रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती व पुरेशा शेणखताची अनुपलब्धता यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कोंबड खताच्या वापराकडे कल वाढत आहे. नगदी पिकांना कोंबड खत अधिक फायदेशीर ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर हे गाव बटाटा बियाण्याबरोबरच कोंबड खताची मोठी बाजारपेठ म्हणून विकसित झाली आहे.
मंचरमध्ये गेल्या 40 वर्षांपासून कोंबड खताची खरेदी-विक्री केली जाते. सुरवातीला छोट्या स्वरूपात असलेल्या या व्यवसायाचा विस्तार गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या मंचरमध्ये कोंबड खताचे सुमारे 12 प्रमुख व्यापारी आहेत. आंबेगाव तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये कोंबड खताचे व्यापारी व वाहतूकदारांची साखळी निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरात एकट्या आंबेगाव तालुक्यात सुमारे तीन हजार ट्रक कोंबडखत विक्री झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय जुन्नर, संगमनेर, खेड, पारनेर, शिरूर, बारामती, नगर आदी तालुक्यांमध्येही कोंबडखताचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
बटाटा, कांदा, ऊस, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून कोंबडखताला सर्वाधिक मागणी आहे. सध्या एक ट्रॉली सुक्या कोंबडखताला एक हजार 800 रुपये दर सुरू आहे. सुमारे तीस किलोची गोणी हंगाम व उपलब्धतेनुसार 45 ते 60 रुपयांना विकली जाते. व्यापारी कामशेत, शिक्रापूर, लोणी, कऱ्हाड, सातारा, सांगली, बारामती आदी भागांतील कुक्कुटपालन प्रकल्पांमधून कोंबड खत खरेदी करतात. त्यानंतर खताचा गोणींमधून किंवा थेट ट्रक, टेम्पो किंवा ट्रॅक्टर-ट्रॉलीने शेतकऱ्यांना पुरवठा केला जातो.
व्यापारी व शेतकऱ्यांनी कोंबडखताबाबत सांगितले की, लेअर फार्मवरील कोंबडखत सर्वोत्तम समजले जाते. ब्रॉयलर फार्मवरील कोंबड खत व्यापारी प्रति पक्षी एक रुपया दराने खरेदी करतात. ब्रॉयलर कोंबड्याचा एक "लॉट' 40 दिवसांत तयार होतो. या 40 दिवसांत तयार झालेले खतात तुसाचे प्रमाण जास्त असते. लेअर कोंबड्यांच्या कोंबड खतात विष्ठेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या खताची गुणवत्ता चांगली असते. ब्रॉयलर कोंबड्यांच्या खताचा सध्याचा दर साडेचार हजार रुपये प्रति टेम्पो असा आहे, तर लेअर कोंबड्यांच्या कोंबडखताला सध्या साडेसात हजार रुपये प्रति टेम्पो असा दर मिळतो आहे. साधारणपणे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अडीच टन, टेम्पोमध्ये पाच टन आणि ट्रकमध्ये दहा टन कोंबडखत मावते.
गेल्या काही दिवसांत गोणींमधील खतविक्रीचे प्रमाण कमी झाले असून, शेतकरी एकदम टेम्पो किंवा ट्रकने खत खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. बटाटा उत्पादनासाठी कोंबड खत हे चांगले असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे मंचरमध्ये बटाटा बियाणे घेण्यास आलेले बहुतेक शेतकरी बियाण्याबरोबरच कोंबडखतही विकत घेऊन जातात. एक कट्टा (सुमारे 50 किलो) बियाण्यास दोन गोणी (सुमारे 55 किलो) कोंबडखत वापरले जाते.
खतविक्रीबाबत व्यापाऱ्यांनी सांगितले, की दिवाळीनंतर रब्बी हंगामात कोंबडखताची सर्वाधिक उलाढाल होते. मंचरमध्ये पुणे-नाशिक महामार्गालगत खताच्या खरेदी-विक्री होते. शेतकरी कोरडं खत विकत घेतात. वाहतुकीच्या अंतरानुसार वाहतूक भाडे ठरते. खत टेम्पोत भरण्याचे व खाली करण्याची हमाली प्रति टेम्पो सुमारे एक हजार रुपये आकारली जाते. कांदा व बटाटा लागवडीच्या हंगामात सर्वाधिक उलाढाल होते. उन्हाळ्यात खताची खरेदी-विक्री थंड असते. मे, जूनपासून खतविक्री हंगाम सुरू होतो.
कोंबड खत खरेदी-विक्री व वाहतूक व्यवसायामुळे आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. तालुक्यात गावोगाव कोंबडीखत विक्रेते, वाहतूकदार व शेतकरी यांचे जाळे विकसित झाले आहे. पुरवठादारांबरोबरच प्रत्येक गाडीमागे खत भरण्यासाठी पाच जणांच्या स्थानिक हमाल टोळ्या तयार झाल्या आहेत. त्यांना प्रति दिन सुमारे 200 ते 600 रुपये रोजगार मिळतो. याशिवाय तालुक्यातील मालवाहतूक व्यवसायाला यामुळे पाठबळ मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून कोंबडखताच्या किमती कमी होऊन उपलब्धता वाढल्याने रासायनिक खताला पर्याय म्हणून कोंबडखताचा वापर वाढत असल्याचे चित्र आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सातारा जिल्ह्यात गटशेतीची पाळेमुळे चांगलीच रुजली आ...
येत्या काळातील कडधान्यांची वाढती मागणी लक्षात घेता...
कडधान्य पिकांचे मानवी आह्यरात महत्वाचे स्थान आहे. ...
उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत हिंगोली शहरात जिल्ह...