অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भू-सूक्ष्मजीव शास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा...

सूक्ष्मजीव शास्त्रात फार पूर्वी झालेल्या संशोधनाचे संदर्भ शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले नाहीत. वैद्यक शास्त्र, औद्योगिक आणि दुग्धशास्त्र शाखेतील शोधांचा त्या क्षेत्राच्या विकासासाठी उपयोग करून घेतला जातो, त्याप्रमाणे शेतीक्षेत्रासाठीच्या विकासासाठी करून घेतला जात नाही. प्रचलित शेती पद्धतीच्या तुलनेत संवर्धित शेती जास्त प्रमाणात भू-सूक्ष्मजीव शास्त्राच्या जवळ जाते, त्यामुळे येत्या काळात शेतीमध्ये भू-सूक्ष्मजीव शास्त्राचा अभ्यास संशोधक आणि शेतकऱ्यांच्या पातळीवर होणे आवश्‍यक आहे.

ऑइल इंजिन, सेंट्रिफ्युगल पंप या यंत्रांच्या आगमनाने मोटा जाऊन पाणी उपसण्याची स्वयंचलित यंत्रे सिंचनासाठी उपलब्ध झाली. या यंत्रांच्या वापराने पाणी उपसा सोपा झाला.

सन 1952 च्या कालावधीत ही यंत्रे शेतात दिसू लागली. त्यानंतर सन 1970 च्या सुमारास वीज मोटारीचे आगमन झाले. सन 1950-55 च्या सुमारास सिमेंट पाइपच्या वापराची सुरवात झाली, त्यामुळे पाणी दूरवर नेणे सोपे झाले. त्यानंतर पुढे पीव्हीसी पाइपचा वापर सुरू झाला. ट्रॅक्‍टरमुळे नांगरणी, पूर्वमशागत आणि वाहतुकीच्या कामांत खूपच सुलभता आली.

स्वयंचलित कापणी - मळणी यंत्र

फवारणीसाठी यंत्रामुळे फवारणीमध्ये गती आली. तणनाशकांच्या आगमनाने भांगलणीच्या कामात सुलभता आली. खतांमध्येही विविध प्रकार शेतकऱ्यांना उपलब्ध झाले आहेत. ट्रॅक्‍टरचलित अवजाराने दिवसाकाठी 10 ते 15 एकरांची पेरणी होऊ लागली आहे. स्वयंचलित कापणी - मळणी यंत्राने शेतकऱ्यांचे काम खूप सोपे झाले. बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर शेतकऱ्यांना कर्जे मिळणे खूप सुलभ झाले, त्याचाही शेतीच्या प्रगतीला हातभार लागला.

हा सर्व इतिहास मांडण्यामागे एक उद्देश असा आहे, की शेतकरी परंपरावादी नाही, शेती करण्याच्या पद्धतीत सतत बदल होत आले आहेत. शेतकरी सर्व बदल स्वीकारत असताना पूर्वीपेक्षा काम सुलभ होते, कार्यक्षमता वाढते, हे लक्षात आल्यानंतर प्रसंगी डोईजड कर्जाचा बोजा अंगावर घेऊन शेतकरी बदलाला सामोरा गेल्याचे दिसते. मग हाच उद्देश कोणताही आर्थिक बोजा न घेता, कोणत्याही अवजाराची खरेदी न करता (काडात पेरणी करणारे यंत्र क्वचित वैयक्तिक पातळीवर घेतले जाईल, त्याचा उपयोग आपल्याबरोबर इतरांना भाड्याने देण्यासाठीही केला जाईल.) संवर्धित शेतीत साध्य होत असेल, तर या तंत्राचा विचार का करू नये? हा बदल एकाच वेळी शेतकऱ्यांचा अनेक बाजूने फायदा करून देणारा आहे. संवर्धित शेतीच्या अधिवेशनाची कागदपत्रे अभ्यासता जगभर हे तंत्र स्वीकारण्याची कारणे दिली आहेत. यामध्ये

  1. जमिनीची सुपीकता सर्वत्र ढासळत चालली आहे.
  2. जमीन नांगरल्याने मोठ्या प्रमाणावर धूप होते.
  3. नांगरल्याने होणारा सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास व संवर्धित शेतीमुळे सेंद्रिय कर्बाचे होणारे संवर्धन.
  4. चांगल्या दर्जाचा मिळणारा सेंद्रिय कर्ब (हा उद्देश अपवादात्मक दिसून येतो).
  5. खरीप पिकाच्या कापणीनंतर गव्हाची पेरणी योग्य वेळेत करता येणे हा सर्वांत प्रमुख उद्देश आढळून येतो.
  6. उत्पादनात वाढ अगर किमान घट होत नाही.
  7. डिझेलच्या वापरात बचत व इतर पर्यावरणीय फायदे.
  8. सुलभता व कार्यक्षमता वाढते. या गोष्टींवर भर देण्यात आले आहे.

भू-सूक्ष्मजीव शास्त्राचा अभ्यास

जगभरच्या शेती शास्त्रात भू-सूक्ष्मजीव शास्त्र हा विषय फारसा अभ्यासला जात नाही. यामुळे या तंत्राचे भू-सूक्ष्मजीव शास्त्रीय परिणाम व त्याचा अभ्यास असा उल्लेख फारसा कोठे आढळत नाही. मी या शास्त्राचा अ-पुस्तकी (नॉन ऍकेडेमिक) विद्यार्थी असल्याने मी केवळ या शास्त्राच्या चष्म्यातूनच या तंत्राचा अभ्यास करतो. या शास्त्राच्या अभ्यासाने माझ्या डोक्‍यात शेतीसाठी काही पायाभूत तत्त्वे निश्‍चित केली गेली आहेत, ती पुढीलप्रमाणे आहेत.

  1. सेंद्रिय पदार्थ जमिनीच्या बाहेर कुजवून तयार झालेले चांगले कुजलेले खत टाकणे चुकीचे आहे.
  2. सेंद्रिय पदार्थ जमिनीतच पीक वाढत असता कुजत राहिले पाहिजेत (रोटाव्हेटरने कुट्टी करून मातीत मिसळून टाकणे योग्य नाही. आच्छादन रूपात अगर पिकाचे जमिनीखालील अवशेष जसे मिळतात, तसेच कोणताही धक्का न लावता).
  3. सेंद्रिय पदार्थ कुजण्याची क्रिया सतत चालू राहिली पाहिजे. काही दिवसांसाठी अगर महिन्यांसाठी नव्हे!
  4. वाढणे व जुने शेष भाग कुजणे या परस्परविरोधी व समांतर चालणाऱ्या क्रिया आहेत.
  5. कुजण्यास जड असणारे पदार्थ थेट जमिनीत कुजले पाहिजेत.
  6. पिकाचे पोषण हे सूक्ष्मजीवशास्त्रीय आहे.

आपण दिलेले कोणतेही खत (सेंद्रिय अगर रासायनिक) हे सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीशिवाय पिकापर्यंत पोचू शकत नाही. सूक्ष्मजीवांकडून हे काम व्यवस्थित होण्यासाठी प्रथम त्यांच्या पोटापाण्याची सोय करणे हे शेतकऱ्याचे प्रथम प्राधान्याचे नैतिक कर्तव्य ठरते. त्यांच्या पोटापाण्याची सोय म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा साठा. तेव्हा आपण जे सेंद्रिय खत (शेणखत, कंपोस्ट) जमिनीला देत होतो, अगर आता क्वचित केव्हातरी देतो, ते पिकासाठी नसून, सूक्ष्मजीवांच्या उदरभरणासाठीच असते; परंतु आपल्याला याची माहिती आहे का, ते तपासून पाहणे गरजेचे आहे.

वरील सर्व तत्त्वांचे पालन आपोआप होते म्हणून संवर्धित शेतीकडे मी आपोआप वळत गेलो. जगभरच्या संवर्धित शेतीचा आढावा घेण्यामागे हाच उद्देश होता, की त्यापैकी कोठे सूक्ष्मजीव शास्त्राच्या माध्यमातून अभ्यास केला जात आहे का? पालापाचोळा जागेलाच कुजविल्याने जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढते, इतपत आता अनेक ठिकाणी बोलले जाते. हा संदर्भ फारच ढोबळमानाचा आहे.

विज्ञानाच्या इतर शाखांत नवनवीन शोध लागतात, त्यांचा पुढे जगभर प्रसार होतो. प्रसिद्धीमाध्यमांचे स्वरूप इतके बदलून गेले आहे, की पूर्वीचे अनेक शोध आपल्यापर्यंत पोचण्यास 20-25 वर्षांचा कालावधी जात असे. आज अत्यंत कमी वेळात हे काम होऊ शकते. शेती आणि शेतकऱ्यांच्या दुर्दैवाने सूक्ष्मजीव शास्त्रात फार पूर्वी झालेल्या संशोधनाचे संदर्भही आपल्यापर्यंत पोचू शकत नाहीत. वैद्यक शास्त्र, औद्योगिक व दुग्धशास्त्र या शास्त्र शाखेतील शोधांचा ज्याप्रमाणे त्या-त्या क्षेत्राच्या विकासासाठी उपयोग करून घेतला जात आहे, त्याप्रमाणे शेती क्षेत्रासाठीच्या विकासासाठी करून घेतला जात नाही, असे खेदाने म्हणावे लागते.

प्रचलित शेती पद्धतीच्या तुलनेत संवर्धित शेती जास्त प्रमाणात भू-सूक्ष्मजीव शास्त्राच्या जवळ जाते. यामुळे संवर्धित शेतीत तरी या शास्त्रशाखेतील शोधांचा उपयोग करून घेतला जात असावा, अशा आशेने चौथ्या संवर्धित शेती परिषदेतून उपलब्ध झालेल्या साहित्याचा अभ्यास केला; परंतु अजूनही याबाबत अधिक माहिती उपलब्ध होणे आवश्‍यक आहे.

संवर्धित शेती पद्धत हा वरील सर्व गोष्टी प्रत्यक्ष शेतात उतरविण्याचा एक चांगला मार्ग आहे. हा विषय यथाशक्ती वाचकांपुढे ठेवला आहे. मालिका चालू असता, वाचकांनी सतत दूरध्वनीद्वारे या तंत्राविषयी उत्सुकता दाखविली. आजपर्यंत झालेल्या वाटचालीला वाचकांकडून मिळालेले प्रोत्साहनच कारणीभूत आहे. संवर्धित शेतीच्या यशकथा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत चालू आहेत, त्यांची माहिती जशी प्राप्त होईल, तशी वेळोवेळी वाचकांपुढे आणण्याचा माझा प्रयत्न आहे.

प्रदूषणाचे होताहेत परिणाम


जगभर पर्यावरणाविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. यांत्रिक नांगरणी मोठ्या प्रमाणावर करून, खनिज तेल जाळून मोठ्या प्रमाणावर कर्ब वायू आपण हवेत सोडतो, तर दुसऱ्या बाजूला जैवभार जाळून, नांगरणीतील खनिज तेल जाळून सुटणाऱ्या कर्ब वायूच्या कित्येक पटीने जास्त कर्ब वायू या ज्वलनातून हवेत सोडला जातो. यातून होणारे हवेचे प्रदूषण अगर जागतिक तापमानवाढीला शेतकऱ्यांकडून लागणारा हातभार या बाबी चर्चा करण्याइतक्‍या गंभीर मानल्या जात नाहीत. या दोनही क्रिया शेती करण्यासाठी गरजेच्या मानल्या गेल्याने कदाचित असे असावे.

या दोन गोष्टींपेक्षा जैवभार जाळून टाकल्यामुळे जमिनीच्या सुपीकतेचे होणारे नुकसान व सुपीकता कमी झाल्यामुळे उत्पादकता घटते, यामुळे होणारे शेतकऱ्यांचे व राष्ट्राचे आर्थिक नुकसान सर्वत्र गंभीर परिस्थिती धारण करीत आहे. जैवभार जाळल्याने व रानात हळूहळू कुजल्याने सारखाच कर्बवायू हवेत जातो.

एक वायू पाच मिनिटात उडून जातो. दुसरीकडे काही महिन्यांपासून वर्षांपर्यंत हळूहळू जात राहतो. याचा नेमका शेती व शेतकऱ्यांसाठी काय फायदा - तोटा आहे हे भू-सूक्ष्मजीव शास्त्राच्या अभ्यासाशिवाय सर्व अंगांनी ध्यानात येणे शक्‍य नाही. या शास्त्रावरील सर्व ग्रंथ इंग्रजीत आहेत; परंतु भाषा तांत्रिक व क्‍लिष्ट आहे. हे तंत्रज्ञान सोप्या भाषेत आणणे गरजेचे आहे.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 8/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate