वाढते तापमान व अवर्षणात मक्यासारख्या पिकाच्या उत्पादनावर काय परिणाम होतात, यासंबंधी आफ्रिकेत सध्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या मदतीने चाचण्या सुरू आहेत. उत्पादनवाढीच्या साह्याने अन्नसुरक्षा मिळवण्यासाठी अशा अभ्यासांची मोठी गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
मेक्सिको येथील आंतरराष्ट्रीय गहू व मका सुधार केंद्र व भागीदारी संस्थांनी अर्ध सहारा - आफ्रिकेतील हवामानात मका उत्पादनाच्या 1999 ते 2007 या कालावधीत चाचण्या घेतल्या आहेत.
सुमारे 20 हजार चाचण्यांसहित विविध केंद्रांमध्ये हवामानाची संपूर्ण आकडेवारीही नोंदवण्यात आली आहे. या संशोधन प्रकल्पात संशोधकांना असे आढळले, की तापमानात एक अंश सेल्सिअस एवढी वाढ जरी झाली, तरी आफ्रिकेतील सध्याच्या मका पट्ट्यातील पिकात योग्य पर्जन्यमान असूनही 65 टक्के नुकसान होऊ शकते. अवर्षण परिस्थितीत संपूर्ण मका पट्ट्यात नुकसान झालेले आढळले आहे. आकडेवारीत सांगायचे तर, एक अंश जरी तापमान वाढले, तरी 75 टक्क्यांहून अधिक क्षेत्रात उत्पादनात किमान 20 टक्के घट येऊ शकते, असा निष्कर्ष मिळाला आहे.
सिमीट संस्थेतील संशोधन विभागाचे उपमहासंचालक व या अभ्यासप्रकल्पातील शास्त्रज्ञ मॅरिएन बॅंझीगर म्हणाल्या, की हे परिणाम आमच्यासाठी आश्चर्यकारक आहेत. कारण मका हे अधिक तापमान सहन करणारे पीक आहे, असे आम्ही गृहीत धरून चाललो होतो. 30 अंशांहून अधिक तापमानात मका हे पीक अधिक काळ राहिल्यास उत्पादन तेवढे घटण्यास मदत होते. त्यात अवर्षण आणि उष्णता या गोष्टी जर एकत्र आल्या, तर परिणाम अधिक तीव्र होतो. साहजिकच आफ्रिका, आशिया किंवा मध्य अमेरिका आदी देशांमध्ये हवामान बदलाचे असे परिणाम अधिक जाणवणार असल्याची शक्यता जाणवते. जगासाठी अन्नधान्याची गरज वाढत असताना ही आव्हाने आपल्यापुढे असल्याचे दिसून येत आहे.
आफ्रिकेतील शेतकऱ्यांना चांगल्या जाती उपलब्ध करून देण्यासाठी पिकांच्या चाचण्या पूर्वीपासूनच घेतल्या जात आहेत. मात्र, यापूर्वी अशा चाचण्या घेताना तेथील हवामानाच्या नोंदी, त्याच्या घटकांचा उत्पादनावर होणारा परिणाम यांचा अभ्यास फार झाला नसल्याचे संबंधित तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्या चाचण्या केवळ पिकांवर हवामान बदलाचा होणारा परिणाम अभ्यासण्याव्यतिरिक्त वेगळ्या उद्दिष्टांसाठीच घेण्यात आल्या होत्या.
भारत, चीन, ब्राझील यांसारख्या देशांमध्ये विविध प्रकारचे हवामान उपलब्ध असल्याने तेथील चाचण्यांचा तुलनात्मक "डाटा' महत्त्वाचा ठरणार आहे. खासगी कंपन्या देखील अशा प्रकारचे संशोधन करीत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मात्र, येत्या काळात हवामानातील बदलांचा पिकांवर कशा प्रकारे परिणाम होत आहे, या विषयावरील अधिकाधिक माहितीचे संकलन अशा चाचण्यांमधून होत राहणार असल्याचा आशावादही या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
सीताफळाचा गर सर्वांनाच आवडतो, परंतु सध्या या फळामध्ये असलेल्या बियांमुळे त्याचा गर काढायचे काम वेळखाऊ आहे. ही अडचण लक्षात घेऊन अमेरिका आणि स्पेनमधील शास्त्रज्ञ बीनबियाची सीताफळाची जात विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. युसी. डेव्हिस येथील वनस्पतिशास्त्र विषयातील तज्ज्ञ चार्लीस गेसीर म्हणाले, की बीनबियाच्या सीताफळाची जात विकसित झाली तर फळांच्या उत्पादनाच्यादृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. स्पेनमधील तज्ज्ञ सध्या शुगर ऍपल या बीनबियांच्या फळांसंबंधी अधिक संशोधन करीत आहेत. शुगर ऍपल हे फळ सीताफळाच्या कुळातील आहे. शुगर ऍपल या फळाबाबत संशोधन करताना गेसर यांना लहान आकाराच्या बियांची निर्मिती करणारा जनुक सापडला आहे. त्यामुळे या जनुकासंबंधीच्या संशोधनाचा फायदा बीनबियांच्या सीताफळाची जात विकसित करण्यासाठी होईल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो.
बाजारपेठेतील वाढत मागणी लक्षात घेऊन छत्तीसगड राज्य सरकारने लाख निर्मिती आणि दर्जेदार उत्पादनासंदर्भात संशोधन केंद्र सुरू करण्याचे ठरविले आहे. देशातील लाख उत्पादनामध्ये छत्तीसगडचा वाटा 42 टक्के आहे. दरवर्षी या राज्यात सुमारे सात हजार टन लाखेचे उत्पादन होते. छत्तीसगडच्या बरोबरीने झारखंडमध्येही लाखेचे उत्पादन घेतले जाते. लाखेचा उपयोग व्हार्निश निर्मितीसाठी होतो. संशोधन केंद्राच्या उभारणीबाबत माहिती देताना राज्याचे वनमंत्री विक्रम उसंदी म्हणाले की, राज्यात लाख निर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी ग्रामीण भागातील युवक गटांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचबरोबरीने जंगल उत्पादनांची विक्री करणाऱ्या सहकारी संस्थांनाही या प्रकल्पामध्ये सामील करून घेण्यात आले आहे. या उद्योगामुळे वन परिसरात राहणाऱ्या लोकांना लाख उद्योगातून आर्थिक स्रोत निर्माण होईल. युवक गटांच्या बरोबरीने शाळांमध्येही लाख निर्मिती उद्योगाबाबत माहिती देण्यात येणार आहे. येत्या काळात वन आधारित उत्पादनांच्या गुणवत्ता वाढीसाठी आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.
-------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
केरळ हे राज्य पर्यटनाच्या बरोबरीने मसाला पिकांच्या...
सातारा जिल्ह्यातील गोळेवाडी (ता. कोरेगाव) येथील ना...
पूर्वहंगामी ऊस लागवडीत पिकाची वाढ होत असताना थंडीच...
पीक संरक्षण हा शैती व्यवसायातील महत्त्चाचा घटक आहे...