অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जमीन वापर वितरण

भूमी उपयोगिता वर्गीकरण (Land Capability Classification)

जे गुणधर्म जमिनीची उत्पादन क्षमता ठरविण्यास कारणीभूत होतात ते लक्षात घेऊन त्यानुसार निरनिराळया गुणधर्माच्या क्षेत्राचे योजनाबध्द वर्गीकरण करणे यास जमिनीचे क्षमतेनुसार किंवा उपयोगितेनुसार वर्गीकरण असे म्हणतात. जमिनीची वर्गवारी मुख्यत: खालील तीन मुद्यांवर अवलंबून असते.

जमिनीची अंगभुत वैशिष्ट्ये-

यामध्ये जमिनीचे मुळ घटक रंग, पोत, घडण, घटृपणा, झिरपकता, सच्छिद्रता, जमिनीची खोली व अभिक्रिया इ.बाबींचा विचार होतो.

जमिनीची बाहय वैशिष्टये-

अ) उतार (ब) धूप

हवामान- भूमि उपयोगिता वर्गीकरण (Land Capability Classes)

भूमि उपयोग क्षमता वर्गीकरण शेतीच्या उपयुक्ततेच्या दृष्टीने केले जाते. जमिनीचे वर्गीकरण करतांना वर्ग-1 ते 8 भाग पडतात. वर्ग 1 ते 4 शेतीस उपयुक्त असतात व वर्ग 5 ते 7 या जमिनी बिगर शेतीस म्हणजे कुरण विकास व वन विकास इत्यादिस उपयुक्त असतात. वर्ग-8 च्या जमिनी वरील उपयेागसाठी उपयुक्त नाहीत. परंतु वन्य पशंुकरिता, मनोरंजन इ. साठी उपयोग होऊ शकतो. भूमि उपयोगिता वर्गाचा तपशील खालीलप्रमाणे.

वर्ग-1 (Class-I)

या वर्गातील जमिनी 100 से.मी. पेक्षा जास्त खोलीच्या, 0 ते 1 टक्के उताराच्या,उत्तम निच-याच्या, किंचित धूपीच्या असून शेतीसाठी सर्वोत्कृष्ट असतात. मृद व जलसंधारणाच्या साध्या व सुलभ मशागत पध्दतीचा अवलंब करुन अशा जमिनी लागवडीस योग्य ठरतात. कोणत्याही प्रकारची लागवड यात करता येते. मृद सर्व्हेक्षण नकाशात या जमिनी हिरव्या रंगाने दर्शविलेल्या असतात.

वर्ग-2 (Class-II)

या वर्गातील जमिनी 50 ते 100 से.मी. खोलीच्या, उतार 1 ते 3 टक्के, निचरा मध्यम ते अल्प, धूपीचे प्रमाण अल्प ते मध्यम असते. लागवडीसाठी चांगली जमीन असून कांही जुजबी उपचार करुन जमीन कोणत्याही लागवडीखाली आणता येते. मृद सर्व्हेक्षण नकाशात या जमिनी पिवळया रंगाने दर्शविलेल्या असतात.

वर्ग-3 (Class-III)

या वर्गातील जमिनीची खोली 25 ते 50 से.मी. असून 1 ते 3 टक्के व 3 ते 5 टक्के उताराच्या, मध्यम निच-याच्या, अल्प ते मध्यम धूपीच्या असतात. या जमिनीच्या उपयोगास जास्त मर्यादा असतात. परंतु मृद व जलसंधारणाच्या कायमस्वरुपी अभियांत्रिकी उपाययोजना करुन या जमिनी लागवडीखाली आणता येतात. अशी जमीन मृद सर्व्हेक्षण नकाशावर लाल रंगाने दर्शविल्या असतात.

वर्ग-4 (Class-IV)

या वर्गातील जमिनी हलक्या पोताच्या, भरड, 7.5 ते 25 से.मी. खोलीच्या, 3 ते 5 टक्के किंवा 5 ते 8 टक्के उताराच्या व जास्त धूपीच्या असतात. या जमिनीची उपयोगिता क्षमता अत्यंत मर्यादित असते. तसेच यांचा उपयोग फक्त ठराविक प्रकारच्या हंगामातील लागवडीसाठीच करता येतो. या जमिनीत मृद संधारण कामे करणे जरुरीचे असते. याप्रकारच्या जमिनी नकाशावर निळया रंगाने दर्शविलेल्या असतात.

वर्ग-5 (Class-V)

या वर्गातील जमिनी ओलसर व दगडयुक्त असतात. या जमिनी हलक्या पोताच्या, मातीचा अंश कमी असलेल्या असून उतार व धूप जास्त असते. या कोणत्याही प्रकारच्या लागवडीसाठी उपयुक्त ठरत नाहीत. काही मर्यादेपर्यत या जमिनी कुरणे व वनीकरणासाठी योग्य ठरतात. अशा जमिनी गडद हिरव्या रंगाने नकाशावर दर्शविल्या असतात.

वर्ग-6 (Class-VI)

अत्यंत उताराच्या मुरमाड, खडकाळ व एकदम श्ुष्क किंवा ओलसर अशा प्रकारच्या या जमिनी असतात. वनीकरण किंवा कुरणासाठी अशा जमिनींचा मर्यादित स्वरुपात उपयोग होऊ शकतो. अशा जमिनी नारंगी किंवा केशरी रंगाने नकाशावर दर्शविल्या असतात.

वर्ग-7 (Class-VII)

या जमिनी अत्यंत खडकाळ, 10 ते 25 टक्के उताराच्या, अति धूपीच्या असल्याने कमी प्रमाणात कुरण विकास व मर्यादित वन विकासासाठी उपयोगात येऊ शकतात. अशा जमिनी नकाशावर तांबडया रंगाने दर्शविलेल्या असतात.

वर्ग-8 (Class-VIII)

अत्यंत तीव्र उताराच्या, अत्यंत कठिण व खडबडीत शुष्क किंवा दलदलीच्या अशा या जमिनी कोणत्याही प्रकारच्या लागवडीसाठी, वनीकरणासाठी किंवा गुरे चारण्यासाठी देखील उपयोगी पडत नाहीत. फक्त वन्य जीवन संवर्धन, मनोरंजन, क्रिडास्थाने, पाणलोट क्षेत्र संरक्षण, नागरीकरण, औदयोगिकरण इ. कारणासाठीच अशा जमिनीचा उपयोग होऊ शकतो. अशा जमिनी नकाशावर जांभळया रंगाने दर्शविलेल्या असतात.

भूमि उपयोगिता उपवर्ग :- (Land Capability Sub-Classes)

जमिनीच्या निरनिराळया समस्यावरुन भूमि उपयोग वर्गीकरणाचे खालील उपवर्ग पाडण्यात आले आहेत.

अ.क्र. जमिनीचीसमस्या उपवर्ग
1 अतिधूपीचीसमस्या. धू(e)
2 पाण्याची पातळी पृष्ठभागालगतअसणे,अति कमीनिचरा,ओलसर पाणथळजमिनी. प (w)
3 मुळांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली खोलीनसणे, एकदम हलकाकिंवाएमदमभारीपोत,दगड गोटेयुक्तकमीजलधारणशक्ती. उ (s)
4 जास्त काळ कोरडया किंवा ओल्या असणे,बर्फ पडणे इ. किंवा इतर हवामान समस्या. ह (c)
5 आम्ल विम्ल क्षारयुक्त. क्षा(sa)

प्रथम भूमि उपयोग वर्ग लिहून त्यापुढे उपवर्ग लिहीला जातो. उदा- वर्ग-6 ची जमीन असेल व तिची धूपीची समस्या असेल तर 'वर्ग-6 धू.' (Class-VIe) असे लिहितात. एखादया वर्गाच्या जमिनीत एकापेक्षा जास्त समस्या असतील तर उपवर्गाची नोंद एकत्र केली जाते. उदा- वर्ग-7 च्या जमिनीस धूपीची व मुळांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली खोली नाही, या दोन समस्या असतील तर 'वर्ग-7 धू.उ ' (Class-VIIes ) अशी नोंद केली जाते. पाणलोट क्षेत्राचा विकास करताना त्यातील जमिनीचा वापर त्या जमिनीच्या उपयोगिता क्षमतेनुसारच केला जावा हे सर्वश्रुत आहे. त्याचप्रमाणे जमिनीची धूप नियंत्रित करण्यासाठी जे उपचार करावयाचे असतात ते देखील जमिनीचा प्रकार, खोली, उतार व धूपीची तीव्रता यावरुन ठरविले जातात. मृद सर्व्हेक्षणाच्या आधारे पाणलोट क्षेत्र विकासाचा आकृतीबंध व अभिकल्प तयार करणे अत्यंत आवश्यक आहे.

स्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate