অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कडाक्‍याच्या थंडीचा परिणाम

वनस्पतींच्या प्रकारानुसार आणि त्यांच्या शरीराच्या सहनशक्तीनुसार कमाल आणि किमान तापमान सहन करण्याची त्यांची मर्यादा निश्‍चित आहे. त्यानुसार उष्ण कटिबंधातील, समशीतोष्ण कटिबंधातील पिके आणि थंड प्रदेशातील पिके असे वर्गीकरण केले जाते. त्यानुसार त्यांना योग्य तापमान मिळाल्यास पिकांची चांगली वाढ होते. यंदाच्या वर्षी कडाक्‍याच्या थंडीचा प्रतिकूल परिणाम अनेक पिकांमध्ये अनुभवण्यास मिळाला. या वर्षी थंडी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत चांगली राहील, त्याचा रब्बी पिकांना फायदा होईल.स न 2010 - 2011 या वर्षी हिवाळ्यात पाऊस उशिरापर्यंत लांबल्याने थंडीचा कालावधी आणि थंडीचे प्रमाण चांगले राहील असा अंदाज नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीस मी दिला होता. मात्र या महिन्याच्या सुरवातीस चांगली सुरू झालेली थंडी ही हवामान बदलाने आकाश ढगाळ राहिल्याने कमी झाली. डिसेंबर महिन्यात पुन्हा चांगली थंडी सुरू झाली. जानेवारी महिन्याच्या 7 तारखेपासून पुढे आठवडाभर या थंडीने कहर केला. काश्‍मीरमध्ये कडाक्‍याच्या थंडीस "चिल्लाई कालन' असे म्हणतात. या वर्षात उत्तर प्रदेशमध्ये थंडीमुळे मृत्यूंची संख्या 104 झाली. लखनौ शहरात किमान तापमान 0.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. काश्‍मीरच्या लेह भागात किमान तापमान उणे 17.1 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. विशेष म्हणजे या वर्षी लेह भागात अतिवृष्टीने कहर झाला. अनेक लोक त्या काळात बळी गेले हे विसरता येत नाही. कारगिल येथे या हंगामात उणे 15 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तेथेही या वर्षी अतिवृष्टी झाली होती. काश्‍मीर खोऱ्यात 13 व 14 रोजी हिमवृष्टी झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. वीजपुरवठा, वाहतूक आणि दूरध्वनी सेवेवर परिणाम झाला. श्रीनगर येथे 12 तारखेला उणे 0.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. काश्‍मीरमधील कुपवाडा भागातही तापमान 1.7 अंश सेल्सिअसपर्यंत बराच काळ स्थिरावले होते.
महाराष्ट्रात 7 तारखेला नगर येथे 1.7 अंश सेल्सिअस तर दुसऱ्या दिवशी दोन अंश सेल्सिअस अशा प्रकारे नीचांकी नोंद झाली आहे. त्याच वेळी जळगाव (4.3), मालेगाव - पुणे (5.3), नाशिक (4.4) परभणी भागात नीचांकी किमान तापमान नोंदले गेले. नागपूर भागात नरखेड तालुक्‍यात थंडीच्या कडाक्‍याने पिकांवर बर्फ पडले. त्यामुळे पिकांची हानी झाली.
वरील सर्व भाग हा हवामानबदलाच्या प्रकाराचा भाग असून डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा नीचांकी तापमान असलेला आजवरचा आठवडा आहे. आता या वेळापत्रकात थोडा बदल होऊन जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्याअखेरीस ते जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नीचांकी किमान तापमान नोंदले जात आहे.

वनस्पतींचे तापमान

वनस्पतीचे तापमान मोजण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटरचा वापर केला जातो. रिमोट सेन्सिंगचे तंत्रज्ञान वापरून इन्फ्रारेड थर्मामीटर विकसित करण्यात आला आहे. त्यात वातावरणाचे तापमान आणि वनस्पतीचे तापमान समजू शकते. वनस्पतींपासून एक फूट अंतरावर इन्फ्रारेड थर्मामीटर वनस्पतीचे दिशेने धरून स्ट्रायगर ओढल्यास प्रथम वातावरणाच्या तापमानाची आकडेवारी त्यात दाखवली जाते. त्यानंतर पुन्हा स्ट्रायगर ओढल्यास वनस्पतीचे तापमान दाखवले जाते. त्यामध्ये वातावरणाच्या तापमानापासून उणे 0.5 ते उणे चार ते पाचपर्यंतची आकडेवारी त्यात मिळते.
अशा परिस्थितीत जेव्हा वातावरणाचे तापमान इतक्‍या खाली घसरते तेव्हा वनस्पतींच्या तापमानाचा अंदाज केल्यास वनस्पतींना अशा प्रकारे घसरलेले तापमान सहन करणे कठीण जाते. त्यामुळे या वर्षी कपाशी पिकावर त्याचा प्रथम परिणाम जाणवला आणि कपाशीचे क्षेत्र थंडीमुळे काही भागात मृत पावले. प्रत्येक वनस्पतीचे प्रकारानुसार तापमान सहन करण्याची प्रत्येक वनस्पतीची मर्यादा वेगवेगळी असते.

कार्डिक तापमान (तापमान मर्यादा)

वनस्पतींच्या प्रकारानुसार आणि त्याच्या शरीराच्या सहनशक्तीनुसार कमाल आणि किमान तापमान सहन करण्याची त्यांची मर्यादा निश्‍चित आहे. त्यास कार्डिक रेंज असे संबोधले जाते. त्यानुसार उष्ण कटिबंधातील, समशीतोष्ण कटिबंधातील पिके आणि थंड प्रदेशातील पिके असे वर्गीकरण केले जाते. त्यानुसार त्यांना योग्य तापमान मिळाल्यास पिकांची चांगली वाढ होते. पिकांच्या उगवणीसाठी योग्य तापमानाची गरज असते. पिकांचे बियाणे रुजण्यासाठी आणि त्यापुढील एक महिना जमिनीचे तापमान आणि वातावरणाचे तापमान दोन्हीही बाबी अतिशय महत्त्वाच्या असतात.

जमिनीचे तापमान

जमिनीचे तापमान हे पिकाचे उगवणीपासून संपूर्ण वाढीचे काळात अतिशय महत्त्वाचे मानले जाते. अन्नद्रव्यांची उपलब्धता होण्यासाठी जिवाणूंचे कार्य हे जमिनीचे तापमानावर सर्वस्वी अवलंबून असते.
अशा वेळी उत्पादकता कमी झाल्यास त्याचा थेट संबंध तापमानाशी असतो. आजपर्यंत या भागाचा जितका सखोल अभ्यास भारतात व्हावयास हवा होता तेवढा झालेला नाही असे दिसून येते. उन्हाळी हंगामात वाढणारे तापमान आणि कमी पडणारा ओलावा यामुळे पिके सुकून जातात आणि पाण्याअभावी मृत पावतात. जमिनीतील ओलाव्याच्या प्रमाणावर जमिनीचे तापमान सर्वस्वी अवलंबून असते. ठिबक सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा मुळ्यांजवळ योग्य प्रमाणात राखला जातो. त्यामुळे उन्हाळी हंगामात पाण्याची गरज वाढूनही पिकांची वाढ चांगली होते.
पिकांचे तापमान जमिनीच्या ओलाव्यावर अवलंबून असते. जसजसा जमिनीचा ओलावा कमी होतो. तशाच प्रमाणात वनस्पतींचे तापमान वातावरणाच्या तापमानापेक्षा वाढत जाते आणि शेवटी पाणीपुरवठा झाल्यास विशिष्ट ओलाव्याच्या पातळीनंतर पिके सुकतात आणि वाळतात. पानांद्वारे बाष्पीभवन क्रियेने पिकांचे तापमान राखण्याचे कार्य केले जाते. या सर्व बाबींवरून हा भाग अतिशय गुंतागुंतीचा आहे असेच दिसून येते.बेस टेंपरेचर मूलतः बऱ्याच वनस्पतींचे "बेस टेंपरेचर' ठरलेले आहे. तापमान आठ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास सर्वच वनस्पतीमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होते. जसजसे तापमान कमी होईल, तसतशी त्या परिस्थितीशी सामना करण्याचा प्रयत्न पिके करतात. तापमान मर्यादेपेक्षा फारच कमी झाल्यास काही काळ तग धरतात. त्यांच्या सर्व क्रिया थांबवता आणि हवामानाशी एकप्रकारे झुंज देत जीवन जगतात. हा काळ पहाटे चार ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा काही कालावधीचा असतो.

थंडीचे पिकावर होणारे थेट परिणाम

रब्बी ज्वारी

जेव्हा रब्बी ज्वारीचे पीक ऐन फुलोऱ्यात होते तेव्हा थंडीच्या कडाक्‍यात सापडले असल्यास पुंकेसर तयार होऊनही ते बाहेर पडू न शकल्याने दाणे भरण्याच्या प्रमाणात घट झालेली असेल. त्यामुळे रब्बी ज्वारी पिकाचा उतारा म्हणजेच एकरी उत्पादन कमी येईल. त्यामुळे अधिक क्षेत्र असूनही राज्यात एकूण उत्पादकतेवर परिणाम झाल्याने उत्पादन कमी होईल. त्याचप्रमाणे एक आठवडा झाल्याने एकूण वाढीवर आणि उत्पादनावर थेट परिणाम होतो.

द्राक्ष

तापमानातील घट फळपिकांना फार घातक ठरते. पिकांच्या आणि फळांच्या पेशी आकुंचन पावण्याची क्रिया स्वसंरक्षणार्थ होते. त्यात फळांना चिरा पडणे, सालीस चिरा पडणे असे प्रकार दिसून येतात. त्यामुळे फळांची प्रत बिघडते.

आंबा मोहोरावर परिणाम

आंब्याचा मोहर थंडी कमी झाल्यानंतर निघेल. त्यामुळे या वर्षी आंबा उशिरा बाजारात येईल आणि त्याचा परिणाम एकूण आंबा उत्पादनावर आणि बाजारपेठेवर दिसेल. काढणीस उशीर होईल. वादळ वाऱ्यामध्ये सापडल्यास नुकसान होण्याची शक्‍यता निर्माण होईल.

गहू

थंडीचा कालावधी चांगला मिळेल. एकूण गव्हाचा उतारा चांगला मिळेल. पिकाची वाढ चांगली होईल आणि उत्पादन व उत्पादकतेत वाढ होईल. हवामानाच्या अनुषंगाने या वर्षी थंडी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत चांगली राहील. त्यामुळे रब्बी पिकांना हवामान अनुकूल राहील. सध्यातरी हवामानात मोठे बदल होतील असे दिसत नाही. त्यामुळे या वर्षीचा रब्बी हंगाम सर्वच पिकांच्या वाढीस आणि उत्पादनास अनुकूल राहील.


- 9890041929
(लेखक राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate