बऱ्याच द्राक्ष विभागामध्ये मागील आठवड्यात पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडून नवीन फुटींवर जखमा झाल्या. या आठवड्यामध्येही सांगली व सोलापूर भागांमध्ये, तसेच विजापूरच्या जवळपासच्या भागामध्ये येत्या दोन दिवसांत हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये बुधवार ते शुक्रवार पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये सर्व पाचही विभागांमध्ये सर्वसाधारणपणे वातावरण निरभ्र राहणार असले तरी अधूनमधून ढगाळ वातावरण राहून रिमझिम पावसाची शक्यता आहे. अशा प्रकारच्या पावसामुळे बागेमध्ये कसल्याही नुकसानाची शक्यता नाही. परंतु, पुढील आठवड्यामधील संभाव्य वादळी पावसासाठी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी कोवळ्या फुटी असलेल्या बागा असतील, अशा ठिकाणी जास्त काळजी घेणे जरुरी आहे. गेल्या आठवड्यात ज्या-ज्या ठिकाणी गारपीट झाली व कोवळ्या काड्यांवर जखमा झाल्या, अशा ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी री-कट घेऊन नवीन फुटी घेण्याचे प्रयत्न केले आहेत.
सांगलीचा काही भाग- विशेषतः कवठेमहांकाळ, पळशी, खानापूर या भागांमध्ये पुढील आठवड्याच्या बुधवारी-गुरुवारी पुन्हा वादळी पावसाची शक्यता आहे. अशा ठिकाणी जखम झालेल्या काडींवरती री-कट अशा रीतीने घ्यावा, की नवीन येणाऱ्या फुटी पुढील आठवड्याच्या शुक्रवारी येण्यास सुरू होतील, जेणेकरून नवीन फुटी पुढील पावसापासून सुरक्षित राहतील.
मागील आठवड्यात सांगितल्याप्रमाणे कोवळ्या हिरव्या फुटींवरील हलक्या जखमा वेगाने भरून येतात व या काडींवर री-कट घेणे जरुरी नसते. हिरव्या काड्यांच्या आतल्या भागांमध्ये काड्यांच्या गाभ्यापर्यंत जखम पोचलेली असेल व वरची साल गारांमुळे फाटलेली असेल, तरच री-कटचा निर्णय घ्यावा; अन्यथा कार्बेन्डाझिम (50 डब्लूपी) एक ग्रॅम व कॉपर हायड्रॉक्साईड दीड ग्रॅम अथवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 3 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. अशा फवारणीने वेलीच्या जखमा भरून निघण्यास मदत होते. तसेच झालेल्या जखमांतून बोट्रीओडिप्लोडिया आत जाण्याची शक्यता कमी होते, तर पावसामुळे वाढलेल्या आर्द्रतेमध्ये कोवळ्या फुटींवर येणारा बुरशीचा करपा नियंत्रित होतो.
नवीन फुटींची वेळीच विरळणी करणे अतिशय आवश्यक आहे. एकाच ठिकाणी ओलांड्यावरती जास्त फुटी फुटलेल्या असल्यास अशा फुटींच्या पुंजक्यांमध्ये आर्द्रता वाढते व आतमध्ये प्रकाश चांगल्या रीतीने पोचत नाही. अशा परिस्थितीमध्ये फुटींच्या आतल्या भागांमध्ये भुरी वेगाने वाढण्याची शक्यता असते. या भुरीचे नियंत्रण वेळेवर न झाल्यास ढगाळ वातावरणामध्ये बागेतील भुरी नियंत्रित करणे कठीण होते. यासाठी काड्यांची विरळणी वेळेवर करून भुरीच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (50 ईसी) 1 मिली प्रतिलिटर किंवा फ्युसिलाझोल (40 ईसी) 25 मि.लि. प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अशा फवारणीने पावसानंतर जोमाने वाढणाऱ्या फुटीसुद्धा मंदावतात. यामुळे "सबकेन' झालेल्या फुटींमध्ये सुप्त अवस्थेतील फलधारणा होण्यास मदत होते.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य ...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
पूर्वहंगामी ऊस लागवडीत पिकाची वाढ होत असताना थंडीच...