অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पैरा- अनुभव कथन

पैरा- अनुभव कथन

“पेरणी, कुळवणी, कापणी, हाताळणी यांसारख्या शेतकामांसाठी आज यंत्रं आली आणि लाकडी नांगर, तिफण, जू, कासरा यांसारखी साधनं, बैलजोडी अशा गोष्टी शेतीपासून दूर झाल्या. एवढंच नाही, तर शेतकामांसाठी शेतकर्‍यांमध्ये होणारी विविध साधनांची, विचारांची देवाणघेवाणही थांबली. त्यातून पारंपरिक शेतीपद्धतीतल्या अनेक संकल्पनाही काळाआड जायला लागल्या. या संकल्पनांबाबत विचारमंथन व्हावं या हेतूनं कृषी संस्कृतीचे अभ्यासक श्री. संपत मोरे यांचा आपल्या खुमासदार शैलीतील ‘पैरा’ या शेतीपद्धतीविषयीचा हा लेख...”

‘पैरा’ हा शब्द लहान असतानाच कानांवर पडलेला. पाचवीच्या वर्गात असताना पैर्‍याबद्दल समजलं.

एक दिवस वर्गातला चंदर जवळ येऊन हळूच म्हणाला, “मी दुपारी पळून जाणार हाय. येणार तू?”

“का?”

“आरं, आमच्या मळ्यात पेरायला ‘कुरी’ याची हाय. तुमचं आप्पाबी येणार हायती.”.

“अंऽऽ आमचं आप्पा ...? त्ये कशाला तिकडं येत्याली?”

“मला कळलंय. सकाळी आमचं आबा म्हणत हुतं, आप्पाबरं आपला ‘पैरा’ हाय.”

मग दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत मी मळ्याकडं जाण्यासाठी चंदरबरोबर पळून गेलो. त्याच्या मळ्यात पोहोचलो. तिथं ‘कुरी’ (तिफण) चाललेली. आमचा एक बैल, चंदूचा एक. आमच्या आप्पांनी बैलाचं कासरं धरलेलं. चंदूचे आबा पेरत होते. चंदूच्या आईनं पाठीमागं ‘मोगणा’ (शेवटच्या चार सर्‍यांमध्ये मोगण्याचा वापर करून कडधान्य पेरले जाते. मोगणा हा कुरीला चार फुट अंतरावर जोडलेला असतो) धरलेला.

मला बघून आप्पा म्हणाले, “शाळा सोडून कुठं फिरताय?”

“आलोय चंदूबर.” मी सांगितलं.

मग ते गमतीनं म्हणाले, “धरा की जरा कासरं. बघू तरी जमतंय का तुमास्नी.”

“न्हाय बाऽ” मी आणि चंदर एकाच वेळी म्हणालो.

‘पैरा’ म्हणजे काय हे मला त्या दिवशी समजलं. ज्या शेतकर्‍याकडं एकच बैल आहे असा शेतकरी एकच बैल असलेल्या दुसर्‍या शेतकर्‍यासोबत ‘पैरा’ करतो. ते दोघं मिळून एकमेकांंच्या शेताची मशागत करतात.

असे बरेच पैरकरी आम्ही परत येताना शिवारात दिसत होते. अमृता पाहुण्यानं जाधवाच्या बापूबर पैरा केलेला. बापूच्या रानात ‘कुरी’ चाललेली. सबंध शिवारात पाचसहा ठिकाणी अशी पैर्‍यातून पेरणी सुरू होती.

‘पैरा’ करताना काही तत्त्वं पाळावी लागत होती, म्हणजे तिथं कामाचं मोजमाप नसायचं. दोन पैरकर्‍यांपैकी एकाची जमीन थोडी जास्त असली, तरी कमी जमीन असलेला कधी कुरकुर करायचा नाही. शिवाय पैरा सोडायचा असंल, तर एक वर्ष अगोदर सांगायला लागायचं. ‘पैरा’ अचानक सोडता येत नव्हता. तसं कुणी करत नव्हतं. ज्या दिवशी पेरणीचं काम संपंल, त्या रात्री पुरणपोळीचा बेत असायचा. त्याला ‘पैराजेवण’ म्हटलं जायचं. बैलाच्या पाठीमागं फिरून दमलेले दोन्ही पैरकरी या जेवणाच्या दिवशी आग्रह करकरून एकमेकाला पोळ्या खायला घालायचे.

