थंडीची वाढ होण्यासाठी आवश्यक ते घटक महाराष्ट्रामध्ये अनुकूल दिसत आहेत. त्याचा रब्बीतील पिकांना फायदा मिळणार आहे. कोकणातील आंबा आणि देशावरील ऊस, द्राक्ष, हळद, आले, डाळिंब, केळी याबरोबरच भाजीपाला पिकांनाही हे हवामान लाभदायक ठरणार आहे. रब्बी ज्वारीसाठी सध्याचे हवामान चांगले असले तरी जानेवारीमध्ये वाढणाऱ्या थंडीमुळे उत्पादकतेत घट होऊ शकते. हवामानातील घटकांचा विचार करून शेतीचे नियोजन करणे आवश्यक राहील.
रब्बी हंगाम सुरू होताच थंडीची चाहूल सुरू होते. किमान तापमानात घट होण्यास सुरवात होते; मात्र कमाल तापमानात सुरवातीस फारशी घट होत नाही. पुढे टप्प्याटप्प्याने मध्यम थंडी ते अतिथंडीचा कालावधी सुरू होतो. त्यानंतर टप्प्याटप्प्याने थंडी कमी होत जाते. त्यात प्रत्येक टप्प्यातील कालावधी महत्त्वाचा असतो. त्यात थंडीतील चढ-उतार, बोचरी थंडी हे घातक असते. या आठवड्यात काही प्रमुख स्थानकांचे सर्वसाधारण तापमान आणि वाऱ्याची अपेक्षित दिशा खाली दिली आहे.
वरील तक्त्यावरून हे स्पष्ट होत आहे, की सध्या देशावर किमान तापमानात घट होण्यास सुरवात झाली आहे; मात्र कोकणातील किमान तापमान मात्र अधिक आहे. वाऱ्याच्या दिशेमध्ये फरक होत चाललेला असून, वाऱ्याची दिशा स्थिर होत आहे. एकूण हवेच्या दाबाचा अभ्यास केल्यास सध्या महाराष्ट्रावर हवेचा दाब 1014 हेप्टापास्कल इतका वाढलेला आहे, तर उत्तर भारतात तो 1016 हेप्टापास्कल आहे. महाराष्ट्रातील हवेचा दाब पाहता, उत्तरेकडून येणारे थंड वारे महाराष्ट्रातील थंडीत वाढ करतील; मात्र कोकणात हवेचा दाब कमी झाला असून, तापमानातील वाढ कायम आहे, तसेच अरबी समुद्राचे पाण्याचे तापमान 301 डिग्री केल्व्हीन इतके आहे.
मात्र, त्याचा फार मोठा परिणाम देशावरील हवामानावर होणार नाही. कोकणातील हवामान आंबा मोहर लवकर निघण्यास अनुकूल ठरेल. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण घटत असून, सध्या कोरडे हवामान आहे. ते कोकणातील रब्बी पिकांना अनुकूल ठरेल. त्यात प्रामुख्याने रब्बी उन्हाळी भात आणि भुईमूग या पिकांना ते अनुकूल ठरेल. हवेतील आर्द्रतेचे घटते प्रमाण नारळ, सुपारी, काजू या पिकांना तितकेसे फायद्याचे ठरणार नाही. आंबा पिकास पाण्याची सोय असल्यास मोहर पूर्णपणे निघाल्यानंतर पाणी दिल्यास अधिक फळधारणा होईल.
देशावरील थंडीचे वाढते प्रमाण गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांना फायद्याचे ठरेल. वाढलेले थंडीचे प्रमाण गहू, हरभरा पिकांच्या वाढीच्या अवस्थांना फायद्याचे ठरेल. बऱ्याच ठिकाणी ज्वारीचे पीक सध्या पोटरीच्या अवस्थेत आहे, ते पोटरीतून बाहेर पडण्यास या वर्षी हवामान अतिशय अनुकूल आहे; मात्र डिसेंबर अखेरीपासून जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडीत वाढ होईल. किमान तापमान आठ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास रब्बी ज्वारी पिकास ते अपायकारक ठरू शकेल. तापमानाचे घटक रब्बी ज्वारी पिकाची उत्पादकता कमी करू शकतील. जेथे पीक त्या काळात फुलोरा अवस्थेत येईल, तेथे रब्बी ज्वारीच्या फलधारणेवरही परिणाम झालेला दिसून येईल. अशा वेळी सोय असल्यास एक पाणी रब्बी ज्वारी पिकास द्यावे. याच दरम्यान हवेतील आर्द्रता वाढून पिकावर दव पडण्यास सुरवात होईल. त्याचा फायदा कोरडवाहू रब्बी ज्वारी पिकास होईल.
एकूण थंडीच्या कालावधीत व काळातही बदल होत असल्याचे चित्र गेल्या दोन वर्षांत दिसून येत आहे. या पूर्वी जास्तीत जास्त थंडीचा महिना डिसेंबर, त्यातही जास्त थंडीचा अखेरचा आठवडा असायचा, यात फरक पडून तो जानेवारीचा पहिला आणि दुसरा आठवडा असा होत आहे. या सर्वांचा परिणाम पीक पद्धतीवर होणार आहे.
सध्याचे हवामान ऊस, द्राक्ष, हळद, आले, डाळिंब, केळी या फळ पिकांबरोबरच भाजीपाला पिकांनाही अनुकूल ठरत आहे. या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात राहील. पालेभाज्या, फळभाज्या पिकांवर रोग आणि किडींचा उपद्रव कमी प्रमाणात जाणवेल. हवामान अनुकूल असल्याने पालेभाज्यांची वाढ आणि प्रत चांगली राहील. रोगांचनया वाढीसही हवामान प्रतिकारक राहील. या आठवड्यातील स्वच्छ सूर्यप्रकाशाचा अधिक कालावधी आणि थंडीचे योग्य प्रमाण ऊसवाढीस व साखर निर्मितीस अनुकूल राहील. त्याचा फायदा उसाचे टनेज वाढण्यासाठी मिळेल. हवामान हा घटक वेगाने बदलणारा असला, तरी सद्यःस्थितीतील हवामान घटकानुसार शेती नियोजन करणे आवश्यक आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
औद्योगिक वातावरणविज्ञान हि वातावरण विज्ञानाची एक श...
हवामानाच्या परिस्थितीत सध्या सातत्याने बदल जाणवत आ...
मध्यप्रदेशातील मांडला जिल्हायातिल आदिवशी आशा असल्य...
कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह...