पीक व्यवस्थापन करताना मुख्यतः नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे उर्वरित अन्नद्रव्यांची कमतरता वाढत जाते. अलीकडे जमिनीत गंधकाची कमतरता जाणवू लागली आहे. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि जमिनीतील सामू नियंत्रित करण्यात गंधक महत्त्वाचे आहे.
गंधक म्हणजेच सल्फर. बुरशीनाशक, कोळीनाशक म्हणून गंधकांचा वापर होतो. विविध खतांमधून सल्फेट या संयुगाच्या स्वरूपात गंधक आता उपलब्ध झाले आहे. सल्फेट ऑफ पोटॅश हे दाणेदार पोटॅशयुक्त खत बाजारात उपलब्ध आहे. त्यामध्ये गंधकाचे प्रमाण दहा टक्के असते. शंभर टक्के पाण्यात विरघळणारे दाणेदार स्वरूपातील गंधक ही बुरशीनाशक म्हणून बाजारामध्ये उपलब्ध आहे.
गंधकामुळे जमिनीची उत्पादकता व आरोग्य टिकविण्यास मदत होते. कृषिमालाच्या गुणवत्तेत वाढ होते. गंधकाला भूसुधारक असे म्हणतात. त्याचे कारण म्हणजे गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये त्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जमिनीतून गंधकयुक्त खतांचा वापर केल्यामुळे नत्र, स्फुरद आणि खतांचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनाची भरीव वाढ होते. गंधकासोबत इतर अन्नद्रव्यांचा वापरामुळे आंतरपीक प्रक्रियेवर अनुकूल परिणाम होऊन शेतीमालाचे उत्पादन वाढण्यास व प्रत सुधारण्यास मदत होते.
1) गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करते. त्यामुळे पिकांच्या अन्ननिर्मितीला चांगली चालना मिळते.
2) गंधक हा प्रत्येक जिवंत पेशीचा एक भाग आहे. तसेच सिस्टीन, सिस्टाईन व मिथीनोओतीत या आवश्यक जमिनी आम्लांचा एक घटक आहे.
3) गंधक हे बीजोत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत करते. त्याचबरोबरीने द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठींमध्ये वाढ करण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिरीकरण्यात मदत करते, विविध विकार व चयापचयाच्या क्रियेला मदत करते.
4) भुरीच्या नियंत्रणासाठी गंधकाचा 80 टक्के वेटेबल पावडर म्हणून वापर होतो, कोळीनाशक म्हणूनही त्याचा वापर होतो.
5) गंधकामुळे हरितद्रव्य निर्मितीत आणि प्रकाश संश्लेषणामध्ये वाढ होते. प्रथिनांचे प्रमाण वाढते. फळांमधील विद्राव्य पदार्थांचे प्रमाण वाढते.
1) मातीच्या ऱ्हासामुळे आणि निचऱ्याद्वारे होणारी गंधकाची कमी.
2) गंधकविरहित अथवा गंधकाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या खतांचा वापर.
3) जमिनीतून पिकांद्वारे सातत्याने, गंधकाचे होणारी उचल.
4) शेतातील पिकांचे अवशेष, सेंद्रिय खते आणि काडी कचऱ्याचे चक्रीकरणातून होणारा कमी वापर.
1) पिकांची वाढ खुंटते, पीक कमजोर दिसते. नवीन येणारी पाने व पालवी पिवळी पडू लागतात.
2) द्विदल पिकांच्या मुळावरील नत्र स्थिरीकरणाच्या प्रमाण कमी होते. तृणधान्य वर्गीय पीक परिपक्व होण्यास उशीर लागतो. फळे पूर्णपणे पिकत नाहीत.
समतोल खत व्यवस्थापनासाठी मृद् चाचणी करून जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता पडताळून पाहणे आवश्यक आहे. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीत विविध पिकांसाठी 20 ते 40 किलोग्रॅम गंधकाची मात्रा उपयुक्त ठरते. नत्र ः स्फुरद ः पालाश ः गंधक यांचे गुणोत्तर 4ः2ः1ः1 असे असावे.
गंधकयुक्त खतांचा वापर पिकांच्या पेरणीपूर्वी जमिनीत पेरून केला जातो. जिप्सम आणि सिंगल सुपर फॉस्फेट ही सर्व साधारणपणे गंधकयुक्त खते म्हणून वापरली जातात. आर्यन पायराईट व गंधक भुकटी वापरायची असेल तर पिकांच्या पेरणीतून तीन ते चार आठवडे जमिनीत मिसळून द्यावे अशा प्रकारे गंधक या दुर्लक्षित खतांच्या वापरामुळे आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल.
खोल काळ्या चिकन मातीयुक्त जमिनीत गंधकाची कमतरता सर्वसाधारणपणे नियमित सेंद्रिय खताचा वापर असल्यास जाणवत नाही; परंतु अलीकडच्या काळातील तीव्र शेती पद्धतीमधील जास्त उत्पादन देणाऱ्या वाणाचा वाढता वापर सेंद्रिय खतांचे अल्प प्रमाण आणि गंधकविरहित खतांचा सततचा वापर इत्यादीमुळे गंधकाची कमतरता दिसून येत आहे. गंधक हे नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्याच्या पाठोपाठ गरजेचे असणारे दुय्यम अन्नद्रव्य म्हणून महत्त्वाचे ठरत आहे. डाय अमोनिअम फॉस्फेटसारख्या गंधकविरहित खताचा वाढता वापरसुद्धा जमिनीतील गंधकाच्या कमतरतेचे एक महत्त्वाचे कारण आहे. स्फुरदाचा पुरवठा करण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट या सरळ खताचा वापर डाय अमोनिअम फॉस्फेटऐवजी केला जातो. त्यातील जवळ जवळ 12 टक्के गंधकाचा पुरवठा केला जाऊन जमिनीतील वाढती गंधकाची कमतरता कमी करता येईल. एकीकडे एकत्रित नत्र व स्फुरदाच्या वापरासाठी आणि त्यामुळे होणाऱ्या मजुरातील बचतीसाठी व डाय अमोनिअम फॉस्फेटचा वापर केला जातो; परंतु त्याचा परिणाम आणखीच तिसऱ्या अन्नद्रव्यांची म्हणजेच गंधकाची कमतरता वाढवीत असल्यामुळे पुन्हा गंधकावर होणारा खताचा आणि मजुरीचा खर्च वाढवितो. याकरिता स्फुरदाचा स्रोत म्हणून याकरिता सिंगल सुपर फॉस्फेटचा वाढता वापर वाढविणे गरजेचे आहे, जेणेकरून स्फुरद व गंधक दोन्हींचा वापर एकत्रित केला जाईल.
केळी ः
1) केळीची नवीन पाने गोलाकार न होता पिवळसर पांढरी होतात.
2) झाडांची वाढ खुंटते व लहान फळे तयार होतात व पाने पिवळी पडतात.
वांगी ः
1) गंधकाची कमतरता असल्यामुळे झाडांची अपरिपक्व फुले गळतात, उत्पादनात घट होते.
कोबी ः
1) कमतरतेमुळे नवीन पानाचे काठ पिवळे पडतात.
2) नवीन पानांचा आकार चमच्याच्या किंवा कपासारखे होऊन निमुळता होत जातो. त्यामुळे गड्डा तयार होत नाही.
फ्लॉवर ः
1) फुलकोबी गंधकाच्या कमतरतेला अतिशय संवेदनशील आहे.
2) लागवडीपासून एक महिन्याच्या आत पानाच्या कडात पिवळसर पडून खाली निमुळत्या होतात.
3) गंधकाच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट होते.
बरबटी / हरभरा ः
1) पानांची टोके पिवळसर हिरव्या रंगाची होतात. कमतरतेमुळे पानाला लाल रंग येतो.
2) नवीन अपरिपक्व पाने वाळतात व झाडांच्या शाखा व्ही आकाराच्या होतात.
मिरची ः
1) गंधकाच्या कमतरता असल्यामुळे झाडांना फुलधारणा उशिरा होऊन फुलांच्या संख्या कमी होते व उत्पादनात घट होते.
2) नवीन कोवळ्या पानांच्या शेंड्यावर पिवळसर ठिपके दिसून येतात.
कापूस ः
1) जुन्या पानांवर गंधकाची कमतरता लवकर दिसून येते. नवीन पाने पिवळी पात्याचा रंग लालसर दिसतो.
भुईमूग ः
1) गंधकाची कमतरता असल्यामुळे सर्वसाधारण झाडापेक्षा लहान झालेले आढळतात.
2) शेंगा व नत्रासाठी यांची वाढ खुंटते व परिपक्व होण्यास वेळ लागतो.
मका ः
1) नवीन पानांच्या शिरा पिवळ्या पडतात व पानांच्या कडा लालसर दिसतात.
2) पानांची कडा लालसर होऊन खोड खालच्या बाजूने लालसर होताना पिवळी पडतात.
कांदा ः
1) गंधकाचे प्रमाण कमी झाल्यास पानाचा आकार लहान होतो. पाने पिवळी पडतात.
2) पानांची शेंडे पिवळसर पडून वाळतात.
तांदूळ ः
1) पाने पिवळसर होतात.
2) झाडांची वाढ खुंटते व लोंब्यांच्या संख्येत घट होते.
ज्वारी ः
1) झाडांची जुनी पाने पिवळसर हिरव्या रंगाची होतात. जुनी पाने हिरवीच राहतात.
2) झाडांची नवीन पाने लहान होऊन निमुळतात.
सोयाबीन ः
1) नवीन पाने हिरवट पिवळसर होतात व पानांची लोळी कमी होते.
2) गंधकाची जास्त कमतरता असल्यास पूर्ण झाड पिवळे होऊन परिपक्व होण्यापूर्वी ते गळून जातात. फुले कमी होऊन फळधारणा कमी होते.
ऊस ः
1) नवीन पानांवर पिवळसर हिरवा रंग येतो.
2) गंधकाची कमतरता असल्यास पूर्ण पान पांढरे होतात व वाढतात.
गहू ः
1) सर्वसाधारण पूर्ण झाड पिवळे पडते.
2) गंधकाच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते. लोंब्या धरण्याचे प्रमाण कमी होते व फुले कमी दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
गंधकामुळे तेलबियाणे पिकांमध्ये तेलाचे प्रमाण तसेच उत्पादनात वाढ होते. शेंगवर्गीय पिकामध्ये जैविक नत्र स्थिर करण्यासाठी गंधकाची मदत होते. उदा. सोयाबीनमध्ये गंधकाच्या उपयोगाने शेंगांच्या संख्येत व त्यांच्या वजनात वाढ होते. गंधकामुळे कडधान्य पिकांची प्रतीमध्ये वाढ होते. उसामध्ये साखरेचे प्रमाण वाढते.
संपर्क ः 9657725787
(लेखक अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
आपण किती जिवांना पोसतो?या प्रश्नाचं उत्तर आपल्या क...
या विभागात डाळिंब पिक पोषनाविषयी माहिती दिली आहे.
या विभागात किशोरवयीन मुलांमध्ये असणारे कुपोषण, रक...