शेतकऱ्यांना सुरक्षित, प्रभावी व गुणवत्ता असलेले कीडनाशक (पेस्टीसाईड) उपलब्ध व्हावे यासाठी हरियाना येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती (सेंट्रल इन्सेक्टीसाईड्स बोर्ड ऍण्ड रजिस्ट्रेशन कमिटी-सीआयबीआरसी) ही केंद्र सरकारची संस्था कार्यरत आहे. या संस्थेकडूनच कृषी रसायन क्षेत्रातील कंपन्यांना आपले उत्पादन विकण्यासाठी मंजुरी मिळते. सीआयबीचे सदस्य व वनस्पती संरक्षण विभागासाठीचे देशाचे मुख्य सल्लागार डॉ. पी. एस. चांदुरकर यांच्याशी मध्यंतरीच्या काळात "ऍग्रोवन'ने कीडनाशकांच्या शिफारशी, लेबल क्लेम व प्लॅंट क्वारंटाईन या मुद्द्यांवर "ऍग्रोवन'ने संवाद साधला होता. त्यातून मिळालेली माहिती शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल.
सीआयबी (सेंट्रल इंसेक्टीसाईड बोर्ड) ही भारत सरकार व राज्य सरकारांना कीडनाशकांच्या वापराबाबत सल्ला वा मार्गदर्शन देणारी उच्चस्तरीय समिती (अपेक्स बॉडी) आहे. तिचे मुख्य कार्यालय फरिदाबाद (हरियाना) येथे आहे. त्याच जोडीला दुसरी समिती म्हणजे नोंदणीकरण समिती (रजिस्ट्रेशन कमिटी- आरसी). कीडनाशकांचा वापर प्रभावी व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्व वैज्ञानिक डाटा तपासून तो योग्य, सुरक्षित वाटला तर त्यांच्याकडून त्या उत्पादनाची नोंदणी दिली जाते.
डॉ.चांदुरकर सांगतात, की आपल्या देशात उत्पादित होणाऱ्या व विक्रीसाठी वापर होणाऱ्या रासायनिक अथवा जैविक कीडनाशकांचे नोंदणीकरण होणे गरजेचे असते. त्यासाठीच "सीआयबीआरसी'ची स्थापना केली आहे. या समितीत विविध तज्ज्ञ, शास्त्रज्ञांचा समावेश असतो. एखाद्या कंपनीचे उत्पादन जेव्हा आवश्यक त्या सर्व डाटासहित मंजुरीसाठी या संस्थेकडे येते तेव्हा या समितीद्वारे निकषांनुसार त्याची तपासणी होते. त्यानंतर कोणते कीडनाशक, कोणत्या पिकावर, कोणत्या किडीसाठी वापरायला पाहिजे हा निर्णय संबंधित उत्पादित कंपनीला कळवला जातो. त्या कीडनाशकाचा वापर त्याप्रमाणेच करायचा असतो.
डॉ. चांदुरकर सांगू लागतात. आमचे कृषी विद्यापीठांना नेहमी सांगणे असते की सीआयबीने लेबल क्लेम दिल्याप्रमाणेच कीडनाशकाची शिफारस करावी. विद्यापीठे आपल्या प्रक्षेत्रात प्रयोग करतात, अनुमान काढतात व त्याप्रमाणे शिफारस देतात. मात्र ती सीआयबीने मंजूर केलेली असेलच असे नाही. लेबल क्लेमप्रमाणेच म्हणजे अधिकृत रीत्या कीडनाशकांचा वापर करायला हवा. अन्यथा निर्यातीमध्ये समस्या येतात. एखादे प्रॉडक्ट एखाद्या पिकावरील किडीसाठी विद्यापीठांना चांगले वाटले तर त्यांनी संबंधित कंपनीला त्याचे लेबल क्लेम करून घेण्याबाबत सांगायला हवे. सीआयबीकडून मंजुरी मिळालेल्या कीडनाशकाच्या चाचण्या या कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रांनी घेतलेल्या असतात. कीडनाशकाचा काढणीपूर्व फवारणी काळ (पीएचआय), विषारीपणा आदी आवश्यक सर्व डाटा त्यांनी तयार केलेला असतो. त्या आधारेच सीआयबीकडून लेबल क्लेम मंजूर होत असते.
शेतकऱ्यांना चांगली पेस्टिसाईड्स उपलब्ध करून देण्याचा सीआयबीचा प्रयत्न असतो. त्या करिता कंपन्यांना लवकरात लवकर नोंदणीकरण देणे हा प्रयत्न असतो. आता सीआयबीचे संपूर्ण पद्धतीचे संगणकीकरण झाले आहे. एखाद्या पार्टीला अर्ज करायचा असेल तर ते त्यांच्या कार्यालयात बसूनच हे काम करू शकतात. घरी बसूनच त्यांना आपल्या अर्जाचे "स्टेट्स' काय आहे, कोणत्या विभागात तो सध्या कोणत्या प्रक्रियेत आहे, त्यात काही त्रुटी आहेत ते कळू शकते. ऑनलाइन अर्जाची ही पद्धती कार्यान्वित झाली आहे.
फवारणीचा काढणीपूर्व प्रतीक्षा काळ (पीएचआय) व कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल) निश्चित झाल्याशिवाय नव्या उत्पादनांना आता नोंदणी दिली जात नाही. मागील दोन ते तीन वर्षांपासून ही नवी पद्धत आपण सुरू केली असल्याचे श्री.चांदुरकर म्हणाले. जुन्या कीडनाशकांमध्ये याबाबत काही त्रुटी आहेत. मात्र भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) तसेच कृषी विद्यापीठांकडून डाटा गोळा करून ते निश्चित केले जातील. त्यावर अलीकडील काही वर्षांपासून काम सुरू आहे.
: 9881307294 (सायंकाळी 5 नंतर)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कोणतीही कंपनी जेव्हा एखादे कीटकनाशक, बुरशीनाशक वा ...
सहा लाखांपेक्षा जास्त खेडी असलेल्या आपल्या ग्रामीण...
गिधाडांचे महत्त्व आणि गिधाड- संवर्धनाचे प्रयत्न या...