आम्ही महाविद्यालयात शिकायला गेलो. तिथं ‘सहकारी शेती’ हा विषय शिकवण्यात आला. त्यात लै अवघड भाषा होती. आयुष्यात कधीही न ऐकलेले शब्द सहकारी शेतीच्या त्या व्याख्येत होते. सहकाराच्या अभ्यासकांनी तयार केलेली ‘सहकारी शेती’ची व्याख्या वर्षभर प्रयत्न करूनही मला पाठ करता आली नाही आणि वार्षिक परिक्षेत नेमका तोच प्रश्न आला. मग मी ‘माझे आप्पा आणि चंदूचे आबा एकत्र येऊन पैर्‍यानं शेती करतात. आमच्या गावातले एकेकच बैल असलेले शेतकरी एकमेकांबरोबर पैरा करतात.’ असं गावठी उत्तर ठोकून दिलं. अर्थात त्याला शून्य गुण मिळाले असतील, पण सहकारी शेतीची जी कल्पना मला चंदूच्या मळ्यात समजली, ती पुन्हा कधी कुणाकडून समजून घ्यावी असं त्यानंतर कधीही वाटलं नाही. आम्हाला प्रात्यक्षिक माहिती झालं होतं, मग पुस्तकी संकल्पनेच्या भानगडीत कशाला पडा?

‘पैरा’ शब्द ग्रामीण भागातल्या राजकारणातही रूढ आहे. ग्रामपंचायतीच्या राजकारणात ‘पैरा’ हमखास असतो. एखाद्या गावात चार भावक्या (चार आडनावांचे लोक) असतील, तर या भावक्या एकमेकींशी पैरा करून ‘पॅनेल’ तयार करतात. राज्यस्तरावरच्या राजकारणात युती-आघाडी असतात. यांचंही मूळ पैर्‍यातच आहे. शेतकर्‍यांतला पैरा सोडण्यापूर्वी एक वर्ष अगोदर सांगावं, असा नियम होता; पण आज राजकीय क्षेत्रातला पैरा मात्र न सांगताच सोडला जातो, आणि मग सरकारच कोसळतं!

शेतीतला हा ‘पैरा’ नुसता शेतीच्या कामापुरताच नसायचा. पैर्‍यातून नवी नातीही तयार व्हायची. रानातल्या औतकर्‍याचं जेवण घेऊन आलेली सावळ्या रंगाची चिंगी पाहून एखाद्याला वाटायचं, ‘लेका, सून म्हणून बरी हाय!’

मग औत सुटल्यावर सावळ्या लेकीच्या बापाला म्हणजे रंगाला विचारायचा, “रंगा, पोरगी लय मोठी झाली रं तुझी?

“व्हय. सोळावं संपल औंदा.”

“मग हुया का पाव्हणं?”

“ते कसं?”

“आरं, भरत्याचं उरकायचं म्हणतूया औंदा.”

“व्हयऽ पण भरत्या लय देखणा हाय. माझ्या चिंगीला न्हाय पसंद करायचा.”

“आरं, तू नुस्ता ‘व्हय’ म्हण ... माझ्या शब्दाम्होरं जात न्हाय पोरगं.”

मग वैशाखातली एखादी ‘तीथ’ गाठून भरत्याचं आणि चिंगीचं लगीन व्हायचं. पैरकरी एकमेकांचे ‘सोयरे’ व्हायचे. दोन घरं एका नव्या नात्यानं बांधली जायची. रानातल्या बांधापासून घराच्या उंबर्‍यापर्यंत जोडणारा ‘पैरा’ आज गावाकडं दिसत नाही. गावोगावी ट्रॅक्टर आलेत. बैलं कमी झाली. रानांच्या मशागती ट्रॅक्टरनं होत आहेत, मग ‘पैरा’ कोण करणार? ‘पैरा’ थांबतोय, तसा हा शब्दही मायमराठीतून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

लेखक: श्री. संपत मोरे

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate