অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तयार करा दर्जेदार तुती रोपे...

कलमांऐवजी तुती रोपांपासून तुतीची लागवड करण्याचे रेशीम संचालनालयाचे धोरण आहे. यामुळे नव्याने तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या अधिक पाला उत्पादन देणाऱ्या सुधारित तुतीच्या जातींची रोपे उपलब्ध होतील. कलमापासून लागवड केल्याने वाया जाणारा वेळ वाचतो. एकरी तुती झाडांची संख्या योग्य राहते. वर्षभरात कीटकसंगोपन बॅच संख्या वाढते.

तुती लागवडीचे नियोजन

  1. जे शेतकरी उशिरा तुती लागवड करणार आहेत अशा शेतकऱ्यांना तुती रोपे उपलब्ध होतात.
  2. ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली आहे; परंतु त्यांच्याकडील तुती बागेतील काही तुती झाडे मेली आहेत त्या जागी नवीन तुती रोपे लावता येतात, त्यामुळे एकरी तुती झाडांची संख्या योग्य राहण्यास मदत होते.
  3. मागील वर्षापासून "किसान नर्सरी कार्यक्रम' रेशीम संचालनालयाने हाती घेतला, त्यामुळे सन 2014-15 या वर्षात (सप्टें. 2014 पर्यंत) राज्यात झालेल्या एकूण तुती लागवडीपैकी 45 टक्के तुती लागवड तुती रोपांपासून झाली आहे. रोपनिर्मितीसाठी जुने तुती लागवड असणारे रेशीम उत्पादक तसेच खासगी रोपवाटिकाधारकांनी पुढे येणे आवश्‍यक आहे. त्यांच्यासाठी केंद्रपुरस्कृत सीडीपी योजना किसान नर्सरी विकासासाठी साह्य योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय नर्सरीधारकाने तयार होणाऱ्या तुती रोपांची प्रति रोप रु. एक याप्रमाणे विक्री करून येणारी रक्कमदेखील नर्सरीधारकास मिळणार आहे.
  4. मागील वर्षी मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांनी तुती रोपवाटिकेला आलेल्या पाल्याचा उपयोग कीटकसंगोपनासाठी करून बॅचेस घेऊन कोष उत्पादन घेतलेले आहे. अशा पद्धतीने तिहेरी फायदा मिळविलेला आहे.

अशी आहे किसान नर्सरी योजना

  1. किसान नर्सरी (तुती विकासासाठी साह्य) या योजनेची एकरी किंमत रक्कम 1,15,000 रुपये आहे. केंद्रीय रेशीम मंडळ 50 टक्के, राज्य 25 टक्के व लाभार्थी 25 टक्के असा प्रत्येकाचा सहभाग असणार आहे.
  2. तुती नर्सरीकरिता सुपीक जमीन व शाश्‍वत पाण्याची उपलब्धता आवश्‍यक आहे.
  3. तुतीच्या सुधारित व्ही-1 अथवा केंद्रीय रेशीम मंडळाने सुधारित वाणाचे व किमान सहा महिने वयाच्या उत्कृष्ट बेण्यापासून कलमे तयार करावीत. त्यापासून रोपे करावीत.
  4. एकरी 1,28,000 जिवंत, रोगमुक्त, कीडमुक्त तुती रोपे तयार होणे आवश्‍यक आहे.
  5. एका लाभधारकास कमीत-कमी एक एकर व जास्तीत जास्त दहा एकर तुती रोपवाटिका योजनेचा लाभ मिळेल.
  6. शास्त्रोक्त पद्धतीने तुती रोपवाटिका तयार करावी, तसेच संबंधित जिल्हा रेशीम कार्यालयाच्या परवानगीशिवाय तुती रोपांची परस्पर विक्री करता येणार नाही. प्रति एकर क्षेत्रावर तयार केलेली तुती रोपे जिल्ह्यातील रेशीम विकास अधिकारी यांनी दिलेल्या यादीतील लाभार्थांना देणे बंधनकारक राहील.
  7. तुती रोपे लाभार्थ्यांना वाटप करेपर्यंत जिवंत ठेवण्याची जबाबदारी नर्सरीधारकाची राहील. पाण्याअभावी किंवा इतर कोणत्याही कारणास रोपे बाद झाल्यास अनुदानास पात्र होणार नाही.
  8. या योजनेचा करारनामा शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून घेणे बंधनकारक आहे.
  9. तुती रोपवाटिकेतून रोपे काढून व मोजून देण्याची जबाबदारी नर्सरीधारकाची असणार आहे; परंतु तुती रोपे वाहतूक करणे व त्यापासून नवीन तुती लागवड करण्याची संपूर्ण जबाबदारी तुती लागवडीसाठी निवडलेल्या नवीन शेतकऱ्यांची राहील.
  10. ही सर्व कामे संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पाडावी लागणार आहे.
  11. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्या नजीकच्या जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा.


संपर्क - संजय फुले - 9823048440 
(डॉ. हिवरे रेशीम संचालनालय, नागपूर येथे संचालक आहेत. श्री. फुले प्रादेशिक रेशीम कार्यालय, पुणे येथे प्रकल्प अधिकारी आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate