অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

देशाच्या अन्नप्रक्रिया उद्योगाची बदलती क्षितिजे

देशाच्या अन्नप्रक्रिया उद्योगाची बदलती क्षितिजे

वर्ल्ड ट्रेड सेंटर व ऑल इंडिया असोसिएशन ऑफ मुंबई यांनी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या साह्याने इंडियन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज हे पुस्तक तयार केले आहे. पुस्तक संपूर्ण इंग्रजी भाषेत लिहिलेले असून, या पुस्तकाला अशोक सिन्हा, सचिव, अन्नप्रक्रिया उद्योग, नवी दिल्ली यांनी प्रस्तावना लिहिली आहे. पुस्तकात सुरवातीच्या प्रकरणांमध्ये देशातील शेतीसंबंधीची रूपरेषा, कृषी प्रक्रिया उद्योगाची उद्दिष्टे आणि अभियान, अपेडा, एम्पेडाविषयी माहिती, अन्नप्रक्रिया उद्योग म्हणजे काय?, या उद्योगासंबंधी देशातील चित्र, स्थानिक बाजारपेठेची रूपरेषा, पिकांचे उत्पादन, होणाऱ्या निर्यात आणि आयातीसंबंधीचा आढावा, कृषी निर्यात झोन आणि विशेष आर्थिक क्षेत्राविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. देशातील कृषी निर्यात झोनसंदर्भातील यादी दिलेली आहे

अन्नप्रक्रिया उद्योग 1988 नंतर शेतकरी व उद्योजक, तसेच शेतकरी व ग्राहक यांमधला दुवा बनला आहे. 2002मध्ये हा उद्योग 14.9 टक्के इतका वाढला, त्यामुळे प्रत्यक्षरीत्या 44 लाख लोकांना व अप्रत्यक्षरीत्या 90 लाख लोकांना काम मिळाले. देशात प्रक्रिया केलेल्या अन्नधान्यांचा वापर वाढत आहे, तसेच परदेशातूनही प्रक्रिया केलेल्या मालाची आयात वाढत आहे. हे पाहता 2015 पर्यंत प्रक्रिया उद्योगांद्वारे अन्नधान्याचे मूल्यवर्धन 26 टक्‍क्‍यांवरून 35 टक्के, तसेच देशाचा जागतिक बाजारपेठेतील प्रक्रिया केलेल्या मालाचा निर्यातीचा वाटा दीड टक्‍क्‍यांवरून तीन टक्के इतके नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

2009-10मध्ये देशातून प्रक्रिया केलेल्या मालाचे निर्यातमूल्य 2540 कोटी रुपये इतके होते. पुस्तकातील आठ व नऊ ही प्रकरणे अतिशय महत्त्वाची आहेत. कारण त्यात अन्नप्रक्रिया उद्योगासाठीच्या अनेक योजना दिलेल्या आहेत. फूडपार्कसाठी 25 टक्‍के मदत म्हणजे चार कोटी रुपये, पॅकेजिंग सेंटरसाठी दोन कोटी रुपये, शीतगृह साखळीसाठी 25 टक्के म्हणजे 75 लाख रुपये, गुणवत्ता व्यवस्थापनासाठी 10-15 लाख रुपये, बार कोडिंगसाठी रुपये तीन लाख इ. योजनांबाबत माहिती दिलेली आहे. तसेच आधारभूत सुविधा, प्रक्रिया उद्योगाचे तंत्रज्ञान सुधारणे, प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, प्रक्रिया उद्योगाचे नूतनीकरण करणे, तसेच प्रक्रिया मालाची गुणवत्ता सुधारणे, अन्नप्रक्रिया उद्योगासाठी लागणारी प्रशिक्षित माणसे तयार करणे, विक्रीमध्ये बारकोडिंग व इतर विक्री व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक आर्थिक योजनांबाबत माहिती दिली आहे. पुस्तकामध्ये दिलेली प्रक्रियायुक्त पदार्थाच्या आयात-निर्यातीविषयीची आकडेवारी, सरकारी योजना व कायदे याबद्दलची माहिती प्रत्येक अन्नप्रक्रिया उद्योजकासाठी मार्गदर्शक ठरणारी आहे, यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगास अधिक चालना मिळू शकेल.

पुस्तकाचे नाव - इंडियन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, चेंजिंग कंटूर्स
प्रकाशक - वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई
पाने - 158
किंमत - रुपये 300

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate