অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कृषी आधारित उद्योग

साखर उद्योग :


महाराष्ट्रात साखर उद्योग हा कृषीआधारीत असा प्रमुख उद्योग मानला जातो. ग्रामीण भागातील सुमारे अडीच कोटी लोकांचे जीवन साखर उद्योगावर अवलंबून आहे. साखरेतून महाराष्ट्राला सुमारे २२०० कोटी रूपयांचा महसूल प्राप्त होतो. एका साखर कारखान्यामुळे ऊस लागवडीपासून साखर बाजारपेठेत पोहोचेपर्यंत सर्व प्रकारच्या प्रकियांमध्ये ५००० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होतो. या आकडेवारीवरून महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे स्थान अधोरेखीत होते. राज्यात एकूण २०२ नोंदणीकृत साखर कारखाने असून (यांमधील काही आजारी व बंद) त्यामधून वर्षाला सुमारे १२००० कोटींची उलाढाल होते. साखरेच्या उत्पादनात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत असून २००७ साली सुमारे ८५० लाख टन एवढे साखरेचे विक्रमी उत्पादन झाले.
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना ६० वर्षांची परंपरा आहे. अहमदनगर जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करणारे डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील, ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ, वसंतदादा पाटील, तात्यासाहेब कोरे आदी अनेक लोकांच्या योगदानातून महाराष्ट्रातील ‘सहकार’ क्षेत्र आकाराला आले आहे.
राज्यात सहकारी साखर कारखाना हा केवळ उद्योग राहिलेला नाही, तर ती एक ‘चळवळ’ बनलेली आहे. या चळवळीतून औद्योगिक विकास तर झालाच, शिवाय महाराष्ट्राला अनेक स्तरांवरील सामाजिक व राजकीय नेतृत्वही यांतून प्राप्त झाले. साखर कारखान्यांच्या आसपासच्या परिसरातील मूलभूत सोयी सुविधांचा विकास झपाट्याने झाला. साखर कारखान्याला जोडूनच शिक्षण संकुल उभारण्याची परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. कारखान्यांमार्फत विविध पाटबंधारे योजना, लिफ्ट इरिगेशनसारख्या विकासाच्या योजना राबविल्या जात असून शाळा, महाविद्यालये, दवाखाने यांसारख्या कल्याणकारी संस्था स्थापन केल्या गेल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक विकासाबरोबरच शैक्षणिक व सामाजिक विकासही साधला गेला आहे.

 

 

दुय्यम उत्पादने :


कारखान्यातून साखरेव्यतिरिक्त इतर दुय्यम उत्पादने निर्माण होतात. सुमारे १०० टन ऊस गाळप केल्यास त्यापासून अंदाजे २८ ते ३० टन उसाचे चिपाड, ४ टन मळी, ३ टन गाळलेली राड व सुमारे ०.३ टन भट्टी राख हे घटक बाहेर पडतात. ही दुय्यम उत्पादने इतर उद्योगांचा कच्चा माल ठरतात.

महाराष्ट्र : ऊस व साखर उत्पादन

वर्ष उसाचे क्षेत्र (००० हेक्टर) उत्पादन टन (हेक्टरी) साखर उत्पादन (लाख टन) साखर उतारा (%) साखर कारखाने(संख्या)
१९८०-१९८१ २५६ ९२.०० २८.८५ ११.०७ ८२
१९९०-१९९१ ४४० ९६.५२ ४१.१७ १०.७६ १०२
२०००-२००१ ५९० ५७६ ६७.२ ११.७ १४०
२००१-२००२ उपलब्ध नाही. ४८० ५५.८ ११.२ *१२७
२००२-२००३ उपलब्ध नाही. ५३४ ६२.० उपलब्ध नाही. १५९

(ऊस उत्पादन (लाख टन) * १३ कारखाने अवसायनात , १९९९-२००० ची आकडेवारी)
(संदर्भ : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे पुस्तिका व महाराष्ट्र टाइम्स वार्तापत्र)

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच संबंधित मद्यार्क, रसायने, कागद यांसारख्या उत्पादनांवरही लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील ६ साखर कारखान्यांनी उसाच्या चिपाडापासून, तर दोन कारखान्यांनी जैविक वायूवर आधारित वीजेची सहनिर्मिती सुरू केली आहे.
राज्यातील साखर कारखान्यांनी गोबर गॅस संयंत्रे बांधणे, विहिरी खोदणे, शौचालये बांधणे, पशुखाद्य तयार करणे, कुक्कुटपालन, फळबागांची लागवड आदी उपक्रमांना, उद्योगांना उत्तेजन देऊन ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासास हातभार लावला आहे.

कापड उद्योग :


महाराष्ट्रात आधुनिक पद्धतीने कापड उद्योगाला १५० वर्षांपूर्वी सुरुवात झाली. राज्यातील पहिली कापड गिरणी १८५४ मध्ये मुंबई येथे सुरू झाली, ही देशातील पहिली कापड गिरणी समजली जाते.
मुंबई हे महाराष्ट्रातील कापड उद्योगाचे सर्वांत मोठे केंद्र आहे. समुद्र जवळ असल्यामुळे तेथील दमट हवामान कापडाच्या निर्मितीसाठी पोषक आहे. त्यामुळे तेथे कापड उद्योगाचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. त्याचबरोबर नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नागपूर या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या कापडाचे उत्पादन केले जाते. उदा. येवला (नाशिक) येथील पैठणी, पितांबर तसेच सोलापूर येथील चादरी, नागपुर येथील सूती कापड इत्यादी. तसेच हातमाग व यंत्रमागासाठी इचलकरंजी (कोल्हापूर) व मालेगाव (नाशिक) ही केंद्रे देखील प्रसिद्ध आहेत.

पशुधन   :


महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुधनाला विशेष स्थान आहे. गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, कोंबडी या प्राण्यांचे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये मोलाचे स्थान आहे. सन २००७-०८ मधील कृषी क्षेत्राच्या स्थूल राज्य उत्पन्नात या क्षेत्राचा हिस्सा सुमारे २४% होता. राज्यात दर चौ. कि. मी. मागे पशुधनाची घनता १२० होती (२००७ च्या पशुगणनेनुसार). शेतीपूरक उद्योगांमध्ये दुग्ध-व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय मानला जातो. महाराष्ट्रात शेतकर्‍यांनी दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून स्वीकारल्यामुळे वर्षभर उत्पादन व रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे. राज्यातील सुमारे ६५% शेतकरी शेतीबरोबर दुग्धव्यवसाय करतात. महानंद, गोकूळ, वारणा आदी अनेक दुग्ध व संबंधित उत्पादनांचे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात कार्यरत आहेत. उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक व पशुपालन या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार देणारे हे क्षेत्र आहे.

पशुधन व कुक्कुट उत्पादन

उत्पादन परिमाण २००६-०७
२००७-०८* शेकडा वाढ
दूध ००० मे. टन ६,९७८ ७,१८७ ३.०
अंडी कोटी ३४० ३५१ ३.२
मांस ००० मे. टन २४३ २५० २.९
लोकर लाख कि. गॅ. १६.६७ १६.९६ १.७

(* अस्थायी)
२००६-०७ मधील कृषी क्षेत्राच्या स्थूल राज्य उत्पादनात पशुधनाचा हिस्सा सुमारे २१ % होता.
२००३ च्या पशुगणने नुसार महाराष्ट्रातील पशुधन हे सुमारे ३.७१ कोटी इतके होते.

रेशीम उद्योग :


राज्यातील हवामान रेशीम उद्योगास अनुकूल असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी या उद्योगाच्या विकासास राज्यात भरपूर वाव आहे. देशात अपारंपरिक पद्धतीने रेशीम उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून एकूण रेशीम उत्पादनात ५ व्या स्थानावर आहे. राज्यातील २३ जिल्ह्यात तुती रेशीम विकास कार्यक्रम राबवला जात असून विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये टसर रेशीम विकास प्रकल्प राबवला जात आहे.

मत्स्यव्यवसाय :


महाराष्ट्राला कोकण किनारपट्टी लाभली आहे. सुमारे ७२० कि. मी. चा सागरी किनारा लाभला आहे. यामुळे सागरी मासेमारी हा कोकणचा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. डहाणू, माहीम, वसई, वर्सोवा, अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन, दाभोळ, रत्नागिरी, शिरोड, हर्णै, वेंगूर्ला ही किनार्‍यावरील महत्त्वाची केंद्रे आहेत. सुरमई, पापलेट, कोळंबी, बांगडी, सावस, हलवा अशा अनेक जातींचे मासे कोकण किनारपट्टीवर आढळतात.याशिवाय राज्यातील नद्या, तलाव व धरणांच्या जलाशयांमध्येही गोड्या पाण्यातील मासेमारी चालते. अन्न म्हणून माशांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर तेलनिर्मिती, खतनिर्मिती, सौंदर्यप्रसाधने निर्मिती या उद्योगांमध्येही माशांचा वापर केला जातो. राज्यात ९.१२ लाख चौ. कि. मी. क्षेत्र सागरी, ३.०१ लाख हेक्टर क्षेत्र गोड्या पाण्यातील व ०.१९ लाख हेक्टर क्षेत्र निमखार्‍या पाण्यातील मासेमारीस योग्य आहे. महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादनाचा तक्ता पुढे देत आहोत.

मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या महत्त्वाच्या बाबींची माहिती

घटक परिमाण २००८-०९ २००७-०८* २००६-०७
एकूण मत्स्य उत्पादन
सागरी लाख मे. टन ३.६ ४.१ ४.६
गोड्या पाण्यातील लाख मे. टन १.० १.३ १.३
एकूण ४.६ ५.४ ५.९
मत्स्य उत्पादनाचे एकूण मूल्य
सागरी रु. कोटीत उ. ना. १,५०६
१,४२३
गोड्या पाण्यातील रु. कोटीत उ. ना. ७५५ ६२२
एकूण उ. ना. २,२६१ २,०४५
मत्स्य उत्पादनाची निर्यात
अ) मात्रा लाख मे. टन ०.५ १.० १.४०
ब) मूल्य रु. कोटीत ६८६ १,२३७ १,३४७
सागरी मच्छिमारी बोटी संख्या २७,८१२ २६,१९५** २४,६४४
यापैकी यांत्रिकी संख्या १४,४६९ १४,६६६** १४,५५४
मासे उतरविण्याची केंद्रे संख्या १८४ १८४** १८४

(* डिसेंबर, २००७ पर्यंत, ** अस्थायी, उ. ना. - उपलब्ध नाही.)

-------------------------------------------------------------------------------------------------

 

स्त्रोत: https://www.manase.org/

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate