অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्यक्तिवेध- डॉ. दिलबाग सिंग अठवाल

व्यक्तिवेध- डॉ. दिलबाग सिंग अठवाल

निरंतर संशोधन करणार्‍या डॉ. अठवाल यांनी पुढे 1967 साली ‘सोना’ या वाणाशी ‘कल्याण’ या वाणाचा संकर घडवून आणला आणि ‘कल्याणसोना’ या नव्या वाणाची निर्मिती केली. या दोन वाणांच्या निर्मितीमुळे गव्हाच्या उत्पादनामध्ये कितीतरी पटींनी वाढ झाली. दुष्काळाशी झुंज देणारा आपला देश पुढे काही वर्षांतच अन्नधान्यनिर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण झाला.

1960च्या दशकात भारतात अन्नधान्याचं उत्पादन आणि जन्मदर यांमध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली होती. तसेच त्यावेळी दुष्काळाची अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. या संकटातून आपल्याला बाहेर काढणारं, भारतीय कृषिक्षेत्रातलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. दिलबाग सिंग अठवाल. 14 मे रोजी म्हणजे नुकतंच त्यांचं देहावसान झालं.

गोष्ट आहे 1959 सालची. भारतात नजीकच्या काळात मोठा दुष्काळ येण्याची शक्यता अमेरिकेच्या एका अभ्यास समितीनं वर्तवली होती. तत्कालीन सरकारचं त्याकडे दुर्दैवानं दुर्लक्ष झालं. परिणाम व्हायचा तोच झाला. पुढे काहीच वर्षांत देशाला प्रचंड दुष्काळाला सामोरं जावं लागलं. पुढच्या काळात पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी झटपट निर्णय घेत इतर राष्ट्रांची मदत मागितली. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया या देशांकडून धान्य आयात करण्यात आले. असे म्हणतात की, दर पाच मिनटांनी धान्यानं भरलेलं एक जहाज यायचं अशी परिस्थिती काही दिवस होती; पण आयात केलेल्या या धान्यापैकी लेरमा रोजो 64, पी वी 18 या वाणांच्या गव्हाच्या पोळ्या लालसर रंगाच्या होत असत, ज्याला तेव्हाच्या जनतेनं साहजिकच नापसंती दर्शवली होती.

डॉ. अठवाल त्या वेळी पंजाब कृषी विद्यापीठात संकरित वाण विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्याच दरम्यान त्यांनी गव्हाचं एक नवीन वाण विकसित केलं. देशी आणि विदेशी वाणांचा संकर घडवून विकसित केलेल्या या वाणाचं नाव ‘कल्याण’ हे होय. आपल्या देशाच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाचं संशोधन ठरलं. निरंतर संशोधन करणार्‍या डॉ. अठवाल यांनी पुढे 1967 साली ‘सोना’ या वाणाशी ‘कल्याण’ या वाणाचा संकर घडवून आणला आणि ‘कल्याणसोना’ या नव्या वाणाची निर्मिती केली. या दोन वाणांच्या निर्मितीमुळे गव्हाच्या उत्पादनामध्ये कितीतरी पटींनी वाढ झाली. दुष्काळाशी झुंज देणारा आपला देश पुढे काही वर्षांतच अन्नधान्यनिर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण झाला. पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये गव्हाचं उत्पादन इतकं वाढलं होतं की, साठवणीला जागा कमी पडली; म्हणून त्या भागांमधल्या शाळांच्या आवारांमध्ये ही साठवण करावी लागली. डॉ. अठवाल यांनी आपल्या संशोधनाद्वारे अनेक धान्यांच्या नव्या वाणांची निर्मिती केली.

बाजरी, गहू; तसेच हरभरा, तंबाखू, मका; या पिकांच्या त्यांनी विकसित केलेल्या नव्या वाणांमुळे उत्पादनवाढीसाठी मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. त्याचबरोबर नव्या शास्त्रज्ञांना, विद्यार्थ्यांना हे संशोधन अतिशय उपयोगी ठरलं, ठरत आहे.

डॉ. अठवाल यांचं हे योगदान जागतिक पातळीवरच्या अनेक संशोधकांकडून वाखाणण्यात आलं. हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग हे असंच एक अग्रणी नाव. डॉ. अठवाल व डॉ. बोरलॉग यांचे निकटचे संबंध होते. कृषी क्षेत्रातले अनेक महत्त्वाचे शोधनिबंध त्या दोघांनी मिळून लिहिले आहेत. डॉ. अठवाल यांनी या क्षेत्रातल्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. बोरलॉग यांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांनी 1967 साली फिलीपिन्सस्थित ’आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थे’च्या सहसंचालक पदाचा कार्यभार सांभाळला. पुढे 1976 साली ते या संस्थेचे पहिले उपमहासंचालक बनले. 1977 साली त्यांची ‘रॉकेफेलर फाउंडेशन’च्या आंतरराष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमात आशिया खंडासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. 1991 साली ’विनरॉक इंटरनॅशनल’ या अमेरिकेतील सामाजिक, कृषी व पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेच्या उपाध्यक्ष पदावरून ते निवृत्त झाले.

अशा या महान संशोधकाचा सन्मान देशात तसेच जगात अनेक ठिकाणी करण्यात आला. विज्ञान क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’ (1964), पद्मभूषण (1975) हे त्यांना प्राप्त झालेले महत्त्वाचे पुरस्कार आहेत. सिडनी विद्यापीठाची डॉक्टरेट (पीएचडी) त्यांना मिळाली  होती. ‘गहू क्रांती’ ची आठवण राहण्यासाठी 1968 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुढाकार घेऊन पोस्टाचं तिकीट काढलं आणि डॉ. अठवालांच्या कार्याचा सन्मान केला. अठवालांच्या सन्मानार्थ पंजाब कृषी विद्यापीठातल्या एका इमारतीला त्यांचं नाव देण्यात आलं आहे.

12 ऑक्टोबर, 1928 साली पंजाबच्या कल्याणपूर इथून सुरु झालेला डॉ. अठवालांचा जीवनप्रवास वयाच्या 89व्या वर्षी 14 मे 2017 रोजी अमेरिकेतल्या न्यू जर्सी येथे पूर्ण झाला. ‘गहू क्रांतीचे जनक’ असणार्‍या या महान संशोधकाचं योगदान तसं पाहायला गेल्यास केवळ भारताच्याच नव्हे, तर जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक भारतीयाला त्यांचं कार्य माहीतच असावं असं आहे. निरंतर कार्यतत्पर राहणं हीच वृत्ती असणार्‍या या थोर संशोधकाचं इतकं भरीव योगदान असूनही त्यांना कमी प्रसिद्धी मिळाली. संकरित वाणाच्या क्षेत्रातला हा जादूगार काही प्रमाणात दुर्लक्षितच राहिला हे दुर्दैवच. भारतीय कृषी क्षेत्राची शान असणार्‍या डॉ. अठवाल यांना विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली.

लेखक: रविराज दामले, पुणे

संपर्क: ravirajdamle@gmail.com

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate