অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धान्यातील ओलावा आणि त्याचे व्यवस्थापन

धान्यातील ओलावा आणि त्याचे व्यवस्थापन

धान्याची साठवणुकीत योग्य काळजी न घेतल्यास धान्याचे उंदीर, कीड, ओलावा यामुळे अतोनात नुकसान होते.   साठवन्यापूर्वी  धान्यात ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्यास प्रथम चांगल्या धान्यात कीटकांची वाढ होण्यास सुरवात होते, आणि पुढे काही दिवसांनी या किड्यांमुळे सुद्धा धान्यातील ओलावा वाढून सूक्ष्मजीव धान्यावर हल्ला चढवितात.  बुरशी, जीवाणू आणि बॅक्टेरिया यामुळे धान्यातील पोष्टिकत्त्व, प्रथिने, पिष्टमय पदार्थ, खनिजे आणि जीवनसत्वे यांचा ऱ्हास तर होतोच याशिवाय धान्यात विषारी द्रव्ये निर्माण होवून असे धान्य खाण्यात आल्यास आरोग्यास धोका संभवतो.  सूक्ष्म जीवणूंमुळे धान्याचे निश्चित असे किती प्रमाणात नुकसान होते हे सांगणे कठीण असले, तरी एका अहवालानुसार सूक्ष्म जीवाणूमुळे ४ टक्के धान्य खराब होते असे आढळून आले आहे.

जीवाणू एकपेशीय असतात आणि बुरशी एकपेशीय किंवा अनेक पेशीय असू शकतात.  यांच्या पासून अनेक लाखो बिजानुंची उत्पत्ती होत असते.  योग्य वातावरणामध्ये म्हणजे अनुकूल पाणी, उष्णतामान आणि खाद्यपदार्थ यांच्या सानिध्यात बिजानुंची वाढ झपाट्याने होते.  धान्याची नासाडी करणारे जीवाणू दाण्याच्या बाहेर, तसेच दाण्याच्या आत राहू शकतात.  आपल्या देशातील हवामान बुरशीची वाढ होण्यास फारच पोषक आहे.  साधारणतः २७० ते ३१० सें. तापमान असताना बुरशीची वाढ झपाट्याने होते.  धान्यामध्ये १३ टक्क्यांपेक्षा आणि तेलबियांमध्ये म्हणजे तीळ, शेंगदाणे यांत ९ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असल्यास बुराशिची वाढ होण्यास सुरुवात होते.

धन्यास लागणारी बुरशी २ प्रकारात मोडते.  १ म्हणजे शेतातील धान्यास लागणारी बुरशी, शेतामध्ये पिक उभे असताना धान्याची मळणी होण्यापूर्वी दाण्यात ओलाव्याचे प्रमाण जास्त असते, यावेळी शेतातील दाण्यावर आल्टरनेरीया, हेल्मेथोस्पोरीयम आणि फ्युजेरीयम या बुरशी लागतात.  धान्यातील ओलावा कमी झाल्यावर साठवणुकीत या बुरशी नष्ट पावतात, दुसरा प्रकार म्हणजे साठविलेल्या धान्यास लागणारी बुरशी.  धान्य कोठारात भरल्यावर अॅस्परजिलस आणि पेनेसिलियम ही बुरशी प्रामुख्याने लागते.  साठवणुकीत साधारणतः दाण्यातील अंकुरावर बुरशी प्रथम हल्ला करतात.  धान्यात १४ ते १५ टक्के ओलावा असल्यास काही महिन्यातच दाण्यातील अंकुर नष्ट पावतात.

अतिकडक उन्हात धान्य वळविले तर काही दाण्यांचे कवच फुटून भेगा पडतात.  धान्याची मळणी करताना सुद्धा अयोग्य पद्धतीमुळे दाण्यास दुखापत होते.  दाण्याचे तुकडे होतात.  अशा धान्यास लवकर कीड लागून धान्यातील ओलावा १३ टक्क्यांपेक्षा जास्त होण्यास मदत होते आणि त्यानंतर बुरशी लागण्यास प्रारंभ होतो.  सुरवातीला धान्याचे उष्णतामान किटकांमुळे ४२० सें. पर्यंत जावू शकत्ते, परंतु बुरशीमुळे नंतर हेच उष्णतामान ७०० सें. गेल्याने धान्यात जलदगतीने रासायनिक क्रिया घडून येतात आणि धान्य खराब होण्यास सुरुवात होते.  बुरशीमुळे दाण्याची उगवण शक्ती नष्ट होते.  दान उगवलाच तर पुढे रोपट्याची वाढ होत नाही, कारण अशा दाण्यातील सर्व पोष्टिक तत्वे नाश पावलेली असतात.  बुरशी लागलेल्या गव्हातील प्रोटीन मधील ग्लुटीनचे प्रमाण कमी झाल्याने पोळी चांगली तयार होत नाही, तिचे तुकडे पडतात.  धान्यातील उष्णतामान वाढल्याने दाण्याचा मुळचा रंग नाहीसा होतो.  दाने काळपट पडतात.  पोत्यांच्या थप्पिमध्ये काही ठिकाणी गर्भस्थळे निर्माण होतात, तर काही ठिकाणी अधिक ओलावा दाण्यात निर्माण होवून दाने इकमेकास चिकटून धान्याची ढेप तयार होते.  धान्यास एक प्रकारचा कुबट वास येतो.

अॅस्परजिलस आणि पेनेसिलीयम नावाच्या बुरशीमुळे धान्यात ‘अॅफ्लॉटाक्सीन’ आणि सिट्रीनीन नावाचे विष तयार होवून असे धान्य खाण्यात आल्यास विषबाधा होते.  धान्य मका, भुईमुग, सोयाबीन, ज्वारी या पिकांच्या मळनिनंतर उन्हात चांगले वाळविले नसल्यास १६ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा राहिल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

धान्यास बुरशी लागू नये म्हणून ओलाव्यावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे.  धान्यात ओलावा १२ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर बुरशीची वाढ होवू शकत नाही.  यासाठी साठविण्यापूर्वी धान्य उन्हात चांगले वाळविले पाहिजे.  सोयाबीन आणि धान्य यांना फरशीवर कमी उन्हात किंवा सावलीमध्ये वाळविल्यास दाण्याची तुट होत नाही.  धान्याची पोती नेहमी लाकडी फळीवर आणि भिंतीपासून दूर ठेवावीत.  हवेत आर्द्रता कमी झाल्यावर धान्यास मोकळी हवा द्यावी, त्यामुळे धान्यातील ओलावा कमी होईल.  नेहमी धान्य थंड करून कणगीत भरावे.  धान्याचे उष्णतामान कमीतकमी ठेवण्याची काळजी घ्यावी.  २३० ते ३०० सें. उश्नतामानामध्ये बुरशीची वाढ जास्त होत असल्याने उष्णतामान त्याच्या आत राहील हे लक्षात ठेवावे.  पोत्याची उलथापालथ करावी.  थप्पीस मोकळी थंड हवा लागू द्यावी.  उन्हळ्यात धान्यास मोकळी हवा लागेल हे बघावे.

 

स्त्रोत - कृषी प्रवचने,  प्रल्हाद यादव

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate