অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतीय शेतकर्यांची सद्यःस्थिती

भारतीय शेतकर्यांची सद्यःस्थिती

सर्वेक्षण अहवालातली महत्त्वपूर्ण निरीक्षणे

“शहरी भागात चांगला रोजगार मिळाला, तर शेती सोडून जाण्याची मानसिकता शेतकर्यांमध्ये दिसून येत आहे. याला शेतीचे निसर्गावरील अवलंबित्व, तसेच शेतीतून मिळणारे तोकडे उत्पन्न या गोष्टी कारणीभूत आहेत. या बाबी नवी दिल्ली येथील ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्’ (सीएसडीएस) या संस्थेनी केलेल्या सर्वेक्षणातून प्रकर्षाने दिसून आल्या.  या सर्वेक्षणाचा हा थोडक्यात आढावा ....”

तीन वर्षांपूर्वी नवी दिल्ली येथील ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्’ (सीएसडीएस) या संस्थेने देशातल्या शेतकर्यांच्या वास्तव स्थितीचे दर्शन घडवणारे एक सर्वेक्षण केले. भारतातील 18 राज्यांच्या 137 जिल्ह्यांमधील 234 खेड्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाअंतर्गत मुलाखतीसाठी यादृच्छिक पद्धतीने निवड (Random Selection) करण्यात आलेल्या तब्बल 8,220 शेतकर्यांपैकी 5,350 मुलाखती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या. या सर्वेक्षणावर आधारित अहवाल ‘लोकनीती’ या स्वयंसेवी संस्थेने प्रकाशित करण्यात आला. या अहवालातल्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे -

सर्वेक्षणाच्या अहवालातील ठळक बाबी

• 36 टक्के शेतकरी झोपड्यांमध्ये किंवा कच्च्या विटांच्या घरांमध्ये राहतात. 44 टक्के शेतकरी कच्च्यापक्क्या किंवा संमिश्र स्वरूपाच्या घरांमध्ये राहतात. त्यांच्यापैकी फक्त 18 टक्के लोकांकडे पक्की, स्वतंत्र घरे आहेत.

• 28 टक्के शेतकरी अशिक्षित असल्याचे आढळले. 14 टक्के शेतकरी मॅट्रिक (दहावी) उत्तीर्ण होते आणि 6 टक्के शेतकर्यांनी महाविद्यालयांमध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला होता.

• एकूण 83 टक्के शेतकर्यांनी शेती हाच आपला प्रमुख व्यवसाय असल्याचे सांगितले. (तमिळनाडूत हे प्रमाण 62 टक्के आणि गुजरातमध्ये 98 टक्के होते.)

• 32 टक्के शेतकरी कुटुंबाच्या अतिरिक्त उत्पन्नासाठी शेतीखेरीज अन्य व्यवसायही करतात.

• दहा टक्के शेतकर्यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात त्यांच्या कुटुंबाला खायला काहीही नसल्यामुळे काही वेळा उपाशी राहावे लागले.

• बहुतांश (61 टक्के) शेतकरी कुुटुंबांना दिवसात दोन वेळा जेवायला मिळत होते. फक्त 2 टक्के शेतकरी कुटुंबांना एक वेळचेच, तर 34 टक्के कुटुंबांना दिवसात दोनहून अधिक वेळा खायला मिळत होते.

• दिवसातून तीन वेळचे जेवण फक्त 44 टक्के शेतकर्यांना, तर फक्त दुपारचे आणि रात्रीचे जेवण 39 टक्के शेतकर्यांना मिळत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.

• 65 टक्के शेतकर्यांनी शेतीशी संबंधित कामांमध्ये कुटुंबातल्या इतर सदस्यांची मदत होत असल्याचे सांगितले.

• 75 टक्क्यांहून अधिक शेतकर्यांनी आपण दहा वर्षांहून अधिक काळ शेती करत असल्याचे सांगितले.

• केवळ दहा टक्के शेतकर्यांकडेच शेतकरी संघटनांचे सदस्यत्व असल्याचे आढळले.

जमिनीची मालकी

• 86 टक्के शेतकर्यांकडे किंवा त्यांच्या कुटुंबांकडे स्वमालकीची शेतजमीन होती.

• या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या शेतकर्यांपैकी 14 टक्के शेतकरी भूमिहीन होते, म्हणजे त्यांच्याकडे स्वमालकीची जमीन नव्हती. 60 टक्के शेतकरी अल्प-भूधारक (फक्त 1 ते 3 एकरपर्यंच शेती असलेले) होते. 19 टक्के मध्यम  (4 ते 9 एकरपर्यंत शेती असलेले) शेतकरी होते. 7 टक्के मोठे (10 किंवा त्याहून अधिक एकर शेती असलेले) शेतकरी होते.

शेतीतले स्वारस्य

• सुमारे तीन-चतुर्थांश शेतकर्यांना त्यांचा व्यवसाय आवडत असल्याचे या सर्वेक्षणातून आढळले. तुम्हांला शेती आवडते का? या प्रश्नावर 72 टक्के म्हणजे बहुतांश शेतकर्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, तर 22 टक्के शेतकर्यांनी मात्र आपल्याला शेती करायला आवडत नसल्याचे सांगितले.

• या प्रश्नाविषयीच्या प्रतिसादांच्या प्रादेशिक विश्लेषणातून असे दिसून आले की, मध्य भारतातल्या 84 टक्के शेतकर्यांना शेती करायला आवडत होते. मात्र उत्तर आणि पूर्व भागांत शेती आवडणार्या शेतकर्यांची संख्या या तुलनेत कमी होती. ती अनुक्रमे 67 आणि 69 टक्के अशी होती.

• शेती करणे आवडत असल्याचे सांगणार्यांपैकी 60 टक्के शेतकर्यांनी शेती हा वंशपरंपरागत व्यवसाय असल्यामुळे आपल्याला आवडतो असे सांगितले. 15 टक्के शेतकर्यांना आपण शेतकरी असल्याचा अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले. शेतीतून चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे 10 टक्के शेतकर्यांनी, तर शेती करताना आनंद वाटतो म्हणून शेती करायला आवडते असे इतर 10 टक्के शेतकर्यांनी सांगितले.

• 22 टक्के लोकांना शेती कसायला आवडत नव्हते, त्याची कारणे काय होती? शेतीतून चांगले उत्पन्न मिळण्याचा अभाव असणे हे शेतीविषयीच्या नावडीचे प्रमुख कारण असल्याचे 36 टक्के शेतकर्यांनी सांगितले. कौटुंबिक दबावामुळे शेती करत असल्याचे त्यांच्यापैकी 18 टक्के लोकांनी; तर या क्षेत्रात आपल्याला भवितव्य नसल्याचे 16 टक्के लोकांनी सांगितले. इतर काम करायला आवडेल असे 9 टक्के लोकांनी; तर शेती करणे जोखमीचे किंवा तणावपूर्ण असल्यामुळे शेती करायला आवडत नाही असे 8 टक्के लोकांनी सांगितले.

शेतकर्याची वास्तव परिस्थिती

• आपला भाग वगळता, देशातील इतर भागांतल्या शेतकर्यांची स्थिती कशी वाटते, या प्रश्नाला उत्तर देताना, देशातल्या शेतकर्यांची स्थिती वाईट असल्याचे 47 टक्के शेतकर्यांनी आणि चांगली असल्याचे 15 टक्के शेतकर्यांनी सांगितले.

• विशेषतः देशाच्या पूर्वेकडच्या पश्चिम बंगाल या आणि त्याखालोखाल दक्षिणेकडच्या केरळ या राज्यांतल्या शेतकर्यांनी देशातल्या शेतकर्यांच्या स्थितीविषयी अधिक नकारात्मक मते मांडली. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकरी मात्र तुलनेने कमी  असमाधानी असल्याचे आढळले ही स्वारस्यपूर्ण बाब आहे.

शेतकरी कुटुंबांतल्या महिलांचे शेतीविषयीचे मत

• आपला कौटुंबिक खर्च किंवा घरखर्च भागवण्याच्या दृष्टीने शेतीतून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याचे बहुतेक शेतकरी कुटुंबांतील महिलांचे मत होते. घरखर्च भागवण्यास शेतीतून मिळालेले उत्पन्न कमी पडते असे 67 टक्के महिलांनी सांगितले; शेतीतून मिळणार्या उत्पन्नातून आपला घरखर्च भागतो असे उत्तर फक्त 20 टक्के महिलांनी दिले; म्हणूनच आपल्या कुटुंबाने इतर व्यवसाय केला, तर आपले जीवनमान सुधारेल असे त्यांना वाटत होते.

शेतकर्यांच्या वर्तमानकालीन आर्थिक स्थितीविषयी

• आपल्या वर्तमानकालीन आर्थिक स्थितीविषयी सुमारे 50 टक्के शेतकरी समाधानी; तर 40 टक्के शेतकरी असमाधानी होते. प्रादेशिक नमुन्याचा विचार करता, असे दिसून आले की; पूर्व भारतातल्या शेतकर्यांच्या तुलनेत मध्य भारतातले शेतकरी अधिक समाधानी होते.

• आपल्या सध्याच्या आर्थिक स्थितीची तुलना पाच वर्षांपूर्वीच्या आर्थिक स्थितीशी करण्यासही शेतकर्यांना सांगण्यात आले. पाच वर्षांपूर्वीच्या आर्थिक स्थितीच्या तुलनेत आपल्या परिस्थितीत आता सुधारणा झाल्याचे 40 टक्के शेतकर्यांनी सांगितले. आर्थिक परिस्थितीत काहीही फरक झाला नसल्याचे 37 टक्के शेतकर्यांनी सांगितले; तर पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत आपली आर्थिक परिस्थिती खालावल्याचे 15 टक्के शेतकर्यांनी सांगितले. मात्र तरीही आपल्या भविष्यकालीन आर्थिक स्थितीविषयी शेतकरी आशावादी आहेत.

• प्रतिसादकर्त्यांपैकी सुमारे (42 टक्के) निम्म्या लोकांना  आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल असे वाटत होते. 19 टक्के प्रतिसादकर्त्यांनी आपली आर्थिक स्थिती तशीच राहील, असे सांगितले. 10 टक्के लोकांना मात्र आपली परिस्थिती आणखी बिघडेल असे वाटत होते. भूतकालीन आणि भविष्यकालीन आर्थिक स्थितीविषयीच्या प्रश्नांच्या बाबतीत अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकर्यांच्या तुलनेत मोठे शेतकरी अधिक समाधानी होते.

शेतकर्यांची शहरी जीवनाविषयीची मते

• या सगळ्याच्या केंद्रस्थानी आर्थिक परिस्थितीचाच विचार असल्यामुळे बहुसंख्य (69 टक्के) शेतकर्यांना  ग्रामीण भागातील आयुष्यापेक्षा शहरातील आयुष्य अधिक चांगले आणि सुखावह असल्याचे वाटत होते. फक्त अगदी अत्यल्प (19 टक्के) शेतकर्यांनाच खेड्यातील आयुष्य शहरातील आयुष्यापेक्षा अधिक चांगले असल्याचे वाटत होते.

• जमीन नसलेल्या (भूमिहीन) शेतकर्यांनी अधिक जोरदारपणे खेड्यातील आयुष्यापेक्षा शहरी आयुष्याला प्राधान्य दिल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. खेड्यांच्या तुलनेत शहरांमध्ये रोजगारांच्या अधिक संधी उपलब्ध असतात, हे अशा प्रकारच्या प्रतिसादामागचे कारण असावे.

शहरातील रोजगार संधीविषयी

• शहरात रोजगाराची संधी मिळाली, तर ते शेतीचा व्यवसाय सोडून देतील का, असा प्रश्न विचारल्यावर 61 टक्के शेतकर्यांनी होकारार्थी उत्तर दिले आणि 26 टक्के शेतकर्यांनी आपण हा व्यवसाय सोडून देणार नसल्याचे सांगितले.

• शेती सोडण्याची तयारी दर्शवलेल्यांपैकी निम्म्या शेतकर्यांनी शहरातील रोजगार चांगला असेल तरच शेती सोडू असे सांगितले. ज्या शेतकर्यांकडे अजिबातच शेती नव्हती किंवा शेतीचा छोटासाच तुकडा होता त्यांना शेतीचा व्यवसाय सोडून शहरांत अधिक चांगले उत्पन्न देणारा रोजगार करण्याची कल्पना अधिक आवडली. दुसरीकडे मोठे शेतकरी (मोठ्या प्रमाणात जमीन असलेले) मात्र शेतीचे काम सोडून शहरांत रोजगारासाठी येण्यास फारसे तयार नव्हते.

शेतकर्यांच्या मुलांचे भवितव्य

•तुमच्या मुलांनी शहरांत स्थायिक व्हावे असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्न शेतकर्यांना विचारला गेल्यावर सुमारे 60 टक्के शेतकर्यांनी आपल्या मुलांनी शहरांतच स्थायिक व्हावे असे आपल्याला वाटत असल्याचे सांगितले. या सर्वेक्षणातून असे स्पष्ट झाले की बहुसंख्य शेतकर्यांना आपल्या मुलांना शेतीत चांगले भवितव्य आहे असे वाटत नव्हते. 14 टक्के शेतकर्यांनी आपल्या मुलांनी शहरांत स्थायिक होऊ नये असे आपल्याला वाटत असल्याचे सांगितले; तर 19 टक्के शेतकर्यांनी याविषयी आपल्या मुलांच्या मताला आपण प्राधान्य देऊ असे सांगितले. मुलांनी शहरांमध्ये स्थायिक व्हावे, असे वाटण्यामागे शहरांमध्ये अधिक चांगले शिक्षण मिळते हे प्रमुख कारण होते. त्याखालोखाल अधिक चांगल्या सुविधा मिळतात आणि रोजगाराच्या अधिक चांगल्या संधीही उपलब्ध होतात, ही कारणे सांगितली गेली.

(या सर्वेक्षणाचा पूर्ण अहवाल http://www.lokniti.org/pdf/Farmers_Report_Final.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate