एका ढगाकडून दुसऱ्या ढगाकडे, हवेकडे अथवा जमिनीकडे विद्युतप्रवाह वेगाने प्रवाहित झाल्यास वीज कडाडते. दर वर्षी विजा पडण्यामुळे शेकडो नागरिकांना, तसेच गुरा-ढोरांना प्राण गमवावे लागतात, यात शेतकरी दगावण्याची संख्या सर्वांत जास्त आहे. विजा कोसळून होणाऱ्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्रात ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू हे शेतमजूर, शेतकरी व शेताजवळ काम करणाऱ्या व्यक्तींचे होतात. विजा कोसळत असताना निघणाऱ्या शलाकांच्या संपर्कात आल्याने अनेक शेतकरी गंभीर जखमी देखील होतात. शक्तिशाली असलेल्या विजामुळे जीविताला धोका होतो, तसेच मालमत्तेचे नुकसान होते. पाऊस नसतानाही स्थानिक हवामानामुळे कडाडणाऱ्या विजा घातक ठरतात. याशिवाय आवाज न होता पडणाऱ्या विजा शक्तिशाली, विध्वंसक असतात.
१) विजा चमकत असताना, शेतातील कामे त्वरित थांबवावीत.
२) वाहत्या पाण्यात किंवा ओल्या भिंतीजवळ थांबू नये.
३) मोकळ्या मैदानावर अथवा उंच टेकडीवर फेरफटका मारण्याचा मोह टाळावा.
४) विजा चमकताना दिसू लागताच पक्क्या, कोरड्या, बंदिस्त अशा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
५) पाऊस नसला तरी विजांचा लखलखाट दिसला किंवा ढगांचा गडगडाट ऐकू आला तरी सर्व कामे थांबवून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
६) उंच किंवा बुटक्या अशा कुठल्याही झाडाखाली विजा चमकत असताना किंवा पावसात आसरा घेऊ नये.
७) झाडाला मोकळ्यावर जनावरे बांधून ठेवू नयेत किंवा जनावरांना भिजत उघड्यावर सोडू नये.
८) जनावरांचे गोठे, घरांचे छप्पर धातूच्या पत्र्याचे असल्यास तातडीने धातूचे पत्रे काढून त्याऐवजी एसबेस्टोसचे किंवा प्लॅस्टिकचे पत्रे बसवावेत. स्वतःचे पशुधन व कुटुंब सुरक्षित करावे.
९) शक्य असल्यास द्राक्ष, फळबागांमध्ये वेली चढविण्यासाठीचे मंडप उभारण्यासाठी धातूच्या खांबांऐवजी बांबू किंवा प्लॅस्टिकच्या मजबूत पाइपचे खांब वापरावेत, तसेच मंडपात धातूच्या तारा, जाळ्या वापरण्याऐवजी नायलॉनच्या दोऱ्या व नायलॉनच्या जाळ्यांचा वापर करावा.
१०) शेतातील आसऱ्याच्या ठिकाणापासून धातूचे तुकडे, धातूचे पाइप, धातूच्या सळ्या, धातूची अवजारे दूर ठेवावीत. अनावश्यक धातूच्या वस्तूंचा साठा टाळावा.
११) ट्रॅक्टर, चारचाकी व दुचाकी वाहने यांचे वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी पार्किंगचे शेड एसबेसस्टोसचे किंवा प्लॅस्टिकचे पत्र्याचे असावे.
१२) विजेचे मीटर, पंप व तो चालू-बंद करण्याचे बटन आदी पावसाच्या पाण्याने भिजणार नाही याची काळजी घ्यावी. ओल्या हाताने ते बंद किंवा सुरू करताना अनेक अपघात होतात यासाठी स्वयंचलित टायमर असलेले पंप किंवा रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या बटनांचा उपयोग ते बंद-चालू करण्यासाठी करता येऊ शकतो.
१३) सुरक्षिततेसाठी लायटनिंग अरेस्टर अथवा कंडक्टर, योग्य उंच ठिकाणी बसवून वाड्या, पाड्या तसेच गावातल्या वस्तीच्या ठिकाणची हानी टाळता येईल. त्या बाबत आग्रहासाठीचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे करता येऊ शकतो. गाव-वर्गणीतून देखील असे उपक्रम शेतकरी राबवू शकतात.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द र...
आपत्तीच्या मालिकेत वीज कोसळणेही सामील आहे. दरवर्षी...
मेंदुज्वर हे माणसाच्या मणक्यातील जलाचे व मेंदुला अ...
कृत्रिम श्वासोच्छ्वासाने वाचू शकतो वीज कोसळलेल्या ...