गारपीटग्रस्त द्राक्ष बागेचे नियोजन
गेल्या दोन दिवसांत काही भागांमध्ये पाऊस आणि गारपीट झाली आहे. सध्या द्राक्ष बागा वाढीच्या विविध अवस्थेत आहेत. अशा वेळी द्राक्षबागेमध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे येणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
पाणी उतरणे ते फळ काढणीच्या अवस्थेतील समस्या
या बागेमध्ये बऱ्यापैकी नुकसान होण्याची शक्यता आहे. गारांचा मार बसल्यामुळे घडांवर किंवा मण्यांवर जखमा दिसून येतील. या परिस्थितीतील मणी चिरणे आणि मणीकूज या दोन समस्या दिसतील. यावर आता खूप लवकर फवारणी करण्याची घाई करून उपयोग होणार नाही. पाऊस संपल्यानंतर वरील दोन्ही समस्या लगेच दिसून येणार नाही. याकरिता 1 ते 2 दिवसांचा कालावधी लागेल. आधी बागेमध्ये किती व कशा प्रकारचे नुकसान झाले आहे, याचा आढावा घ्यावा. त्यानंतर पुढील उपाययोजना कराव्यात.
- वेलीवरील कुजलेले व चिरलेले मणी काढून बागेच्या बाहेर काढावेत. यालाच आपण नेटिंग करणे असे म्हणतो. कारण हे चिरलेले व सडलेले मणी बागेत तसेच राहिल्यास मण्यातून रस निघेल. या रसामध्ये मिथाईल युजिनॉल रसायन असल्यामुळे हे घरगुती माश्यांना (हाउस फ्लाय) आकर्षित करेल. त्यावर या माश्या अंडी घालून पुन्हा या माश्यांचा प्रादुर्भाव बागेमध्ये वाढेल.
- यावर नियंत्रणाकरिता वेलीवर चिरलेले व सडलेले मणी आधी काढून टाकावेत. त्यानंतर बागेमध्ये क्लोरिन डायऑक्साईड 50 पीपीएम या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे घडावरील किंवा मण्यावरील हानिकारक असलेले जीवाणू मरतील. या फवारणीमुळे रेसिड्यूची समस्या उद्भवणार नसल्यामुळे फवारणी करणे फायद्याचे राहील.
- दुसरी महत्त्वाची उपाययोजना म्हणजे माश्यांचा प्रादुर्भाव कमी करणे. माश्यांच्या नियंत्रणासाठी बरेच बागायतदार कीडनाशकाची घडांवर फवारणी करतात; परंतु असे न करता जमिनीवर डायक्लोरव्हॉस 1.5 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास माश्या किंवा इतर हानिकारक ठरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी करता येईल. डायक्लोरव्हॉसची जमिनीवर फवारणी केल्यास रेसिड्यूचा संबंध येणार नाही. फक्त जमिनीवर फवारणी करावी. कारण वर फवारणी केल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी होईल; परंतु इतर अडचणी येऊ शकतात.
- तिसऱ्या प्रकारचे नियोजन करायचे झाल्यास बागेमध्ये कायटोसॅन (10 टक्के) दोन मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे मण्यांचे चिरणे काही अंशी थांबेल. भविष्यात मणी चिरण्याची संभावना कमी राहून मण्याची टिकवणूक क्षमता वाढेल.
- यानंतरची उपाययोजना करावयाची झाल्यास बागेमध्ये स्युडोमोनास (5 मि.लि. प्रति लिटर ) व ट्रायकोडर्मा या जैविक घटकांची ( 5 मि.लि. प्रति लिटर) फवारणी करावी. कायटोसॅनच्या फवारणीमुळे मण्यांवर किंवा पानावर झालेल्या कोटिंगमुळे सूक्ष्म वातावरण तयार होईल. त्याचाच परिणाम म्हणजे काही काळात ट्रायकोडर्मा किंवा स्युडोमोनसचा चांगला परिणाम बागेत मिळेल.
प्रिब्लूम ते फुलोरा अवस्थेतील बाग
- या बागेमध्ये गारांच्या जखमा काडीवर झालेल्या आहेत. याचसोबत काही पाने फाटले असतील तर काही काड्या तुटल्या असतील. या वेळी पाऊस झाला किंवा जमिनीत व तसेच कॅनॉपीमध्ये आर्द्रता वाढली की डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. यावर उपाययोजना म्हणजे कार्बेन्डाझीम 1 ग्रॅम + कॉपर 2 ग्रॅम किंवा कॉपर 2 ग्रॅम + मॅंकोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे काडीवरील जखमेवर नियंत्रण करणे किंवा डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव कमी करणे सोपे होईल.
- मणी सेटिंग झाले नसल्यामुळे रेसिड्यूची समस्या या वेळी सुद्धा नसेल. ज्या ठिकाणी पाने चिरली आणि काडीसुद्धा तुटली आहे, अशा ठिकाणी मणी सेटिंगपर्यंत पानांची संख्या वाढवून पानांची पूर्तता करून घ्यावी.
- द्राक्षबागा गारपीट व पावसाच्या अडचणीतून बाहेर येताच भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तेव्हा बागायतदारांनी मणी सडणे, चिरणे व डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणाकरिता बागेत केलेल्या उपाययोजना संपताच भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे महत्त्वाचे असेल.
टीप : वरील उपाययोजना या सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता संशोधनाच्या उपलब्ध माहितीच्या आधारावर दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या बागेतील परिस्थितीचा विचार करूनच वापर करावा. उपाययोजना करताना राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
निर्यातक्षम शेतमालामध्ये फवारणी करताना संबंधित तज्ज्ञांच्या सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
संपर्क : 020- 26956060
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी पुणे येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.