हवामानातील बदलामुळे दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, थंडी या रूपांनी शेतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. दुर्दैवाने कृषी संशोधनात हवामान बदलावर अजून विचार केला गेला नाही. त्यामुळे त्याच त्याच जुन्या शिफारशींवर भर देतो आहोत. शास्त्रज्ञांना नवे तंत्रज्ञान, प्रतिकूल परिस्थितीला प्रतिकारक्षम सक्षम नव्या वाणांच्या निर्मितीवर प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार आहे. कृषी संशोधनात आमूलाग्र बदल करून संशोधनाची दिशाच बदलावीच लागणार आहे.
हवामानातील बदलांमुळे शेतीपुढे आव्हाने उभी राहिली आहेत. याला कसे सामोरे जाता येईल?
आतापर्यंतच्या हवामानाचा आढावा घेतला तर या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गारपिटीचा कुणीही अपेक्षा केली नसेल, पण तसे घडले. काढणीच्या अंतिम टप्प्यातील रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. हवामानातील बदलाचे मोठे आव्हान आपल्यापुढे उभे राहिले आहे. भूतकाळाचा अभ्यास करून भविष्यकाळाची शास्त्रीय स्वरूपातील रणनीती बनवावी लागणार आहे. त्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे. येत्या काळात यानुसार पिकांचे वाण, पीक पद्धती, हंगाम यात कोणते बदल करता येतील, कसे करता येतील, यावरून शेतातील कामाचे नियोजन, पद्धती ठरवावी लागेल. त्यात शाश्वती कशी आणता येईल, याबाबतही शास्त्रज्ञांकडून ठोस निष्कर्ष येणे अपेक्षित आहे.
आज फळ बागायतीसह अन्य कुठलेही पीक बघितले तर अजूनही आपण जुन्याच शिफारशींवर भर देतो आहोत. अचानक बदलणाऱ्या वातावरणाच्या संदर्भात अजून आपण तयार नाही, ही वास्तविकता आहे. गेल्या काही वर्षांतील वातावरणातील बदल हा सर्वांनाच आश्चर्याचे धक्के देणारा आहे. वाढते उष्णतामान, अनियमित पाऊस, वादळ-वारे, धुके, अवकाळी पाऊस, गारपीट यांचा नीट अभ्यास करून आपल्याला यापुढे वाटचाल करावी लागणार आहे.
पिकांचा लागवड हंगाम, कापणी, काढणी हंगाम यात मोठे बदल करावे लागणार आहेत, किंवा अशा आपत्तीच्या अत्यंत प्रतिकूल स्थितीतही ज्याला आम्ही "अबायोटिक कंडिशन्स' म्हणतो, त्यात टिकून राहतील, तग धरतील असे वाण विकसित करण्यावर भर द्यावा लागेल. केवळ तग धरणारच नाही तर निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीत अशा वाणांचा "परफॉर्मन्स'ही चांगला असेल. अशा वाणांचे संशोधन करणे गरजेचे बनले आहे. शास्त्रज्ञांना यावर भर द्यावा लागणार आहे. असे झाले नाही तर ही अनिश्चितता कायम राहील. जुन्या शिफारशी नव्या काळात कालबाह्य होताना पिकांचे, पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होतच राहील.
आपत्तीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात संशोधनाची दिशा नेमकी कशी असावी?
भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे किंवा खासगी स्वरूपात काम करणाऱ्या संशोधकांना माझा असा सल्ला राहील, की आपल्या सर्वांना एकत्र येऊन या वातावरण बदलाच्या आव्हानांसंदर्भात प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध लढा द्यावा लागेल. "लढा'चा माझा अर्थ- असं नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता प्रयत्न वाढवावेत, जे अशा परिस्थितीतून पिकांचे, शेतकऱ्यांचे संरक्षण करील आणि अपेक्षित उत्पादकताही देईल. या वर्षी वादळी पाऊस, गारपीट झाली.
मागील वर्षी महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दुष्काळ होता. आता आपल्याला विचार करण्याच्या पद्धतीत बदल करून कृषी संशोधनाची दिशाच बदलणे गरजेचे ठरणार आहे. त्यानुसार शेतात कालानुरूप नवीन "पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस' अर्थात पीक उत्पादन तंत्राचा अवलंब करावा लागणार आहे. उदाहरणार्थ- समजा जुलै महिन्यात ज्या पिकाच्या लागवडीची शिफारस आहे, त्या काळातील अडथळ्यांचा अभ्यास करून त्यातील काही टप्पे गाळून उत्पादन घेता येईल का? त्यातही नव्या, सक्षम, प्रतिकारक्षम वाणांच्या निर्मितीवर आता प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा, की संपूर्ण भारत देशामध्ये असे काही वेगळे वेगळे पॉकेट्स तयार करता येतील.
दक्षिण, उत्तरेतील काही भागात ठराविक वेळी सातत्याने पाऊस, गारपीट, महापूर अशा आपत्ती येतात. त्या भागासाठी वेगळ्या सक्षम वाणांची निर्मिती करणे किंवा तेही वास्तवात शक्य झाले नाही तर लागवडीचे क्षेत्र बदलणे, हा पर्याय ठरू शकतो. दर वर्षी आपण पाहतो की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कांद्याच्या मागणीच्या तुलनेत आवक घटते. बाजाराचे प्रश्न तयार होतात. अशा वेळी देशात जो कांद्याच्या दृष्टीने अपारंपरिक नवीन "एरिया' (क्षेत्र) आहे, तिथे लागवड होण्यासाठी धोरणकर्त्यांकडून प्रयत्न व्हायला हवेत. यामुळे कांद्याच्या क्षेत्राचा विस्तार होईल. यामुळे एका ठिकाणचे पीक जरी खराब झाले तरी दुसऱ्या राज्यातील किंवा प्रदेशातील पीक वाचलेले असेल. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचा समतोल साधला जाईल. दराच्या संदर्भातील "क्रायसिस' उद्भवणार नाही. अतिरिक्त उत्पादनाचे निर्यातीसाठी नियोजन करता येईल.
स्त्रोत -अग्रोवण
अंतिम सुधारित : 10/7/2020
सोयाबीन, भात, तूर आदी पिकांना वाढीच्या अवस्थेत हवा...
हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य ...
गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले असून, त्या त...
हवामान अत्यंत बेभरवशाचे झाले आहे. दुष्काळ, गारपीट,...