অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पूर्वहंगामी उसातील योग्य आंतरपिके देतील फायदा

अलीकडे ऊस लगवडीसाठी पट्टा पद्धत, रुंद सरी पद्धतीचा वापर वाढत आहे. या पद्धतीत ऊस व साखरेच्या उत्पादनातही वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. योग्य नियोजन केल्यास उसाच्या दोन ओळीत चार ते सहा फुटांच्या मोकळ्या पट्ट्यामध्ये हंगामानुसार आंतरपिके घेता येतात. 
उसाच्या पूर्ण उगवणी सर्वसाधारणपणे 3 ते 6 आठवडे लागतात. त्यानंतर सुरवातीच्या 2.5 ते 3 महिन्यांत पिकाची वाढही सावकाश असते. उसाच्या दोन ओळींतील रिकामा पट्टा 90 ते 150 सेंमीपर्यंत असतो. योग्य आंतरपीक घेतल्यास दोन्ही पिकांची वाढ समाधानकारक होते. आंतरपीक अल्पावधीत (3 ते 3.5 महिन्यांत) काढणीस तयार होते.

आंतरपिकांचे फायदे


  1. हंगामनिहाय उसात आंतरपिके घेतल्याने वर्षभर उत्पन्न उपलब्ध राहते.
  2. उसातील आंतरपिकामुळे तणांचे प्रमाण कमी होते.
  3. द्विदलवर्गीय आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो.
  4. आंतरपिकामुळे एकूण उत्पन्नात वाढ होते.
  5. आंतरपिकामुळे जमीन, पाणी व दिलेली खते तसेच सूर्यप्रकाश यांचा पुरेपूर वापर होतो.

उसामध्ये आंतरपिके घ्यावयाच्या पद्धती


  1. सलग सरी पद्धत - जमिनीच्या प्रकारानुसार 100 ते 150 सें.मी अंतरावर सऱ्या वरंबे पाडून उसाची लागण सरीमध्ये केल्यानंतर दुसरे पाणी (आबवणी) देण्याच्या अगोदर वरंब्याच्या दोन्ही बगलेत आंतरपिकाची टोकण पद्धतीने लागण करावी. कोबी, फुलकोबी व कांद्याची रोपे लावावी.
  2. पट्टा पद्धत - या पद्धतीत 75 किंवा 90 सें.मी. अंतरावर सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांत ऊस लागवड करून तिसरी सरी मोकळी सोडावी. अशाप्रकारे जोड ओळ लागवड करून राहिलेल्या 150 किंवा 180 सें.मी. पट्ट्यात आंतरपिकाची लागवड करावी. या पद्धतीत उसाच्या उत्पादनात घट येत नाही. आंतरपिक निघाल्यानंतर उसात आंतरमशागत करणे सुलभ जाते.

उसातील आंतरपीक कसे असावे?

  • पूर्वहंगामी ऊस लागवडीच्या काळात रब्बी पिकांची पेरणीची वेळ असते.
  • आंतरपिकाची निवड करताना ते पीक उसाशी स्पर्धा न करणारे, कमी उंचीचे, थोडी कमी सूर्यप्रकाश व सावली मानवणारे, मुळांची ठेवण उसापेक्षा वेगळी असणारे व अल्प मुदतीत तयार होणारे असावे.
  • आंतरपिकांची वाढ व उंची अन्नघटक शोषण करण्याची पद्धत व क्षमता, स्थानिक बाजारपेठ व मागणी, मजुरांची उपलब्धता, कुटुंबाची गरज व जमिनीचा प्रकार यांचाही विचार करणे आवश्‍यक आहे.

पूर्वहंगामी उसात घ्यावयाची आंतरपिके

  • पूर्वहंगामी उसाची लागवड ऑक्‍टोबर-नोव्हेंबर दरम्यान करतात. या उसामध्ये मुख्यत्वे करून रब्बी हंगामातील बटाटा, कांदा, लसूण, पाणकोबी, फुलकोबी, वाटाणा, टोमॅटो, हरभरा इ. आंतरपिके घेता येतात.
  • लागणीनंतर 6 ते 7 दिवसांनी म्हणजेच आंबवणीचे पाणी देण्याच्या आधी आंतरपिकाची टोकण अथवा पुनर्लागण करावी. या पिकांना अधिक पाणी मानवत नसल्याने पाणी व्यवस्थापन दक्षतेने करावे.
  • उसामध्ये कांद्याच्या रोपांची लागण सरीच्या दोन्ही बाजूस 10 ते 15 सें.मी. अंतरावर दुसऱ्या पाण्याच्या (आंबवणी) वेळी करावी. या पिकाला मुख्य पिकाच्या खत मात्रे व्यतिरिक्त हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. जमिनीची सुपीकता टिकविण्याचे व वाढविण्याचे दृष्टिकोनातून कांदा हे उत्तम आंतरपीक आहे.

ऊस व बटाटा सलग लागवड पद्धत

जमिनीच्या प्रकारानुसार उसाची लागवड 90, 100, 120 आणि 150 सें.मी अंतरावर केली जाते. रान ओलावून वापशावर निवडलेल्या अंतरावर लाकडी नांगराने अथवा रिजरने हलक्‍याशा सऱ्या पाडून घ्याव्यात. उपलब्ध ओलाव्यावर बटाट्याची लागण करावी. बटाटा उगवल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी उसाची लागवड करावी.

  • कोरड्या पद्धतीने बटाट्याची लागण केल्यास व बेण्यासाठी मोठे बटाटे घेऊन फोडी करून लागवडीमध्ये नंतर दिलेल्या पाण्याने बटाटे कुजून उगवण कमी होते.
  • ऊस व बटाट्याची एकाचवेळी लागण करावयाची असल्यास बटाट्याची लागण कोरड्या सरीतच करावी व नंतर पाडलेल्या सरीत उसाची लागण सरीत पाणी सोडून करावी. अशा वेळी बेण्यासाठी लहान आकाराचे अंकुर फुटलेले 20-30 ग्रॅम वजनाचे संपूर्ण बटाटे 15 ते 20 सें.मी. अंतरावर ठेवून लागवड करावी. साधारणपणे हेक्‍टरी 20 ते 25 क्विंटल बटाटे बियाणे लागते. बटाट्याची लागण केल्यानंतर बटाट्याच्या दोन ओळमधून मोठा रिजर चालवल्यास ऊस लावण्यासाठी सऱ्या पडतात व वरंब्यात बटाटे आपोआप झाकले जातात. वरंब्यात बटाटा खूप खोलवर झाकला जात असला तरी उगवण चांगली होते. उलट मोठ्या वरंब्यामुळे बटाटे हिरवे होण्याचे प्रमाण कमी होऊन ते चांगला पोसतात.
  • तीन महिन्याने उसाला खांदणी करताना रिजरने अथवा लाकडी नांगराने वरंबा फोडून घ्यावा. बटाटे आपोआपच जमिनीबाहेर पडतात. ते वेचून घ्यावेत. त्यानंतर एक महिन्याने उसास खांदणी करून भरपूर माती लावण्यासाठी पुन्हा रिजर चालवावा.
  • उसात बटाटा पिकाचे सर्वसाधारणपणे 150 ते 200 क्विंटल उत्पादन मिळू शकते.

ऊस अधिक बटाटा जोडओळ पद्धत

75 ते 150 सें.मी किंवा 90-180 सें.मी अशा ओळ पद्धतीने उसाची लागण करून पाच किंवा सहा फुटांच्या पट्ट्यात बटाट्याची लागण करावी. बटाटा पीक निघून गेल्यानंतर फक्त जोड ओळीतच पाणी सोडावे लागत असल्याने पाण्याचीही बचत होते. 
ठिबक सिंचनाखाली उसाची लागवड करावयाची झाल्यास पट्टा पद्धतीने उसाची लागण करणे फायदेशीर ठरते. प्रत्येक जोड ओळीस एकच उपनळी वापरून दोन्ही पिकांना पाणी देता येते. मात्र जोड ओळ पद्धतीने उसाची लागवड ठिबक सिंचनाखाली घ्यावयाची असल्यास व मोकळ्या जागेत आंतरपीक घ्यावयाचे असल्यास, आंतरपिकासाठी सरीतून वेगळे पाणी द्यावे लागते.

हिरवळीच्या खतासाठी आंतरपिके

उसासाठी हेक्‍टरी 40 ते 50 गाड्या शेणखत अथवा कंपोस्ट खताची शिफारस आहे. अनेक वेळा त्याची उपलब्धता होत नसल्याने हिरवळीच्या खते (ताग किंवा धैंचा) आंतरपिके म्हणून फायदेशीर ठरतात. 
ही पिके ऊस लागणीनंतर आंबवणीचे वेळी लावावीत. साधारणपणे 45 ते 50 दिवसांत ही पिके फुलावर येऊ लागतात. त्या वेळी म्हणजे बाळ बांधणीचे वेळी उसाच्या सरीलगत गाडावीत. यामुळे रासायनिक खताची जमिनीतील क्षारयुक्तपणा कमी होतो. म्हणून क्षारयुक्त जमिनीसाठी धैंचाचा उपयोग करावा.
हे टाळावे... 
हंगामानुसार उसामध्ये आंतरपिके घेणे फायदेशीर असले तरी दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा भागात अनेक शेतकरी उसात मका, गहू ही आंतरपिके घेतात; परंतु नेहमीच्या सलग सरी-वरंबा पद्धतीने उसाची लागण केल्यास अशा पिकांमुळे उस उत्पादनात लक्षणीय घट येते.
हे करावे... 
ही पिके उसात आंतरपीक म्हणून घेताना उसाची लागवड पट्टा पद्धतीने अथवा जोड ओळ पद्धतीने करून मोकळ्या जागेत ही पिके घ्यावीत. तसेच आंतरपिकामुळे उसाची होणारी घट टाळण्यासाठी आंतरपिकासाठी रासायनिक खतांची वेगळी मात्रा त्या पिकाने व्यापलेल्या जमिनीच्या प्रमाणानुसार देण्याचे विसरू नये. 

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate