অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्राम विकासाचा नवा पर्याय - करंज शेती

इंधन ही एक ग्रामीण भागाची मुख्य गरज असून, इंधनामध्ये स्वयंपूर्ण होणे अत्यावश्‍यक आहे. याचा अर्थ स्थानिक स्तरावर इंधनपूरक घटकांतूनच इंधनाची गरज भागवावी लागेल. आज आपण इंधनाची गरज भागविण्यासाठी आयात केलेले महागडे डिझेल वापरतो. हे टाळण्यासाठी करंज झाडाची लागवड करणे हा एक सक्षम पर्याय आहे.

विकासाचा असमतोल

2011 च्या जनगणनेनुसार, ग्रामीण भारतातील 22 टक्के लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी किमान अर्धा किमी चालत जावे लागते. आजही 43 टक्के ग्रामीण भारतातील घरात घासलेटच्या कंदिलाचा उजेड आहे, त्या तुलनेत शहरी भागात घरात प्रकाशासाठी वीज वापरणाऱ्यांचे प्रमाण 93 टक्के आहे. आजही ग्रामीण भागातील 85 टक्के लोक स्वयंपाकाच्या इंधनासाठी घासलेट, लाकूडफाटा, कचरा, शेणाच्या गोवऱ्यांवरच अवलंबून आहेत. शहरी भागातील 20 टक्के जनतेलाही स्वयंपाकाच्या इंधनासाठी या साधनांचा अवलंब करावा लागत आहे. स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण शहरी भागात दोन तृतीयांश आहे. आजही भारतातील केवळ 41 टक्के घरे ही राहण्याच्या लायकिची आहेत. 5.3 टक्के घरे ही "मोडकळीला आलेली' या सदरात मोडतात. 10 टक्के घरे ही रिकामी पडलेली आहेत. 30 टक्‍क्‍यांहून अधिक कुटुंबांत सहा सदस्य आहेत आणि घर असलेल्यांपैकी दोन तृतीयांश लोक "वन अथवा टू' रूम किचनमध्ये राहत आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुमारे 40 टक्के जनता अधिकृत शौचालयाशिवाय राहत आहे. आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी युरोपियन प्रगतीची परिमाणे लागू करता येणार नाहीत. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी शहरे हे आपल्या राष्ट्राच्या विकासाचे परिमाण नाही, तर या राष्ट्राचा विकास तेव्हाच शक्‍य होईल, जेव्हा येथील खेडी स्वयंपूर्ण होतील. मात्र परिस्थिती याउलट असल्याने विकासाचा असमतोल निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होताना दिसते.

शहराकडे स्थलांतर

ग्रामीण भागात रोजगाराचा अभाव असणे हे एक स्थलांतर होण्यामागचे मुख्य कारण आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण ग्रामीण भागातील संसाधनावर पडतो. त्याचप्रमाणे निसर्गाच्या शोषणातून नैसर्गिक चक्र बिघडल्याने नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी रसायनांचा शेतीमध्ये अतिरेकी वापर करण्यात येऊ लागला. परिणामी उत्पादन खर्च वाढूनही उत्पादनात पुरेशी वाढ होताना दिसत नाही. उलट जमिनीचा कस खालावताना दिसतो. या सर्वांचा परिणाम ग्रामीण भागातील रोजगाराचे मुख्य साधन असलेल्या शेती व्यवसायावर होऊ लागला. परिणामी, ग्रामीण भागातून मोठ्या उदरनिर्वाहासाठी शहरांकडे स्थलांतर होताना दिसते. अनेक कारणांमुळे शहरी भागाकडे होणारे स्थलांतर रोखणे ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्‍वत विकास करण्यासाठी आवश्‍यक आहे.

ग्रामीण भागाच्या शाश्‍वत विकासाकरिता उपाय

पाण्याची पुरेशी उपलब्धता - पावसाची अनियमितता असल्याने, पाणी साठण्याचे प्रमाण घटल्याने आणि ग्रामीण भागातील जलस्रोतातील पाणी शहरांकडे जात असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासताना दिसून येते. जलसंचयाचे अत्याधुनिक प्रयोग खेड्यापर्यंत पोचवून गावांना जलसमृद्ध बनविल्यास आणि शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध करून दिल्यास शहरांकडे होणारे स्थलांतर थांबून ग्रामीण भागांचा शाश्‍वत विकास होण्यात नक्कीच मदत होईल.

हवामान बदलास अनुकूल पीक पद्धतीचा विकास - शेतीतील उत्पादनाची पातळी स्थिर राखण्यासाठी उच्च उत्पादनक्षमतेच्या आणि दुष्काळ, पूर, जमिनीचा खारटपणा आदी प्रतिकूल बाबींवर मात करू शकतील, अशा पिकांच्या जाती विकसित करणे फायद्याचे ठरू शकेल. त्याचप्रमाणे पिकांच्या जातींमध्ये विविधता आणून शेतीची उत्पादकता वाढविता येऊ शकते. तापमान आणि आर्द्रता बदलामुळे निर्माण झालेल्या तणावांमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याचा हा प्रभावी उपाय असू शकेल. यामध्ये वनस्पतींचे उपलब्ध प्रकार, वाणे आणि संकरित वाणांच्या जागी दुष्काळ आणि उष्णतावाढीशी जुळवून घेणाऱ्या नव्या जाती लागवडीत आणण्याचाही समावेश होतो. हवामान बदलाच्या काळात पीक प्रणालीची लवचिकता वाढविण्यामध्ये हे महत्त्वाचे ठरेल.

स्वयंपूर्ण गावांची उभारणी - उदरनिर्वाहासाठी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी "रोजगार व स्वयंरोजगार स्वयंपूर्ण गावां'ची उभारणी होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी तरुणांना रोजगार देऊ शकणारे लघुउद्योग उभारणे, राष्ट्रीय रोजगार हमी योजना सक्षमपणे राबविणे आवश्‍यक आहे.

घर तेथे शौचालय आणि शेत तेथे शेततळे - ग्रामीण भागामध्ये स्वच्छता ठेवणे हा सर्वांगीण विकासातील एक महत्त्वाचा भाग असायला हवा. केंद्र शासनाने सुरू केलेले "स्वच्छ भारत अभियान' ही त्याचीच प्रचिती आहे. त्याचबरोबर जिरायती शेती सिंचनाखाली आणण्यासाठी प्रत्येक शेतामध्ये त्याच्या आकारानुसार शेततळे असायला हवे.

ग्रामीण भागाचा स्वयंपूर्ण विकास करण्यासाठी करंज लागवड हा एक समर्थ उपाय आहे.

करंज शेती - माणसाच्या सर्वांगीण विकासात अन्नधान्याचे उत्पादन हवेच; पण हे अन्नधान्याचे उत्पादन इंधनाविना उपयोगी ठरणार नाही. कारण "अन्न' या प्रमुख गरजेच्या पोटातच इंधनाची गरज दडलेली आहे आणि शेतीमधील सर्व सोपस्कार पार पडण्यासाठी वीज किंवा डिझेल या इंधनाची आवश्‍यकता आहे. आजमितीला खेडेगावातून घरातील "सिंगल फेज' वीज 24 तास असली, तरीही पंपाला लागणारी "थ्री फेज' वीज मात्र केवळ सहाच तास उपलब्ध असते. हा मुद्दा कोणताही शेतकरी अमान्य करणार नाही, त्यामुळे इंधन ही एक मुख्य गरज असून, इंधनामध्ये स्वयंपूर्ण होणे अत्यावश्‍यक आहे. याचा अर्थ स्थानिक स्तरावर इंधनपूरक घटकांतूनच इंधनाची गरज भागवावी लागेल. आज आपण इंधनाची गरज भागविण्यासाठी आयात केलेले डिझेल वापरतो आणि ते गावांपर्यंत पोचेपर्यंत त्याच्या वाहतुकीतही तो खर्च होतो. हे टाळण्यासाठी करंज झाडाची लागवड करणे हा एक सक्षम पर्याय आहे.

  • करंज ही लेग्युमिनेसी कुळातील सदाहरित वनस्पती आहे.
  • ती मुळची आशिया खंडातील असून, फिलिपिन्स, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि मध्य अमेरिकेतील उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात वाढते.
  • पडीक, रेताड, खडकाळ, निचऱ्याच्या तसेच क्षारयुक्त जमिनीतही करंजची चांगली वाढ होते.
  • करंजच्या वृक्षाला तिसऱ्या वर्षांपासून शेंगा येऊ लागतात. 4 ते 5 वर्षांमध्ये व्यापारी स्वरूपाचे उत्पादन मिळते.
  • करंजच्या मुळांचा रस जखमा धुण्यासाठी वापरला जातो.
  • गुरांना चारा म्हणून पानांचा उपयोग केला जातो.
  • करंज वृक्षाचे लाकूड जळण म्हणून वापरता येते तर लाखेचे कीटक पोसण्यासाठी आधारवृक्ष म्हणूनही या झाडाचा उपयोग होतो.
  • सर्वांत महत्त्वाचा आणि गाव इंधनामध्ये स्वयंपूर्ण होण्यामध्ये उपयोगाच्या ठरतात त्या करंजाच्या बिया.
  • बियांपासून तेल काढता येते आणि मिळणाऱ्या पेंडीचा उपयोग बायोगॅसच्या निर्मितीसाठी करता येतो.

करंज तेलाचा उपयोग

  • कंरजाच्या बीमध्ये सुमारे 27 ते 40 टक्के तेल असते.
  • यांत्रिक घाणे वापरले, तर 24 ते 26.5 तेल निघू शकते.
  • खेडगावातील बैलाच्या घाण्यावर फक्त 18-22 टक्के तेल निघू शकते.
  • करंज तेलाचा वापर भिंतीला देण्याच्या रंगात, साबण व कीटकनाशके बनविण्यासाठी, कातडी कमविण्यासाठी तसेच वंगण म्हणून करतात.
  • करंज तेल बायोडिझेल किंवा डिझेलला पर्याय म्हणूनही वापरले जाते.
  • आज कर्नाटकात लिफ्ट इरिगेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या डिझेल पंससेटकरिता शेतकरी करंज तेलाचा वापर करत आहे.
  • शिवाय करंज तेलाचा वापर ऑटोरिक्षासारखी वाहने चालविण्यासाठीसुद्धा करता येणार आहे.

आपल्या देशातील एकूण 329 दशलक्ष हेक्‍टर भौगोलिक क्षेत्रांपैकी 50 टक्के क्षेत्र पडीक अथवा कमी उत्पादनक्षम आहे, तसेच 50 टक्के जनता बेकार आहे. या दोन्हींचा उपयोग करून अन्नधान्य उत्पादनात कमतरता न येता करंज तेलासारख्या अखाद्य तेलाचे उत्पादन वाढविले पाहिजे. ज्यातून पेट्रोलियम उत्पादनांवरील अवलंबित्व कमी होईल. करंजाच्या साधारण 160 किलो शेंगांपासून 40 लिटर करंज तेल मिळते. करंज तेलाची साधारण 25 रुपये लिटरप्रमाणे किंमत गृहीत धरले, तरी किमान हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. मोठ्या प्रमाणात करंजाची लागवड केल्यास शेतमजुरांना बिया संकलनाचा पूरक रोजगारही मिळू शकतो. त्याचप्रमाणे करंज बियांपासून तेल काढणीचा लघुउद्योग सुरू करता येतो. त्यातून पुरेशा प्रमाणात तेलाचे उत्पादन मिळून तो स्थानिक स्तरांवरसुद्धा विक्री करता येऊ शकेल. शिवाय तेल उत्पादन करण्याचा, तो आयात करण्याचा आणि त्याची वाहतूक करण्याचा मोठा खर्च वाचेल. स्थानिक स्तरावर स्थानिक स्रोतांआधारे इंधन मिळू शकेल. करंज वृक्षामुळे हरित पट्ट्यात वाढ होते आणि आज मोठ्या प्रमाणात जी तापमान वाढ होत आहे, ते रोखण्यामध्ये अल्पशी भूमिका अदा करता येऊ शकते.

करंज लागवड ठरावे जनआंदोलन

करंज तेलाच्या उत्पादन प्रक्रियेतून गावातील संसाधने गावातच वापरली जात असल्याने संसाधनाची वाहतूक लांब अंतरावर करण्याची गरज नाही म्हणजेच मुंबई बंदरात आलेले आयात डिझेल गावांपर्यंत नेण्याचा खर्च वाचेल आणि त्यासाठी वाया जाणारे डिझेलही वाचेल आणि वातावरणातील प्रदूषणही कमी होईल. रासायनिक खतांऐवजी करंज पेडींचा वापर केल्याने रासायनिक खतांची वाहतूक टळेल. त्यासाठी होणारी डिझेलची उधळपट्टी वाचेल आणि जमिनीचा पोतही सुधारेल. शिवाय डिझेल आयात करण्यासाठी लागणारे बहुमूल्य परकीय चलन वाचेल, त्यामुळे करंज लागवडीचा कार्यक्रम "जनआंदोलन' म्हणून चालविणे गरजेचे आहे.

साधारण 160 किलो शेंगांपासून 40 लिटर करंज तेल (25 रुपये प्रतिलिटर), 120 किलो करंज पेंड, 250 किलो हिरवा पाला, त्यांचे साधारण किंमत अनुक्रमे 2 आणि 1 रुपया असे गृहीत धरले, तरी पूर्ण वाढ झालेल्या एका करंज वृक्षापासून शेतकऱ्याला 1 हजार 490 रुपये उत्पन्न मिळू शकतात. 

(लेखक वनराई संस्थेत सचिव आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 8/7/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate