची उपलब्धता नसल्याने साठवलेल्या चाऱ्याचा त्या काळात हे शेतकरी वापर करतात.
बाजारपेठेची मागणी पाहून या शेतकऱ्याने पशुपालनाच्या बरोबरीने चीजनिर्मिती उद्योगही सुरू केला आहे. या उद्योगामध्ये कुटुंबीयांची चांगली साथ या शेतकऱ्याला मिळाली. विक्री केंद्रामध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार ५०० ग्रॅम, एक किलो, दोन किलो, पाच किलो, दहा किलो अशा विविध आकारांमध्ये चीजचे गोळे या शेतकऱ्याने बनवून ठेवले होते. त्याला विशिष्ट प्रकारचे पॅकिंगही केले होते. त्यामुळे त्याची टिकवणक्षमता चांगली वाढली होती. विशेष म्हणजे विविध स्वाद असलेले चीजचे प्रकार त्याच्या विक्री केंद्रात पाहावयास मिळाले. त्या शेतकऱ्याने स्वतःच्या चीज उत्पादनाचा ब्रँड तयार केला होता. तसेच त्यावर ‘होममेड‘ असे लेबलही लावले होते. चीजच्या विक्रीसाठी त्याने विविध शहरांतील व्यापाऱ्यांशी करार केला होता. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार तो चीजचा पुरवठा वर्षभर करतो.
चीजनिर्मितीबरोबरच या शेतकऱ्याचा लाकडी बूट बनविण्याचा घरगुती उद्योगही होता. घरातील पुरुष मंडळींच्याकडे जनावरांची देखभाल आणि दूध काढणे आणि लाकडी बूट तयार करण्याची जबाबदारी होती. तर महिला वर्गाकडे चीजनिर्मितीची जबाबदारी होती. या परिसरातील गावांमध्ये चीज आणि लाकडी बुटांना चांगली मागणी होती. या देशात भेटवस्तू म्हणून लाकडी बूट नातेवाइकांना देण्याची पद्धत आहे. एकूणच शेती, पशुपालन आणि दुग्धप्रक्रिया उत्पादने, तसेच लाकडी बूट उत्पादन व्यवसाय यामुळे हा शेतकरी चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवीत होता. संपूर्ण कुटुंब या सर्व व्यवसायात सहभागी होते. शेतकऱ्याचा गोठा, बूटनिर्मिती कारखाना पाहिल्यानंतर आम्ही ॲमस्टरडॅम येथे पोचलो.
१) ॲमस्टरडॅम येथील अल्समेर येथील फ्लॉवर ऑक्शन सेंटर (फूल लिलाव केंद्र) ‘फ्लोरा हॉलंड’ हे पहाटे चारपासून सुरू होते. हे विक्री केंद्र ५०० खासगी फूल उत्पादकांनी एकत्र येऊन उभारले आहे. ते खासगी पद्धतीने चालविण्यात येते. २) जगभरातील विविध प्रकारच्या फुलांची येथे खरेदी आणि विक्री या लिलाव केंद्रात होते. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करण्यात येतो. दोन मोठ्या हॉलमधील स्क्रीनवर फुलांचे फोटो, गुणधर्म, पुरवठादाराचे नाव, एका कंटेनरमध्ये असलेली फुलांची संख्या, खरेदीदारांचा नंबर, तपासणीबाबतचा शेरा, फुलांची उपलब्धता याची माहिती दिली जाते. त्या वेळी स्वनियंत्रित ट्रॉलीमधून मोठ्या आकाराच्या बॉक्समधून व्यापाऱ्यांना फुलांचे नमुनेसुद्धा दाखविण्यात येतात. या हॉलमध्ये सुमारे ३३० व्यापारी एका वेळी बसून आपापल्या संगणकावर हॉलमधील स्क्रीनवर दर्शविलेली माहिती बघून आपली बोली लावतात. इलेक्ट्रॉनिक फलकावर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने सुई फिरत असते. हॉलमधील व्यापाऱ्यांनी संगणकावर बोली लावल्यानंतर सुई ज्या ठिकाणी थांबून ते दर मार्केट कमिटीच्या संगणकामध्ये नोंदवले जातात. अशा प्रकारे सर्वांत जास्त बोली लावणारा खरेदीदार अंतिम होतो. काही तासांतच मोठ्या रेफ्रिजरेटेड ट्रकमधून पुरवठादाराकडून व्यापाऱ्याने सांगितलेल्या ठिकाणी फुले रवाना होतात. त्याच वेळी शेतकऱ्याच्या खात्यावर फुलांची रक्कम व्यापाऱ्याकडून जमा केली जाते. ३) बाजारात लिलाव केंद्राच्या हॉलजवळच बाजारपेठेत विक्रीस आलेल्या फुलांचे नमुने व्यापाऱ्यांना पाहावयास ठेवलेले असतात. त्या ठिकाणी केवळ व्यापाऱ्यांना प्रवेश आहे. लिलाव केंद्रातील सर्व संगणकांवर बाजार समितीचे सॉफ्टवेअर लावलेले असून, त्यावर पूर्ण नियंत्रण समितीचे असते. व्यापारी केवळ बोली लावण्यासाठी त्यांचा वापर करतात. यामध्ये कोणतीही लपावाछपवी नसल्याने फुलांचा दर जगजाहीर होतो. त्याचप्रमाणे शेतकरीसुद्धा मालाच्या गुणवत्तेमध्ये कोणतीही हातचलाखी न दाखविता गुणवत्तेप्रमाणेच सर्व फुले असल्याची खात्री देतो. यामध्ये कोणतीही त्रुटी ठेवली जात नाही, फसवेपणा केला जात नाही. संपूर्ण लिलाव केंद्र हे वातानुकूलित आहे. तसेच सभासदांसाठी बँक, स्वच्छतागृह, कँटीनची सुविधासुद्धा उपलब्ध आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सातारा जिल्ह्यात गटशेतीची पाळेमुळे चांगलीच रुजली आ...
उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत हिंगोली शहरात जिल्ह...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...
कडधान्य पिकांचे मानवी आह्यरात महत्वाचे स्थान आहे. ...