অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतीमध्ये वाढावा तंत्रज्ञानाचा वापर...

उत्पादनापासून काढणीपर्यंत विविध टप्प्यावर तंत्रज्ञानाचा वापर करीत काटेकोर नियोजन केल्यास शेतीमालांचे नुकसान कमी करणे शक्‍य होईल.

हजारो वर्षांच्या प्रयत्नातून शेती विकसित होत गेली. त्यात व्यवसाय म्हणून होत गेलेले बदलही अभ्यासण्यासारखे आहेत. विविध प्रयोगांतूनच शेती व्यवसाय आजपर्यंत टिकून आहे. अर्थात, शेतीमध्ये आजही अनेक समस्या आहेत. त्यात अनियमित पाऊसमान व हवामानातील बदल, त्याचे शेतीवर होणारे दुष्परिणाम, भांडवलाची कमतरता, शेतमजुराची कमतरता, विम्याचे संरक्षण नाही, आणि सर्व जुळून चांगले पीक आल्यावरही बाजारपेठेची शाश्‍वती नाही, असे अनेक अडसर आज शेतकऱ्यांसमोर आहेत. त्यात साठवणुकीच्या सोयी नसल्याने होणारे शेतीमालाचे नुकसान सर्वच घटकांना त्रासदायक आहे.

या समस्यांवर मात करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर शेतामध्ये वाढण्याची आवश्‍यकता आहे. त्यातील काही तंत्रज्ञानाची माहिती घेऊ.

रोपवाटिका व टिश्‍यूकल्चर रोपे - शेतकऱ्यांने पेरलेले बियाणे उगविण्यापर्यंत विविध नैसर्गिक घटक कार्यरत असतात. प्रत्येक बी रुजेलच याची खात्री नसल्याने बियाणे व त्यावरील खर्च वाया जाऊ शकतो. त्यासाठी रोपवाटिका, टिश्‍यूकल्चर तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे.

जलसिंचन, पाणी व्यवस्थापन व निचरा प्रणाली

महाराष्ट्रात चांगली माती व पाण्याचे स्रोतही चांगले आहेत. पाऊस आणि नैसर्गिक स्रोतांपासून मिळणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवला गेला पाहिजे. उपलब्ध पाण्याचा योग्य व काळजीपूर्वक वापर केला गेला पाहिजे. यासाठी खालीलपैकी योग्य असे तंत्रज्ञान वापरणे आवश्‍यक आहे : 
  1. सूक्ष्म जलसिंचन - तुषार सिंचन, ठिबक सिंचन.
  2. पाणी व्यवस्थापन - पीकवाढीच्या संवेदनशील अवस्था, पिकांच्या गरजेनुसार पाण्याचे व्यवस्थापन.
  3. मर्यादित सिंचन.
  4. फर्टिगेशन तंत्र - विद्राव्य खते देण्याच्या पद्धतींचा योग्य वापर केल्यानेच इस्राईलसारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये कृषी क्षेत्राची प्रगती साध्य झाली. पाण्याची साठवणूक करणे, पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिके घेणे, पाण्याचा पुनर्वापर करणे असे उपाय करणे आवश्‍यक आहे.

शेडनेटगृह तंत्रज्ञान

उन्हाच्या अधिक तीव्रतेमध्ये पिके तग धरण्यामध्ये मर्यादा येतात. त्यात उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी असते. परिणामी वाढीवर अनिष्ट परिणाम होऊन उत्पादनात लक्षणीय घट येते. शेडनेटच्या साह्याने वातावरणातील तापमान, आर्द्रता, कर्बवायू, वारा इत्यादी घटकांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. शेडनेटगृहातील पीक लागवड ही उघड्या शेतातील पीक लागवडीपेक्षा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. शेडनेटगृहाचे क्षेत्र 5 गुंठ्यांपासून 1 एकरपर्यंत असू शकते.

मुख्यतः खालील पिके शेडनेटगृहात लागवडीसाठी घेतली जातात

  1. 1) रंगीत ढोबळी मिरची, 2) टोमॅटो, 3) काकडी, 4) ब्रोकोली, 5) लेट्यूस, 6) ऍन्थुरियम, 7) इतर पालेभाज्या पिके उदा. वाटाणा, फ्लॉवर, कोबी, वांगी, मिरची, भेंडी इत्यादी, 8) सर्व भाजीपाला व फळपिकांच्या रोपवाटिका, 9) भाजीपाला पिकांचे बियाणे घेण्यासाठी.
  2. शेडनेट उभारणी व सूक्ष्म जलसिंचनप्रणाली शेतामध्ये बसवण्यासाठी कृषी विभागातर्फे अनुदान योजना आहेत. त्याची जरूर माहिती घ्यावी.
  3. हरितगृह तंत्रज्ञान, शेतीमध्ये आच्छादनांचा वापर, शेततळे व सामूहिक तलाव, एकात्मिक तण व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, पिकांचे संरक्षण करणारी अवजारे, जैवतंत्रज्ञान, सुधारित अवजारे व यंत्रे यांचाही वापर करण्याकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे.
  4. "काटेकोर शेती' (Precision Farming) चा उपयोग परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. भारतातही त्यांचा वापर वाढला पाहिजे.
  5. काढणीपश्‍चात शेतमालाचे नेमके स्थान जाणण्यासाठी (Traceability) तसेच शेतकरी ते ग्राहक या साखळी व्यवस्थापनासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे.

मूल्य साखळी विकास प्रकल्पातील घटक

संकलन गृह (Collection Center), प्रतवारी व पॅकिंग गृह (Grading & Packing Center), प्राथमिक प्रक्रिया केंद्र (Preliminary Processing Unit).

संकलन गृह (Collection Center)

शेतात शेतीमाल योग्य तितका पक्व झाल्यावर त्याची काढणी तापमान कमी असताना (पहाटे, सायंकाळी) करायला हवी. तोडलेला शेतमाल लगेच सावली, कमी तापमानात ठेवायला हवा. त्याचे संकलन करण्यासाठी शेतकरी गटांमार्फत 3-4 गावांमध्ये सामायिक संकलन केंद्र उभे करता येईल. येथे साठवणूक व स्वच्छता केली जाईल. फळे व भाज्यांच्या विविधतेनुसार एकसारख्या पिकांसाठी स्वतंत्रपणे संकलन केंद्रे उभारता येतील. शेतीमाल तोडणीनंतर त्वरित माल तिथे पोचविल्यास नुकसान कमी होईल. मालाचे योग्य वजन करून त्याला बार कोडिंग करता येईल.

प्रतवारी व पॅकिंग गृह (Grading & Packing Unit)

उत्पादित शेतमालाची साफसफाई, प्रतवारी, वर्गीकरण तसेच आवश्‍यक वजनाचे पॅकिंग करण्यासाठी सुसज्ज पॅकिंगगृहांची उभारणी केली पाहिजे. त्यातून फळे व भाजीपाला यांसारख्या नाशवंत मालाचा दर्जा व आयुष्य वाढू शकेल.

न्यूनतम/ प्राथमिक प्रक्रिया केंद्र (Minimum/ Preliminary Precessing Unit)

स्थानिक पातळीवर फळे व भाजीपाल्याची स्वच्छता, योग्य प्रतवारी व पॅकिंग करणे, पूर्व शीतकरण करून, शीतगृहात साठवण करणे ही कामे केली जातात. यामुळे नाशवंत मालाचे आयुष्य व दर्जा वाढतो. शेतमालाची आवक वाढून दर कोसळणे या परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते. भाजीपाल्याचा अनावश्‍यक गाव परिसरातच काढून टाकल्याने चारा व खतासाठी वापर होऊ शकतो. शहरातील कचरा कमी होतो. गावामध्ये रोजगारनिर्मिती होऊ शकते.

अशा केंद्रांच्या उभारणीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध आहे

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 8/9/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate