অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निरंतर मशागतीची आमची शेती

जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजत असताना ते जमिनीची मशागतही करतात. अशा प्रकारे जमिनीत जैविक मशागतीचे काम 12 महिने 24 तास चालू असते. यंत्राने मशागत करण्याच्या पद्धतीत पीक पेरणीपूर्वी फक्त 2-4 वेळा मशागत केली जाते. यामुळे आमची बिना अगर शून्य मशागतीची शेती नसून, निरंतर मशागतीची शेती असे म्हणणे गरजेचे आहे.

भू-सूक्ष्म जीवनशास्त्राच्या प्रत्येक पुस्तकात असे स्पष्ट संदर्भ आढळतात, की जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजत असेल तर कुजविण्याच्या क्रियेत ते जमिनीची मशागतही करतात. याला आम्ही जैविक मशागत असे म्हणतो. अशा प्रकारे जमिनीत मशागतीचे काम 12 महिने 24 तास चालू असते. यंत्राने मशागत करण्याच्या पद्धतीत पीक पेरणीपूर्वी फक्त 2-4 वेळा मशागत केली जाते. यामुळे आमची बिना अगर शून्य मशागतीची शेती नसून, निरंतर मशागतीची शेती आहे, असे म्हणणे गरजेचे आहे. कोणत्याही सुधारित यंत्राने केलेल्या मशागतीच्या तुलनेत सूक्ष्मजीवांनी केलेली मशागत कित्येक पटीने चांगली आहे. यांत्रिक मशागतीसाठी औजारामध्ये खूप मोठी गुंतवणूक करावी लागते. त्याची तूट- फूट- दुरुस्ती हाही खर्च मोठा आहे.

डिझेलचे दर सतत वाढत असतात. यामुळे इंधनावर मोठा खर्च होतो. त्याचबरोबर पर्यावरणाचे नुकसानही होते. सर्वसामान्य अल्पभूधारक ही गुंतवणूक करू शकत नाही. त्याला भाडे देणे डोईजड होते. बहुतेक शेतकऱ्यांना ही कामे उधारी- उसनवारीनेच करावी लागतात. या सर्व कामांतून मुक्ती देणारे हे तंत्र आहे. पूर्वी उन्हाळ्यातील बराच वेळ खरीप पिकाच्या पूर्व मशागतीवर खर्च होत असे. आता तो वेळ उभ्या पिकासाठी देणे शक्‍य झाल्याने त्या पिकांना "ताणतणावातून मुक्ती' या लाभाचे मूल्यमापन कोणत्याही पट्टीने करता येणार नाही. मातीत विसकटलेले बी कालविणे अगर उसाची भरणी (खांदणी) या अत्यावश्‍यक कामासाठी यंत्राची मदत घ्यावी सागते. त्यासाठी प्रति एकर प्रति वर्ष 1 ते 2 लिटर डिझेल लागते. त्यातही बचत करून शून्य लिटरवर नेण्याचे प्रयत्न चालू आहेत.

प्रचलित व शून्य मशागत, तुलनात्मक अभ्यास

प्रचलित पद्धतीत जमिनीची सुपिकता वाढवून पिके चांगली येण्यासाठी आपण शेणखत टाकून मातीत मिसळून घेतो. पीकवाढीच्या काळात या खतांचा वापर होऊन कापणीपूर्वी बहुतांशी ते संपलेले असते. शून्य मशागत तंत्रात मागील पिकाचे अवशेष हळूहळू सतत कुजत असतात. दररोज ताजे खत तयार होते व वापरलेही जाते. पीक कापणी अगर पुढेही हे काम चालूच राहते. पीक कापणीनंतरही जमिनीत उच्च पातळीवर सेंद्रिय कर्बाचा साठा असतो. अशी जमीन पुढील पिकांच्या पेरणीसाठी लगेचच तयार असते. खरीप पिकानंतर योग्य वेळेत, योग्य ओलाव्यात (जिरायती शेतीत) पेरणी उरकण्यासाठी या तंत्राचा चांगला उपयोग होतो. आम्ही आता भात कापणीनंतर दुसऱ्या दिवशी लगेच उसाची रोपे लावतो. कारखान्यावर लावणीची नोंदणी करतो. मगच भात पिकाची दाणे वारे देणे, वाळविणे, पिंजर वाळविणे ही कामे करतो. प्रचलित पद्धतीने काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे पावसाने काही गडबड केली नाही तर 10-15 दिवस या कामात जातात. लावणीची तारीख लवकरात लवकर नोंदविणे याला ऊस शेतीत प्रचंड महत्त्व आहे.

खरीप भात कापणीनंतर रब्बी हंगामात गव्हाची पेरणी योग्य वेळेत पूर्ण करणे याला खूप महत्त्व आहे. उत्तर भारतात गव्हाच्या पट्ट्यात पूर्वी मशागत करून गहू पेरणी करण्यासाठी खूप वेळ जात असे. त्यांनी आता कोणतीही मशागत न करता पेरणी करण्याची यंत्रे विकसित केली आहेत. यांत्रिक मळणीमुळे काड जमिनीत तसेच पडते, ही नवीन यंत्रे भाताच्या काडात गहू पेरणी करतात, तर गव्हाच्या काडात भात पेरणी करतात. जमिनीखालील अवशेष जमिनीत कुजतात, तर वरील काड आच्छादन रूपात कुजल्याने जमिनीच्या सुपिकतेचा गंभीर बनत चाललेला प्रश्‍न काही प्रमाणात सुटू लागला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात आता गहू यंत्राने मळला जातो, परंतु काडात पेरणी करणारी यंत्रे नसल्यामुळे कापणी, मळणीनंतर काड जाळून टाकावे लागते. अशा अडचणीमुळे एक वेळ काड जाळावे लागले तरी चालेल, परंतु बुडखा व मुळांचे जाळे अजिबात मशागत न करता तसेच ठेवून पुढील पीक पेरणी करण्याचे तंत्र विकसित होणे गरजेचे आहे. यथावकाश काडात पेरणी करणारी यंत्रे कशी उपलब्ध करता येतील, याचाही विचार होणे गरजेचे आहे.

बिना नांगरणीची शेती आपल्यासाठी नवीन आहे, परंतु तसे हे तंत्र नवीन नाही. 1930-40 सालापासूनच या तंत्राच्या प्रयोगाला सुरवात झाली आहे. आज जगभरातील 100 पेक्षा जास्त देशांत 10 कोटी हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर या पद्धतीने शेती केली जाते. हे तंत्र पूर्णपणे पायाभूत शास्त्रावर आधारित आहे.

 

संदर्भ : अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate