অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बायोगॅसपासून सेंद्रिय खत, ऊर्जानिर्मिती

बायोगॅस संयंत्राची निवड जनावरांच्या प्रतिदिवस उपलब्ध शेणाची मात्रा आणि गॅसच्या संभावित गरजेच्या आधारावर करावी. बायोगॅस एक उत्कृष्ट इंधन आहे. बायोगॅस उत्पादनाव्यतिरिक्त या संयंत्राद्वारे उच्च गुणवत्तेचे जैविक खत निर्मिती करता येऊ शकते.

बायोगॅसपासून नायट्रोजनयुक्त खत मिळते. तसेच ज्वलनीय गॅस, धूर विरहित इंधन, प्रकाश आणि व्यावसायिक रूपात याचा उपयोग करता येतो. बायोगॅस मुख्यतः जैव टाकाऊ पदार्थ जसे - प्राणी आणि मनुष्याची विष्टा आणि वनस्पतींचे घटक बायोगॅस संयंत्रात मिसळून वायूच्या अनुपस्थितीत जिवाणूच्या साहाय्याने पचन प्रक्रियेने (हायड्रोलाईटिक जिवाणू, मिथानोजनिक जिवाणू) अनेक प्रकारच्या घटकांना या माध्यमातून सडवून (विघटन) बायोगॅस तयार होतो. बायोगॅस एक उत्कृष्ट इंधन आहे. बायोगॅस सयंत्रात शेण व इतर जैविक पदार्थांवर हवेच्या अनुपस्थितीमध्ये किंण्वन प्रक्रिया होते. एक घन मीटर बायोगॅसचे उष्णतामान जवळजवळ 4700 किलो कॅलरी आहे. बायोगॅस उत्पादनाव्यतिरिक्त या संयत्राद्वारे उच्च गुणवत्तेचे जैविक खत निर्मिती करता येऊ शकते.

बायोगॅस सयंत्राची निवड

बायोगॅस सयंत्राची निवड जनावरांच्या प्रतिदिवस उपलब्ध शेणाची मात्रा आणि गॅसच्या संभावित गरजेच्या आधारावर केली जाते. संयंत्रात शेणाचे 25 किलोग्रॅम प्रति घनमीटर क्षमतेच्या हिशेबाने प्रतिदिवस टाकणे आवश्‍यक असते. तसेच जनावरांच्या संख्येनुसार मिळणारे शेण साधारणतः प्रति जनावर 6 ते 10 किलोग्रॅमपर्यंत असते.

बायोगॅस संयंत्राचे फायदे

1) बायोगॅसच्या वापराने अन्न शिजवणे, दिवे लावणे, द्विइंधनीय जनरेटर, रेफ्रिजरेटर, वेल्डिंग इत्यादींसाठी होऊ शकते.

2) बायोगॅस बनविल्यानंतर मिळणाऱ्या स्लरीला ओले किंवा सुकवून शेतामध्ये सेंद्रिय खत म्हणून वापरता येते.

3) इंध नम्हणून वापर 
बायोगॅस चुलीमध्ये बायोगॅसच्या ऊर्जेचा सर्वाधिक रूपांतर उष्णता निर्मिती करता होतो. बायोगॅस चुलीमधून 60 टक्के उष्णता मिळते. याचा अर्थ असा, की एक घनमीटर बायोगॅसपासून 2800 किलो कॅलरी उष्णता मिळते. घरामध्ये स्वयंपाकासाठी प्रति व्यक्ती, प्रति दिवस 0.3 घनमीटर गॅसची आवश्‍यकता असते. या हिशेबाने जर एका कुटुंबामध्ये एकूण पाच सदस्य असतील, तर एकूण 1.5 घनमीटर (50 घनफूट) गॅसची आवश्‍यकता असते.

4) प्रकाशनिर्मिती  
ज्या ठिकाणी आतापर्यंत पूर्णतः वीजपुरवठा पोचला नाही, त्या ठिकाणी बायोगॅसचा उपयोग प्रकाशासाठी होऊ शकतो. बायोगॅसपासून मिळणारा प्रकाश विद्युत प्रकाशाच्या तुलनेत कमी असतो. आजकाल बाजारात दोन प्रकारचे बायोगॅस लॅम्प उपलब्ध आहेत. बायोगॅस लॅम्पमध्ये प्रकाशाची तीव्रता 100 कॅंडल पॉवर किंवा 40 वॉटच्या बल्बच्या बरोबरीची असते. बायोगॅस लॅम्पला 1 तास जाळण्यासाठी साधारणतः 0.15 घन मीटर गॅसची आवश्‍यकता असते. म्हणजे 1 घनमीटर बायोगॅसपासून साधारणतः सात तास प्रकाश मिळू शकतो.

5) डिझेल इंजिन चालविण्यासाठी  
1) बायोगॅसचा उपयोग डिझेल इंजिन चालविण्यासाठी होऊ शकतो. बायोगॅसवर चालणारे इंजिन बाजारात आज उपलब्ध आहे. हे इंजिन 80 टक्के बायोगॅस व 20 टक्के डिझेलवर चालते.

2) एक अश्‍वशक्ती इंजिनला एक तास चालविण्यासाठी साधारणतः 0.50 घनमीटर बायोगॅस लागतो. अशाप्रकारे बायोगॅसचा उपयोग करण्यासाठी बायोगॅसचा 25 टक्के ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक शक्तीमध्ये होते. म्हणजेच 1 घनमीटर बायोगॅस (4700 किलो कॅलरी ऊर्जा) पासून 1175 किलो कॅलरी ऊर्जा ही यांत्रिकी शक्तीमध्ये रूपांतरित होऊ शकते.

3) बायोगॅस आधारित इंजिनचा उपयोग शेतातील कामे पूर्ण करण्यासाठी होतो. तसे पंपसेट, थ्रेशर, डिझेल इंजिन 3 ते 16 हॉर्सपॉवरपर्यंत बाजारात उपलब्ध आहे.

बायोगॅस संयंत्रांची देखभाल

1) दररोज शेण व पाण्याचे मिश्रण 1-1 प्रमाणात होत आहे की नाही हे तपासावे.

2) शेण व पाण्याचे मिश्रण करताना डिटर्जंट किंवा साबणाच्या (अंघोळीच्या) पाण्याचा वापर करू नये.

3) सर्वसाधारणतः दुपारच्या वेळेस नियमितपणे बायोगॅस संयंत्र शेण पाण्याच्या मिश्रणाने (स्लरीने) भरून घ्यावे.

4) दगड - गोटे, खडे, वाळू, कचरा इत्यादी स्लरीबरोबर बायोगॅस संयंत्रात जाऊ देऊ नयेत.

5) बायोगॅस संकलन अर्धवर्तुळाकार भागात स्लरीचा थर (पापडी) जमणार नाही, याची काळजी घ्यावी.

6) चुलीचा बर्नर किंवा दिवा सुरू करण्याआधी आगपेटी पेटवून घ्यावी.

7) साबणाच्या पाण्याने बायोगॅस बर्नर धुऊन स्वच्छ करावा.

8) गॅस पाइपलाइनची साबण व पाण्याच्या द्रावणाने गळती तपासून घ्यावी. गळती नसल्याची खात्री करून घ्यावी. जर गॅसगळती आढळल्यास ती दुरुस्त करून घ्यावी.

बायोगॅस प्रदूषणविरहित इंधन

बायोगॅस एक स्वस्त व प्रदूषणविरहित इंधन आहे. ज्यामध्ये 55 ते 70 टक्केपर्यंत ज्वलनशील मिथेन वायू असतो. तसेच 30 ते 45 टक्के कार्बन- डाय-ऑक्‍साइड वायू असतो. या व्यतिरिक्त नायट्रोजन, हायड्रोजन सल्फाइड अत्यल्प प्रमाणात असते. या सर्व उत्सर्जित वायूमध्ये केवळ मिथेन वायू हा ज्वलनशील आहे.

विभिन्न क्षमतेचे बायोगॅस/ गोबरगॅस व संयंत्रासाठी शेणाची आवश्‍यक मात्रा  
संयंत्र क्षमता व घन मी. शेणाची आवश्‍यक मात्रा (कि.ग्रॅ.) जनावरांची संख्या कुटुंबामध्ये सदस्यांची संख्या 
1 25 2-4 3-4 
2 50 5-8 5-8 
3 75 8-12 9-12 
4 100 10-16 13-16 
5 150 15-25 17-24

बायोगॅस स्लरीची पोषणमूल्ये

नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश 
बायोगॅस स्लरी 1.4 1.0 0.8 
कंपोस्ट खत 0.5 0.2 3.5 
शहरी कंपोस्ट 1.5 1.0 1.5

 

संपर्क - हेमंत श्रीरामे - 9422545915 
(लेखक विद्युत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत 
विभाग, कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate