অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेशीम उद्योग-किटक संगोपन

रेशीम उद्योग-किटक संगोपन

रेशीम उद्योग-किटक संगोपन

अंडी, अळी, कोष, पतंग, हे रेशीम किटकाचे जीवनचक्र आहे. यातील कोष, पतंग, अंडी या रेशीम अंडीपुंज निर्मितीच्या आवश्यक अवस्था आहे. अंडी, अळी, कोष या रेशीमअळी संगोपनाच्या आवश्यक अवस्था आहेत. रेशीम अळयांचे आयुष्य सर्वसामान्यपणे 28 दिवसांचे असून ते पाच अळी वाढीच्या अवस्था व चार कात टाकण्याच्या (सुप्तावस्था) यात विभागते. यापैकी रेशीम अंडीपुंजांतून रेशीम अळया बाहेर पडण्यापासून रेशीम अळयांच्या पहिल्या दोन वाढीच्या अवस्था व पहिल्या दोन कात टाकण्याच्या अवस्था या रेशीम बालअळी संगोपनात मोडतात तर पुढील तीन वाढीच्या अवस्था व दोन सुप्तावस्था या प्रौढ अळी संगोपनात येतात. आता आपण बालअळी संगोपनाबाबत माहिती घेणार आहोत.

आवश्यक किंवा योग्य जातीची अंडीपुंज शेतकऱ्याने मागणी केल्यानंतर ती मिळाल्यापासून ती ज्या दिवशी अंडयावर काळसर ठिपका दिसतो तो अळया येण्यापूर्वी दोन दिवस अगोदरचा असतो. या दिवशी किंवा यापूर्वी अळया अंधारात व हवेशीर ठेवून दोन दिवसांनंतर अळया उजेडात येणे व सर्व अळयांना एकाच वेळी बाहेर येवू देणे यास अंधारपेटी पध्दत (ब्लॅक बॉक्सीग) म्हणतात. ही यशस्वी संगोपनासाठी अत्यावश्यक बाब आहे. यानंतर अळया ट्रे मध्ये घेऊन त्यांना तुतीचा पाला 1 से.मी. ग 1 से.मी. आकाराने खाऊ घातला जातो.

बालअळी संगोपनासाठी लागणारा पाला हा कोवळा, लुसलुशीत व पानामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असलेला वरचा वाढीव कोंब सोडून खालील तीन ते चार पाने या अवस्थांना उपयोगी पडतात. ही पाने अतिशय कसदार व जोमदार असणे आवश्यक आहे. याकरिता स्वतंत्र तुतीची बाग अगर एकूण तुती लागवडीतील एका बाजूच्या दोन ते चार ओळी खत पाणी निगा याबाबतीत विशेष लक्ष देवून जोपासल्या जातात. यामुळे अळयांना कसदार खाद्य मिळाल्याने त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते व प्रौढ अवस्थेमध्ये ही रोगप्रतिकार शक्ती अळयांना रोगापासून दूर ठेवते व भरघोस कोष उत्पादन देण्यास मदत करते. अंडयातून अळया एकाचवेळी बाहेर येण्यासाठी अंधारपेटी पध्दत वापरणे व अळयांना पाला खायला घालून अळया ट्रे मध्ये घेणे यास ब्रशिंग असे म्हणतात. ब्रशिंग दोन प्रकारे घेण्यात येते.

कागदावर चिकटलेल्या अंडीपुंजाचे ब्रशिंग

21ध्2 मोकळया कागदावर न चिकटलेल्या, लूज अंडीपुजांचे ब्रशिंग कागदावर चिकटलेल्या अंडीपुंजांचे ब्रशिंग घेण्यासाठी कागद ट्रे मध्ये पसरुन झाकून ठेवणे व सर्व अळया एकदम बाहेर आल्यानंतर कागदावर 2 से.मी. आकाराचा पाला पसरणे व तुती पाल्याच्या वासाने रेशीम अळया पाल्यावर आल्यानंतर तो पाला ट्रे मध्ये घेवून त्यास अळयांना वाढीस आवश्यक जागा उपलब्ध करुन द्यावी लागते व त्यानुसार प्लॅस्टिक ट्रे वापरले जातात. मोकळया अंडयांचे ब्रशिंग घेतांना त्यासाठी मिळणारे खास ट्रे घेवून त्यामध्ये जाळीदार कापड दोन थरात अंथरुन त्यावर ही अंडी पसरावीत व काळया कागद अगर कापडाने झाकावीत.

सर्व अळया बाहेर आल्यानंरतर तुतीचा पाला कापून खायला देण्यात यावा व सर्व अळया पाल्यावर आल्यानंतर वरच्या जाळीसह अळया उचलून घ्याव्यात व ट्रे मध्ये घेवून त्यांना योग्य ती जागा द्यावी. 100 अंडीपुंज म्हणजे साधारणपणे 45 हजार अंडयातून अंदाजे 40 हजार अळया किमान मिळतात. याकरिता पहिल्या अवस्थेच्या सुरुवातीस (अंडयातून बाहेर आल्यानंतर)4 चौ.फुट जागा देण्यात यावी. पहिली अवस्था साडेतीन दिवसांची असून यामध्ये शेवटी हे अंतर 15 चौ.फूटपर्यंत वाढवावे. याचा अर्थ या अळयांच्या वाढीसाठी अवस्थेच्या सुरुवातीस 1 ट्रे लागतो व अवस्थेच्या शेवटी 3 ट्रे लागतात. याकाळात अळी 0.15 मिलीग्रॅम पासून 2.00 मिलीग्रॅमपर्यंत वाढते. या वाढीकरिता त्यांना 90 टक्के आर्द्रता व 280 सें.ग्रे. तपमान लागते.

या अवस्थेत सगळयात जास्त म्हणजे 64 टक्के पचनशक्ती असते. या काळात त्या एकूण लागणाऱ्या पाल्याच्या 0.04 टक्के म्हणजे ग्रॅम पाला खातात. या काळातील त्यांची वाढ ही अंडयातून बाहेर आलेल्या आकारमानाच्या 15 पट या अवस्थेच्या शेवटी वाढ होते. यामुळे या अवस्थेत त्यांची काळजी घेणे, निर्जंतुक कोवळा व लुसलुशीत पाला खाऊ घालणे आणि जिवाणू, विषाणू व बुरशीजन्य रोगापासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. पहिल्या अवस्थेच्या शेवटी म्हणजेच साडेतीन दिवस अगर 84 तासानंतर पहिल्या अवस्थेतील तपमान व आर्द्रता योग्य असल्यास सर्व अळया साधारणपणे एकाचवेळी एकसारख्या वाढतात त्यांच्या अंगावरील कात ही पूर्ण वाढीमुळे ताणली जावून अळयावर एकप्रकारे चकाकी येते ही ताणली गेलेली कात अळया टाकून देवून आतून येणारी नवीन कात धारण करतात. या कात टाकण्याच्या अवस्थेस सुप्तावस्था असे म्हणतात. कारण या काळात अळी हालचाल न करता शांत मान वर करुन बसून राहते. पहिली कात टाकण्याची अवस्था 20 तास राहते. या काळात अळी हालचाल करीत नाही अगर पाने खात नाही. 75 टक्क्यापेक्षा अधिक अळया सुप्तावस्थेस बसल्यानंतर खाणे देणे थांबविले जाते यास मोल्ट बसविणे असे म्हणतात. सुप्तावस्थेच्या काळात वातावरण कोरडे ठेवले जाते यामुळे अंगावरील कात निघून जाण्यास हे वातावरण उपयुक्त ठरते. 20 तासानंतर अळया पुन्हा हालचाल करु लागतात त्यावेळी पुन्हा मोठया आकाराचा पाला खायला दिला जातो. यास मोल्ट उठविणे असे म्हणतात. यावेळी अळी दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करते.

अळीची दुसरी अवस्था अडीच दिवसांची म्हणजेच 60 तासांची असते. या काळात अळया दोन मिलीग्रॅमपासून 13 मिलीग्रॅमपर्यंत वाढतात. या अवस्थेच्या सुरुवातीस त्यांना 15 चौ.फूट जागा लागते व अवस्थेच्या शेवटी ती 45 चौ.फुटापर्यंत वाढलेली असते. या काळात 85 टक्के आर्द्रता व 27 डि.सें.ग्रे. तपमान लागते. याकाळात त्यांची पचनशक्ती 52 टक्के असते. या अवस्थेत त्यांचे पाला खाण्याचे प्रमाणे 0.96 टक्के म्हणजे इतके ग्रॅम असून या काळात त्यांची वाढ पहिल्या अवस्थेच्या शेवटच्या आकारमानापेक्षा सहा ते साडेसहा पट आकारमानाने वाढ होते. याचा अर्थ या अळयांच्या वाढीसाठी अवस्थेच्या सुरुवातीस 3 ट्रे लागतात व अवस्थेच्या शेवटी 8 ट्रे लागतात. दुसऱ्या अवस्थेच्या शेवटी अळयांची वाढ पूर्ण झाल्यामुळे त्यावर चकाकी येत व अळया कात टाकण्याकरिता शांतपणे बसून राहतात यास दुसरा मोल्ट असे म्हणतात. ही अवस्था 24 तास राहते. पहिल्या मोल्टप्रमाणेच याही मोल्टमध्ये कात निघून जाण्यासाठी हवामान कोरडे ठेवतात. यानंतर अळी तिसऱ्या अवस्थमध्ये प्रवेश करते. त्यापूर्वीच मोल्ट अवस्थेमध्ये या सर्व अळया चॉकी अगर बालअळी संगोपनातून स्वतंत्र प्रौढ अळी संगोपनगश्हात नेल्या जातात. अशा रितीने लहान अळयांची अगर बाल अळयांची जोपासना केली जाते. याकरिता स्वतंत्र छोटी उबदार व हवेशीर खोली संगोपनाकरिता वापरली जाते या सर्व पध्दतीस चॉकी अगर बालअळी संगोपन असे म्हणतात.

या काळात तुतीचा पाला तोडून त्यावरील धूळ ओल्या फडक्याने पुसून ओलसर पाने कापून अळयांना खाऊ घातली जातात प्रौढ अळी संगोपन दुसऱ्या मोल्टमध्ये पास झाल्यानंतर रेशीम अळया किटकसंगोपनासाठी बांधलेल्या स्वतंत्र संगोपनगश्हामध्ये नेल्या जातात व आळयांना तुतीचा पाला फांदीच्या स्वरुपात खायला द्यायला सुरुवात करतात. यावेळी अळी तिसऱ्या अवस्थेत प्रवेश करते. या तिसऱ्या अवस्थेपासून पाचव्या अवस्थेपर्यंत अळयांची वाढ या संगोपनगश्हात होते. पूर्ण वाढ झालेल्या अळया पिवळसर, पारदर्शक व आखूड होतात व या अवस्थेमध्ये त्यांना कोषिकांचा आधार मिळाल्यास त्या कोष बांधतात. कोष बांधायला सुरुवात केल्यापासून 4 थ्या दिवशी कोष काढले जातात व स्वच्छ करुन विक्री केले जातात. यास प्रौढ अळी संगोपन असे म्हणतात.

तिसरी अवस्था ही साडेतीन दिवसाची असते. व सुरुवातीस अळयांचे वजन 13 ते 14 मिलीग्रॅमच्या जवळ असते. ते 60-62 ग्रॅमच्या जवळ अखेरीस त्यांचे वजन वाढते. या अवस्थेस पाला पध्दत बदलून फांदी पध्दत सुरु होते. या अवस्थेच्या सुरुवातीची अळयांना लागणारी जागा 100 चो.फुटापासून सुरु होवून अवस्थेच्या अखेरपर्यंत ती 200 चौ.फुटापर्यंत वाढते. सापेक्ष आर्द्रता 80 टक्के व तपमान 26 डी.सें.ग्रे. या अवस्थेस अत्यंत अनुकूल आहे. या काळात पचनशक्ती ही 43 टक्केच्या जवळपास असून पाला खाण्याचे प्रमाण फांदी पध्दतीमध्ये एकूण त्या अवस्थेत 150 किलो लागते. हे एकूण खाण्याच्या 5 टक्के येतो. या काळात दुसऱ्या अवस्थेच्या तुलनेत अळयाच्या वाढीच्या साडेचार पट वाढ या अवस्थेत होते. तिसऱ्या अवस्थेच्या शेवटी अळयांची वाढ पूर्ण झाल्यामुळे त्यावर चकाकी येते व अळया कात टाकण्याकरिता शांतपणे बसून राहतात यास तिसरा मोल्ट असे म्हणतात. ही अवस्था 24 तास राहते. दुसऱ्या मोल्टप्रमाणेच याही मोल्टमध्ये कात निघून जाण्यासाठी हवामान कोरडे ठेवतात. यानंतर अळी चौथ्या अवस्थेमध्ये प्रवेश करते. या मोल्टच्या अवस्थेमध्येही तुतीचा पाला खायला देणे पूर्णपणे थांबविलेले असते. चौथी अवस्था ही चार दिवसांची असून या अवस्थेमध्ये सुरुवातीस अळीचे वजन 70 मिली ग्रॅम पासून 3 ग्रॅम पर्यंत वजन वाढते. या अवस्थेच्या सुरुवातीस 200 चौ.फूट जागा लागते व या अवस्थेच्या शेवटीपर्यंत ती 400 चौ.फुटापर्यंत लागते. सापेक्ष आर्द्रता 75 टक्के व तपमान 250 सेल्सीअस लागते. या काळात तिची पचनशक्ती 42 टक्के असून 100 अंडीपुंजांतील अळया एकूण 500 किलोच्या जवळपास फांदीसह पाला खातात. हा पाला एकूण लागणाऱ्या पाल्याच्या 17 टक्के असतो. या काळात तिसऱ्या अवस्थेच्या शेवटी असणाऱ्या आकारमानाच्या 5 पट वाढ या अवस्थेत होते.

चौथा मोल्ट हा कात टाकण्याची सगळयात शेवटची अवस्था होय. चौथ्या अवस्थेच्या शेवटी अळयांची वाढ पूर्ण झाल्यामुळे त्यावर चकाकी येते व अळया कात टाकण्याकरिता शांतपणे बसून राहतात यास चौथा मोल्ट असे म्हणतात. ही अवस्था 30 तास राहते. तिसऱ्या मोल्टप्रमाणेच याही मोल्टमध्ये कात निघून जाण्यासाठी हवामान कोरडे ठेवतात. यानंतर अळी पाचव्या अवस्थेमध्ये प्रवेश करते. या मोल्टच्या अवस्थेमध्येही तुतीचा पाला खायला देणे पूर्णपणे थांबविलेले असते. पाचवी अवस्था ही अळीच्या जीवनातील शेवटची वाढीची अवस्था होय. या अवस्थेमध्ये पूर्ण वाढलेल्या अळीचे वजन 6-7 ग्रॅम जाते. या अवस्थेत लागणारी जागा 400 चौ.फूटापासून 800 चौ.फूटापर्यंत वाढते. सापेक्ष आर्द्रता 70 टक्के व 240 सेल्सीअस तपमान या अवस्थेस उपयुक्त ठरते. या काळात पचनशक्ती 38-39 टक्केच्या जवळपास असून, एकूण पाल्याच्या 80 टक्के पाला म्हणजे जवळपास 2 ते अडीच हजार किलो पर्यंत पाला फांदीसह या काळात लागतो. चौथ्या अवस्थेच्या शेवटी असलेल्या आकारमानाच्या 5 पट आकारमान या काळात वाढते. शेवटच्या तीन-चार दिवसांत अळयांना जुना पाला लागतो व खाल्लेल्या सर्व पाल्याचे रेशीम ग्रंथीमध्ये रेशीम तयार होते. यामुळे अळया पिवळसर, पारदर्शक दिसतात व थोडया आखूड होतात. दोन दिवसांत कोषिकेवर कोष विणतात.नंतरचे दोन दिवस हे कोष वाळून टणक होवू द्यावे लागतात व पाचव्या दिवशी ते काढून विक्रीस योग्य होतात. कवच टक्केवारीनुसार रु 75 ते रु 130 या. दराने शासन हमी भावाने ते खरेदी करते. यामुळे शेतकऱ्यास प्रति एकरी वार्षिक 50-60 हजार रुपये एकूण उत्पन्न मिळते व दुसऱ्या वर्षापासून 20 टक्के खर्च वजा जाता 45-50 हजार रुपये निव्वळ उत्पन्न शेतकऱ्यांस किमान चार पिकात प्राप्त होते.

 

- रेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन

स्त्रोत : रेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate