অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अवकाळी पावसामध्ये विविध पिकांमध्ये घ्यावयाची काळजी

अवकाळी पडलेल्या किंवा पडत असलेल्या पावसामुळे विविध भाज्या व फळबागामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी खालील उपाययोजनाचा अवलंब फायदेशीर ठरेल.

पाणी व्यवस्थापन उपाययोजना

1) सध्या पडलेल्या आणि पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे सर्व पीक क्षेत्रातील अतिरिक्त पाण्याचा निचरा तत्काळ करावा.
2) ओलीचा फायदा पुरेपूर करून घेण्यासाठी वापश्‍यावर रब्बी पिकांची पेरणी करावी.
3) कापून/काढून शेतात पडलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र त्यावर शक्‍य त्या उपाययोजना करून नुकसान टाळण्याचे प्रयत्न करावेत.
4) काढणीयोग्य उभ्या अवस्थेतील पिकांची काढणी/ मळणी पाऊस थांबल्यानंतरच करावी.

कडधान्य, भाजीपाला व फळपिकामध्ये घ्यावयाची काळजी

1) तूर व हरभरा पिकासाठी सध्याचा पाऊस उपयुक्त आहे.
2) हरभऱ्यावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस (25 ईसी) 1000 मि.लि. प्रतिहेक्‍टरी 500 लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा एचएएनपीव्ही 500 मि.लि. प्रति 500 लिटर पाण्यातून फवारावे.
3) हरभऱ्याच्या उशिरा पेरणीकरिता शक्‍यतो/ शक्‍य असल्यास दिग्विजय वाणाची निवड करावी.

1) खरीप कांद्याची काढणी पाऊस थांबल्यानंतर, वाफसा आल्यावर करावी. 
2) काढणी झालेला खरीप कांदा पातीसकट कोरड्या जागेत सुकवावा. 
3) रब्बी हंगामासाठी पेरलेल्या रोपवाटिकेतील पाणी बाहेर काढून द्यावे व रोपांना नत्राचा हलका हप्ता द्यावा.

आंबा

आंब्यावर फुलकिडे तसेच तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. खालील कीटकनाशकांची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • क्विनॉलफॉस 20 मि.लि. अथवा थायामेथोक्‍झाम 4 ग्रॅम अथवा इमिडॅक्‍लोप्रिड 4 मि.लि.
  • अथवा मेटॅरिझीयम अनासोप्ली 50 ग्रॅम.

मोसंबी/लिंबू/संत्रा/पेरू

या पिकांवर कोवळ्या फुटीवर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी फवारणी डायमिथोएट 15 मि.लि. अथवा थायामेथोक्‍झाम 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी.

हस्त बहर व आंबे बहराच्या डाळिंब फळबागेचे व्यवस्थापन

ऑक्‍टोबर - नोव्हेंबर महिन्यात विशेषतः तापमानात झालेली वाढ व त्यानंतर आलेल्या अवेळी पावसामुळे रोगाचे व किडीचे सुप्तावस्थेत असलेल्या जीवाणू व किडी यांचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. 
अ) रस शोषणाऱ्या व फळ पोखरणाऱ्या किडींचे नियंत्रण

(फुलकिडे, मावा, पांढरी माशी व सुरसा)
1) रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशकांच्या मेटारायझीम किंवा व्हर्टीसिलियम लेकॅनी 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात याप्रमाणे 2 फवारण्या 8 दिवसांच्या अंतराने घ्याव्यात. 
2) फुलकिडीचा प्रादुर्भावासाठी, प्रति 10 लिटर पाण्यात स्पिनोसॅड (2.5 टक्के एससी) 10 मि.लि. 
मावा, पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी, ऍसिटॅमिप्रीड (20 एसपी) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात. 
3) फळावर असलेल्या फळबागेमध्ये फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, इमामेक्‍टीन बेन्झोएट 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात.
ब) बुरशीजन्य रोग
अल्टरनेरिया, सर्कोस्पोरा, कोलेटोट्रिकम बुरशी - 
डाळिंब फळपिकावर फुले व फळांवर येणाऱ्या या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी बोर्डोमिश्रण 1 टक्का किंवा मॅन्कोझेब 25 ग्रॅम अधिक कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 20 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम किंवा कॅप्टन 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी.
क) तेलकट डाग रोगाचा प्रसार

  • तेलकट डाग रोगाचा प्रसार हा दमट वातावरणात, हवेतून, वादळी पावसामार्फत मोठ्या प्रमाणात होतो.
  • तसेच रोगग्रस्त मातृवृक्षापासून गुट्यांमार्फत होतो.
  • रोगग्रस्त झाडांवरील विशेषतः फळांवर तसेच पाने, फांद्या, खोडांवर तसेच बागेतील जमिनीमध्ये रोगाचे जीवाणू दीर्घकाळापर्यंत (3-4 वर्षे) सुप्तावस्थेत राहतात व अनुकूल दमट वातावरण त्यांचा प्रसार हवेमार्फत 8-10 किलोमीटर अंतरावरील परिसरात होतो.

बागेची स्वच्छता हा या रोगाच्या नियंत्रणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे


1) बागेतील रोगट झाडावरील पाने, फुले व फांद्या छाटून जाळाव्यात. (खड्ड्यात गाडू अथवा इतरत्र टाकू नये.) 
2) बागेतील आवारात विखरून पडलेला रोगयुक्त अवशेष झाडून गोळा करावेत. जाळून नष्ट करावेत. 
3) अशा झाडांवर ब्रोमोपॉल (2 ब्रोमो 2 नायट्रोप्रोपेन 1-3 डायोल) (500 पीपीएम) 0.5 ग्रॅम अधिक कॅप्टन हे बुरशीनाशक 2.5 ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात फवारावे. 
4) बागेमध्ये प्रतिहेक्‍टरी 60 किलो ब्लिचिंग पावडर किंवा 4 टक्के कॉपर डस्ट 25 प्रमाणे धुरळणी जमिनीवर करावी. 
5) त्यानंतर 2 ब्रोमो 2 नायट्रोप्रोपेन 1-3 डायोल (250 पीपीएम) 0.25 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे पुन्हा एकदा फवारणी करावी. त्यानंतर 10 दिवसांच्या अंतराने 1 टक्का बोर्डोमिश्रण आणि कॅप्टन 2.5 ग्रॅम/ लिटर यांची फवारणी घ्यावी. 
6) शेवटी पुन्हा एकदा अर्धा टक्का बोर्डो मिश्रण + चिलेटेड झिंक 0.4 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate