অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतीपूरक उद्योगातून आर्थिक समृदधी

शेतीपूरक उद्योगातून आर्थिक समृदधी

राष्‍ट्रीय कृषी तंत्रज्ञान प्रकल्‍प व महाराष्‍ट्र स्‍पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्‍पाने दिले बळ

राष्‍ट्रीय कृषी तंत्रज्ञान प्रकल्‍प (आत्‍मा) व महाराष्‍ट्र स्‍पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्‍पा अंतर्गत राहता तालुक्‍यातील पुणतांबा येथे शेतक-यांनी पुण्‍यस्‍तंभ शेतकरी उत्‍पादक कंपनी स्‍थापन करून 245 शेतकरी कुटुंबांच्‍या कौटुंबिक अर्थव्‍यवस्‍थेला आधार दिला आहे. विशेष म्‍हणजे वर्षभरात या महिलांनी मोठी आर्थिक उलाढाल केली असून ग्रामिण भागात शेतीक्षेत्रात रोजगार निमिर्तीचे पथदर्शी काम उभे केले आहे.

राहाता तालुका मुख्‍यालयापासून 20 किलोमीटर अंतरावर पुणतांबा नावाचे गाव आहे. गावातील बहुतांश कुटुंबाचा शेती हाच मुख्‍य व्‍यवसाय. गावातील 19 गटातील सदस्‍यांनी एकत्र येत शेतकरी उत्‍पादक कंपनी स्‍थापन करण्‍याचा निर्णय घेत कृतीची जोड दिली. शेतकरी उत्‍पादक कंपनीची उभारणी करण्‍यासाठी शासकीय अनुदान देण्‍याच्‍या योजनेचा लाभ घेत गावातील शेतकरी एकत्र येत पुण्‍यस्‍तंभ शेतकरी उत्‍पादक कंपनीची उभारणी केली, यामध्‍ये 25 टक्‍के लोकवाटा शेतकरी उत्‍पादक कंपनीच्‍या संचालकांनी उचलला. यासोबतच त्‍यांना यांत्रिक मशिनरी उभारणीसाठीही अनुदान देण्‍यात आले. अध्‍यक्षपदाचा भार सुनिता धनवटे यांच्‍याकडे तर विजय धनवटे उपाध्‍यक्ष, तर सचिव पदाची जबाबदारी पाराजी वरखड सांभाळतात. बापूसाहेब तोडमल, नामदेव धनवटे संचालक पदावर काम करतात. यासोबतच सहा प्रवर्तकांचाही सहभाग महत्‍वाचा आहे.

शेतकरी अभ्यास दौ-यातून धडे

शेतीमध्ये उत्कृष्‍ट काम करणा-या व यशस्वी विक्री करणारे शेतकरी, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, खाजगी संस्था इत्यादी ठिकाणी शेतक-यांना आत्मा अंतर्गत अभ्यास दौ-यासाठी पाठविण्यात येते. या माध्यमातून पुण्‍यस्‍तंभ शेतकरी उत्‍पादक कंपनीच्‍या सदस्‍यांना बाजारपेठेतील विक्री कौशल्‍याची माहिती होण्‍यासाठी सुरत येथील बिल्‍लीमोरा बाजारपेठेत विक्री कौशल्‍यासोबतच सविस्‍तर धडे देण्‍यात आले, त्‍याचा फायदा शेतकरी उत्‍पादक कंपनीच्‍या शेतीमाल खरेदीविक्री करताना झाल्‍याचे अध्‍यक्षा सुनिता धनवटे सांगतात. जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, आत्‍माचे प्रकल्‍प संचालक भाऊसाहेब ब-हाटे, उप विभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तालुका कृषी अधिकारी दादासाहेब गायकवाड,आत्‍माचे तालुका तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक नंदकुमार घोडके, सहायक व्‍यवस्‍थापक राजदत्‍त गोरे, कृषी सहायक डी. एल. चव्‍हाण यांचे मार्गदर्शन महत्‍वाचे ठरते.

किसान गोष्‍टीतून चारानिर्मितीचे धडे

आत्‍मा अंतर्गत पुण्‍यस्‍तंभ शेतकरी उत्‍पादक कंपनीस्‍थळी क्षेत्रीय किसान गोष्‍टी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले. या माध्‍यमातून शेतक-यांना हायड्रोपोनिक्‍स, मुरघास, अॅझोला तंत्रज्ञानाद्वारे सकस चारा निर्मितीबाबत प्रशिक्षण मिळाले. निमगाव पागा येथील तज्ञ शेतकरी अनिल कानवडे यांनी मार्गदर्शन केल्‍याने शेतक-यांना समजणेही सोपे झाले. दुग्‍धउत्‍पादक शेतक-यांना चारा निर्मिती करताना किसान गोष्‍टी कार्यक्रमातील मार्गदर्शनाचा लाभ झाला असून शेतकरी सकस चारानिर्मिती करू लागले आहेत.

उत्‍पादकता वाढीसाठी पीक प्रात्‍यक्षिके

आत्‍मा अंतर्गत थेट शेतीवर पीक प्रात्‍यक्षिके घेण्‍यात आली. 40 एकर क्षेत्रावर पीक प्रात्‍य‍क्षिक घेण्‍यात आले. यातून उत्‍पादकता वाढीबाबत शेतक-यांना सविस्‍तर मार्गदर्शन करण्‍यात आले. तूर लागवड ते काढणीपर्यंत कृषी यंत्रणेच्‍या मार्गदर्शनाचा लाभ शेतक-यांना झाला आहे.

मका व तूर खरेदीतून मोठी उलाढाल

आत्‍मा व महाराष्‍ट्र स्‍पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून मका व तूर खरेदी केंद्र सुरू करण्‍यात आले. आत्‍माचे प्रकल्‍प संचालक भाऊसाहेब ब-हाटे यांच्‍या उपस्थितीत खरेदी केंद्राला प्रारंभ झाला. 1500 क्विंटल तूर खरेदी, 460 क्विंटल मका खरेदी करण्‍यात आली. यामध्‍ये 100 रूपये प्रति क्विंटल दराने प्रतवारी करण्‍यात आली. यातून कंपनीला 1 लाख 96 हजार रूपयांचा निव्‍वळ नफा मिळाल्‍याचे अध्‍यक्षा श्रीमती धनवटे सांगतात.

  ठळक वैशिष्ट्ये
 • -245 शेतक-यांचा सहभाग
 • -40 शेतक-यांकडे तूर पीक प्रात्‍यक्षिक घेण्‍यात आले.
 • -प्रात्‍यक्षिकात सहभागी सर्व सभासद शेतक-यांची तूरीची हमीभावाने खरेदी
 • -शासनाचे आधारभूत खरेदी केंद्र सूरू करून 1350 क्विंटल तूर खरेदी
 • -खरिप हंगामात 3 हजार हेक्‍टरवर मका प्रात्‍यक्षिक घेण्‍यात आले.
 • -कंपनीचे कृषी सेवा केंद्र व पशूखाद्य युनिट लवकरच सुरू करण्‍यात येत आहे.
 • -शेतकरी उत्‍पादक कंपनीमुळे पुणतांबा व लगतच्‍या गावातील शेतकरी यांना विविध सुविधा व उपक्रम राबविल्‍यामुळे शेतक-यांना लाभ होत आहे.
 • लेखक - गणेश फुंदे, प्र. माहिती अधिकारी,

  उप माहिती कार्यालय शिर्डी

  माहिती स्रोत : महान्यूज  © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate