অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समर्थ मी, संपन्न मी!

शेतीबाबत बोलताना प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या आणि शेती करण्यातल्या अनंत अडचणी डोळ्यासमोर येतात. पण शेतीमध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे शेतकरीदेखील आजूबाजूला आहेत ही मनाला उभारी देणारी गोष्ट आहे. या शेतकर्‍यांच्या, त्यांच्या कुटुंबांच्या जिद्दीचं कौतुक वाटतं आणि ही प्रेरणा इतरही शेतकर्‍यांनी घ्यावी असंही मनोमन वाटतं. अशी प्रेरणादायी उदाहरण आपल्यामध्ये आहेत हे सर्वांसमोर येणं फार आवश्यक आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीने अडचणीवर मात्र करणार्‍या काही भूमीपुत्रांची आणि भूमीकन्यांची ओळख करून देणारा हा महत्त्वाचा लेख.

कृषी पत्रकार म्हणून विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्रातील शिवार, खळं, रान आणि बागांमधून फिरताना मला जो शेतकरी-कास्तकारांचा दुर्दम्य आशावाद दिसला तो अचंबित करणारा आहे. विदर्भात २००६-०७ मध्ये जेव्हा शेतकरी आत्महत्येची ‘लाट’ आली होती आणि रोज पहिल्या पानावर जेव्हा आत्महत्येचा स्कोअर छापला जात होता त्यावेळी एका सर्वेक्षणानिमित्त जवळपास ६०० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेटता आले. ‘१० हजार ते ४० हजार रुपड्यांच्या कर्जापायी आमचे धनी, भाऊ, वडिल, चुलते, मुलगा यांनी मृत्यूला कवटाळले’, असं जेव्हा बाया-बापड्या सांगायच्या तेव्हा चर्र व्हायचंच! त्या रडत असताना माझा प्रश्‍न असायचा ‘शेती परवडत नाही, कर्ज फेडता येत नाही, पाऊसपाणी बेभरवशाचे मग आत पुढे काय करणार?’ एवढ्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांकडून मी असे उत्तर कधीच ऐकले नाही की, ‘आम्ही नाही करणार शेती यापुढे! पाय ठेवणार नाही या शिवारात!’ उलट चटकन उत्तर येई - शेतीच करणार, दुसरं काय?

शेती फायदेशीर, व्यावसायिक कशी बनवायची?

मला या उत्तरात शेतकरी कुटुंबाची हतबलता नाही दिसत, दुर्दम्य आशावाद दिसतो. अंकुरण्याच्या प्रक्रियेतील या साखळ्यांना ‘खुडणं’ नवं नाही ‘मढी झाकून करती पेरणी’ असं त्यांचं कौतुक केलं जातं, किंबहुना या हातांना माहितेय, नर-मादीच्या परागीकरणाने शिवार फुलतं ते, मित्र-कीटकांच्या वस्त्या शिवारात किती हळुवार वाढवतात ते. मातीचा पोत स्पर्शाने ओळखणारी माणसं ही, त्यांना ठाऊक असतं ते फक्त अंकुरणं आणि यामध्येच मला शेतकरी-कास्तकारांच्या इच्छाशक्तीची मुळे दिसतात. ‘आजोबा-बा-काका-मामा-पोरग्याने दोर लावून घेतला कर्जापायी, गेला तो म्हणून आम्ही काय शेती सोडायची व्हय?’ असा ज्वालाग्रही प्रश्‍न फक्त शेतकरी कुळातील महिलाच डोळे पुसत पुसत ताडकन् विचारू शकतात. शेतीच करायचीय ना? मग ती आता फायदेशीर, व्यावसायिक कशी बनवायची? याचा विचार अगदी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबामध्येही केला जातोय आणि याच खर्‍या तर प्रगतीच्या वाटा म्हटल्या पाहिजेत. शेती करण्यासाठी कितीही प्रतिकूल स्थिती असली तरी ६२ टक्के लोकसंख्या आज राज्यात शेती करण्यात गुंतलीय. राज्याचा खर्‍या अर्थाने व्यवसाय तो शेतीच! त्याची दुरवस्था झाली खरी; पण तो operational भाग झाला. शेतीला आणि ती करणार्‍या शेतकर्‍यांना उगाच दोष देण्यात मतलब नाही. राज्य चालवता आले नाही, संस्था चालवता न आल्यास राज्य वा संस्थेला आपण कुठे दोष देतो?

शेतीची दुरवस्था झालीय म्हणा किंवा ती कठीण बनलीय म्हणा, त्याची कारणे दिसतात ती बेभरवशाचे पाऊसपाणी, लहरी हवामान, बियाण्यांविषयी गॅरंटी नसणे, शेतीला आवश्यक असणार्‍या सर्वच साधनसामुग्रीमध्ये दरवर्षी होणारी १० टक्के वाढ, शेती कर्जाविषयीची गुंतागुंत-सावकारी कर्जाची सहजता, जमिनीमधील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, जमिनीचा ढासळलेला पोत, दर तीन वर्षांनी येणारा दुष्काळ (प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, खानदेश) सिंचनासाठी पाणी सहज उपलब्ध न होणे, कीड-रोगांचे वाढणारे प्रमाण, कीड नियंत्रण आणि खत व्यवस्थापनासाठी आवश्यक असणार्‍या माहिती-प्रशिक्षणाचा शेतकर्‍यांचा ऍक्सेस नसणे, शासन-कृषी विद्यापीठांच्या विस्तार सेवांची अकार्यक्षमता, बाजारपेठांशी सहज संपर्क नसणे, शेतमाल विक्रीच्या मूल्य साखळी (व्हॅल्यू चेन) मधील नफेखोर वृत्ती, सरकारी धोरणे, सबसिडी वेळेवर न मिळणे, नुकसानभरपाईसाठी केल्या जाणार्‍या पंचनाम्याचा घोळ, पिकविमा दाव्यातील फोलपणा, शेती आणि शेतकर्‍यांना डाऊन मार्केट समजून मुख्य प्रवाहापासून त्यांना वेगळे पाडण्याची प्रवृत्ती, शेतकर्‍यांची शासननिर्भर मानसिकता, हवामान खात्याचा नॉन प्रोऍक्टिव्हनेस, मजूरटंचाई, काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाचा अभाव, शेतमाल प्रक्रिया आणि मूल्यवृद्धीबद्दलची साशंकता, साठवणुकीच्या नसणार्‍या सोयी अशा कित्येक गोष्टी ‘शेतीला कठीण’ बनवण्यात येतात. पाऊसपाणी, भाव न मिळणे, नापिकी या तीन घटकांतील समतोल बिघडला की, शेती सोडण्याचे, नैराश्याचे विचार येतात. पण डोंगराएवढी संकटे असूनही राज्यातील शेतीमाल उत्पादन वाढतानाच दिसतेय आणि शेतीतच राहणार्‍यांचे प्रमाणही वाढताना दिसते. एक आत्महत्या घडणे हे वाईटच; पण एकूण शेतीनिर्भर लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण सामान्यच ठरते.

शेतीच्या नकारात्मकतेचा गवगवा होत असला तरी शेतीमधील सकारात्मकतेचे प्रमाण अधिक आहे आणि शांतपणे छोटा-मध्यम आणि बडे शेतकरी शिवार आणि बागा फुलवण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहेत. एका शेतकर्‍याच्या आत्महत्येपासून धडा घेऊन शंभर शेतकरी शेतीमध्येच वेगळा प्रयोग करून आपापल्या यशोगाथा अधोरेखित करत आहेत. मी जेव्हा ‘शेतकरी’ असा शब्द वापरतो तेव्हा त्यात शेतकर्‍याचे सारे कुटुंबच येते. शेतीची ७० टक्के कामे या महिलाच करतात. निंदणी, खुरपणी, पेरण्यांच्या पलीकडे जाऊन कीडनियंत्रण, खत व्यवस्थापन अशी कामेही आता सहजतेने महिलाच करतात. फक्त बाजारात शेतमाल नेणे आणि बाजारपेठेची निवड हे निर्णय मात्र अजूनही पुरुष शेतकर्‍यांच्या हातीच आहे.

पोरस पाईपवर उसाची शेती

आता प्रयोगशील म्हणा किंवा वेगळ्या वाटेने जाणारे शेतकरी नेमके असे काय करतात ज्यामुळे त्यांची शेती शाश्‍वत वा अश्‍वासक बनते? पाण्याची बचत म्हणजेच किमान पाणी देऊन अधिक उत्पादन वाढवणे. मजुरांवरील खर्च कमी करण्यासाठी घरातील सर्व कुटुंबाचा सहभाग घेणे, सार्‍या गावालाच शेतकामात निमंत्रण देणे (‘इर्जिक’ या नावाने ही पद्धत आजही बर्‍याच ठिकाणी चालू आहे.) गटाने शेती करणे, यामध्ये ३०-४० शेतकरी मिळून एकाच पिकाचे बियाणे, खत, औषधे आणि उपकरणे खरेदी करतात. त्यामुळे किमान ३० ते ३५ टक्के पैशांची बचत होते. बरेच शेतकरी आपल्या सोयीप्रमाणे तंत्रज्ञान शोधतात किंवा उपलब्ध तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याला स्थानिक परिस्थितीनुसार रूप देतात. जयसिंगराव गोटखिंडीकर नावाचे कोल्हापूरजवळचे एक वृद्ध शेतकरी सतत प्रयोग करत असतात. गतवर्षी त्यांनी ठिबक सिंचनाला पर्याय म्हणून ‘पोरस पाईपवर उसाची शेती’ हा प्रयोग केला. याचे कारण अर्थातच पाण्याची टंचाई हाच होता. पोरस पाईप ही संकल्पना समजून घेण्यासाठी जयसिंगराव गुजरातमध्ये गेले, तेथे अनेक शिवारं फिरले, पोरस पाईप तयार करणार्‍या कंपनीत जाऊन आपल्या शेताला अनुकूल असणारे डिझाईन त्यांनी करून घेतले. त्यांचे नशीब चांगले की, कंपनीचे मालक पटेल यांनाही महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यामुळे त्यांनी जयसिंगरावांच्या शेतातच तळ ठोकला आणि पोरस पाईपने ठिबकपेक्षा ३५ टक्के पाण्याची बचत कशी होते आणि मुळाला गरज असेल तरच ते पाणी कसे ओढून घेते, हे सार्‍या महाराष्ट्रापुढे सिद्ध केले. अशी स्थानिक हुशारी अनेक शेतकरी दाखवत असतात. उदा. कोकणात दापोली आणि चिपळूण भागात जे ट्यूबर क्रॉप घेतले जातात त्याच्या बागेत रानडुकरे घुसून बागांची नासधूस करण्याचे प्रमाण खूप होते. ही रानडुकरे मध्यरात्री येऊन सारी बाग नष्ट करून जात. आता यावर कोणतेही विद्यापीठीय संशोधन कुचकामीच होते.

दोन शेतकर्‍यांनी मध्यरात्री झाडावर चढून रानडुकरांची बागेत घुसण्याची आणि बाग नष्ट करण्याची पद्धत बारकाईने तपासली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, ही डुकरे जमीन हुंगत हुंगत, आवाज करत येतात आणि ट्यूबर क्रॉप उकरतात. नाकाने श्‍वास घेण्याचे डुकरांची ही सवय लक्षात घेऊन या दोन शेतकर्‍यांनी आपल्या बागेच्या कुंपणाभोवती न्हाव्याच्या दुकानातील १०-१५ किलो केस गोळा करून आणले आणि पसरवले. डुकरांच्या टोळीने दुसर्‍या दिवशी बागेत प्रवेश केला आणि हे सारे केस त्यांच्या नाकात गेल्याबरोबर ते सैरभैर झाले आणि पुन्हा फिरकले नाहीत. अशी स्थानिक हुशारी कीड व्यवस्थापनातही आणि खते देण्याच्या पद्धतीतही दाखवली जाते. पीक बिगरहंगामात काढले की बाजारभाव चांगला मिळतो, या ठोकताळ्याप्रमाणे अलीकडे फळपिके काढली जातात. हापूस आंबा फेब्रुवारी महिन्यात आणणार्‍या सावंत यांना ‘माझ्या आंब्याला सोन्याचा भाव मिळतो’ असा अभिमान म्हणूनच वाटतो. अर्थात बाजारपेठेचे हे गणित तसे कमीच शेतकर्‍यांना अवगत असते. बहुसंख्य शेतकरी हे आजही कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन माल विकणेच पसंत करतात; पण अलीकडे महिलांच्या सहभागामुळे शेतमालाचे क्लीनिंग, ग्रेडिंग आणि पॅकिंग याला महत्त्व आल्यामुळे आणि बाजारपेठेलाही अनेक पर्याय निर्माण झाल्याने शेतकर्‍यांनी विक्रीचे तंत्रज्ञानही शिकून घेतले आहे.

प्रारंभी आपण आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबियाने पुन्हा शेतीकडे वळणे, हा मुद्दा घेतला होता. त्यातील एक आठवण अशी की, मार्च २०१२ मध्ये बीड जिल्ह्यातील महाजन वाडी या गावातील एक कांद्याचा शेतकरी सखाराम लिंबाजी घरत याने कांद्याला भाव न मिळाल्यामुळे कांद्याच्या ढिगार्‍यावर उभा राहून झाडाला टांगून घेतले होते. कांद्या ढिगार्‍यावर मृतदेह लटकताना मी प्रथमच पहात होतो. सारे भीषणच होते. घरत कुटुंबाची जेव्हा भेट घेतली तेव्हा अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकर्‍याच्या घरात जेवढे दारिद्य्र असते तेवढे होतेच, जोडीला तरण्याताठ्या मुलाचा मानसिक आजारही होता. आता हे कुटुंब पुन्हा कसे काय उभे राहणार, असा प्रश्‍न मला पडला होता. २०१२ च्या खरीप हंगामात मला फोन आला महाजन वाडीतून आणि त्यांनी सांगितले की, ‘मयत सखारामची पत्नी संगीता, मुलगा शाळिग्राम, अपंग वडील आणि आई उद्या कपाशीची पेरणी करणार आहेत, त्यावेळी तुम्ही या.’ केस स्टडी म्हणून गेलो तर हे सारे कुटुंब अशा काही गतीने शेतात राबत होते की, थक्कच झालो. संगीता शेती केव्हा शिकली, कापूस लावायला (कांद्याला भाव न मिळाल्याने सखारामने आत्महत्या केली होती) तिला कोणी सांगितले, तिच्या मानसिक रुग्ण मुलाचा तिने सहभाग कसा घेतला आणि मयत सखारामचे अंथरूणावर पडून असणारे वडील एका पायावर शेतातील कामे कसे काय करतात? असे अनेक प्रश्‍न माझ्यापुढे उभे राहिले खरे; पण महत्त्वाचे म्हणजे सखारामच्या कुटुंबावर त्याच्या आत्महत्येचे कोणतेच सावट नव्हते. ते कपाशीचे पेरणी रुढ अर्थाने करत असले तरी मला ती पेरणी जिद्दीचीच वाटत होती. कांद्याने तुमच्या घरातील कर्त्याचा बळी घेतला तेव्हा बरे झाले तुम्ही बीटी कापसाकडे वळला, असे मी संगीताला सहजपणे म्हणालो तेव्हा ती ताडकन म्हणाली, ‘ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कांदा लावणार आहे. कारण त्यावरच शाळिग्रामची दहावी पूर्ण होणार आहे.’ या कुटुंबाने २०१३-१४ मध्ये ही जिद्द पूर्ण करून दाखवली आणि आपल्या दोन-तीन एकरांतील शिवारात आपल्यापुरती यशोगाथा कोरली.

आपण महिलांच्या सहभागाविषयी पूर्वी बोलत असू; पण शेतीसारख्या महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित व्यवसायात महिलांचा सहभाग आहेच. विशेषतः डेअरी, पोल्ट्री, शेळीपालनात जनावरांचे आरोग्य राखण्याचे महत्त्वाचे काम कुटुंबातील महिलाच करताना आढळतात. जयाबाई पवार या बीड जिल्ह्यातील निरक्षर महिलेने गतवर्षी ‘खानदेश भूषण पुरस्कार’ मिळवला. प्रारंभी जयाबाई शेतमजुरी करत होत्या. आपण निरक्षर आहोत, याचे दुःखही त्यांना होतेच; पण पै-पैका जमवून त्यांनी दोन एकर जमीन घेऊन त्यावर भाजीपाला घ्यायला सुरुवात केली. स्वतः विहीर खोदून पाण्याची सोय या बाईने केली. गेवराई आणि बीडसारख्या शहरात रिक्षाने जाऊन त्या विकायला लागल्या. त्यांच्या सुदैवाने त्यांना कामेश्‍वर चांडक नावाचे कृषी अधिकारी भेटले आणि त्यांनी अधिक चांगले नियोजन त्यांना करून दिले. आज जयाबाईंच्या शेतात स्वच्छ असा जनावरांचा गोठा आहे, गांडूळखताच्या मोठ्या शेड आहेत. चारजणांचे कुटुंब सारे शेतीचे नियोजन करते आणि राबते. जयाबाईच हिशेब ठेवतात, असे सून राधाबाई उघडपणे सांगतात. त्यांची मुले इंग्रजी शाळेत जातात.

भाजीपाल्याचा दर्जा राखल्याने आता अनेक मोठे व्यापारी त्यांच्या शेतावर येऊनच भाजीपाला आणि धान्य घेऊन जातात. ‘आम्ही अडीच एकरात लक्षाधीश झालो, मग पाच-दहा एकरवाले दुःखी का?’ असा प्रश्‍न जयाबाई नेहमी विचारत असतात. अगदी याच धर्तीवर नाशिकजवळील पिंपळगाव बसवंतमधील शारदाताई मोरे यांनी द्राक्षातून संपन्नता आणली. शारदाबाईंकडे आजच्या घटकेला तीन लहान व एक मोठे महिन्द्रा ट्रॅक्टर आहे. द्राक्षावरील फवारणीसाठी इटलीहून आणलेले मशीनही आहेच. द्राक्ष शेती ही अभ्यास आणि संशोधनावरच करता येते. शारदाबाई आणि त्यांच्या पाच जावा यांनी अशी काही घडी बसवली आहे की, त्यांच्या द्राक्षाच्या बागा नेहमीच फुललेल्या दिसतात. आपल्या शेतात राबणार्‍या मजुरांची काळजी त्या स्वतः घेतात आणि आवश्यक तेथे त्यांना प्रशिक्षणही देतात. शेतात द्राक्षासोबतच अन्य कोणते फळपीक घ्यायचे याचाही अभ्यास त्या करून घरातील पुरुषांना त्या समजवून सांगतात. त्यांना स्वातंत्र्य मिळाले आणि पुरुष मंडळींचे पाठबळही मिळाले, हा एक ऍडव्हान्टेज असला तरी मुळात त्यांनी द्राक्ष शेतीचा अभ्यास केला आणि त्यातून संपन्नता खेचून आणली हे जास्त महत्त्वाचे आहे.

पारंपरिक पिके

शेतीमध्ये तरुणच काही करू शकतात या माझ्या समजाला वडवणी तालुक्यातील कुप्पा गावच्या उत्तमराव परसराम सावंत यांनी छेद दिला. एकत्र कुटुंंबातील उत्तमरावांनी जमिनीच्या वाटण्या करून आपल्याकडे आठ एकर जमीन ठेवली. त्यापैकी तीन एकर पूर्णतः पडीक होती. राजकारणात उत्तमराव तसे रस घेत होते; पण शेतीवरच उपजीविका असल्याने त्यांनी अनेक प्रयोग केले होते. संकरित ज्वारी सी. एच. दास-२ या वाणाचे एकरी ४८ क्विंटल उत्पादन काढून त्यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकवला होता. ऊस, कापूस, बाजरी, तूर अशी पारंपरिक पिके घेण्यावरच त्यांचा भर होता. त्यांच्या खडकाळ जमिनीत आंबा लावायची त्यांची इच्छा होती आणि गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी आता केशर आंबा काढायला सुरुवात केली आहे. व्यापार्‍यांना सरसकट ३१ रुपये प्रति किलोने ते आंबे विकताना दिसतात. गतवर्षीच्या गारपिटीत त्यांच्या बागेचे मोठे नुकसान झाले होते; पण फवारणी आणि खते देण्याचा इतका बारीक अभ्यास त्यांनी केला की त्यांच्या आंब्याला गारपिटीमुळे तडे गेले नाहीत आणि त्यांना दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न गारपिटीतही मिळालेच. आपण ८१ वर्षांचे आहोत आणि काही करू शकत नाही या टीकेला उत्तर देण्यासाठी आपण आंबा लागवड कशी यशस्वी केली हे उत्तमराव सांगत असतात.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील धामणगावमधील सुनील शिंदे हे शेतकर्‍यांमध्ये संशोधक अभियंता म्हणून प्रसिद्ध आहेत. शेतमजुरांच्या टंचाईने शिंदे हैराण झाले होते आणि त्यांनी स्वतःच पुढे भंगारातून शेतोपयोगी उपकरणे, अवजारे तयार करायला सुरुवात केली. शिंदे यांनी अनेक अचाट प्रयोग केले आहेत. कोणतेही तांत्रिक शिक्षण नसताना या माणसाने राजदूत मोटरसायकलच्या शॉकप्स ते भंगार लोखंडापासून अनेक उपकरणे तयार केलीत. स्वतःच्या आठ एकर शेतात आपलीच उपकरणे शिंदे जेव्हा वापरतात, खर्च कमी करून दाखवतात तेव्हा साहजिकच आजूबाजूचा शेतकरीही त्यांच्याकडे येऊन मार्गदर्शन घेतो आणि यंत्रेही विकत घेतो. छाटणी मशीन, एकबैली दुफण, एका बैलाचे औत, एका जानवळ्याचे औत, बेणे बुजवण्यासाठी अवजार, पेरणी यंत्र, बैलांच्या सहाय्याने चालणारे डिक्स, शॉकप्स मोगडा अशी शिंदे यांची अनेक उपकरणे खेडोपोडी वापरली जातात.

ग्रामीण भागात फिरताना पवन नावाचा एक तरुण मला भेटला होता. २००८ मध्ये त्याच्या वडिलांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. ६ एकर शेती, त्यावर आठ जणांचा परिवार आणि घरात कर्ता म्हणून १५ वर्षांच्या पवनवरच जबाबदारी येऊन पडली होती. वडिलांनी मला शाळेत सोडले आणि शेतात जाऊन आत्महत्या केली, याचा सल पवनला बोचत होता; पण जबाबदारी पडल्यामुळे त्याने आजूबाजूला शेतकर्‍यांशी बोलून आणि शेतीमधील कोणताही अनुभव नसताना आपल्या नववीपर्यंतच्या शिक्षणाच्या जोरावर शेतीचा अभ्यास केला. पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करून सोयाबीन, कापूस आणि हरभरा या तीन पिकांवर भर देऊन आपली कमाल करून दाखवली. वडिलांच्या नावावरील कर्ज फेडले. दोन बहिणींचे शिक्षणही त्याने पूर्ण केले. आता त्याला स्वतःचे शिक्षण पूर्ण करायचे आहे आणि शेतीवरच माझी भिस्त असल्याने आज ना उद्या हाती पैसा आल्यावर मी बारावी पूर्ण करीन आणि शेतीही सुधारेल असे पवन ताठे हा बुलडाण्याचा युवक मला सांगत होता.

शेतीप्रमाणेच शेतमाल विक्रीतही अलीकडे शेतकरी अनेक प्रयोग करत आहेत. ग्राहकांपर्यंत थेट शेतमाल पोहोचवण्यासाठी सांगोला तालुक्यातील शीरबावी या गावातील शेतकर्‍यांच्या गटाने ‘वन-पीस-सेल’ हे तंत्र शोधून काढून पंढरपूर आणि सोलापूरमध्ये जाऊन पालक, कोथिंबीर, कांदा, कोबी, फ्लॉवर, काकडी आदी भाज्यांची विक्री जोरात सुरू केली आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार आणि पाहिजे तेवढीच भाजी शेतकर्‍यांचा हा गट विकत असतो. ताजा, स्वच्छ व निवडलेला भाजीपाला ही शीरबावी शेतकरी मंडळाची खासियत आहे. मंडळातील सदस्य आपल्या शिवारात कोणती पिके घ्यायची हे एका बैठकीत ठरवतात आणि त्यानंतर त्याचे नियोजन करतात. एकमेकांच्या शिवारात जाऊन पिकांविषयीच चर्चाही करतात. यातूनच एक मोठी चळवळ आता उभी राहिली आहे.

अशा अनेक यशोगाथा सांगता येऊ शकतात आणि गावोगाव असे शेतकरी उभे राहतानाही दिसतात; पण शेतीकडे बघण्याच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि शेतकर्‍यांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात येऊ न देण्याच्या राजकारणामुळे शेती व्यवसायाला आणि शेतकर्‍यांनाही बदनाम करण्याचे मोठे षड्यंत्र एका बाजूला अधिक प्रभावीपणे काम करत असल्याने शेतीविषयी असे काही सांगितले तरी त्या दंतकथाच आहेत असे भासवले जाते; पण ग्रामीण महाराष्ट्र शेतीमुळेच संपन्न होता आहेे. शेतीपूरक व्यवसायात शेतकरी गुंतत आहे आणि परिणामी जिल्हा आणि सहकारी बँकांमधील ठेवीचे प्रमाण वाढलेले दिसते. आकडेवारी देऊन हा विषय दहा ओळीतच संपवता आला असता; पण शेती, शेतकरी आणि शेतीचे तंत्रज्ञान बदलते आहे, आत्मसात केले जात आहे, याची जाणीव करून देण्यासाठी एवढ्या विस्ताराने काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. (ज्या वाचकांना वरील यशस्वी शेतकर्‍यांची किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील संपन्न शेतकर्‍यांची नावे आणि संपर्क हवे असतील त्यांनी लेखकाशी संपर्क साधावा, ही विनंती.)

निशिकांत भालेराव
संपादक,
सा. आधुनिक किसान,
औरंगाबाद.
मो. नं. ९८८१०९८१५६
nishikant.bhalerao@gmail.com

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate