कागल, जि. कोल्हापूर - साखर कारखान्यांमध्ये वीजनिर्मिती करताना तेथे तापमान स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पाचट बजावते. बगॅसच्या तुलनेत सव्वापट जादा उष्णता पाचटापासून मिळते. कागलच्या शाहू साखर कारखान्याने सहवीजनिर्मिती प्रकल्पामध्ये पाचटाचा वापर सुरू केला असून, त्यामुळे वीजनिर्मिती वाढली आहे. सध्या कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येत असून. त्यातून 9 मेगावॉट जादा वीजनिर्मिती होणार आहे.
2012-13 च्या गळीत हंगामामध्ये या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू होईल. शाहू साखर कारखान्याकडील सहवीज प्रकल्पामधून रोज सरासरी अडीच लाख युनिट विजेची निर्मिती केली जाते. आपली गरज भागवून उर्वरित दीड लाख युनिट वीज कारखाना वीज वितरण कंपनीला (एमएसइबी) विकतो. सध्याचा प्रकल्प 12.5 मेगावॉट क्षमतेचा असून या प्रकल्पाचे सध्या विस्तारीकरण सुरू आहे. विस्तारीकरणानंतर नऊ मेगावॉट जादा वीजनिर्मिती होणार असल्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात भर पडेल.
बहुतांश कारखाने सहवीज प्रकल्पांमध्ये वीजनिर्मितीसाठी बगॅसचा वापर करतात; परंतु "शाहू'मध्ये वीजनिर्मितीसाठी बगॅसबरोबरच पाचटचाही वापर सुरू केला आहे. त्यासाठीचे पाचट शेतकऱ्यांच्या शेतामधून आणले जाते. दीड टन पाचट देणाऱ्या शेतकऱ्यास त्या बदल्यात 50 किलोचे फॉस्फोकंपोस्टचे पोते दिले जाते. ऊसतोडणीनंतर पाचट जाळून टाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून यांत्रिक पद्धतीने पाचट गोळा करण्यास कारखान्याने सुरवात केली आहे.
"पाचट बेलिग' यंत्राद्वारे पाचट गोळा करून त्यांचे गठ्ठे बांधले जातात. हे गठ्ठे कारखान्याकडील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी आणले जातात. तेथे "ट्रॅश बेल ब्रेकर'द्वारे त्याची भुकटी केली जाते. हे मशीन कारखान्याने विकसित केले आहे. पाचटापासून बगॅसच्या तुलनेत सव्वापट उष्णता जास्त मिळते; मात्र तांत्रिक अडचणींमुळे केवळ पाचटापासून वीजनिर्मिती केली जात नाही. त्यामुळे ते बगॅसच्या तुलनेत आठ टक्के वापरले जाते. त्यामुळे बगॅस बचत होते. बगॅसमध्ये आर्द्रता (मॉईश्चर) जादा असल्यास बॉयलरचे तापमान खाली येण्याची शक्यता असते. याचा परिणाम वीजनिर्मितीवर होऊ शकतो; मात्र याच वेळी पाचट बॉयलरचे तापमान स्थिर ठेवण्याचे काम करते.
यासंदर्भात कारखान्याचे मुख्य अभियंता जे. ए. चव्हाण म्हणाले, "निरुपयोगी वाटणारे पाचट कारखान्याकडील सहवीजनिर्मिती प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बॉयलरचे तापमान स्थिर ठेवण्याचे काम पाचट करते. पाचटापासून जादा वीजनिर्मिती होत असली, तरी तांत्रिक अडचणीमुळे कारखान्याला ते थेट वापरणे शक्य होत नाही; परंतु त्याचा आठ टक्के वापर करून कारखाना जादा वीज मिळवत आहे. एक टन पाचट जाळल्यास सव्वा टन बगॅसची बचत होते. सध्या दररोज अडीच लाख युनिट विजेची निर्मिती केली जात आहे.''
भविष्यात सर्वच कारखान्यांमध्ये सहवीज प्रकल्प राबवला जाण्याची शक्यता आहे. त्या वेळी वीजनिर्मितीसाठी बगॅसचा तुटवडा जाणवू शकतो. त्या वेळी पर्यायी सहइंधन शोधणे अपरिहार्य ठरणार आहे. त्या दृष्टीने शाहू कारखान्याने यंदापासून पाचट हे पर्यावरणपूरक सहइंधन वापरणे सुरू केले आहे. पुढील हंगामात विस्तारीकरण पूर्ण होईल. त्यानंतर पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होईल, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय औताडे यांनी सांगितले.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
तापमानवाढ आणि आर्द्रतेत घट झाल्यास उसावरील खोडकिडी...
कीटकांद्वारेदेखील या रोगाचा प्रसार होतो
बाह्य परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे शरी...
उन्हाळी भुईमुगामध्ये पाने खाणाऱ्या व गुंडाळणाऱ्या ...