অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्रातील जी. आय. मानांकित पिके आणि त्यांचे वेगळेपण

महाराष्ट्रातील जी. आय. मानांकित पिके आणि त्यांचे वेगळेपण

महाराष्ट्रातील जी. आय. मानांकित पिके आणि त्यांचे वेगळेपण

जी. आय. मानांकित पीक

पिकाचे अद्वितीयत्व ठरवणारे घटक

 

भौगोलिक महत्त्व

इतर पिकांपेक्षा असलेला वेगळेपणा

कोकम (रत्नागिरी व सिंधुदुर्ग)

जमीन - कोकण विभागात जेथे झाडाची घनता जास्त आहे, अशा ठिकाणी कोकम घेतले जाते. कारण कोकमसाठी अर्धसावली असणे आवश्यक असते. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील जमिनीत रेतीचे, सेंद्रिय घटकांनी युक्त मातीचे प्रमाण जास्त असल्याने त्या जमिनी कोकमसाठी उपयुक्त आहेत. येथील जमिनी आम्लयुक्त (पीएच सरासरी 5.6) आणि निचर्‍याच्या असून त्यांमध्ये पालाशचे व नत्राचे प्रमाण मध्यम आणि स्फुरदाचे प्रमाण किंचित कमी आढळते. हवामान - कोकमलागवडीसाठी उष्ण व दमट हवामान लागते व बहुतांश कोकण विभागात  असे हवामान असतेे. पर्जन्यमान - रत्नागिरी व सिधुंदुर्ग जिल्ह्यांमध्ये तीन ते साडेतीन हजार मि. मी. पाऊस पडतो. आर्द्रतेचे प्रमाण 65 ते 90 टक्के यांदरम्यान, तर तापमान 15 ते 34 अंश सेल्सिअस असते. पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे फक्त चार ते पाच तास स्वच्छ सूर्यप्रकाश मिळत असला, तरी फुलोरा येण्याच्या कालावधीत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांमध्ये दहा ते अकरा तास स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो आणि कमीतकमी बारा ते चौदा अंश सेल्सिअस व जास्तीतजास्त 25 ते 28 अंश सेल्सिअस तापमान राहिल्यामुळे फुलोरा चांगला येतो. हिवाळ्यात फुलोरा व उन्हाळ्यात (मार्च व एप्रिल  महिन्यांत) फळे पक्व होतात. कोकम हे पीक हवामानाला अत्यंत संवेदनशील आहे. फुलोर्‍याच्या वेळी धुके जास्त असेल, तर फुलोरा झडतो व उत्पादन कमी येते.  रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील जमिनी व तिथले हवामान उत्तर कोकणापेक्षा वेगळे आहे. दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा जास्त पाऊस पडतो व आर्द्रताही जास्त असते.

कोकम हे एक आंबट फळ असून ते दीर्घकालीन नैसर्गिक वनोपज आहे. स्थानिक लोकांकडून विविध स्वरूपांत वापरात असलेले आणि भौगोलिकतेशी अतिशय घनिष्ठ संबंध असलेले हे उत्पादन आहे. स्थानिक स्तरावरील लोकांचे कौशल्य आणि त्यांचे तांत्रिक ज्ञान यांतून हे उत्पादन तयार झाले आहे.  कोकम हे बहुउपयोगी आणि औषधी गुणधर्म असलेले पीक असून नजीकच्या भविष्यकाळात ते व्यावसायिक दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण पीक ठरेल असा दावा स्पाइसेस बोर्ड ऑफ इंडियाकडून करण्यात आला आहे. ‘कोकण हाती’ आणि ‘कोकण अमृता’ या दोन कोकम जाती या भागात लोकप्रिय आहेत. कोकम फळापासून आमसुले (आगळी सोले), बियांपासून मुटला, कोकम सरबत, जेवणानंतर पचनासाठी सोलकढी अशा प्रकारचे घरगुती पदार्थ बनवले जातात.  कोकमपासून तयार होणारे पदार्थ शरीरातील उष्णतारोधक म्हणून, विविध त्वचाविकारांवर, स्थूलपणामुळे निर्माण होणार्‍या विविध विकारांवर आणि हृदयाशी निगडित रोगांवर गुणकारी आहेत.

घनसाळ तांदूळ (आजरा,  जि. कोल्हापूर)

जमीन - आजरा तालुक्यात तांबडी ते तपकिरी रंगाच्या मातीची कमीजास्त खोलीची जमीन दिसून येते. पश्चिम घाटातील जास्त पावसाच्या प्रदेशात  डोंगरमाथ्यावर व डोंगरउतारावर आजर्‍याच्या पश्चिम भागात तांबडी माती प्रामुख्याने दिसून येते. या जमिनीमध्ये नत्र, जस्त, लोह, तांबे, कॅल्शिअम व मंगल या पोषकद्रव्यांचे प्रमाण मुबलक असल्याने ती सुपीक असते. अशी तांबडी माती घनसाळ तांदळाच्या वाढीसाठी योग्य समजली जाते. हवामान - आजरा तालुक्यात सरासरी तापमान 14 ते 36 अंश सेल्सिअस इतके असते. जून ते नोव्हेंबर या भातलागवडीच्या कालावधीत ते 17 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान असते. भाताच्या वाढीच्या काळात हवामान दमट व उष्ण, तर पीक पक्वतेच्या वेळी ते थंड व कोरडे असते. घनसाळ तांदूळ हा पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. याची वाढ, विकास आणि सुवास यासाठी असे हवामान उत्तम असते. घनसाळीचा सुवास विकसित होण्यासाठी सरासरी तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस, आर्द्रता 65 टक्क्यांपेक्षा जास्त व तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली न जाणे आवश्यक असते. पर्जन्यमान - येथील पावसाची सरासरी 1,900 मि. मी. आहे.

उच्च प्रतीचा सुवास- आजरा घनसाळीचा भात हा चवीसाठी व सुवासासाठी प्रसिद्ध आहे. उच्च प्रतीचा सुवास हे घनसाळीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे व तो मद्यार्क, अल्डिहाइट्स, इस्टर्स इत्यादी अनेक घटकांच्या मिश्रणातून तयार होतो.  घनसाळीच्या सुवासास 2-असेटिल-1-पायरोलिन (2 एपी) हे रसायन महत्त्वाची भूमिका बजावते. महाराष्ट्रातील घनसाळीमध्ये 2 एपी हा घटक काही बासमती जातींपेक्षाही जास्त असतो.  मुलायम व सुटसुटीत मोकळा भात- घनसाळीचा भात मुलायम, सुटसुटीत व पिठाळमुक्त असतो. भातामध्ये पिठाळपणाचे प्रमाण 20%पेक्षा जास्त असेल, तर स्वादिष्टता कमी होते. पोषक अशा थंड व कोरड्या हवामानामुळे घनसाळीमधला पिठाळपणा संपूर्णपणे नष्ट होतो. भाताच्या इतर वाणांपेक्षा हा भात कमी चिकट असतो. हा भात शिजल्यानंतर भाताच्या इतर वाणांपेक्षा जवळपास दुपटीने फुलतो.

नवापूर तूर (नवापूर, जि. नागपूर)

जमीन- नवापूर परिसरातील जमीन काळी कसदार असल्याने तुरीची वाढ उत्तमप्रकारे होते. येथील जमिनीला उतार असल्याने पाण्याचा निचरा लवकर होतो. नवापूर तालुक्याचे वातावरण थंड असल्याने सेंद्रिय कर्बाचा नाश होत नाही. त्यामुळे जमिनीत नत्राचे प्रमाण वाढते व पिकास जास्त प्रमाणात अमीनो अ‍ॅसिड्स घेता येतात. अमीनो अ‍ॅसिड्स हे प्रथिनाचेच रूप आहे व या कारणामुळे नवापूर तूरडाळीला वेगळी चव प्राप्त होते. हवामान - येथील सरासरी तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस असते. डोंगराळ प्रदेशामुळे व जास्त पर्जन्यमानामुळे या भागात थंडपणा राहण्यास मदत होते. अनुकूल हवामानामुळे नवापूर तुरीची प्रत चांगली राहते.  पर्जन्यमान - नवापूर तालुका सातपुड्याच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे व तेथे 1200-1300 मि. मी. पाऊस पडतो.

नवापूर तालुका तुरीचे वेगळेपण असणार्‍या ‘देशी तुरी’साठी प्रसिद्ध आहे. नवापूर हा आदिवासबहुल, डोंगराळ प्रदेश आहे. रोजच्या जेवणात याच तुरीचा वापर होतो. कमी कालावधीत येणारी ही तूर कोरडवाहू क्षेत्रात घेतली जाते. नवापूर तुरीचा दाणा पांढर्‍या रंगाचा असतो. पांढर्‍या दाण्याच्या तुरीमध्ये पॉलिफेनॉल्स, फामलेक्टिन्स यांसारख्या अपोषक घटकांचे प्रमाण लाल रंगाच्या तुरीपेक्षा कमी असते. महाराष्ट्रामध्ये असणार्‍या इतर वाणांपेक्षा नवापूर तुरीच्या बियाणाचा आकार लहान असतो. हा वाण 90 ते 95 दिवसांत तयार होतो. ही तुरीची डाळ तुलनेने लवकर शिजते. पारंपरिक पद्धतीने डाळ तयार केली जात असल्याने डाळीच्या सुवासात व चवीत भर पडते.

मंगळवेढा ज्वारी (मंगळवेढा  जि. सोलापूर)

जमीन - मंगळवेढा तालुक्यातील जमीन काळीभोर असून तिची खोली 40 ते 50 फूट आहे. या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे.  हवामान - सोलापूर जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे असते. या जिल्ह्यामध्ये जास्तीतजास्त तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअस व कमीतकमी तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असते.  पर्जन्यमान - येथील सरासरी पर्जन्यमान 519.8 मि. मी. आहे.

रब्बी हंगामात घेतली जाणारी ही ज्वारी कमी तापमानाला प्रतिकारक्षम आहे. दाणा टपोरा; आवरण पातळ; दाण्याची, चार्‍याची प्रत उत्तम; व इतर जातींपेक्षा साखरेचे प्रमाण जास्त असते. या या ज्वारीची भाकरी चविष्ट असते व तिच्यात ग्लुटीनचे प्रमाण जास्त असल्यामुळे भाकरी मऊ होते. खोडमाशी व मावा यांसारख्या किडीवर, तसेच खडखड्या व तांबेरा यांसारख्या रोगांवर मात करण्याचा उपजत गुण या ज्वारीमध्ये आहे. त्यामुळे या ज्वारीवर कीटकनाशकांची व बुरशीनाशकांची फवारणी करण्याची गरज पडत नाही.

वाघ्या घेवडा  (कोरेगाव जि. सातारा)

 जमीन - कोरेगाव व खटाव तालुक्यांतील जमीन मध्यम काळी, चांगला निचरा करू शकणारी, वाळूमिश्रित आहे. तिचा पीएच 6.5 ते 8 यांदरम्यान आहे. या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बचे व सेंद्रिय पदार्थांचे प्रमाणही चांगले आहे. यामुळे नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया होऊन सुपीकतेत व उत्पादकतेत वाढ होते. अशी जमीन वाघ्या घेवड्यासाठी उत्तम असते. कोरेगावचे हवामान कोरडे व थंड आहे. खरिपामध्ये ते उष्ण व कोरडे असते.  पर्जन्यमान - कोरेगाव व खटाव तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येत असल्याने येथे अत्यल्प पाऊस पडतो. कोरेगाव तालुक्यात फक्त 600 ते 650 मि. मी. पाऊस पडतो.

इतर राजमा जातींपेक्षा वाघ्या घेवड्याची चव जास्त गोड असते. वाघ्या घेवडा हा अवर्षणास प्रतिकारक आहे. प्रथिनांचे व कर्बोदकांचे प्रमाण जास्त आहे.  वाघ्या घेवड्याचा रंग फिक्कट गुलाबी असून त्यावर लाल रंगाच्या रेषा असतात. 78 ते 80 दिवसांत हे पीक तयार होते व एका शेंगेत 12 ते 14 दाणे असतात.

जालन्याची मोसंबी (जि. जालना)

जमीन - जालना जिल्ह्याचा काही भूभाग हा टेकड्यांनी व्यापला आहे; तर दक्षिणेकडील भूभाग हा सखल पठारी आहे, जो गोदावरी नदीच्या खोर्‍यात येतो. या खोर्‍यातील जमीन भारी, काळीभोर आणि सुपीक आहे; जी मोसंबीसारख्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हवामान - मोसंबीसाठी उष्ण व कोरडे हवामान (सरासरी 120 अंश सेल्सिअस ते 350 अंश सेल्सिअस तापमान) अनुकूल असते. जालना जिल्ह्यातील तापमान हिवाळ्यात 200 अंश सेल्सिअस आणि उन्हाळ्यात 400 अंश सेल्सिअसपर्यंत असते. त्यामुळे येथील वातावरण हे मोसंबीला खूप उपयुक्त ठरते.

जालना जिल्ह्यात ‘न्यूसेलर’ जातीच्या मोसंबीचे उत्पादन सर्वाधिक आहे. या जातीच्या मोसंबीमध्ये सर्वांत जास्त एकूण विद्राव्य घटकांमध्ये (टीएसएसमध्ये) 80 टक्के साखर, 10 टक्के आम्ल व 10 टक्के नत्रयुक्त संयुगे असे घटक सापडतात.  फळामध्ये नत्राचे प्रमाण जास्त असेल; तर रसाचे प्रमाण, टीएसएस व आम्लाचे प्रमाण वाढते. याचबरोबर सालीची जाडीही वाढते व काढणीच्या वेळी फळाचा रंग हिरवा राहतो. ही सर्व वैशिष्ट्ये येथील मोसंबीमध्ये सापडतात.

जालन्याची मोसंबी (जि. जालना)

पर्जन्यमान - मोसंबी हे कमी पाण्यावर येणारे पीक आहे. येथे पडणारा केवळ 600 ते 700 मि. मी. पाऊस मोसंबीसाठी पुरेसा ठरतो.

जाड साल हे या मोसंबीचे वैशिष्ट्य आहे. घट्ट व जाड सालीमुळे फळातील गराचे संरक्षण होते.  मोसंबीच्या इतर जातींपेक्षा जालना जिल्ह्यातील मोसंबीचा पसारा जास्त असतो.

वेंगुर्ला काजू (वेंगुर्ला  जि. सिंधुदुर्ग)

जमीन - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश जमिनी या जांभ्या खडकापासून बनलेल्या आहेत व त्यामध्ये लोहाचे व अ‍ॅल्युमिनिअमचे प्रमाण जास्त असते. जांभ्या दगडापासून बनलेल्या जमिनीमध्ये मातीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तिची पाणी धरून ठेवण्याची व कॅटायन एक्स्चेंजची क्षमता वाळूयुक्त जमिनीपेक्षा जास्त असते. काजूसाठी खोल, चांगल्या निचर्‍याची जमीन लागते व तशा जमिनी वेंगुर्ल्यामध्ये आहेत. किनारपट्टीच्या या भागातले आर्द्र व उष्ण वातावरण काजूसाठी पोषक ठरते. जांभ्या मातीमुळे काजूला उत्तम चव प्राप्त होते. हवामान - या भागात असलेले आर्द्र व उष्ण हवामान काजूला पोषक असते. पर्जन्यमान - सिंधुदुर्गमध्ये जवळपास 3500 मि. मी. पाऊस होतो. काजूसाठी कमीतकमी 600 व त्यापेक्षा जास्त पाऊस लागतो. वेंगुर्ल्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर असे चार महिने पाऊस पडतो.

रसाचे व जीवनसत्त्वांचेे प्रमाण - या काजूमध्ये रसाचे प्रमाण अधिक असते. ‘व्ही 5’ व ‘व्ही 7’ या जातीच्या काजूमध्ये रसाचे प्रमाण 86 टक्के असते व ते भारतातील इतर जातींपेक्षा जवळपास 12 टक्के जास्त आहे. काजू बोंडामध्ये ‘क’ जीवनसत्त्वाचेे प्रमाण जास्त असते.  जाड कवच - वेंगुर्ल्याच्या ‘व्ही-2’ ह्या जातीचे कवच जास्त जाडीचे असल्याने काजूबियांचे चांगले सरंक्षण होते व त्यांचे नैसर्गिक व इतर आघातांमुळे नुकसान होत नाही. त्यामुळे काजूबियांची साठवणक्षमता वाढते. या जातीच्या एका झाडापासून सरासरी 24 किलो उत्पादन मिळते व ते भारतातील इतर जातींपेक्षा सर्वांत जास्त आहे. कमी सुरकुत्या- नंदूरबार काजूपेक्षा वेंगुर्ला काजूवर अत्यंत कमी सुरकुत्या असतात किंवा नसतात, पण यामुळे काजूबिया आकर्षक दिसतात व त्यामुळे त्यांना जगभरातून मागणी येते.

लासलगावचा लाल कांदा (लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक)

जमीन - लासलगावमधील काळ्या जमिनीत अ‍ॅल्युमिनिअम, कॅल्शिअम कार्बोनेट, मॅग्नेशिअम ह्यांचे प्रमाण जास्त आणि नत्राचे व स्फुरदाचे प्रमाण कमी असून या जमिनी मध्यम-अल्कली आहेत. त्यामुळे येथे कांद्याचे जास्त उत्पादन मिळते. येथील जमिनीचा सामू 6-8 (अल्काइन) इतका आहे. या जमिनीत गंधक जास्त असल्याने कांद्यामध्ये अधिक तिखटपणा येतो. त्याचा तीव्र वास येतो. हवामान - लासलगावचे हवामान, जमिनीच्या प्रकारामुळे येथील कांदा चांगल्या प्रतीचा असतो. लासलगावच्या आजूबाजूच्या क्षेत्रात हा कांदा अनेक वर्षांपासून घेतला जातो.

लासलगावच्या कांद्याच्या जातीस निफाड रेड, नाशिक रेड, लासलगाव लाइट रेड असेही म्हटले जाते.  गर्द लाल रंग, तिखट चव, टिकाऊपणा व मोठा आकार यांमुळे येथील कांदा प्रसिद्ध असून मार्केटमध्ये त्याला इतर कांद्यांच्या तुलनेत अधिक मागणी असते. हा कांदा रब्बीमध्ये लावला जातो. या कांद्याच्या बाहेरच्या बाजूने 16 ते 17 वाळलेले पापुद्रे असल्याने आतील कांदयाला चांगले संरक्षण मिळते. या कांद्यामध्ये निर्जल पदार्थाचे प्रमाण जास्त असल्याने इतर वाणांपेक्षा तो जास्त दिवस (आठनऊ महिने) साठवता येतो.

पुरंदर अंजीर (जि. पुणे)

जमीन व हवामान - कोरडे हवामान, डोंगर उताराच्या जमिनी, चांगला निचरा या आवश्यक असलेल्या बाबींमुळे पुरंदर तालुक्यातील अंजिराचे वेगळेपण आहे. फळाचा विकास व पक्वतेच्या वेळी कोरडे हवामान मिळत असल्याने या विभागात उच्च प्रतीच्या अंजिराचे उत्पादन मिळते. पुरंदर तालुक्याला शुष्क किंवा अर्धशुष्क वातावरण, उन्हाळ्यातील जास्त तापमान, भरपूर सूर्यप्रकाश व मध्यम पाणी उपलब्धता ह्यांचे देणे लाभलेले आहे. या तालुक्याचे जास्तीतजास्त तापमान 39.05 अंश सेल्सिअस, तर कमीतकमी तापमान 10.50 अंश सेल्सिअस आहे. अंजिराचे झाड 45 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तग धरू शकत असले, तरी 39 अंश सेल्सिअसनंतर फळाची प्रत कमी होते. पर्जन्यमान - अंजिरासाठी 600 ते 800 मि.मी.पर्यंत पाऊस लागतो. या भागाचे सरासरी पर्जन्यमान 814 मि.मी. आहे. पुरंदर तालुक्यातील अंजिराचा आकार, सालीचा रंग यांच्याबरोबरच गराची प्रत चांगली असण्याला पुरंदर तालुक्यातील हवामान कारणीभूत आहे. या प्रदेशातील डोंगराळ भागातील अंजिराचा आकार मोठा, तर सपाट प्रदेशातील अंजिराचा आकार तुलनेने लहान आहे.

घंटाकृती आकार व आकर्षक जांभळा रंग यांमुळे पुरदंर अंजिराचे वेगळेपण उठून दिसते. आकर्षक जांभळा रंग ग्राहकाचे लक्ष आकर्षित करण्यास, खाण्याचा मोह होण्यास मदतीचा ठरतो. फळामध्ये कमी आम्लता (0.20 - 0.22), एकूण विद्राव्य घटकाचे टीएसएसचे जास्त प्रमाण (15-18 डिग्री ब्रिक्स) यांमुळे पुरदंर अंजिराचा स्वाद जिभेवर रेंगाळतो. पुरंदर अंजिराचे उत्पादनही चांगले येते. या भागात प्रति झाड 60 ते 70 किलो (1150-1200 फळे) इतके उत्पादन येते व फळे जास्त दिवस टिकतात. पुरंदर अंजिराचा आकार इतर वाणांपेक्षा मोठा आहे. पुरंदर अंजिराचे वजन 60 ते 70 ग्रॅम भरत असल्याने गराचे प्रमाणपण वाढते. गराचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रक्रिया उद्योगात अंजिराचा जास्त वापर होतो. गराचे प्रमाण जास्त (80%पेक्षा जास्त गर), गराचा रंग गुलाबी लाल असून तो अत्यंत सकस आहे.

बालानगर सीताफळ (जि. बीड)

जमीन - पालाशचे व सूक्ष्म मूलद्रव्याचे मोठे प्रमाण; कमी खोलीच्या, पण निचर्‍याच्या व उताराच्या जमिनी बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगरक्षेत्रामध्ये असल्याने तेथील सीताफळाला वेगळी व अद्वितीय चव प्राप्त होते.  हवामान - अंबेजोगाई, धारूर तालुक्यांतील उष्ण व शुष्क तापमान, कमी पाऊस यांमुळे सीताफळाचे या तालुक्यात चांगले उत्पादन मिळते.

या जिल्ह्यातील बालानगर ही जात नैसर्गिकरीत्या उगवते. बीडमधील बालानगर जातीच्या सीताफळांमध्ये एकूण शर्करेचे प्रमाण 20.12% इतके जास्त असल्याने त्याची गोडी इतर जातींपेक्षा जास्त असते. एकदम गोल आकार, आकर्षक व चमकदार अशी फळाची बाहेरील बाजू, आल्हाददायक सुंगध व चांगल्या पोताचा गर, पिवळसर किंवा पांढर्‍या रंगाचा दोन डोळ्यांमधील खोलगट भाग  ही बीडमधील सीताफळाची महत्त्वाची ओळख आहे. बीडचे सीताफळ वजनदार असून त्यात गराचे प्रमाण जास्त असते. गरामध्ये रसाचे प्रमाण जास्त, गर पिवळसर पांढरा व मांसल, बियांचे प्रमाण कमी ही या सीताफळाची वैशिष्ट्ये आहेत.

नाशिकमधील द्राक्षे (जि. नाशिक)

जमीन - द्राक्षांसाठी जमिनीत असावे लागणारे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, सल्फर, आयर्न, मँगनीज, झिंक असे सर्व घटक पुरेशा प्रमाणात नाशिकमधील जमिनीत आढळतात. येथील मातीतील सामू 6.5 ते 7.5 इतका आहे. हवामान - ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत सर्वत्र तापमान वाढण्यास सुरुवात होते, मात्र नाशिकमध्ये तापमान इतर भागापेक्षा 5 अंश सेल्सिअसने कमी राहते. याच काळात द्राक्षांच्या वेलींवर फळधारणेस सुरुवात होत असते.  साहजिकच नाशिकमधील नोव्हेंबर महिन्यात असणारे कमी तापमान द्राक्षांना मानवते आणि फळांना आवश्यक असे अ‍ॅसिडचे अधिक प्रमाण आणि आर्द्रतेचे कमी प्रमाण यांमुळे वाइनसाठी अत्यंत उपयोगी अशी द्राक्षे तयार होतात. साधारण इतर क्षेत्रांत तापमानाचे प्रमाण 30 अंश ते 40 अंश इतके असते, मात्र नाशिकचे हे प्रमाण 20 अंश इतके आहे. परिणामस्वरूप उच्च प्रतीची द्राक्षे उत्पादित होतात.

नाशिकमधील द्राक्षांचे घड आकर्षक व शंकूच्या  आकाराचे असतात. द्राक्षाचा घड मोकळा दिसत असला, तरी तो पूर्णपणे भरलेला असतो.  फळे मोठी आणि लांबट आकाराची असतात. घडाची त्वचा मऊ, फळे कुरकुरीत, आकर्षक व रसदार आणि कमी बियाणे असलेली असतात. घडाचे वजन 350 ते 500 ग्रॅम असते.  नाशिकमधील द्राक्षे स्वच्छ, घडामध्ये बाहेरील घटकाचा अभाव, किडीपासून व रोगापासून मुक्त, कोरडे, बाहेरच्या घटकांच्या वासापासून मुक्त, फळाचे वजन 3.5 ते 4 ग्रॅम व परीघ 18 मि.मी. असतो. रसायनमुुक्त, 18 डिग्री ब्रीक्स टीएसएस, साखर/आम्ल गुणोत्तर 20:1 असल्यामुळे ती मोठ्या प्रमाणात निर्यात होतात.

वायगाव हळद (ता. समुद्रपूर  जि. वर्धा)

जमीन - वायगावमधील काळ्या, कसदार, पाणी धरून ठेवणार्‍या, अल्कलीयुक्त, आठपेक्षा जास्त सामू, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनी हळदलागवडीसाठी उत्तम आहेत. जमिनी जरी अल्कली असल्या, तरी जास्त पावसाने क्षार धुऊन जातात व जमिनी क्षारमुक्त (न्युट्रल) बनतात. या जमिनीत नत्राचे, स्फुरदाचे व पालाशचे प्रमाण अनुक्रमे मध्यम, कमी व जास्त आहे. पर्जन्यमान - या भागात 985 ते 1100 मि.मी. पाऊस पडतो. पावसाच्या पाण्यावरच हळदीची बहुतांश वाढ होते. हमखास पाऊस पडणारा हा भाग आहे.

या हळदवाणामध्ये ‘कुरकुमीन’चे प्रमाण सर्वाधिक असल्याने हळदीला भडक पिवळा रंग असतो, तसेच तिचा स्वादही वेगळेपण जपणारा असतो. वायगाव हळद ही 180 दिवसांत म्हणजे इतर हळदीवाणांच्या तुलनेत लवकर काढणीस येते. सेंद्रिय पद्धतीने लागवड केली जाणारी वायगाव हळद अन्न प्रक्रिया उद्योग आणि औषधी उत्पादन ह्या व्यवसायांसाठी खूप महत्त्वाची आहे. इतर हळदीवाणांच्या तुलनेत ती अधिक काळ टिकते.

भरताचे वांगे (जळगाव)

जमीन - जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, यावल, जळगाव (जळगाव तालुक्यातील आसोदा, ममुराबाद, भादली व भालोद ही गावे) हे तालुके भरताच्या वांग्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. विशेषतः बामनोद (ता. यावल) हे गाव मोठ्या आकाराच्या भरीत वांग्यासाठी प्रसिद्ध आहे. तापी नदीच्या खोर्‍यात या वांग्याची लागवड होते.

भरताच्या वांग्याचे शहर म्हणून जळगावची ओळख निर्माण झाली आहे. येथील फिक्कट हिरव्या रंगाचे वांगे भरतासाठी प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी भरताच्या वांग्याची गावरान जात पाच शतकांहून अधिक काळापासून जपून ठेवली आहे.

भरताचे वांगे (जि. जळगाव)

भरताच्या वांगेलागवडीसाठी लागणार्‍या काळ्या, कसदार, चांगल्या निचर्‍याच्या जमिनी जळगाव जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत.  हवामान - जळगाव जिल्ह्यात भरताच्या वांग्याची लागवड नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत (हिवाळ्यात) केली जाते. या कालावधीत भरताच्या वांग्यासाठी लागणारे उत्तम हवामान मिळते.  जळगाव जिल्ह्यातील हवामान, जमीन व पर्जन्यमान या गोष्टी वांग्याच्या लागवडीस योग्य आहेत.

जळगावच्या वांग्यामध्ये बियांचे प्रमाण कमी असते. या वांग्याचा आकार पारंपरिक वांग्यापेक्षा चारपट मोठा असतो. जळगावमधील वांग्याचा आकार अंडाकृती असतो, तर रंग लांब, पिवळसर हिरवा असून त्यावर पांढर्‍या रेषा असतात.. ‘वांग्याचे भरीत’ थाली ही खान्देशामध्ये विशेषत: लेवा पाटील समाजामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. भाजलेल्या वांग्यतून जास्त प्रमाणात तेल बाहेर पडत असल्याने या वांग्याच्या भरताला वेगळी चव प्राप्त होते. भाजल्यावर त्याला प्राप्त होणारा सोनेरी-तांबडा रंग व त्यावर टाकलेला मसाला अशी ‘खान्देशी भरीत डिश’ प्रसिद्ध आहे.

नागपूर संत्रा (जि. नागपूर)

जमीन - नागपूर जिल्ह्यात प्रामुख्याने काळी, मोराड, खरडी-बरडी अशा प्रकारची जमीन आढळते. साधारणपणे संत्र्यासाठी मध्यम काळी आणि खरडी-बरडी जमीन उपयुक्त असल्याने येथील काटोल, नरखेड, सावनेर तालुक्यांमध्ये संत्र्याचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून येते.  येथील जमिनीची आर्द्रता ही 7.6 असते.  बंगालचा उपसागर आणि अरेबिअन समुद्रापासून दूर असलेल्या भारतीय द्विपकल्पाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर शहराचे हवामान आर्द्र आणि कोरडे आहे.  या शहरात वर्षातील बहुतांश काळ कोरडेच हवामान असते. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात नागपुरात 1,205 मि.मी. इतका पाऊस पडत असतो.

आकर्षक रंग, आल्हाददायक सुगंध व चांगली चव यांमुळे नागपूर संत्रा जगातील सर्वोत्तम संत्र्यांपैकी एक समजला जातो. नागपूर संत्र्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. याचबरोबर या संत्र्यामध्ये कार्बोहायड्रेट्स (साखर व तंतू), पोटॅशिअम, फोलेट, कॅल्शिअम, थायमीन, नामसीन, जीवनसत्त्व बी-6, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, कॉपर, रिबोल्फेविन, पॅन्टोथेनिक अ‍ॅसिड इत्यादी घटकसुद्धा असतात. वजन कमी करण्यासाठी आहारात संत्र्याचा उपयोग करतात.

$कोल्हापूरचा गूळ (जि. कोल्हापूर)

जमीन - डोंगरातून उगम पावणार्‍या व बारमाही वाहणार्‍या नद्यांचे पाणी येथे मुबलक  प्रमाणात असते. खनिजयुक्त जमिनींमुळे कोल्हापूरचा गूळ आरोग्यदायी व उच्च प्रतीचा असतो. सह्याद्री पर्वतातून येणार्‍या नदीच्या पाण्याला गोडवा असल्यामुळे कोल्हापूरमधील उसाचा गोडवा वाढतो व या गोडव्यात वेगळेपणाही आहे. हवामान - आर्द्र हवामानामुळे व मध्यम तापमानामुळे कोल्हापूरमधील उसाची वाढ जलद होते. नदीतील क्षारमुक्त पाण्यामुळे कोल्हापुरी गुळाला चांगल्या चवीबरोबरच चांगला रंगही प्राप्त होतो व त्याची साठवण क्षमताही वाढते.

कोल्हापूरच्या गुळाला देशांतर्गत, तसेच देशाबाहेर मोठी मागणी आहे. इतर गुळाच्या तुलनेत या गुळामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक आहे.कोल्हापूरमधील गुळाचा रंग पांढरा व सोनेरी असून त्यात आरोग्याच्या दृष्टीकोनातून उपयोगी रसायनांचा समावेश असतो.कोल्हापुरी गुळामध्ये ग्लुकोज, खनिजे, कॅल्शिअम, जीवनसत्त्व, लोह, फॉस्फरस, प्रोटिन्स, कॉपर इत्यादी जीवनावश्यक घटक असतात.

सांगलीचा बेदाणा (जि. सांगली)

या जिल्ह्यातील स्फुरदाचे व पालाशचे प्रमाण जास्त असणार्‍या काळ्या कसदार जमिनी, तुलनेने कमी तापमान, उन्हाळ्यामध्ये व हिवाळ्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश, व अनुकूल असे थंड व कोरडे हवामान यांमुळे फळात साखरेचे प्रमाण वाढते; तसेच सौम्य हिवाळा, दिवसाचे तापमान जास्त आणि रात्रीचे तापमान कमी यांमुळे साखरेचे विघटन खूप कमी होते, परिणामी, मनुक्यावर कमी सुरकुत्या येतात. सांगली जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे असल्यामुळे येथील मनुक्याची प्रत सुधारण्यास मदत होते.

सांगली जिल्ह्यातील बेदाण्याच्या जातीस एक समान व गोल आकार आहे. या जातीच्या द्राक्षाची लागवड फक्त मनुके तयार करण्यासाठीच केली जाते. नाशिक, सोलापूर व कर्नाटक येथील बेदाण्यास असा आकार येत नाही. उत्कृष्ट सुवास आणि चव यांसाठी हे बेदाणे प्रसिद्ध आहेत.या बेदाण्याचा पोत मऊसर असून इतर मनुक्यांपेक्षा या मनुक्याच्या सालीवर कमी सुरकुत्या असतात.

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी (जि. सातारा)

जमीन - महाबळेश्वरमधील तांबड्या जमिनीत लोहाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे पोषणमूल्य वाढते.हवामान - महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीला लाल रंग येण्यामागचे कारण म्हणजे येथे मिळणारी आवश्यक उष्णता व उपलब्ध सूर्यप्रकाश हे आहे. आवश्यक उष्णता व सूर्यप्रकाश नसेल, तर स्ट्रॉबेरीला लालसर तपकिरी रंग प्राप्त होतो. येथील लाल माती आणि पाच नद्यांचे उगमस्थान यांमुळे स्ट्राबेरी उत्पादन घेण्यासाठी महाबळेश्वर हे एक परिपूर्ण वातावरण असलेले ठिकाण बनले आहे.

महाबळेश्वरामधील स्ट्रॉबेरीमध्ये पाण्याचे प्रमाण 80 टक्के असल्यामुळे इतर जातींपेक्षा ही जात जास्त रसदार आहे. इतर जातींमध्ये बियांची संख्या दीडशेच्या जवळपास असते, तर महाबळेश्वरच्या स्टॉबेरीमध्ये जवळपास 200 बिया असतात. महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीमध्ये ग्लुकोजचे प्रमाण 10 टक्के आढळते व ती इतर जातींपेक्षा अधिक गोड आहे. या स्ट्रॉबेरीमध्ये 0.25 - 0.7% प्रोटिन्स, 8.5 - 9.2% कार्बोहायड्रेट्स व 0.1 % तंतू असतात. या स्ट्राबेरीमध्ये चरबीचे प्रमाण कमीतकमी, तर ‘क’ जीवनसत्त्व, तंतू, पोटॅशिअम व फॉलिक अ‍ॅसिड यांचे प्रमाण जास्त असते.

नाशिक व्हॅली वाइन (दिंडोरी, जि. नाशिक)

जमीन - येथील भूभाग समुद्रसपाटीपासून 2000 ते 2400 फुटांहून अधिक उंचीवर आहे आणि 20.10 ते 20.33 उत्तर अक्षांश व 73.38 ते 73.55 पूर्व रेखांश या पट्ट्यात वसलेला आहे. त्यामुळे आम्लता आणि गोडवा यांचा अप्रतिम मिलाफ असलेल्या स्वादाची द्राक्षे उत्पादित होण्यास येथील हवामान आणि वातावरण कारणीभूत ठरते. इथल्या तांबड्या मातीमुळे वाइनसाठी चांगल्या प्रतीची द्राक्षे उपलब्ध होऊ शकतात.द्राक्षमळ्यातून चांगल्या द्राक्षांचे भरपूर उत्पादन, फळे ताजीतवानी राहण्यासाठी लागणारी शीतकरणाची व्यवस्था, वाइनसाठी द्राक्षावर चांगली प्रक्रिया करणार्‍या कारखान्यांची (50 कि. मी.पेक्षाही कमी अंतरावर असलेली) उपलब्धता हे येथील वैशिष्ट्य आहे.

दिंडोरी वाइन कॅबरनेट, सुवीग्नॉन, सीराज, सुवीग्नॉन ब्लँक व रेजलिंग या जातींपासून तयार केली जाते. व्हाइट वाइन व रेड वाइन असे तिचे दोन प्रकार आहेत.  या वाइनला एका विशिष्ट चवीबरोबरच विशिष्ट रंगही प्राप्त होतो, तो तेथील भौगोलिक स्थानामुळे. दिंडोरी वाइन ही उत्साह वाढण्यासाठी, सुंगधासाठी व स्वादासाठी प्रसिद्ध आहे.

आंबेमोहोर भात (ता. मुळशी जि. पुणे)

जमीन - मुळशी तालुक्यातील जमिनी आम्लधर्मी आहेत. येथील जमिनीचा सामू 5.5 ते 6.7 आहे या जमिनीत लोहाचे व अ‍ॅल्युमिनिअमचे प्रमाण जास्त असते, तर कॅल्शिअमचा अभाव असतो. येथील तापमान 17 ते 29 अंश सेल्सिअस आहे. पर्जन्यमान - येथे सरासरी 1866 मि.मी. इतका पाऊस पडतो.

या तांदळाचा आकार लहान व गोलाकार असतो. हा तांदूळ शिजवल्यानंतर फुगतो व त्याला आंब्याच्या मोहोरासारखा सुगंध येतो. 2-अ‍ॅसेटिल-1-पायरोलिन (एसीपीवाय) या रसायनामुळे हा विशिष्ट सुवास प्राप्त होतो. अ‍ॅस्परजिलस अवोरी या जमिनीतील बुरशीमुळे हा सुवास प्राप्त होतो. शिजल्यानंतर तांदूळ फुगतो व त्याचा भात चिकट होतो.

सोलापूरचे डांळिब (जि. सोलापूर)

जमीन - सांगोला जिल्ह्यातील जमीन उथळ (22.5 से.मी.पेक्षा कमी खोली) असल्याने तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. पाणी उपलब्धतेचा काळ 100 दिवसांपेक्षा कमी आहे. हे घटक डाळिंब लागवडीस पोषक ठरतात व उत्पादनही चांगले येते.  हवामान - उष्ण व शुष्क हवामान; जास्त तापमानाचा मोठा कालावधी; कमी आर्द्रता; अणि कमी खोलीची, परंतु चांगल्या निचर्‍याची जमीन यांमुळे सोलापूरमधील डाळिबांचे उत्पादन उच्च प्रतीचे आणि विक्रमी असते. विशेषतः सांगोला तालुका हा डाळिंब-उत्पादनाचे केंद्र बनत आहे.भरपूर सूर्यप्रकाशामुळे डाळिंबावर चकाकी येते. सोलापूर जिल्ह्याला स्वच्छ व मुबलक सूर्यप्रकाश आणि कमी आर्द्रता यांचे वरदान मिळाल्यामुळे डाळिंबाची वाढ उत्तम होते.

आकर्षक रंग, फळावरचे मऊ आवरण आणि चमक यांमुळे गेल्या चार दशकांपासून सोलापूरच्या डाळिंबाला देशातच नव्हे, तर परदेशातही मागणी आहे. सोलापूरच्या डाळिंबाचे दाणे अधिक रसदार, मोठ्या आकाराचे; तर बिया मऊ व लहान आकाराच्या असतात.  दाण्यांचे प्रमाणही इतर वाणांपेक्षा जास्त असते. सोलापूर डाळिंबाचा आकार इतर ठिकाणच्या डांळिबांपेक्षा मोठा आहे. सोलापूर डाळिंबाच्या अवीट गोडीला मोठ्या कालावधीचे अधिकचे तापमान व कमी आर्द्रता, जमिनीतील पालाशचे अधिक प्रमाण, कमी खोल व चांगल्या निचर्‍याच्या जमिनी हे घटक कारणीभूत आहेत.

भिवापूरची मिरची (ता. भिवापूर  जि. नागपूर)

जमीन - भिवापूर तालुक्यातील जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असून तेथील जमीन सूक्ष्म मूलद्रव्यांनी समृद्ध आहे. इथल्या मातीमध्ये लोह, मंगल व तांबे यांची उपलब्धता जास्त असल्याने मिरचीला अधिक लाल रंग प्राप्त होतो. हवामान - मिरचीसाठी उष्ण व आर्द्र वातावरणाची व स्वच्छ सूर्यप्रकाशाची गरज असते व भिवापूर तालुक्यात असेच वातावरण आहे. पर्जन्यमान - या भागात 1250 ते 1350 मि.मी. पाऊस पडत असल्यामुळे खरीप हंगामातील मिरचीला मुबलक पाणी मिळते.

मिरचीमध्ये कॅप्सेसिनॉइड्स हे रसायन जितक्या अधिक प्रमाणात, तितका मिरचीतील तिखटपणा अधिक असतो. हे रसायन मिरचीच्या इतर वाणांपेक्षा भिवापूर मिरचीत अधिक असल्याने त्या अधिक तिखट असतात. रंगाच्या आणि तिखटपणाच्या बाबतीत गुंटुर, ब्याडगी या मिरचीच्या वाणांपेक्षा भिवापूर मिरची सरस ठरते. भिवापूर मिरची पावडरला  (मिरचीपुडीला) किडींचा प्रादुर्भाव होत नसल्याने ती एक वषार्ंपर्यंत साठवता येते.

डहाणू-घोलवड चिकू (डहाणू, जि. ठाणे)

जमीन - डहाणू-घोलवड भागातील जमीन काळी, मातकट प्रकारची (चिकणमाती) असल्याने तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त व निचर्‍याचे प्रमाण कमी आहे. या जमिनीत कॅल्शिअमचे प्रमाण जास्त आहे.हवामान व पर्जन्यमान - किनारपट्टीचे उष्ण व आर्द्र हवामान, जून ते सप्टेंबर कालावधीतला भरपूर पाऊस, कॅल्शिअमचे जास्त प्रमाण असलेल्या काळ्या जमिनी यांमुळे या भागात चिकूची लागवड मोठ्या प्रमाणात होते व त्याचे उत्पादन चांगले येते. जमिनीतील कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असल्यामुळे घोलवड-चिकूचा गोडवा वाढलेला आहे. घोलवड परिसरातील भरपूर सूर्यप्रकाशामुळे व आर्द्र वातावरणामुळे चिकूचे उत्पादन वाढते.

डहाणू-घोलवड भागात ‘काली पत्ती’ या चिकूच्या जातीची लागवड गेल्या शतकापासून केली जाते. इतर जातींपेक्षा या जातीचा चिकू वजनदार असून जास्त गर असलेला आणि अधिक साठवण क्षमतेचा (टिकून राहण्याच्या अधिक क्षमतेचा) असतो. आकर्षक रंग (फिकट तपकिरी), गोल आकार, वजनदार आणि मऊ व कणदार गर, प्रत्येक फळात दोनतीन बिया यांमुळे इतर वाणांच्या तुलनेत हे चिकू सरस ठरतात. या वाणांच्या झाडाची उत्पादकता इतर वाणांच्या तुलनेत अधिक आहे.

जळगावची केळी (जळगाव)

जमीन - जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये केळीचे सर्वांत जास्त उत्पादन होते. या तालुक्यातील सुपीक जमीन व भूगर्भातील पाण्याची चांगली उपलब्धता या गोष्टी केळीलागवडीस पूरक ठरतात. तापी नदीवरील हातनूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या क्षेत्रावर केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मुबलक प्रमाणतील भूगर्भातील पाण्याची उपलब्धता, नत्राचे व पालाशचे जास्त प्रमाण असलेल्या व गाळाच्या सपाट जमिनी व मेहनती शेतकरी यांमुळे येथे केळीचे क्षेत्र वाढले आहे व परिणामी उत्पादकताही वाढलेली आहे. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात (45 हजार एकर क्षेत्रावर) केळीची सर्वाधिक लागवड होते. जळगाव जिल्ह्यातील रावेर, चोपडा, यावल व भुसावळ या तालुक्यांतले केळीसाठीचे आवश्यक उत्तम हवामान हे एक प्रमुख कारण आहे.

ही केळी विक्रीसाठी देशभर, तसेच परदेशातही पाठवली जातात. जळगावच्या केळीला महत्त्व प्राप्त झाले आहे ते जिल्ह्याच्या स्थानामुळे. भुसावळ रेल्वे स्टेशनमधून उत्तर भारताशी केळीचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. सघन लागवड पद्धतीमुळे येथे प्रतिएकरी जास्त झाडांची लागवड केली जाते, ज्यामुळे जमिनीतील ओलावा बाष्पीभवनाद्वारे उडून जाण्यापासून व बाहेरील उष्ण हवा बागेत येण्यापासून बचाव होतो. ठिबकमुळे केळीच्या मुळांना आवश्यक पाणी मिळते. रोगाचे प्रमाणही कमी राहते. टिश्यू कल्चर रोपांची लागवड हे आणखी एक वैशिष्ट्य.

मराठवाड्याचा केशर आंबा (जि. जालना)

आठ जिल्ह्यांमध्ये विभागलेल्या या प्रदेशाचा भूभाग डेक्कन ट्रॅप अर्थात बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाने बनलेला आहे. हा भूभाग बालाघाट, अंजिठा-सातमाळा, सह्याद्री अशी विविध डोंगर-पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. येथील काळी मृदा असलेली खोल जमीन केशर आंब्यासाठी पोषक आहे. मराठवाड्यातील हवामान उष्ण व कोरडे असून, हवेत आर्द्रता अत्यंत कमी असते. तसेच येथे काळी जमीन आहे. येथील हवामानात ही प्रचंड विविधता आढळते.

मराठवाड्यातील केशर आंब्यामध्ये एकूण विद्राव्य घटक 24 डिग्री ब्रिक्स आढळून येतात व आंब्याच्या भारतातील आंब्याच्या सर्व जातींत तो सर्वोच्च आहे. मराठवाड्यातील केशर आंब्याचा आकार इतर केशरसारख्या वाणापेक्षा मोठा आहे. केशर आंब्याच्या टीएसएसमध्ये साखर, आम्ल व नत्रयुक्त संयुगे यांचे प्रमाण अनुक्रमे 80%, 10% व 10% आढळून येते.

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate