অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोसळणाऱ्या विजेला अटक करा !

कोसळणाऱ्या विजेला अटक करा !

पावसाळा आल्हाददायक तसा तो आपत्ती आणणाराही असतो. या आपत्तीच्या मालिकेत वीज कोसळणेही सामील आहे. दरवर्षी शेकडो जण यामुळे प्राणास मुकतात. लायटनिंग अरेस्टरची यंत्रणा हा धोका कमी करते. याकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे.
पावसाळा हा ऋतू अतिशय आल्हाददायक असला आणि नवनिर्मिती करणारा ऋतू असला तरी तो एका अर्थाने आपत्ती आणणाराही ठरत असतो. निसर्गाची शक्ती खूप मोठी आहे. कोणत्या क्षणी निसर्गाचं रुप पालटेल आणि एखादी नैसर्गिक आपत्ती कोसळेल याचा भरवसा देता येत नाही. आपत्तींची काहीशी मालिकाच या काळात घडत असते. अनेक नैसर्गिक आपत्तीं पैकी एक आपत्ती म्हणजे विजेचं कोसळणं. या आपत्तीपासून कशा प्रकारे वाचता येईल, त्याच्या उपाययोजना पहा.

जमीन आणि आकाशात जमा होणारे ढग यांच्या तापमानात निर्माण होणारा फरक आणि त्यातून निर्माण होणारा कणांचा भार याचा निचरा विजेच्या रुपाने होत असतो. वीज कोसळण्याचं भाकित करता येत नाही म्हणून कोसळणाऱ्या या विजेला नैसगिक आपत्तीपैकी एक असं म्हणता येईल.

पडणाऱ्या विजेचा दाब १ लक्ष व्होल्टस् इतका असतो. इतक्या तीव्र दाबाने येणारी ही वीज धरतीत सामावण्याचा मार्ग शोधत असते. जमिनीलगत संपर्कात येणाऱ्या पहिल्या वस्तू वा इमारतीच्या माध्यमातून वीज जमिनीत जात असते. विजेच्या या प्रवासात दाबाच्या तीव्रतेमुळे माणसंच काय तर वृक्ष देखील जळून खाक होतात.

तीव्र ऊर्जेचा लोळ अशा अर्थाने आपण या विजेच्या प्रवासाला काही प्रमाणात नियंत्रित राखू शकतो त्यासाठी आपणास “लायटनिंग अरेस्टर” सारख्या उपकरण्याची गरज भासते. विशिष्ट पध्दतीने धातूच्या सहाय्याने कोसळणाऱ्या विजेला आपणाकडे खेचणे आणि अगदी सुरक्षितपणे जमिनीत पोहचवणे या कामासाठी अशी अरेस्टर बसविली जातात.

क्षेत्रफळाच्या हिशेबाने राज्यात अशा अरेस्टरचे प्रमाण वाढविण्याचे काम आता सुरु झाले आहे. शहरांमधील उंच इमारती तसेच प्रेक्षागारे, चित्रपटगृहे आदी ठिकाणांवर असे अरेस्टर असतात. मात्र ग्रामीण व निमशहरी भागात अशी यंत्रणाच नाही त्यामुळे या भागात वीज कोसळणे या आपत्तीपासून सावध आणि सुरक्षित अंतरावर राहणे हाच एकमेव पर्याय असतो.

विजा चमकत असतील तर त्यावेळी रेडिओ, टिव्ही, संगणक, मोबाईल आदी सारख्या उपकरणांचा वापर टाळणे धातूची छडी किंवा तत्सम वस्तू न बाळगणे, विजा चमकतात त्यावेळी झाडाच्या आसऱ्याला उभे न राहणे आदी काही उपाय आपणास सुरक्षित ठेवू शकतात.

ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतींनी आपल्या क्षेत्रात किमान १ लायटनिंग अरेस्टर बसविण्यापासून सुरुवात केली तर अल्पावधीत आपण राज्यात वीज सुरक्षित क्षेत्रात वाढ करु शकतो. जी यंत्रणा माणसांचे आणि जनावरांचे जीव वाचवू शकते ती आपल्या परिसरात आवश्यक आहे. अशा भूमिकेतून याकडे लक्ष दिल्यास येणाऱ्या काळात शेकडो जीव वाचवणे आपणास शक्य होईल.

- प्रशांत दैठणकर,

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलढाणा

स्त्रोत: महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate