অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलसमृध्‍दीसाठी शेततळे

जलसमृध्‍दीसाठी शेततळे

दिवसेंदिवस कमी होत जाणारा पाऊस आणि त्‍यामुळे उद्भवणारी पाणी टंचाई या नेहमीच्‍या गोष्‍टी झालेल्‍या दिसून येतात. पाणी म्‍हणजे जीवन आहे, जपून वापर करा, असे कितीही ओरडून सांगितले तरी पाण्‍याचा काटकसरीने वापर करण्‍याची अजून सवय झालेली नाही. पाण्‍याअभावी माणसांचेच हाल होत नाहीत तर जनावरांचेही मोठे हाल होतात. जेव्‍हा मोठया कष्‍टाने घाम गाळून फुलवलेली फळबाग पाण्‍याअभावी वाळते तेव्‍हा शेतक-याच्‍या डोळयातील पाणीही आटलेले असते

पाणलोट क्षेत्र विकास योजनेखाली जलसंधारणाच्‍या विविध उपायांचा अवलंब केला जातो. यामध्‍ये नालाबांध, सिमेंट बांध, पाझरतलाव,कोल्‍हापुरी पध्‍दतीचे बंधारे यांचा समावेश आहे. या कामांमुळे त्‍या परिसरातीलच शेतक-यांना लाभ मिळत असे. तथापि शेततळयामुळे शेतक-यांना वैयक्‍तिक लाभ घेता येत आहे.

पावसाचा अनियमितपणा व लहरीपणा यावर बंधन घालणे मानवाच्‍या हातात नाही.  मात्र पाण्याचे  योग्यरितीने व्यवस्थापन केल्यास कोरडवाहू शेतातील अडचणीवर काही प्रमाणात का होईना मात करता येऊ शकते.  राज्यातील ब-याचशाकोरडवाहू जमिनी काळया मातीच्या आहेत. पडणा-या पावसाचे पाणी हे मोठया प्रमाणात जमिनीवरुन वाहते.

साधारणत: हे प्रमाण पडणा-या पावसाच्या  30 टक्‍क्‍यांपर्यंत असते. हे पाणी अडवून, साठवून आणि नंतर गरजेच्या वेळी वापरणे हे शेततळयाच्या माध्यमातून शक्य आहे.

शेत जमिनीतून वाहत जाणारे पाणी अडचणीच्‍या वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळयास शेततळे म्हणतात. शेतात तळेकरुन भुपृष्टावरुन वाहत जाणारे पाणी त्यात साठवून त्याचा उपयोग जलसिंचनासाठी करता येऊ शकतो. पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हापावसाअभावी पिकास ताण पडतो अशा वेळी तळयात साठविलेल्या पाण्यामधून एखाद- दुसरे पाणी पिकास देता आल्यास पीक हमखास येते.परभणी जिल्‍ह्यात राष्‍ट्रीय कृषी विकास योजना व महाराष्‍ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली गेल्‍या वर्षी 451 शेततळी पूर्ण करण्‍यात आली. त्‍यामध्‍ये परभणी तालुक्‍यात 41 शेततळी, पाथरी 10, पूर्णा 11, पालम 52, सेलू 91, मानवत 72, गंगाखेड 71 सोनपेठ 66 तर जिंतूर तालुक्‍यात 37 शेततळी घेण्‍यात आली. यासाठी 2 कोटी 98 लक्ष 39 हजार रुपये खर्च आला.

शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकाराचे शेततळे करता येते. शेतततळयाची जागा निवडतांना पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरनिवडू नये कारण अशी जागा निवडल्यास तळी गाळाने लवकर भरतात. त्यामुळे शेततळी प्रवाहाच्या बाजूला थोडया अंतरावर खोदावीत.शेततळी दोन प्रकारची असतात एक म्हणजे खोदून खड्डा तयार करणे व दुसरे म्हणजे नाल्यात आडवा बांध टाकून पाणी अडवून तयार केलेलातलाव. शेततळयाचे आकारमान पावसाच्‍या उपलब्‍धतेवर अवलंबून असते. शेततळयाची खोली तीन मीटर मध्याची लांबी रुंदी 15x15 मीटर ते30x30 मीटर पर्यंत ठेवता येते. तळयाची लांबी रुंदी 9x9 मीटर ते 21x21 मीटरची असू शकते. शेततळयातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळयास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे.  अस्तरासाठी बेन्टोनाईट, माती सिमेंट मिश्रण, दगड, विटा, सिमेंट मिश्रण, चिकण माती किंवा प्लास्टीक फिल्मचा वापर करावा. प्लास्टीक फिल्म वापरतांना तिची जाडी 300 ते 500 जी.एस.एम. असावी. सिमेंट व माती प्रमाण 1:8 व जाडी 5 सें.मी. इतकी ठेवतात.
शेततळयातील साठलेल्या पाण्याचा वापर करण्यासाठी पंपसेट, पाईप लाईन तसेच तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा, जेणेकरुन कमीतकमी पाण्याचा उपयोग जास्तीत जास्त क्षेत्रावर कार्यक्षमरित्या करता येईल. पाणी देतांना ते केव्हा व कसे द्यावे तसेच किती प्रमाणात द्यावेयाही गोष्टीचा विचार करावा, त्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येईल. शेततळयाचे पाणी शक्यतो नगदी पिके तसेच फळबागांसाठीवापरावे यामुळे निश्चित उत्पादन मिळून आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरु शकते. शेततळी ही काळया खोल जमिनीत बांधली गेली असतील तर अशा जमिनीत पाणी झिरपून पाण्याचे प्रमाण कमी राहते. परंतु शेततळयात गाळराहण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे कालांतराने शेततळयाची पाणी साठवण क्षमता कमी होते. शेततळे घेण्‍यापूर्वी मृद व जलसंधारणाचेउपाय करावेत, जेणे करुन पावसाच्या वाहून येणाऱ्या पाण्याबरोबरच गाळ  वाहून येणार नाही. शेततळयात गाळ येऊ नये म्हणून पाण्याचा प्रवाहज्या ठिकाणी शेततळयात प्रवेश करतो त्या अगोदर 2x2x1 मीटर आकाराचे खोदकाम करावे तसेच पाणी ज्या बाजूने निर्गमित होते त्याठिकाणी गवत लावावे, त्यामुळे गाळ खड्यामध्ये साचेल आणि प्रवाहाबरोबर आलेल्या गाळाची गवतामुळे गाळणी होईल.

शेततळयामुळे शेतक-यांना स्‍वत:च्‍या शेतात पाणीसाठा निर्माण करणे, शेतात पाणी मुरवणे व पिकांस संरक्षित पाणी देणे शक्‍य होते. शेततळ्यामुळे जमिनीतील पाण्‍याची पातळी वाढण्‍यास मदत होत असल्‍याने जलसमृध्‍दीच्‍या दिशेने नेणा-या शेततळयाचा मार्ग निवडणे योग्‍य ठरेल.

 

लेखक - राजेंद्र सरग,

जिल्‍हा माहिती अधिकारी, परभणी

स्रोत - http://rajendrasarag.blogspot.in/2011/05/blog-post_2568.html

 

 

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate