जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्वसाधारणपणे थंडी वाढत जाते, मात्र "थेन' वादळाचा परिणाम होऊन थंडीत घट झाली आहे. या घटलेल्या थंडीच्या परिणामाची पीकनिहाय चर्चा या लेखात केली आहे.
जानेवारी महिन्याचे दुसऱ्या आठवड्यात कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानात घसरण होण्याची दाट शक्यता राहील. कमाल तापमानाचा थेट परिणाम आर्द्रतेवर आणि दव पडण्यात अडचणी निर्माण होण्यात होईल. त्यामुळे सकाळची आर्द्रता 40 ते 60 टक्के, तर दुपारची आर्द्रता 30 टक्क्यांच्या जवळपास राहील. वाऱ्याचा ताशी वेग सहा किलोमीटर ताशी राहील. हवेच्या दिशेत बदल होत असून वारा ईशान्येकडून दक्षिणेकडे राहील. हवेच्या दाबात वाढ होण्याची शक्यता आहे. हवेचा दाब महाराष्ट्रावर 1014 हेट्टापास्कल इतका वाढेल. वाऱ्याची ईशान्य आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहण्याची दिशा, हवेचा वाढता दाब यामुळे थंडीचे पुनरागमन होईल. ती आणखी काही काळ राहणार आहे. हिंदी महासागराच्या पाण्याचे तापमानात वाढ होईल. विषववृत्ताच्या दरम्यान त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून तेथे चक्राकार वारे वाहत आहेत. मात्र हवेचे दिशेत होणारा बदल लक्षात घेता उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे वारे यामुळे हिंदी महासागरातील चक्राकार वाऱ्याचा फार मोठा परिणाम महाराष्ट्रावर दिसणार नाही. हिंदी महासागराचे पाण्याचे तापमानात 302 ते 303 अंश केलव्हीन्स इतकी वाढ होत असल्याने तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन वारे दक्षिणेकडे वाहतील आणि ते थंडी वाढवतील.
बंगालच्या उपसागरात डिसेंबरचे अखेरचे आठवड्यात चक्राकार वाहणारे वारे आणि पाण्याचे वाढते तापमान याचा एकत्रित परिणाम होऊन "थेन' वादळाची निर्मिती झाली. वारे दिशा बदलत तमिळनाडूचे दिशेने भूपृष्ठावर घुसून ते महाराष्ट्राचे उस्मानाबाद, परभणी आणि विदर्भाचे काही भागाच्या वर घुसल्याने ढग जमा झाले. काही विदर्भाच्या काही भागाच्या वर घुसल्याने ढग जमा झाले. काही प्रमाणात वाऱ्याच्या दिशेत होणाऱ्या बदलाने वारे महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक ढग घेऊन आले. महाराष्ट्रात ढगामधील बाष्पाचे प्रमाण कमी असल्याने पाऊस फारसा झाला नाही. मात्र तेच वारे अधिक वेगाने दिल्ली, उत्तर प्रदेशच्या दिशेने गेल्याने तिकडे थोडा पाऊस झाला. एकूणच हवामानबदलाचे परिणामाने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कडाक्याची पडणारी थंडी कमी झाली. तापमानात अचानक वाढ झाली. या तापमानवाढीचे ढगाळ हवामानाच्या पिकांवर निश्चित परिणाम होतील यात शंका नाही.
गव्हाच्या पीकवाढीच्या अवस्थेत असताना अचानक तापमानात झालेली वाढ या पिकाच्या वाढीच्या दृष्टीने घातक आहे. उष्मांकात वाढ झाल्याने आणि थंडीच्या प्रमाणात घट झाल्याने पिकात लवकर परिपक्वता येण्याच्या क्रियेत झपाट्याने वाढ होते. गव्हाच्या पीकवाढीच्या अवस्था निश्चित अथवा ठराविक कालावधीपूर्वी पूर्ण करते. त्याचा पिकाच्या वाढीवर, उंचीवर, कांड्यांच्या लांबीवर, ओंबीच्या लांबीवर, दाण्याच्या संख्येवर आणि दाण्याच्या आकारावर अनिष्ट परिणाम होतो. उत्पादनात, उताऱ्यात घट येऊन दाण्याची प्रत खालावते. जेव्हा थंडीचा कालावधी अधिक असावयास हवा तेव्हा थंडीत चढ- उताराने कालावधी कमी- अधिक होतो आहे. त्याचे थेट परिणाम गव्हाच्या पिकावर दिसतात.
ढगाळ हवामान येताच तुडतुड्यांची वाढ झपाट्याने होते. पिकातील रस शोषण्याचे काम तुडतुड्यांची पिल्ले सुरवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात करतात. कांदा पातीचा तजेलदारपणा जातो आणि पाती माना टाकू लागतात. कांदा वाढणे आणि पोसणे हे हवामानावरच अवलंबून असते. तसेच करपा रोगाचा प्रादुर्भावही वाढण्याची भीती असते. याचा पिकाचे वाढीवर, उत्पादनावर आणि प्रतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
ढगाळ हवामान ज्वारी पिकास उपयुक्त ठरेल. मात्र वाढणारे तापमानामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन दव पडण्याचे क्रियेत अडथळा येईल, त्याचा परिणाम रब्बी ज्वारी पिकावर होईल. या वेळी पुंकेसर, स्त्रीकेसर आणि फुलधारणेत विशेष अडचणी येणार नाहीत. मात्र दाण्यांची संख्या अधिक असूनही दाण्यांचा आकार लहान राहील. त्यामुळे उत्पादकता घटेल आणि प्रत खालावेल. बागायत रब्बी ज्वारीवर विशेष परिणाम होणार नाही. मात्र कोरडवाहू रब्बी ज्वारीवर त्याचे परिणाम जाणवतील.
हरभरा आणि हरभऱ्यावरील घाटे अळीचा उपद्रव वाढेल, तर तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचे प्राबल्य वाढेल. त्यासाठी या दोन्ही किडींपासून पिकाचे संरक्षण करणे आवश्यक राहील. अन्यथा नुकसानीच्या पातळीत वाढ होईल.
पाऊस न झाल्याने संभाव्य कीड आणि रोगांच्या धोक्यातून द्राक्ष बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. आजवर या हंगामात द्राक्षाच्या वाढीस उत्तम हवामान लाभले आहे. त्यामुळे द्राक्षाचे उत्पादन आणि प्रत या वर्षी चांगली राहील. तरीही हवामानबदलाच्या परिणामानुसार काळजी घेण्याची गरज आहे.
माजी प्रमुख कृषी हवामानशास्त्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर! तीन दिवसांचे शिबिर. गाव...
कृषी पराशर ग्रंथातील पहिल्या 10 श्लोकांत पराशर ऋष...
कृषि विद्या विभाग, महात्मा फुलै कृषि विद्यापीठ यां...