অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भुईमूग, मोहरी आणि अंग ओलितावरील पिके

  • भात कापणीनंतर अंग ओलितावर घेता येण्यासारख्या कुळीथ, चवळी, वाल इ. पिकांची पेरणी करावी. पेरणीसाठी कुळिथाचे 20 ते 25 किलो, चवळीचे 18 किलो आणि वालाचे 18 किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे.
  • भुईमूग पिकासाठी जमीन तयार करून त्याची पेरणी करावी. पेरणीसाठी प्रति हेक्‍टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे. लागवडीसाठी कोकण गौरव, कोकण टपोरा, टी. जी. 26, एस. बी. 11, फुले प्रगती जातींचा वापर करावा.
  • मोहरी पिकाच्या पेरणीसाठी वातावरण अनुकूल असल्याने वरुणा, पुसा बोल्ड इ. जातींची निवड करावी. पिकाची पेरणी 45 सें.मी. x 10 सें.मी. अंतरावर 2 ते 3 सें.मी. खोल करावी. पेरणीच्या वेळी 1.25 किलो युरिया आणि 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति गुंठा द्यावे.

भाजीपाला रोपवाटिका

  • वांगी, मिरची व टोमॅटो रोपांचे जीवाणूजन्य मर या रोगापासून संरक्षण करण्याकरिता ज्या गादीवाफ्यावर बियाणे पेरणी करायची आहे, त्या ठिकाणी पेरणीपूर्वी कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड 2.5 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून वाफ्यावर फवारणी करावी. तसेच, मुंग्यांच्या नियंत्रणासाठी वाफ्याच्या बाजूने कार्बरील भुकटी पसरावी. पेरणीपूर्वी एक किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी.
  • वांगी, मिरची, कोबी, नवलकोल इ. पिकांच्या रोपवाटिकेवर मावा, तुडतुडे, फुलकिडी यांचा प्रादुर्भाव दिसून येताच डायमिथोएट 12 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कलिंगड

कलिंगडाची लागवड करण्यासाठी जमीन नांगरून कुळवून लागवडीसाठी तयार करावी. लागवडीसाठी चार मीटर अंतरावर पाट किंवा सऱ्या काढाव्यात. पाटाच्या दोन्ही बाजूस 90 सें.मी. अंतरावर 30 सें.मी. x 30 सें.मी. x 30 सें.मी. आकाराचे खड्डे करून त्यात 1 ते 1.5 किलो चांगले कुजलेले शेणखत व 10 ग्रॅम कार्बारील (10 टक्के) पावडर मिसळून खड्डा भरून घ्यावा. प्रत्येक खड्ड्यात 3 ते 4 बिया एकमेकांपासून 5 सें.मी. अंतरावर व 2 ते 2.5 सें.मी. खोलीवर लावाव्यात. रुजवा झाल्यानंतर 15 दिवसांनी रोपांची विरळणी करून प्रत्येक ठिकाणी 2 चांगली जोमदार रोपे ठेवावीत. या पिकाला प्रतिहेक्‍टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि पालाश यांची संपूर्ण मात्रा व नत्राची 1/3 मात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी. उर्वरित नत्राची मात्रा समप्रमाणात विभागून 1 व 2 महिन्यांनी लागवडीनंतर द्यावी.
संपर्क ः 
1) डॉ. उत्तम महाडकर ः 9422431067 
विभाग प्रमुख (कृषिविद्या विभाग) 
2) प्रा. वीरेश चव्हाण ः 9422065344 
कृषिविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली

कृषी सल्ला

केळी ः केळीच्या मृगबागेस खते देणे बंद करावे. केळीच्या बागेस नियमित पाणी द्यावे. केळीची कांदेबाग लागवड केली असल्यास नत्राचा दुसरा हप्ता 82 ग्रॅम युरिया प्रति झाड देऊन पाणी द्यावे. थंडीपासून संरक्षण करण्याकरिता बागेस सजीव कुंपणाची वाढ होऊ द्यावी. 
संत्रा मोसंबी ः संत्रा व मोसंबीच्या बागेत आंतरमशागतीची कामे पूर्ण करून घ्यावीत. 
करडई ः करडईच्या पिकात खुरपणी करून पीक तणविरहित ठेवावे. 
तूर ः तुरीमध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणाकरिता प्रोफेनोफॉस (40 टक्के) अधिक सायपरमेथ्रीन (40 टक्के) संयुक्त कीटकनाशक 25 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
डाळिंब ः आंबेबहर धरलेल्या डाळिंबाच्या बागेत अंतरमशागतीची कामे पूर्ण करून बाग स्वच्छ ठेवावी. खोडावर बोर्डोपेस्ट लावावे. 
फुलशेती ः ऍस्टरची लागवड केलेल्या फुलपिकास नत्राची मात्रा देऊन पाणी द्यावे. गुलाबाच्या फुलांची नियमित काढणी करून विक्रीसाठी पॅकिंग करून बाजारपेठेत पाठवावीत. पिकास नियमित पाणी द्यावे. 
भाजीपाला ः कोबीवर्गीय पिकातील अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संपर्क ः 02452 - 223276.
कृषी हवामानशास्त्र विभाग 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

कपाशीवरील पिठ्या ढेकणाचे नियंत्रण

सध्या मराठवाडा विभागात बागायती कपाशीवर पिठ्या ढेकणाचा (फिनाकोकस सोलॅनोप्सीस) प्रादुर्भाव आढळून आला आहे. 
1) पिठ्या ढेकणाची प्रौढ व पिल्ले या दोन्ही अवस्था कपाशीची पाने, कोवळे शेंडे, पाने, फुले, बोंडे यांतून रसशोषण करतात व शरीरातून साखरेसारखा चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे झाडे चिकट व काळपट दिसतात. झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा होऊन झाडाची वाढ खुंटते. रुईची प्रत खालावते.

एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन

पिठ्या ढेकणाचे शरीर मेणासारख्या पदार्थाने झाकलेले असल्यामुळे रासायनिक कीटकनाशकाद्वारे नियंत्रण करणे अवघड असते. 
1) पिकांचे अवशेष नष्ट करावेत. 
2) पिकात आंतरमशागत करावी. 
3) गाजरगवत, पेटारी, रानभेंडी बांधावरून नष्ट करावे. 
4) पिठ्या ढेकणावर उपजीविका करणारे ढालकिडे (लेडी बर्ड बीटल), क्रायसोपर्ला आदी मित्रकीटकांचे संवर्धन करावे. 
5) व्हर्टीसीलियम लेकॅनी 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
6) प्रादुर्भावग्रस्त भागावर क्‍लोरपायरिफॉस (25 ईसी) 30 मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (50 ईसी) 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीच्या द्रावणात चांगल्या दर्जाचे सरफेक्‍टंट मिसळावे.
संपर्क ः डॉ. शिवाजी तेलंग ः 9421942023 
डॉ. शिवाजी तेलंग ः 
सौ. वर्षा ताटीकुंडलवार, 
कापूस संशोधन केंद्र, नांदेड

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate