অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतीत सामुदायिक कामाचे महत्त्व जाणा

शेतीतील सामुदायिक कामाचे महत्त्व शेतकऱ्यांचे हाडीमाशी खेळले ते त्यांचे रक्तात भिनले व तसा त्यांचा स्वभाव बनला, तर याचा शेतकऱ्यांना नक्की लाभ मिळेल. शेतीमध्ये असंख्य रोजगार निर्माण होतील. शेतकऱ्यांपुढच्या सर्वच अडचणी संपतील.

आधुनिक शेतीच्या फक्त पन्नास साठ वर्षांच्या अल्प वाटचालीत शेतकऱ्यांपुढे इतकी संकटे का उभी राहिली, हे समजून घेतले पाहिजे. आधुनिक शेतीच्या सुरवातीलाच शेती शास्त्रज्ञांपुढे वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्याचे मोठे आव्हान होते. त्या वेळी शास्त्रज्ञांनी अधिक उत्पन्न देणारे पिकांचे वाण तयार केले.

संकरित बियाणे त्याच वेळी तयार झाले. रासायनिक खते, कीडनाशके या नवीन निविष्ठा शेतीमध्ये आल्या. या निविष्ठांचे व पाण्याच्या अति वापराने निर्माण झालेल्या समस्या सर्वांना माहीत आहेत. पण याचा वापर पूर्णपणे बंद पण करता येत नाही. शास्त्रज्ञांनी अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकाच्या वाणांची पूर्व मशागतीपासून काढणीपर्यंतची आधुनिक शेती शास्त्राशी सुसंगत कामे कशी करावीत याची शिफारस केलेली असते.

या शिफारशीप्रमाणे तंतोतंत कामे करणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे कामाला भरपूर प्रसिद्धी मिळणे गरजेचे होते. याचा उपयोग अन्य शेतकऱ्यांना झाला असता. निसर्गाच्या शास्त्राशी सुसंगत कामे करणाऱ्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीच्या शास्त्राशी सुसंगत कामे करायचे तंत्र अवलंबले नाही, यातूनच आजच्या शेतीपुढे व शेतकऱ्यापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शास्त्रज्ञांनी शिफारस केलेली रासायनिक खताची मात्रा काटेकोर मोजून घेणे, योग्य वेळी पिकाच्या योग्य अवस्थेत व योग्य ठिकाणी देणे, सर्व पिकाला समप्रमाणात मिळणे, हे शास्त्र व त्याप्रमाणे काम करण्याचे तंत्र (कौशल्य) समजले पाहिजे. शेतीच्या प्रत्येक कामात शास्त्र आहे, तंत्र आहे, ते समजून घेतले पाहिजे.

शेती कामाचे उत्तम व्यवस्थापन

जे शेतकरी आधुनिक शेतीच्या शास्त्राशी सुसंगत, दैनंदिन शेती कामाचे उत्तम व्यवस्थापन ठेवून पुऱ्या क्षमतेने आपली शेती कामे चालवतात त्यांच्या शेतीचा उत्पादन खर्च कमी येतो, उत्पादन वाढते व शेतीत फायदा होतो. ज्या शेतकऱ्यांची कामे याप्रमाणे चालत नाहीत त्यांचा शेतीचा उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन कमी येते व शेती फायद्यात चालत नाही. अशा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शेतकऱ्यांनीच याचे महत्त्व समजून आपल्या शेतीच्या दैनंदिन कामात सुधारणा केली पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना स्वतः पुढच्या अडचणीतून बाहेर पडता येईल.

सामुदायिक कामातील उदासीनता शेतकऱ्यांच्या अनेक अडचणीना जन्म देते. एका विहिरीवर चार हिशेदार असतात. चौघांनी मिळून एक इलेक्‍ट्रिक पंप बसवून सामुदायिकपणे वापरला, तर त्याचा शेतीमालाचा उत्पादन खर्च फार मोठ्या प्रमाणावर वाचतो. पण प्रत्येकाचे स्वतंत्र चार पंप असतात. नऊ-दहा शेतकऱ्यांनी एक ट्रॅक्‍टर घेऊन सामुदायिकपणे वापरला, तर प्रत्येक शेतकऱ्याची कामे वेळेत होऊन त्याचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाचवता येतो. पण असे चित्र नाही. सध्याचे ट्रॅक्‍टर भाडे शेतकऱ्यांना परवडत नाही. पण त्यांच्यापुढे दुसरा इलाज नसतो. स्वतःचा स्वतंत्र ट्रॅक्‍टर घेऊन तो पुऱ्या क्षमतेने वापरता न आल्यामुळे ट्रॅक्‍टरचे बॅंकेचे कर्जाचे हप्ते फेडण्यास शेतकऱ्याला स्वतःची जमीन विकावी लागल्याची उदाहरणे आहेत.

आपल्या देशात ऐंशी टक्के शेतकरी लहान आहेत. लहान शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीत अनेक कामे सामुदायिकपणे केली, तरच फायदेशीर होतात. कधी कधी कामेच रखडल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत असते. लहान शेतकऱ्यांनी आपला रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी व चरितार्थ उत्तम चालविण्यासाठी सामुदायिक कामाची कास घरावीच लागते व शेतीची कामे सामुदायिकपणे करणे स्वतःच्या अंगवळणी पडले पाहिजे.

शेतीतील सामुदायिक कामाचे महत्त्व

पन्नास वर्षांपूर्वी शासनाने शेतकऱ्यांचे शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती केली. शेतकऱ्यांनी या बाजार समित्यांच्या सतत संपर्कात राहून इतर बाजारपेठात शेतीमालाची खरेदी- विक्री कोणत्या दरात चालू आहे यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते. कारण शेतकऱ्यांनी स्वतःचे शेतीचे उत्तम व्यवस्थापन ठेवून भरपूर उत्पादन काढले व त्याला चांगला बाजारभाव मिळाला तरच शेतकऱ्याला शेतीत फायदा होतो, अन्यथा तोटाही होऊ शकतो. इतके या कामाला महत्त्व आहे. इतर पेठांतील बाजारभाव व शेतीमालाचा उत्पादन खर्च माहीत असल्यामुळे व्यावसायिक दृष्टी येते. शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या बाजार समित्यांवर शेतकऱ्यांचा व्यावसायिक प्रभाव राहिला असता.

सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्याला संघर्षाचे स्वरूप येऊ न देता ज्या त्या वेळी व्यावसायिक कौशल्यानेच आपला शेतीमाल योग्य दरात विकता आला असता. दहा-वीस व्यापारी व अडत दुकानदार यांनी बाजार समित्या ताब्यात घेतल्या व याच समित्यांमार्फत गेली पन्नास वर्षे शेतकऱ्यांच्या शेतीमालाची अनिर्बंध लूट केली. शेतकऱ्यांना कर्ज बाजारी बनवले. या सर्व व्यवहारात शेतकरी कुठे कमी पडले यासाठी शेतकऱ्यांनीच स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. शेतकरी संघटनांचे पण याकडे लक्ष दिले नाही. ही शेतकऱ्यांची चालू असलेली लूट शासनाच्या लक्षात आली आहे. यामुळे शासन बाजार समित्यांवर कडक निर्बध आणत आहे. याचा शेतकरी कसा लाभ घेतात, हे पाहावे लागेल. शेतकऱ्यांना शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारापर्यंत विकण्याचा मधला बाजार समित्यांचा अडथळा शासनाने दूर केला आहे, हा निर्णय शेतकऱ्यांचे हिताचा आहे. शेतीतील सामुदायिक कामाचे महत्त्व शेतकऱ्यांचे हाडीमाशी खेळले ते त्यांचे रक्तात भिनले व तसा त्यांचा स्वभाव बनला, तर याचा शेतकऱ्यांना नक्की लाभ मिळेल. शेतीमध्ये असंख्य रोजगार निर्माण होतील. शेतकऱ्यांपुढच्या सर्वच अडचणी संपतील.

युरोपमधील सर्व देशांतील शेतकरीच शेतीमालाची विक्री किंमत ठरवतात. पिकाच्या काढणीनंतर पिकाची प्रतवारी पॅकिंग, लेबलिंग ही कामे शेतकरी स्वतःच करतात. सुटा शेतीमाल ते विकत नाहीत. पॅकिंगवर मालाचे वजन व किंमत लिहिलेली असते. आपल्या देशात पिकाचे काढणीपश्‍चात बाबींकडे दुर्लक्ष होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. या पद्धतीने आपल्या देशातील शेतकरी कामाला लागले व अशी कामे करण्यास शासनाच्या धोरणाचा अडथळा येत असेल, तर तिथे जरूर संघर्ष केला पाहिजे. गेली तीस-चाळीस वर्षे शेतकरी व शासन यामध्ये जो संघर्ष चालू आहे. त्यातून शेतकऱ्यांपुढचा एकही प्रश्‍न सुटलेला नाही. या प्रश्‍नांमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान होते त्यावर केवळ मलमपट्टी लावायचे काम चालू आहे. मूळचे प्रश्‍न आहेत तसेच आहेत. ते पहिल्यापेक्षा अधिक कठीण होऊन शेतकऱ्यांपुढे उभे आहेत.

शासनाने सर्व शक्ती पणाला लावून शेतकऱ्यांसाठी उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करून ठेवल्या असत्या, तर शेती पुढचे अनेक प्रश्‍न संपुष्टात आले असते. शासनाची कामे शासनाने करावीत व शेतकऱ्यांची कामे शेतकऱ्यांनी करावीत. या दृष्टीने शेतकरी विचार करू लागले, तर शेतकऱ्यांनाच शेतीपुढचे नेमके प्रश्‍न कळतील. या प्रश्‍नांतून स्वतःपुढच्या अडचणींतून बाहेर पडण्याचा मार्गदेखील सापडेल.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate