অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भौगोलिक दर्शकत्व आणि 21व्या शतकातील व्यापार- संरक्षण

भौगोलिक दर्शकत्व आणि 21व्या शतकातील व्यापार- संरक्षण

भौगोलिक दर्शकत्व विशिष्ट प्रदेशात रुजलेले असल्यामुळे त्याचा वापर स्थानिक विकासासाठी, स्थानिक ज्ञानसंरक्षणासाठी आणि पारंपरिक सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या संरक्षणासाठी होतो. आपल्या देशातील विविध प्रदेशांत खाद्यवैशिष्ट्यपूर्ण अशी शेती उत्पादने, हस्त व्यवसायातील उत्पादने, तसेच कारखानदारी उत्पादने यांसाठी भौगोलिक दर्शकत्व जास्तीतजास्त प्रमाणात मिळवणे, त्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद करवणे व त्याबद्दलची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणे देशाच्या हिताचे ठरेल...

गेल्या दोनशे-तीनशे वर्षांत आतंरराष्ट्रीय व्यापाराचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलत गेले. 19व्या व 20व्या शतकात जगातील बहुतेक सर्वच प्रमुख राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करताना व्यापारवादी दृष्टीकोन (Merchantalism) या-ना-त्या स्वरूपात वापरण्याचा प्रयत्न केला. फ्रेडरिक लिस्ट या जर्मनीच्या विचारवंताने देशाची निर्यात जास्तीतजास्त असावी, देशात आयात कमीतकमी व्हावी, व्यापारतोलातील शिल्लक (Trade  Account  Balance) मोठी असावी व त्याच्याआधारे देशाचे आर्थिक सामर्थ्य वाढवावे असा विचार मांडला. लिस्ट यांच्याअगोदर इंग्लंडच्या थॉमस मन यांनी, तर नंतरच्या टप्प्यात अगदी अमेरिकेसारख्या देशातदेखील कॅरेसारख्या अर्थशास्त्रज्ञाने व तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हॅमिल्टन यांनी या विचाराची पायाभरणी केली.

मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापार सर्वच राष्ट्रांना फायद्याचा असतो, म्हणून व्यापार संरक्षणाचा वापर न करता, त्या-त्या राष्ट्राच्या नैसर्गिक क्षमतेप्रमाणे आयात व निर्यात व्हावी, हेच सगळ्यांच्या हिताचे आहे असा विचार 1796मध्ये अ‍ॅडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने मांडला. तरीदेखील 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या जवळजवळ 89-90च्या दशकापर्यंत या-ना-त्या स्वरूपात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पद्धतीने व्यापार संरक्षणाचे तत्त्व परकीय व्यापारासाठी बहुतेक सर्वच देशांनी वापरले.

1950 नंतर जागतिक नाणेनिधी, जागतिक बँक, तसेच प्रारंभी मार्शल करार, नंतर गॅट, तसेच अंकटॅड यांसारख्या सांघिक पद्धतींनी व्यापार मोकळा करण्याचा प्रयत्न वाढला. 1995मध्ये गॅटचा अस्त झाला आणि (दि. 1 जानेवारी 1995 रोजी) आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक मुक्त करणारी, अधिक वस्तू व सेवा यांचा समावेश असणारी ‘जागतिक व्यापार संघटना’ निर्माण झाली. या ‘जागतिक व्यापार संघटने’च्या उदारमतवादी चौकटीत व्यापार करणार्‍या देशांना काही नैसर्गिक क्षमतांचा वापर करून अप्रत्यक्षपणे व्यापारी सरंक्षणाची व्यवस्था वापरता यावी, यासाठी भौगोलिक दर्शकत्व (Geographic Indicator) या पद्धतीचा वापर करण्याची व्यवस्था निर्माण झाली. ‘जागतिक व्यापार संघटने’च्या करारातील कलम (22) (1) प्रमाणे जागतिक बौद्धिक संपदा संघटन निर्माण झाले व त्यातून व्यापारसंबंधित बौद्धिक संपदा हक्कांच्या आधाराने भौगोलिक दर्शकत्व (Geographic Indicator) ही व्यवस्था उत्क्रांत झाली.

जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या शब्दातच व व्यापार संबंधित बौद्धिक संपदा कराराच्या तरतुदीप्रमाणे बोलायचे झाल्यास भौगोलिक दर्शकत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल.

“एखाद्या विशिष्ट सभासदराष्ट्राच्या प्रदेशातून अथवा त्याच्या एखाद्या भागातून उगम होणार्‍या वस्तूच्या गुणवैशिष्ट्यांची अभिव्यक्ती, त्यांची प्रसिद्धी तथा खास वैशिष्ट्ये जेव्हा मूलतः त्या भौगोलिक प्रदेशाशी संबंधित असतात, तेव्हा त्याला ‘भौगोलिक दर्शकत्व’ असे म्हणतात.”

आंतरराष्ट्रीय बाजारात विशिष्ट प्रदेशाशी संलग्न असणार्‍या प्रसिद्ध वस्तूंची खरेदी करण्याकडे ग्राहकाचा कल असतो. उदाहरणार्थ, दिल्लीतील, हिमाचल प्रदेशातील आणि पंजाबमधील बासमती तांदूळ; नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्षे, रत्नागिरी-देवगड भागातील हापूस आंबा, फ्रान्समध्ये तयार झालेली वाइन, स्कॉटलंडमध्ये तयार झालेली स्कॉच व्हिस्की ही त्यांपैकी काही उदाहरणे आहेत.

भारतामध्ये याबाबतीत वस्तूंचे भौगोलिक दर्शकत्व (नोंदणी आणि संरक्षण) हा कायदा 1999मध्ये मंजूर झाला आणि त्याचा सप्टेंबर 2003पासून अंमल सुरू झाला. विशिष्ट वस्तूंना होणारा भौगोलिक दर्शकत्वाचा फायदा पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल.

1. भौगोलिक दर्शकत्व वैशिष्ट्यामुळे संबंधित वस्तूंच्या व्यापाराला नैसर्गिक संरक्षण मिळते.

2. शेतमालाची नेमकी ओळख प्रस्थापित होते.

3. वस्तूच्या गुणवत्तेची खातरी पटते.

4. रंग, चव, गंध व पोषकता या निकषांवर संबंधित वस्तूला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा व ओळख प्राप्त होते.

5. संबंधित वस्तूच्या बाबतीत इतर कोणत्याही राष्ट्राला व प्रदेशाला अनुकरण करता येत नाही.

6. अशा भौगोलिक दर्शकत्व असणार्‍या वस्तूंची आंतरराष्ट्रीय मागणी व किंमत (स्थिर) व उत्पन्न लवचीक असते. त्यामुळे त्यातून निर्यातवृद्धी होऊ शकते.

भारताच्या बाबतीत 2017पर्यंत 295 वस्तूंच्या बाबतीत भौगोलिक दर्शकत्व कायद्याचे संरक्षण मिळालेले आहे. देशातील बहुतेक सर्व घटकराज्यांतील शेती, हस्तव्यवसाय, कारखानदारी अशा तिन्ही क्षेत्रांतील वस्तूंचा समावेश यात होतो. वस्तूंचा विचार केल्यास तांदूळ, कापड, सोलापुरी चादर, टॉवेल, म्हैसूर सिल्क, साबण, नागपूरची संत्री, अलेप्पीचा काथ्या, इरकल साडी, किनारपट्टीचे मसाल्याचे पदार्थ, तसेच लासलगावचा कांदा, नाशिकची द्राक्षे, सांगोल्याची डाळिंबे अशा अनेक वस्तू भौगोलिक दर्शकत्व असणार्‍या आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक वस्तूंना आंतरराष्ट्रीय व्यापारात भौगोलिक दर्शकत्वाचा आधार मिळावा म्हणून

डॉ. रघुनाथ माशेलकरांनी मधल्या काळात अत्यंत कौतुकास्पद प्रयत्न केले. हळद तसेच लिंबू यांना भौगोलिक दर्शकत्वाचा लाभ देण्यात आला. कायद्याप्रमाणे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, एकट्या शेतकर्‍याला भौगोलिक दर्शकत्वाचा लाभ घेता येत नाही. तसा लाभ घेण्यासाठी कायदेशीर मान्यता असलेल्या नावाने शेतमाल उत्पादक संस्था किंवा संघटना प्रस्थापित करावी लागते. या संस्थांची नोंदणी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भौगोलिक चिन्हांकन नोंदणी कार्यालयात करावी लागते.

भौगोलिक दर्शकत्व तत्त्वांचा वापर करणे हे संबंधित वस्तूंच्या उत्पादकांना का आवश्यक असते याचाही विचार करावा लागेल. लासलगावचा कांदा, वेंगुर्ल्याचा काजू, कोकम, आजर्‍याचा घनसाळ तांदूळ, नवापूर तूर, सातार्‍याचा वाघ्या घेवडा आणि मंगळवेढ्याची ज्वारी यांच्याबाबतीत भौगोलिक दर्शकत्वाचा लाभ मिळवण्यासाठी झालेल्या प्रयत्नांना यश आले. त्याचप्रमाणे सांगलीचा बेदाणा; सासवड, पुरंदर येथील अंजीर; वायगावची हळद; तसेच जळगावचे भरीत वांगे याही वस्तूंचा समावेश भौगोलिक दर्शकत्वाच्या तत्त्वात झाला आहे. एका अर्थाने भौगोलिक दर्शकत्व मान्य झाल्यानंतर संबंधित उत्पादकाला एक प्रकारचा पेटंट (एकस्व) हक्क, नावातून निर्माण होणारा ब्रँड हक्क, तसेच पुरवठ्यांच्या नियंत्रणामुळे मक्तेदारी हक्क प्राप्त होतो. वेगळ्या शब्दांत असे म्हणता येते की, विशिष्ट भूभागातील माती, तिच्यामधील क्षार, तेथील पाणी, आर्द्रता, हवामान, तसेच शेतकर्‍यांचे व्यवस्थापनकौशल्य यांतून शेतमालास किंवा हस्तोद्योगातील तथा कारखानदारीतील वस्तूंना एक विशिष्ट रंग, चव, आकार, पोषकमूल्ये व सौंदर्यमूल्य, टिकावू मूल्य अशी वैशिष्ट्ये प्राप्त होतात. त्यांच्या आधारे संबंधित उत्पादक विक्रेत्यास किंवा संस्थेस विशिष्ट सौदाशक्ती प्राप्त होते. ग्राहकांना दर्जाची खातरी असल्यामुळे संबंधित वस्तूला चांगली मागणी राहते, निर्यात वाढते. परकीय चलनाची प्राप्ती होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन युरोपमधील देशांनी शेती क्षेत्रातील जवळजवळ 1300 वस्तूंना भौगोलिक दर्शकत्वाचा लाभ मिळवून दिला आहे.

एकंदरीत विचार करता, भौगोलिक गुणवैशिष्ट्यांच्या आधारावर एखाद्या गावात, प्रदेशात व देशात विशिष्ट गुणवत्तेच्या वस्तू निर्माण होत असतील; तशा प्रकारची भौगोलिक वैशिष्ट्ये इतरत्र नसतील, तर संबंधित उत्पादक देशांना भौगोलिक दर्शकत्व मान्यतेचा शिक्का आंतरराष्ट्रीय व्यापारात वापरता येतो. भारत सरकारच्या नोंदणी कार्यालयाकडे नोंदणी केल्यानंतर संबंधित शेतीउत्पादक व्यक्तिसमूह किंवा संस्था यांना संबंधित प्रमाणपत्र मिळते व त्या प्रमाणपत्राचा वापर करून निर्यात करता येते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर रॉकफोर्ड चीज, फे्रंच वाइन, स्विस घड्याळे, पेरू देशातील मातीची भांडी यांचा उल्लेख करता येतो. भौगोलिक दर्शकत्व तसेच ट्रेडमार्क (व्यापारचिन्ह) याची मालकी असलेल्या उत्पादकास बाजारपेठेत आपला माल इतरांपेक्षा अधिक चांगला आहे हे सिद्ध करता येते. त्यासाठी काही वेळेला उगमदर्शक  संकल्पनेचाही (also appellations of origin) उपयोग करता येतो, जी पॅरिस करारातून उदयास आली. या संकल्पनेची व्याख्या लिस्बन करारामध्ये करण्यात आली. भौगोलिक दर्शकत्वामुळे संबंधित उत्पादकाला आपल्या विक्रीप्रयत्नासाठी वैशिष्ट्यभेदाचे साधन वापरता येते. भौगोलिक दर्शकत्वामुळे पारंपरिक ज्ञान सुरक्षित ठेवता येते, तसेच पारंपरिक सांस्कृतिक अभिव्यक्ती सातत्याने चालवता येते. बनारसी साड्या, बेंगलोर सिल्क, म्हैसूर सिल्क ही त्याचीच उदाहरणे आहेत. एखाद्या वस्तूसाठी भौगोलिक दर्शकत्व नोंदणी झाल्यानंतर त्या वस्तूसाठी तशाच प्रकारची नोंदणी करण्याचा अधिकार इतर स्पर्धकांना मिळू नये यासाठी संबंधित देशाला, प्रदेशाला जागरूक राहणे गरजेचे असून सतत कायदेशीर पद्धतीने अशा फेरनोंदण्या करायला हव्यात. तसे झाले, तर भौगोलिक मार्गदर्शकत्वाचे रूपांतर हळूहळू जेनेरिक, स्थानिक (मूळ पदार्थ/वाण गृहीत धरून) वस्तूमध्ये होऊ शकते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर विशिष्ट प्रदेशांचे विशिष्ट हक्क व उत्पादनवैशिष्ट्य संरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कायदेशीर व्यवस्था करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पॅरिस कन्व्हेन्शन 1883, माद्रिद करार 1891 व 1994चा ट्रिप्स करार हे महत्त्वाचे टप्पे आहेत. बर्‍याच वेळेला भौगोलिक दर्शकत्व नाकारले जाते. विशेषतः ज्या भौगोलिक दर्शकत्वाच्या नामामध्ये भाषासाधर्म्य असते, परंतु प्रदेशभिन्नता असते; त्या ठिकाणी असा गोंधळ होण्याची शक्यता असते. म्हणून भौगोलिक दर्शकत्व हक्काचे संरक्षण करण्यासाठी तीन प्रकारे प्रयत्न करावे लागतात.

1. विशिष्ट प्रदेशाचे हक्क प्राप्त करून घेणे.

2. लिस्बन तथा माद्रिद करारातील तरतुदीचा आधार घेणे आणि

3. विशिष्ट देशांशी द्विपक्षीय करार करणे.

एकंदरीत पाहता, भौगोलिक दर्शकत्व तंत्राचा वापर हा 21व्या शतकातील निर्यातवृद्धीचा तथा व्यापारी संरक्षणाचा एक कायदेशीर प्रकार मानावा लागेल. भौगोलिक दर्शकत्व हा विचार म्हणजे आता सामान्यांच्या हितसंबंधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः व्यापारसंबंधित बौद्धिक संपदा कराराच्या मांडणीतून भौगोलिक दर्शकत्वाची चर्चा अधिक वाढली. भौगोलिक दर्शकत्व विशिष्ट प्रदेशात रुजलेले असल्यामुळे त्याचा वापर स्थानिक विकासासाठी, स्थानिक ज्ञानसंरक्षणासाठी आणि पारंपरिक सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या संरक्षणासाठी होतो. आपल्या देशातील विविध प्रदेशांत खास वैशिष्ट्यपूर्ण अशी शेती उत्पादने, हस्त व्यवसायातील उत्पादने, तसेच कारखानदारी उत्पादने यांसाठी भौगोलिक दर्शकत्व जास्तीतजास्त प्रमाणात मिळवणे, त्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद करवणे व त्याबद्दलची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणे देशाच्या हिताचे ठरेल.

लेखक: प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, कोल्हापूर, संपर्क: 94220 46382

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate