অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भुश्शापासूनही मिळविता येईल स्वीटनर!

भुश्शापासूनही मिळविता येईल स्वीटनर!

भुस्सा आणि काही बुरशी यांच्या मदतीने इरिथ्रीटॉल या स्वीटनरच्या निर्मितीची स्वस्त पद्धत ऑस्ट्रिया येथील व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथे विकसित केली आहे. हे संशोधन ‘एएमबी एक्प्रेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
सध्या अतितीव्र अशा मोलॅसिसमध्ये यीस्टच्या काही विशिष्ट प्रजाती वापरून इरिथ्रीटॉल तयार केले जाते. मात्र व्हियन्ना तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी साध्या भुश्शापासून माऊल्ड बुरशीच्या साह्याने इरिथ्रीटॉल स्वीटनरच्या निर्मितीची पद्धती विकसित केली आहे. त्यामुळे अधिक स्वस्तामध्ये स्वीटनर उपलब्ध होऊ शकेल. शेतीमध्ये शिल्लक राहिलेला भुस्सा अनेक ठिकाणी जाळून टाकला जातो. मात्र आता त्यापासून स्वीटनरनिर्मिती शक्य झाल्याने शेतकऱ्यांना अधिक प्राप्ती होऊ शकेल.

...अशी आहे पद्धती

अत्यंत बारीक कापलेल्या भुश्शामध्ये विशिष्ट द्रावण मिसळले जाते. त्यामध्ये त्याच्या पेशीभित्तिका विघटित होतात आणि लिग्नीन विरघळले जाते. केवळ झायलन आणि सेल्युलोज शिल्लक राहते. त्या विषयी माहिती देताना प्रा. रॉबर्ट माच म्हणाले, की शर्करेच्या निर्मितीसाठी सामान्यतः महागड्या विकरांचा अतितीव्र मोलॅसिसवर वापर केला जातो. तसेच पृष्ठीय ताणाखाली विशिष्ट यीस्ट प्रजातीसह ठेवले जाते. मात्र नव्या पद्धतीमध्ये भुश्शामध्ये विकराऐवजी बुरशी ट्रायकोडर्मा रीसेई (Trichoderma reesei) वापर केला जातो.
बुरशीच्या जुनकीय सुधारित प्रजातींचा वापर केल्याने विकरांची निर्मिती सोपी झाली आहे. या प्रजाती सरळ भुश्शावर वापरता येतात.
नेहमीच्या प्रक्रियेतील मोलॅसिस निर्मिती आणि यीस्टचा वापर हा भाग वगळून भुश्शापासून सरळ इरिथ्रीटॉलची निर्मिती शक्य झाली आहे.
या पद्धतीचे पेटंट ऍस्ट्रीड माच- ऐगनर व रॉबर्ट माच या दोघा संशोधकांच्या नावे घेण्यात आले आहे.
ट्रायकोडर्मा रिसेई या बुरशीमध्ये इरिथ्रीटॉल निर्मितीची क्षमता असल्याची माहिती असली, तरी त्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. मात्र बुरशीमध्ये योग्य त्या जनुकीय सुधारणा केल्यामुळे विकरांच्या निर्मितीला वेग देणे शक्य झाले आहे. अधिक प्रमाणात स्वीटनर निर्मिती शक्य होणार आहे.
प्रा. रॉबर्ट माच, संशोधक, व्हिएन्ना तंत्रज्ञान विद्यापीठ.

स्वीटनरविषयी अधिक माहिती

 

सध्या २३ हजार टन इरिथ्रीटॉलचे प्रति वर्ष उत्पादन होते. त्याचा वापर आशियामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. अलीकडे युरोप अमेरिकेतही याचा वापर वाढू लागला आहे.
इरिथ्रीटॉल हे साखरेच्या तुलनेमध्ये ७० ते ८० टक्के गोड असून, त्याचे आरोग्यासाठी काही फायदे आहेत.
१) यामध्ये कॅलरीचे प्रमाण अत्यल्प असते.
२) दातांचे किडणे कमी होते.
३) रक्तातील साखरेच्या प्रमाणावर परिणाम होत नाही.
४) त्याच प्रमाणे अन्य स्वीटनरप्रमाणे शरीरावर काही विपरीत परिणामही नाहीत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate