অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेळ्यांचा गोठा कसा असावा......

शेळ्यांचा गोठा कसा असावा......

गोठा बांधणी

बंदिस्त शेळीपालन करताना शेळ्यांची संख्या हळूहळू वाढवावी, त्याप्रमाणे विस्ताराच्या दृष्टीने गोठा बांधताना जागेची सोय ठेवावी. गोठा बांधणी ही शेतातील उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करता येते. गोठा बांधताना शक्‍यतो गोठ्याची लांबी पूर्व-पश्‍चिम ठेवावी. गोठ्याच्या जमिनीवर शक्‍यतो माती, मुरूम, लाकडाचा भुस्सा, विटा यांच्या साह्याने चांगले दाबून धुम्मस तयार करावे. अशी जमीन हिवाळ्यात उबदार राहते व करडांचे व शेळ्यांचे थंडीपासून संरक्षण होण्यास मदत होते.

गोठ्याचे छत

शेतातील बाभळीच्या झाडांपासून खांब; तर तुराट्या, भाताचा पेंढा, गव्हाच्या पेंढ्या, तसेच बाजरीचे सरमाड यांचा वापर करून गोठ्याचे छत शाकारता येते. कुंपण तसेच गोठ्यातील कप्पे, भिंती तुराट्या, बांबूच्या पट्ट्यांचा वापर करून तयार करता येतात. गोठ्याचे छत हे नेहमीपेक्षा थोड्या जास्त उंचीवर शाकारावे, जेणेकरून हवा खेळती राहील, तसेच दुर्गंधी राहणार नाही. गोठ्याच्या छताला प्लॅस्टिक, पॉलिथिन अथवा खताच्या रिकाम्या पिशव्या शिवून केलेले आच्छादन बसवल्यास पावसापासून जास्त संरक्षण मिळते. थंडीच्या दिवसांत गोणपाटाच्या साह्याने शेळ्यांसाठी, मुख्यत्वे करून करडांसाठी ऊब राखता येते.

जमिनीपासून साधारण एक ते दीड फूट उंचीवर गव्हाण बसवावी. या गव्हाणीची रुंदी एक फूट, साधारण तेवढीच खोली असावी. गव्हाणीच्या बाजूची जाळी ही लोखंडी पट्ट्यांच्या साह्याने मोठे कप्पे असलेली करावी, जेणेकरून शेळ्यांना त्या कप्प्यातून चारा खाणे शक्‍य होईल. पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंटची एक टाकी गोठ्याबाहेर एका कोपऱ्यात ठेवावी.

 

संपर्क - 02426- 243455 
अखिल भारतीय समन्वित संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्प, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate