অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हवामानबदलात आंबा मोहोराचे संरक्षण...

हवामानबदलात आंबा मोहोराचे संरक्षण...

हापूस आंबा मोहोर

आंब्याला मोहोर येण्याच्या कालावधीत थंडीच्या चढ-उतारांमुळे पुनर्मोहोराचे प्रमाण वाढते. पुनर्मोहोरामुळे आंबा काढणीचा हंगाम लांबतो. योग्य प्रकारे कीटकनाशकांचा वापर न केल्यास या वेळी फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. ज्याप्रमाणे फळपिकांच्या विविध जाती असतात, त्याचप्रमाणे त्यांचे नुकसान करणाऱ्या किडींच्यादेखील विविध जाती असतात. गेल्या वर्षी तुडतुड्यांच्या आम्रीतोडस अटकिनसोनी या प्रजातीपेक्षा आयडिओस्कोप्स निओस्पारसस ही प्रजाती अधिक प्रमाणात आढळून आली.
थंडी संपल्यानंतर उन्हाळा वाढू लागतो. हवेत कीड, उष्णतेचे प्रमाण वाढू लागते व फळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. या कालावधीमध्ये फळांची वाढ झपाट्याने होते. मात्र, मागील वर्षी मार्च महिन्यात व त्या आधीच्या वर्षी एप्रिल महिन्यात तापमानामध्ये अचानक पाच ते सहा अंश से.ची वाढ झाली. आदल्या दिवशी असलेले तापमान 36 अंश से.वरून अचानक 41 ते 42 अंश से.पर्यंत वाढले. जर तापमानात अचानक वाढ झाली, तर अपक्व फळे मोठ्या प्रमाणावर गळतात.
या वर्षीसुद्धा कोकणामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला, तसेच ऑक्‍टोबर महिनाअखेरपर्यंत पाऊस पडत होता, त्यामुळे मोहोरासाठी आवश्‍यक असणारी थंडी सुरू होण्यासाठी उशीर झाला. योग्य थंडी नसल्याने, तसेच जमिनीमध्ये ओलावा असल्याने बहुतांशी आंबा बागांमध्ये पालवी (सर्वसाधारणपणे 80 टक्के) आल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरवात झाल्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया थंडावली.
यंदा डिसेंबर महिन्यामध्ये थंडीस सुरवात झाल्यानंतर किनारपट्टीच्या भागामधील 10 ते 15 टक्के बागांमध्ये सध्या आंबा बागांमध्ये मोहोर येण्यास सुरवात झाली आहे. आजमितीस असलेल्या वातावरणामध्ये फारसा बदल न झाल्यास पॅक्‍लोब्युट्राझोल दिलेल्या बागांना जानेवारी महिन्यामध्ये मोहोर येण्याची शक्‍यता आहे. गेल्या आठवड्यापासून कोकणामध्ये थंडीचा जोर वाढू लागला. सुमारे चार ते पाच दिवस सातत्याने कमी तापमान नोंदविले गेले. पुन्हा नंतरचे दोन दिवस वातावरण ढगाळ होऊन तापमानात वाढ झाली. दोन दिवसांनी वातावरण निवळले व पुन्हा थंडी वाढली आहे. एकंदरीत या वर्षी आंबा पीक कसे असेल हे यापुढे महिनाभरातील वातावरण कसे राहील, यावर बहुतांशी अवलंबून असेल.

आंबा उत्पादनाची पंचसूत्री

बदलत्या हवामानात हापूस आंब्याची उत्पादकता वाढविणे हे एक प्रकारचे आव्हानच आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आंब्यासाठी एक पंचसूत्री तयार केली आहे, ज्यामध्ये गरजेवर आधारित छाटणी व मध्य फांदीची विरळणी, खतांचा संतुलित वापर (जून महिन्यात 10 वर्षांवरील प्रत्येक झाडास 50 किलो शेणखत, 1.50 किलो नत्र, 500 ग्रॅम स्फुरद आणि 1.0 किलो पालाश - सल्फेट ऑफ पोटॅशमधून), पॅक्‍लोब्युट्रॉझॉल या संजीवकाचा वापर (15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये 10 वर्षांवरील झाडांना वाढीच्या सरासरी विस्ताराच्या प्रमाणात पॅक्‍लोब्युट्रॉझोलची मात्रा प्रति मीटर विस्तारास 0.75 ग्रॅम पॅक्‍लोब्युट्रॉझोल म्हणजेच तीन मि.लि. पॅक्‍लोब्युट्रॉझोल), आंबा मोहोराचे संरक्षण (तक्ता क्र. 1मध्ये दिल्याप्रमाणे) व वाढणाऱ्या फळांचे व्यवस्थापन या गोष्टी व्यवस्थापनाच्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

वाढणाऱ्या आंबा फळांचे व्यवस्थापन


  • तिसऱ्या ते सहाव्या फवारणीच्या वेळी दोन टक्के युरियाची फवारणी केल्यास फळगळ कमी होऊन फळांचा आकार वाढतो.
  • फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर शक्‍य असल्यास प्रत्येक झाडाला 150 ते 200 लिटर पाणी द्यावे. 15 दिवसांच्या अंतराने अंदाजे तीन ते चार पाण्याच्या पाळ्या दिल्यास फळगळ कमी होऊन फळांचा आकार वाढतो. फळधारणेपासून 75 ते 80 दिवसांनंतर पाणी देऊ नये.
  • फळांना आकर्षक रंग येण्यासाठी, तसेच उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (13ः0ः45) या विद्राव्य खताच्या एक टक्का तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी (10 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट प्रति लिटर पाण्यात) फळे वाटाणा, गोटी आणि अंडाकृती आकाराची असताना करावी.
वरील पंचसूत्रीचा अवलंब केल्यास बदलत्या वातावरणामध्ये देखील हापूसपासून चांगले उत्पादन मिळू शकेल.
बाबी संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्या दृष्टीने विद्यापीठामध्ये प्रयोग सुरू आहेत. आंब्याची लागवड केल्यानंतर छाटणी न करता झाड तसेच वाढू दिल्यास त्याचा आठ ते दहा मीटरपेक्षा जास्त विस्तार होतो, तसेच ते भरपूर उंच होते. अशा झाडांचे व्यवस्थापन करणे अवघड होते. या झाडांवर योग्य प्रकारे फवारणी करता येत नाही, फळांची काढणी करणे कठीण व खर्चिक बनते. आंब्याच्या 20 वर्षांवरील मोठ्या झाडांची मार्च महिन्यात 1/3 छाटणी करून पुन्नरुज्जीवन करण्याचे प्रयोग विद्यापीठात यशस्वी झाले असून, तशी शिफारस देखील करण्यात आली आहे. याहीपेक्षा उंची कमी करण्याचे व सध्या असलेल्या जास्त अंतरावर लावलेल्या बागांचे घन लागवडीमध्ये रूपांतर करण्यासाठीचे प्रयोग सुरू आहेत. असे केल्याने आंबा कलमांचे व्यवस्थापन अधिक सुलभपणे योग्य प्रकारे करता येऊ शकेल. 

संपर्क ः 02358 - 282415, विस्तार ः 218
(लेखक उद्यानविद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate