অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

युरोपचा शेतकरी ठरवितो शेतमालाची किंमत

शेतमालाची किंमत ठरविण्याचे स्वातंत्र्य हा युरोप आणि आपल्या शेती व्यवस्थेतील मुख्य फरक आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, नेदरलॅंड या चारही देशांमध्ये शेतकरीच त्यांच्या शेतमालाची विक्री किंमत ठरवतात. सर्व शेतमाल पॅकिंगमध्येच विकला जातो. पॅकिंगवर मालाचे वजन, किंमत लिहिलेली असते.
काढणीपश्‍चात तंत्रज्ञानावर युरोपमधील शेतकऱ्यांनी भर दिला आहे. प्रतवारी, पॅकिंग आणि लेबलिंग ही युरोपमधील शेतकऱ्यांची दैनंदिन गोष्ट आहे. शेतमाल सुट्टा विकायचा नाही, हे तेथील शेतकऱ्यांच्या रक्तात भिनलेले आहे. सर्व शेतमाल प्लॅस्टिक पॅकिंग, पेपर पॅकिंग किंवा जैवविघटनशील प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग केलेला असतो. शेतमाल आहे त्याच किमतीला विकत घ्यायचा, सौदेबाजी करायची नाही, हे तेथील ग्राहकांच्याही रक्तात भिनलेले आहे. आपल्याकडे याउलट परिस्थिती आहे. बहुसंख्य शेतकरी काढणीपश्‍चात बाबींकडे दुर्लक्ष करतात. थेट विक्री पद्धतीतून ही परिस्थिती बदण्यास आपल्याला मोठा वाव आहे.

निरोगी हवामानाचा परिणाम


युरोपच्या 10 दिवसांच्या प्रवासात चारही देशांमध्ये आम्हाला कुठे एखादा किडा किंवा चिलटं दिसली नाहीत. सर्व अवस्थांमधील पिकांवरही कुठे किडीचा, रोगांचा प्रादुर्भाव दिसला नाही. वातावरणच एवढे स्वच्छ व निर्मळ आहे, की पिकांवर कुठल्याही प्रकारची रोगराई नसावी. फुलांवर आलेले बटाटे; पण एक पानही किडीने चाटलेले नव्हते. यामुळे त्यांच्याकडे कीटकनाशके, बुरशीनाशकांचा वापर नगण्य; तर तणनाशकांचा वापर जास्त असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आपल्याकडे उत्पादनखर्चाचा मोठा भाग फक्त कीड व रोग आटोक्‍यात ठेवण्यासाठी होतो. हा ताण येथील शेतकऱ्यांना नाही.

मुबलक पायाभूत सुविधा


शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा कशा प्रकारच्या हव्यात, याचा आदर्श वस्तुपाठ नेदरलॅंडने दाखविला आहे. या देशाचा निम्म्याहून अधिक भूभाग समुद्रात मातीचा भराव टाकून तयार केलेला आहे. या जमिनीवर त्यांनी हरितगृहे उभारली आहेत. यामध्ये भाजीपाला व फुलांचे उत्पादन घेतले जाते. फुलांच्या विक्रीसाठी अल्समीर येथे जगातील सर्वांत मोठा अत्याधुनिक फुलबाजार उभारला आहे. फुलांच्या विक्री व वितरणासाठीच्या सर्व प्रकारच्या सेवा या बाजारात अतिशय झटपट पुरवल्या जातात. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बाजारचे कामकाज पूर्ण होते. बाजारापासून अवघ्या दहा किलोमीटरवर फुलांच्या वाहतुकीसाठी विमानतळ आहे.

सुसज्ज रस्ते व वाहतूक व्यवस्था

1) शेतमालाची वाहतूक व रस्त्यांची व्यवस्था हा शेती व्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. युरोपमध्ये शेतकऱ्यांना रस्त्यांची अडचण नाही, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गावापासून बाजूला राहणारा शेतकरी असेल किंवा शेतात अगदी एखादेच घर असले तरी त्याच्या घरापर्यंत डांबरी रस्ता आहे. नेदरलॅंडमधील शहरे, गावांचा विकास विकास वाहतूक केंद्रस्थानी ठेवून केलेला आहे. नेदरलॅंडमधील ऍस्टरडॅम हे शहर याचा आदर्श नमुना म्हणावा लागेल.
2) समुद्रात मातीचा भराव टाकून ऍस्टरडॅम शहराचा बहुतेक भाग तयार करण्यात आला आहे. हे करताना शहरात तब्बल 1200 किलोमीटर लांबीचे कालवे करण्यात आले आहेत. पुणे-मुंबईत जसे छोट्या-मोठ्या रस्त्यांचे जाळे आहे, तसे या शहरात कालव्यांचे जाळे आहे. कालव्यांवर 600 हून अधिक पूल आहेत. त्यातही कालव्यातून मोठी बोट जात असेल तेव्हा त्यावरील पूल मध्यभागी दोन भाग होऊन वरच्या दिशेने उघडले जातात. बोट गेली की पुन्हा पूर्ववत होतात. सर्व कॅनॉलच्या कडा व नद्यांचे किनारे व्यवस्थित बांधलेले आहेत. या ठिकाणी चार व सहा पदरी रस्ते आहेत. त्यातही खास रस्तादुरुस्तीच्या कामासाठी मधल्या पट्ट्यात एकपदरी रस्ता ठेवण्यात आला असून, रस्तेदुरुस्तीची स्वतंत्र यंत्रणा आहे. शेतमालाची बहुतेक वाहतूक रस्त्यानेच होते.

पराकोटीची भिन्नता


1) युरोपियन शेतकऱ्यांची परिस्थिती आणि आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती यांत पराकोटीची भिन्नता आहे. त्यांच्या शेतकऱ्याला प्रत्येक गोष्ट त्याने मागितली तशी किंवा हवी तशी मिळते. आपली लढाई सात बारापासून सुरू होते. आयात, निर्यात, बाजारपेठ संरक्षण, अनुदाने, पायाभूत सुविधा या सर्वच आघाड्यांवर तेथील शेतकऱ्यांना शासनाचे सहकार्य मिळते.
2) बहुतांश युरोपीय शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्यावर कुठल्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. शेतीसाठी पाणी, हा विचारही त्यांना करावा लागत नाही; कारण संपूर्ण शेतीच निसर्गाधारित आहे. निसर्ग पूर्णपणे अनुकूल आहे.

ऊर्जानिर्मितीत संधी


1) युरोपमधील देशांनी सौर ऊर्जानिर्मितीवर खूप भर दिला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन, अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांकडे निर्माण होणारी वीज विकत घेण्यासाठीही सक्षम यंत्रणा उभारण्यात आली आहे.
2) त्यांच्याकडे सहा ते सात महिनेच सूर्यप्रकाश असतो. रात्रही मोठी असते; तरीही त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प थेट शेतकऱ्यांच्या शेतावर उभारले आहे.
3) आपल्याकडे दहा महिने चांगला प्रखर सूर्यप्रकाश असतो, दिवसाचा कालावधीही जास्त असतो. पाण्याची उपलब्धता कमी, पिके चांगली येत नाहीत, अशा भागांत सौर प्रकल्प उभारता येऊ शकतात. शेतकऱ्यांकडून जमीन विकत घेण्यापेक्षा त्यांची मालकी कायम ठेवून भागीदार म्हणून शेअर देऊनही चांगले प्रकल्प उभारले जाऊ शकतात. यासाठी युरोपीय देशांप्रमाणेच शासनाने शेतकऱ्यांना दीर्घकालीन सहकार्य देणे अत्यावश्‍यक ठरेल.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate