অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेशीम उद्योग - येवला पैठणी

रेशीम उद्योग - येवला पैठणी

येवला पैठणी ''पैठणी'' हा शब्द खास करुन अस्सल सोन्या-चांदीच्या जरीमध्ये व विशिष्ठ नक्षीदार विणलेल्या पदराच्या गर्भरेशमी साडीशी निगडीत आहे. पैठणी खास करुन औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे पूर्वी तयार होत असल्याने अशा या विशिष्ठ साडीस पैठणी हे नाव पडले आहे. पैठणीचे उत्पादन स्वातंत्रपूर्व कालापर्यंत राजाश्रयाने चालत आले. राजाश्रय संपल्यानंतर याचे खास कारागीरांना रोजगार नाहीसा झाल्याने तेथून ते विस्कळीत झाले व जुन्या विणकामामध्ये काम मिळेल तेथे समावेश होत गेले. बनारसी पध्दतीचा शालू, साडी व फेटे करु लागले. त्यातील काही कसबी कामगार किंवा कारागीर निजामशाहीच्या हद्दीबाहेरचे गाव येवला येथे येऊन स्थायिक झाले. महाराष्ट्रातील येवला व पैठण येथे तयार होणारी पैठणी जगात प्रसिध्द असून तिला परदेशातून मागणी आहे.

पैठणी तयार करणे ही पैठण व येवला येथील पारंपारीक कला आहे. सन 1973 मध्ये हिमरु पैठणी मश्रूम प्रदर्शनात मांडली गेली व त्यास चांगली प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर 75-76 मध्ये येवल्यातील कारागीरांनी पैठणी प्रदर्शनात ठेवली व त्यावेळेस येवल्यात असलेल्या कारागीरांना सुमारे 5 वर्ष पुरेल असे काम मिळाले व 74-75 पासून येवला पैठणी अस्तित्वात आली. 1977 मध्ये पहिले हातमाग प्रदर्शनामध्ये येवला पैठणीने प्रसिध्दी मिळविली. त्यावेळी अवघे 100 माग येवला येथे होते. आज येवला, नागडे, वडगांव, बल्लेगांव, सुकी 1ध्4गणेशपूर1ध्2 या गावामध्ये एकूण 850 कुटुंबे 2200 मागावर आपला व्यवसाय करीत आहेत. यातील काही कारागिरांनी राष्ट्रपती पुरस्कार, राज्य पुरस्कार व इतरही काही पुरस्कार मिळविले आहेत. येवला आणि उपरोक्त परिसरातील कारागीर हे क्षत्रिय खत्री, साळी, कोष्टी, मराठा, नागपूरी समाजातील आहेत. आर्थिक दश्ष्टया उपरोक्त कारागीरांची प्रामुख्याने वर्गीकरण करता येईल.

1. कोणतेही भांडवल उपलब्ध नसलेले उधारीवर कच्चा माल आणून पैठणी तयार करुन देणारे 
2. कच्चा माल खरेदी करुन पैठणी तयार करुन देणारे 
3. कच्चा माल देऊन पैठणी तयार करवून घेणारे व्यापारी

इ.डी.पी. अंतर्गत 25 कारागिरांचे सेंट्रल सिल्क बोर्ड यांचे सहकार्याने 1 महिन्याचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यापैकी 2 प्रशिक्षणार्थंींनी आपली प्रगती केली आहे. पैठणीमध्ये प्रामुख्याने सेमी पैठणी, सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर आणि रिच पदर असे पाच प्रकार दिसून येतात. याशिवाय पदराच्या व काठ यांच्या विशिष्ठ नक्षीकामानुसार मुनिया ब्रॉकेट व ब्रॉकेट असे वर्गीकरण करता येते. तसेच विणकाम पध्दतीनुसार एकधोटी व तीन धोटी असेही प्रकार दिसून येतात. सिंगल पदरमध्ये काठ नारळाच्या नक्षीचा काठ व पदरामध्ये तीन मोर जोडीचे नक्षीकाम केलेले असते, डबल पदरामध्ये नारळ काठ व सात मोर जोडीचे नक्षीकाम केलेले असते. यासाठी रेशीम धागा वापरला जातो.

टिशू पदरामध्ये जर शक्यतो त्रिम वापरली जाते व पदरामध्ये बारा मोर अगर कोयरी तीन ओळीत नक्षीकाम केलेले असते. रिच पदरमध्ये ग्राहकाच्या पसंतीनुसार पदराच्या नक्षीकामाची निवड केली जाते. सिंगल पदर 18-21 इंचाचा तर डबल पदर 28-32 इंचाचा असतो. सिंगल पदर पैठणीस 4 ते 5 दिवस, डबल पदर पैठणीस 7 ते 8 दिवस, टिशू पदर 1 ते दीड महिना व रिच पदर पैठणीस 4-6 महिने विणकामास लागतात. पदराच्या नंतर एक मीटर पर्यंत बुटी 3 इंच अंतरावरती व त्यानंतरच्या 6 इंच अंतरावर असतात. यामुळे 3 इंच अंतरावर असलेल्या दाट बुटयांचा भाग हा पदरानंतर दर्शनी भागावर येतो तर विरळ बुटयांचा भाग हा नि-यांमध्ये जातो त्यामुळे पैठणी उठावदार दिसते.

मुनिया ब्रॉकेट पैठणीचे वैशिष्ठय म्हणजे काठ लहान व पोपटाची चोच लांब असते यामध्ये सिंगल पदर, डबल पदर आणि रिच पदर येऊ शकतात. ब्रॉकेट पैठणीमध्ये राजहंस, मोर, पोपट, आसावली व कमळ यांचे नक्षीकाम पदरामध्ये ग्राहकांच्या पसंतीने केले जाते. एक धोटीमध्ये सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर, रिच पदर हे प्रकार येतात. तीन धोटीमध्येही सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर, रिच पदर हे प्रकार येतात. यास कडियल किंवा परती असेही म्हणतात. पैठणी साडीची किंमत साधारणपणे रु.2500 पासून 3 लाख रुपयापर्यंत असते. मध्यम व उच्चवर्गीय ग्राहक 5 ते 10 हजारापर्यंतची पैठणी पसंत करतात.

 

स्त्रोत : रेशीम संचालनालय, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate